दिल्लीत धान्य बाजाराला लागलेल्या आगीत ४३ होरपळले

दिल्लीत धान्य बाजाराला लागलेल्या आगीत ४३ होरपळले

नवी दिल्ली : शहरातील धान्य बाजारातील राणी झाँसी मार्गावरील एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ४३ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली. बहुतांश जणांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळाले नसले तरी या कारखान्याच्या इमारतीला ‘फायर क्लियरेंन्स’ प्रमाणपत्र मिळालेले नव्हते आणि या इमारतीमध्ये आग रोखणारी कोणतीही उपकरणे नव्हती असे दिल्ली अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. या दुर्घटनेत ५० जण बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिल्लीतील धान्य बाजार हा अत्यंत गजबजलेला भाग असल्याने तेथे दाटीवाटीने इमारती उभ्या आहेत. ज्या कारखान्याला आग लागली त्या इमारतीमध्ये बॅग, प्लास्टिक व बायडिंगची कामे सुरू होती. त्यामुळे आग पसरत गेली आणि इमारतीतील लोकांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. त्यात प्रचंड धूरामुळे श्वास गुदमरून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

आग लागल्याचे कळल्यानंतर काही वेळातच दिल्ली अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या कारखान्याचा मालक रेहान हा बेपत्ता असून त्याचा भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारच्या या भीषण दुर्घटनेने दिल्ली हादरून गेली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस व भाजपच्या अनेक नेत्यांना झालेल्या घटनेबद्दल शोकसंवेदना प्रकट केली. केजरीवाल आगीचे वृत्त कळताच लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रु. तर जखमींना एक लाख रु.ची मदत जाहीर केली. तर पंतप्रधान कोषातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रु. व जखमींना प्रत्येकी ५० हजार रु. देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पक्षातर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रु. तर जखमींना प्रत्येकी २५ हजार रु. देण्याची घोषणा केली आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांनी कोणतीही परवानगी नसताना हा कारखाना सुरूच कसा राहिला असा सवाल दिल्ली महापालिकेला केला आहे.

COMMENTS