साहसी पत्रकारितेबद्दल नेहा दीक्षित यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

साहसी पत्रकारितेबद्दल नेहा दीक्षित यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व हरियाणा राज्यातील पोलिस कोठडीतील आरोपींचे मृत्यू आणि कायदा धाब्यावर ठेवून कोणालाही तुरुंगात डांबण्याची पोलिसांची दमनशाही य

‘शेवटी माझे नाव तर स्टॅलिनच आहे!’
दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता
अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हे दाखल करा : मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व हरियाणा राज्यातील पोलिस कोठडीतील आरोपींचे मृत्यू आणि कायदा धाब्यावर ठेवून कोणालाही तुरुंगात डांबण्याची पोलिसांची दमनशाही याचा पर्दाफाश करणारे वृत्तांकन केल्याबद्दल नेहा दीक्षित यांना २०१९च्या ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अॅवार्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. नेहा दीक्षित यांची पत्रकारिता अत्यंत धाडसाची असून त्यांना हा असा पुरस्कार देणे आमचा सन्मानच असल्याचे प्रशस्तीपत्र ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’ने दिले आहे.

नेहा दीक्षित ‘द वायर’साठीही सातत्याने पत्रकारिता करत असून जानेवारी २०१९मध्ये त्यांच्या A Chronicle of the Crime Fiction That is Adityanath’s Encounter Raj, या ‘द वायर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने खळबळ माजली होती. नेहा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या १४ व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध घेऊन उत्तर प्रदेशचे पोलिस कायदा धाब्यावर बसवून कोणालाही कसे अटक करतात, कुणावरही खोटे गुन्हे कसे लावतात व त्यांचा चकमकीत कसा मृत्यू होतो यावर प्रकाशझोत टाकला होता.

त्याचबरोबर नेहा यांनी ‘For Haryana Police, the Holy Cow Is an Excuse for Extra-Judicial Killings’ या वृत्तांकनात हरियाणामध्ये गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून १६ व्यक्तींचे पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यू याचा सखोल वेध घेतला होता.

नेहा दीक्षित यांच्या पत्रकारितेने आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्ह्यांना कशी वाचा फोडली याचाही उल्लेख ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’ने केला आहे. पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यू व कोणतेही सबळ कारण न देता कुणालाही तुरुंगात डांबण्याची पोलिसांची मानसिकता आणि त्यामागचे राजकीय हेतू यांना उघड केल्याने गेल्या जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीने भारत सरकारला एक पत्र लिहून अशा प्रकारांविषयी चिंता व्यक्त केली होती, याकडे ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’ने लक्ष वेधले आहे.

नेहा दीक्षित यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा बडगा दाखवत उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना दहशतीखाली ठेवण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे कारनामेही उघडकीस आणले होते. ‘In Run up to 2019, NSA Is the Latest Weapon Against Muslims in UP’ या वृत्तांकनात नेहा दीक्षित यांनी उत्तर प्रदेशात जातीय दंगली झाल्यानंतर हिंदू समाजकंटकांना सोडून फक्त मुस्लिमांना रासुकाखाली कशी अटक केली जाते याकडे लक्ष वेधले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0