शाहीन बागमध्ये आजादीच्या गाण्यांनी नव्या वर्षाचे स्वागत

शाहीन बागमध्ये आजादीच्या गाण्यांनी नव्या वर्षाचे स्वागत

शाहीन बागमधील निदर्शने दिल्लीच्या थंड हवेत उष्णता निर्माण करत आहेत.

ती अगदी सहजपणे, कसलाही गाजावाजा न करता सुरू झाली. जामिया मिलिया इस्लामियावर हल्ला झाला त्या रात्री, दहा महिला त्यांच्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यांच्या घराच्या जवळच्या, दिल्ली आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्या. काहीही झाले तरी इथून हलायचे नाही हा निश्चय करून.

स्वतःला जाहिल आणि अशिक्षित म्हणवणाऱ्या या महिला, जसे ९० वर्षे वयाच्या पणजीबाई, ज्यांना त्या भारतीय असल्याचे सिद्ध करायला सांगितले जात आहे, किंवा ५५ वर्षे वयाची आई, जिने मुलाला शिकवले खरे परंतु पुढे काहीच भविष्य नाही हे आता लक्षात येऊ लागले आहे, किंवा एक तरुण स्त्री, जिचे २० दिवसांचे बाळ आहे आणि भविष्य असे अनिश्चित होऊन बसले आहे, या सगळ्या तिथे अजूनही बसल्या आहेत. डिसेंबरमधल्या दिल्लीतील असह्य थंडीला तोंड देत, संविधानाच्या रक्षणासाठी आणि त्या ज्याला कलम की लडाई म्हणतात त्या लढ्यासाठी.

त्या दिवशी, त्या रस्त्यावर काही तास आधी नवीन नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काहीशे तरुण मुलांचा एक निषेधमोर्चा होता. पण तो फार काळ चालला नाही. त्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी एका बाजूने दगड आणि दुसऱ्या बाजूने रबरी गोळ्यांचा मारा करून त्याला दडपून टाकले.

पण जेव्हा या मुलांच्या मागोमाग या १० स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि जिथे हिंसाचार झाला त्या पादचारी पुलापासून काही अंतरावर त्यांनी एक ठिकाण निवडले, तेव्हा त्यांच्या त्या निदर्शनाचे स्वरूप, पोत आणि अर्थ स्वाभाविकपणे बदलून गेले. तरुण पुरुषांनी त्यांच्या भोवती एक संरक्षक कडे केले आणि शाहीन बाग आंदोलनाची निर्मिती झाली.

आणखी स्त्रिया येत गेल्या, पुरुष आले, एक तंबू ठोकण्यात आला. जेव्हा समूह आणखी मोठा झाला तेव्हा एक स्टेज उभारण्यात आले जिथे तरुण, वृद्ध, पुरुष, स्त्रिया, मुले भारतीय संविधान शिकू लागली, आणि त्याचे रक्षण करण्यासाठीच्या दीर्घ लढ्याबाबतही समजून घेऊ लागली.

सगळीकडच्या सार्वजनिक बैठकांमध्ये, जेव्हा स्टेजच्या समोर गर्दी जमा होते तेव्हा गर्दीसमोरच्या व्यासपीठाच्या भोवती काही ना काही राजकारण असते. ते राजकारण केवळ काय बोलले जाते याबद्दलचे नसते तर कुणाला प्रवेश मिळतो याबद्दलही असते – कोण दिसते, कोण गर्दीला संबोधित करते, किती काळ आणि कोणत्या क्रमाने. शाहीन बागमधल्या मंचाचेही राजकारण आहे, आणि त्याचा भाव आणि त्याचा व्यवहार हे दोन्हीही या देशासारखेच निर्धारपूर्वक लोकशाहीवादी आणि गोंधळाचे आहे.

निदर्शनांचे हे १८ दिवस आणि रात्री शाहीन बागच्या मंचावर अनेक कवी आणि प्राध्यापक, गृहिणी आणि वृद्ध, नागरि समाज गट आणि नेते, अभिनेते आणि सेलिब्रिटी आणि अर्थातच विद्यार्थी – जामिया, जेएनयू, स्थानिक सरकारी शाळांमधले विद्यार्थी येऊन गेले आहेत.

रोज भाषणे आणि व्याख्याने तर होतातच, पण शायरी आणि रॅपही सादर केले जाते. शाहीन बागमध्ये सूत्रसंचालकांचे प्रमुख काम केवळ बोलण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांची रांग करणे एवढेच असते.

