नवी दिल्लीः गेल्या वर्षी सीएए आंदोलनादरम्यान आंदोलकांवर निशाणा साधणारे वक्तव्य केल्यानंतर ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती पण तसे वक्तव्य पुन्हा गरज भास
नवी दिल्लीः गेल्या वर्षी सीएए आंदोलनादरम्यान आंदोलकांवर निशाणा साधणारे वक्तव्य केल्यानंतर ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती पण तसे वक्तव्य पुन्हा गरज भासल्यास आताही करण्याची आपली तयारी असल्याचे विधान भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी सोमवारी केले. जर रस्ते अडवले जातील, लोकांची कामे थांबवली जातील, मुलांना शाळेपासून जाण्यापासून रोखले जाईल तेव्हा हा कपिल मिश्रा आंदोलकांच्या विरोधात पुन्हा उभे राहील व तो तयार असेल, असेल असे कपिल मिश्रा म्हणाले.
दिल्ली दंगलीला एक वर्ष झाले आहे. पण मी पुन्हा बोलतोय की २३ फेब्रुवारीला जे केले ते गरज भासल्यास पुन्हा करेन, असेही मिश्रा म्हणाले.
‘डेल्ही रॉयट्स 2020- द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने कपिल मिश्रा यांनी वादग्रस्त विधाने केली. झालेल्या घटनेचा मला कोणताही पश्चाताप नाही, पण दिनेश खटीक, अंकित शर्मा व अन्य जणांचे मी प्राण वाचवू शकलो नाही, ही खंत त्यांनी बोलून दाखवली. गेल्या प्रजासत्ताक दिनादिवशी जो हिंसाचार झाला त्याचे एक मॉडेल असल्याचा दावा करत निदर्शने ते दंगा असे हे मॉडेल आहे, असाही दावा मिश्रा यांनी केला. लोकशाहीत अंतिम इशारा देणे याचा काय अर्थ आहे, असे म्हणत मिश्रा यांनी दंगलखोर पोलिसांना असा अंतिम इशारा देऊ इच्छितात का, असा सवाल केला.
‘डेल्ही रॉयट्स 2020- द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तक वकील मोनिका अरोडा, दिल्ली विद्यापीठातील शिक्षक सोनाली चितळकर व प्रेरणा मल्होत्रा यांनी लिहिले आहे. या कार्यक्रमास दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तवही उपस्थित होते.
गेल्या वर्षी ‘डेल्ही रॉयट्स 2020- द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक चर्चेत आले ते प्रकाशक ब्लूम्सबरी यांनी हे पुस्तक छापण्यास नकार दिल्यामुळे. या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशनाला कपिल मिश्रा यांना बोलावल्यामुळे त्यावर टीका झाली. त्यानंतर हे पुस्तक गरुड प्रकाशन प्रायवेट लिमिटेडने प्रकाशित केले.
गेल्या वर्षी दिल्लीत दंगल भडकण्याच्या अगोदर २३ फेब्रुवारीला कपिल मिश्रा यांनी एक व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओत ते मौजपूर सिग्नलपाशी सीएए समर्थकांच्या गर्दीला संबोधित करत होते. या व्हीडिओत ईशान्य दिल्लीचे डीसीपी वेदप्रकाश सूर्या उपस्थित होते. या वेळी कपिल मिश्रा म्हणाले होते की, ते (सीएएविरोधक) दिल्लीत तणाव निर्माण करू पाहात आहेत. त्यामुळे रस्ते बंद केले जात आहे. त्यांनी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही दगडफेक केलेली नाही. आमच्यापुढे डीसीपी उभे आहेत आणि त्यांना मी तुमच्यातर्फे सांगू इच्छितो की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारतात असेपर्यंत आम्ही या भागात शांतता पाळू. तोपर्यंत जर रस्ते मोकळे झाले नाहीत तर आम्ही तुमचेही (पोलिस) ऐकणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल
मूळ बातमी
COMMENTS