अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव

अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने गुरुवारी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेत त्यांना राजधर्माच्या रक्षणासाठी आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करावा व अमित शहा यांना पदावरून हटवावे अशी विनंती केली.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला व अन्य नेते उपस्थित होते. या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सादर केलेल्या पत्रात दिल्लीत झालेल्या दंगलीत सार्वजनिक संपत्तीची झालेली लूट, सामान्य नागरिकांचा बळी जात असताना दिल्ली पोलिस व केंद्र सरकारचे त्याकडे मूकपणे पाहणे, याचा उल्लेख केला आहे. दिल्लीतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाला स्वत: पावले उचलावी लागली, हिंसाचार पसरवण्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश द्यावे लागले, दिल्ली पोलिस व गृह खात्याला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागली, हा सगळा घटनाक्रम काँग्रेसने राष्ट्रपतींपुढे विशद केला व त्यांचे लक्ष वेधले.

दिल्लीतील दंगल केंद्र सरकार, गृहखाते व खुद्ध गृहमंत्री यांच्यासाठी लाजीरवाणे आहे असाही आरोप काँग्रेसने या पत्रात केला आहे.

दरम्यान, नंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींनी राजधर्माचे संरक्षण करण्यासाठी आपले अधिकार वापरावेत अशी विनंती केली.

मूळ बातमी

COMMENTS