मुंबई : भाजपचा हेतू भेसूरपणे समोर आला आहे, मात्र काळ बदलत असतो, तो तुमच्याशी अधिक निघृणपणे वागू शकतो, अशा शब्दात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यां
मुंबई : भाजपचा हेतू भेसूरपणे समोर आला आहे, मात्र काळ बदलत असतो, तो तुमच्याशी अधिक निघृणपणे वागू शकतो, अशा शब्दात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आणि शिवसेना संपत असल्याचे आणि प्रादेशिक पक्ष संपत असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी आज सकाळी केले होते. त्यानंतर ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली.
ठाकरे म्हणाले, “जे. पी. नढ्ढा यांचे विधान गंभीर आहे. प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता संपवण्याचे भाजपचे कारस्थान भेसूरपणे समोर आले आहे. म्हणजे आम्ही इतर पक्षांना संपवू, असा त्याचा अर्थ आहे. त्यांचा हेतू समोर आला आहे. त्यांना हुकुमशाही हवी, असा याचा अर्थ आहे.”
ठाकरे पुढे म्हणाले, “राजकारण घृणास्पद होत आहे. विरोधकांना संपवण्याचे काम सुरू झाले आहे. विरोधकांना वाट्टेल ते करून अडकवायचे प्रयत्न सुरू आहे. दिवस बदलत असतात. कदाचित काळ तुमच्याशी अधिक निघृणपणे वागू शकतो.”
ठाकरे म्हणाले, की राजकारण यापूर्वी बुद्धिबळाचा खेळ समजला जात होता. आता केवळ बळाचा वापर सुरू झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला जात आहे.
दुसरे विरोधी पक्ष संपर्कात आहेत. बघू पुढे काय होते ते, असे ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांना अटक झाल्याबद्दल ठाकरे म्हणाले, “संजय राऊत यांच्यावर अभिमान आहे. झुकणारे तिकडे गेले. जे खरे शिवसैनिक आहेत, ते आमच्याबरोबर आहेत. संजय माझा जुना मित्र आहे. मी आत्ताच त्याच्या घरी गेलो होतो. ”
ठाकरे म्हणाले, की जे जे तिकडे गेले ते सगळे हमाम मध्ये गेले आहेत. सत्तेचा फेस उतरला की त्यांनाही समजेल. ते म्हणाले, “माझ्याबरोबर असणारे दमदार आणि इमानदार आहेत.”
COMMENTS