दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत

दगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत

"हिंदूंनी गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले,” माझ्या फोनवरून जाळपोळीची छायाचित्रे पुसून टाकत एका हिंदू गटाचा सदस्य म्हणाला.

दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल
दिल्लीत काँग्रेसचा आत्मघात की भाजपविरोधी खेळी?

नवी दिल्लीउत्तरपूर्व दिल्लीमध्ये हिंदुत्ववादी गट आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शने करणारे लोक यांच्यातील हिंसाचारामध्ये काल दिल्ली पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबलसह १३ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी मौजपूरजवळच्या घोंडा भागात दगडफेक आणि जाळपोळ झाली.

वस्तीच्या पलिकडे द वायरच्या प्रतिनिधीला तोडफोड झालेली आणि जाळलेली वाहने, जाळलेली दुकाने आणि अजूनही जळत असलेली वाहने दिसली. हिंदुबहुल क्षेत्राच्या सीमेवर पोलिस उभे होते मात्र वाहने जळताना त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या म्हणण्याप्रमाणे हिंसाचार रात्रभर सुरू होता, अनेक दुकाने फोडण्यात आली होती. “आज सकाळी सुद्धा या भागात दगडफेक झाली,” एका रहिवाशाने सांगितले.

दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भाग.

दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भाग.

ज्या भागाच्या पलिकडे मुस्लिमबहुल गल्ल्या आहेत त्याला ‘सीमा’ म्हटले जात आहे. त्या भागाच्या जवळ अनेक तरुण मुले आणि पुरुष लोखंडी सळया, लाकूड आणि दगड घेऊन फिरताना दिसत होते. त्यांनी दोन ई-रिक्शांना आग लावली तेव्हा ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. दोन टेम्पो अगोदरच जळत होते. पोलिस लांबून पाहताना दिसत होते, पण त्यांनी जाळपोळ थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

जेव्हा एका गटाने मला जळत्या वाहनांची छायाचित्रे घेताना पाहिले, तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि मारहाणीची धमकी देत ती सगळी पुसून टाकायला लावली.

एका ईरिक्शाचा चालक अश्रफ म्हणाला, “माझे स्वतःचे घर आहे तिथे, पण मी तिकडे जाऊ शकत नाही. ते जाळून टाकतील घरही. पोलिस काहीही करणार नाहीत. माझं जगणं या रिक्षेवर अवलंबून आहे, आणि तिला गमावणं मला परवडणार नाही.”

अफसान हेअर-कटिंग सलूनमध्ये रात्री तोडफोड केली गेली. “कुणीतरी मला सकाळी ७ वाजता उठवून सांगितले की दुकान फोडलंय,” इतस्ततः पसरलेल्या काचा आणि खुर्च्यांचे अवशेष गोळा करताना दुकानाचा मालक सांगत होता.

त्याच्या दुकानाच्याच समोर, एक मोबाईल दुकानाचा मालक एका तुटक्या खुर्चीवर बसून रडत होता. “मी १ लाख रुपये कर्ज घेऊन दुकान काढलं. आता सगळंच नष्ट झालं आहे. मी तर सीएएविरोधी निदर्शनातही सामील नव्हतो,” तो म्हणाला.

एका चौकाच्या जवळ एका हिंदू मालकाचे कपड्यांचे दुकानही उद्ध्वस्त केले गेले. त्याची कार मारुती एर्टिगा जाळली.

एका चहाच्या दुकानात, कपाळी टिळे लावलेल्या माणसांचा एक गट जमला होता. एक जण म्हणाला, “मी या मुसलमानांना आता सोडणार नाही. एक जरी दिसला तरी मी त्याला जिवंत जाळीन.” दुसरा म्हणाला, “पण जाळलेली सगळी दुकाने आणि ऑटो तर त्यांच्याच होत्या.” पहिला म्हणाला, “त्यांनी स्वतःचीच दुकाने जाळली आहेत, आपल्यावर नाव टाकायला आणि डोनाल्ड ट्रम्पच्या समोर भारताचं नाव खराब करायला.”

या भागातील रहिवाशांच्या मते, काल संध्याकाळी दगडफेकीने या हिंसाचाराला सुरुवात केली. तिथले मुस्लिम सांगतात, हिंदू जमावाने हिंसाचाराला सुरुवात केली तर हिंदू म्हणतात दगडफेक मुस्लिमांनी सुरू केली आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले.

रात्री दगडफेक थांबली, पण सकाळी पुन्हा सुरू झाली. त्यात दोन्ही बाजू सहभागी होत्या. आत्ता हिंसाचार थांबला आहे पण तो भाग खूप तणावाखाली आणि अस्वस्थ आहे. जमाव रस्त्यांवर पहारे देत आहेत आणि पोलिस अनुपस्थित आहेत.

मेट्रो सेवा स्थगित आहे, ऑटो आणि ईरिक्शावाले त्या भागात जायला नकार देत आहेत. फोनवर कोणी छायाचित्रे तर घेत नाही ना याकडे जमाव सतर्क होऊन लक्ष ठेवत आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या जमावांनी परवापासून अनेक सेल फोन फोडले आहेत.

“हिंदूंनी आता गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले. तुम्ही पत्रकार असाल तर घरीच थांबायला हवे होते. आम्ही कालपासून बऱ्याच पत्रकारांना झोडपलंय,” मी घेतलेली जळत्या ऑटोंची छायाचित्रे माझ्या फोनवरून पुसून टाकत एकजण म्हणाला.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0