आणि त्यात ज्या क्वचितच घराबाहेर पडतात, सार्वजनिकरित्या कधीच बोलत नाहीत अशा महिलांचाही मोठा सहभाग असतो. कधीकधी एखादी राजकारणी व्यक्तीही येते, जसे एकदा सलमान खुर्शीद आले. पण ते फार काळ थांबत नाहीत.

शाहीन बाग मंचावर राजकारणी लोक, शायरीसाठी प्रसिद्ध असलेले स्थानिक वयस्कर आजोबा, आणि धर्म कोणताही असला तरी आपण सगळे कसे एकच आहोत याबद्दल आत्ताच कविता रचून ती म्हणून दाखवणाऱ्या पोनीटेलमधल्या शाळकरी मुली हे सगळे आपली १५ मिनिटे मिळवण्यासाठी झगडतात.

शाहीन बाग व्यासपीठ थोडेफार पक्षपाती असेलच तर ते स्त्रियांच्या बाजूने आहे आणि अशा अभ्यासकांच्या बाजूने जे जनतेला केवळ सीएए-एनआरसी-एनपीआर बद्दलच नव्हे तर स्वातंत्र्यलढा, आंबेडकर, गांधी आणि संविधानाच्या प्रस्तावनेतील कल्पनांबद्दलही माहिती देऊ शकतात.

व्यासपीठाच्या बाजूला सीएए-एनआरसीमधला संबंध दर्शवणारा एक फ्लोचार्ट आहे. आंबेडकरांचे एक मोठे पोस्टर लावले आहे, ज्यामुळे नोएडाकडे जाणाऱ्या रस्त्याची पाटी काहीशी झाकली गेली आहे.

त्या दिवशी ज्या पादचारी पुलावर हिंसाचार झाला, त्याच्या कडेने आणि खाली आता लांबलचक बॅनर लावले आहेत. विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या भोवतीचे कुंपणही आता निषेध कला आणि विरोध कवितांची लोकांची गॅलरी बनले आहे.

मध्यरात्री लाऊडस्पीकर बंद होतो तेव्हा २ अंश सेल्सियस थंडीत लोक चित्रपट पाहतात. डिटेंशन सेंटरबद्दलचा बीबीसी माहितीपट किंवा १९८१ मध्ये बनलेली Lion of the Desert, जी लिबियन आदिवासी नेता ओमर मुख्तारने मुसोलिनीच्या लष्कराशी कसा लढा दिला त्याची कथा सांगतो. पुन्हा पुन्हा हा संदेश दिला जातो, की हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा मुद्दा नाही.

ही भारताला नरेंद्र मोदी आणि अमित शहांपासून वाचवण्याची लढाई आहे आणि एक तत्त्व, वारसा, आणि रणनीती म्हणून ही लढाई अहिंसक असली पाहिजे.

स्त्रिया शाहीन बाग आंदोलनाचे हृदय आणि आत्मा आहेत, आणि आंदोलनाचे हातपाय आहेत समर्पित तरुण कार्यकर्त्यांची फौज, जी दिवसरात्र शिफ्टमध्ये काम करतात. सुरक्षितता आणि आंदोलनाची शांततामय सत्यनिष्ठा जपणे ही दोन त्यांची प्रथम कर्तव्ये आहेत.

यापैकी एक मोहम्मद रमीझ. २२ वर्षांचा हा तरुण दिल्ली विद्यापीठात बीकॉम करत आहे. तो म्हणतो, “इथे काही गडबड होऊ नये याकरिता आम्ही अनेक टीममध्ये काम करत आहोत. एकदा आम्हाला अभाविपसारख्यांचा एक गट आत शिरतोय अशी खबर मिळाली, पण आम्ही ठामपणे पण सौजन्याने त्यांना ‘त्यांचे फोन दुरुस्त करण्यासाठी’ दुसरीकडे जा म्हणून सांगितले. रस्त्यावरच्या या बंद असलेल्या शोरूम तुम्ही पाहत आहात, आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेला – शटर, पाट्या, सीसीटीव्ही कॅमेरे – हात लावला जाणार नाही याची काळजी घेतो. तुम्हाला ‘NO-CAA’ ग्रॅफिटी सगळीकडे दिसतील, पण या शटरवर एकही दिसणार नाही.

१९ वर्षीय मोहम्मद रिझवान जामियामध्ये इंटीरियर डिझाईन करतो. तो म्हणाला, “अरे, पोलिससुद्धा आम्हाला सांगतात की या आंदोलनावर ते खूष आहेत. आम्ही त्यांना जेवणखाण देतो, बसायला जागा देतो आणि त्यांना वापरण्यासाठी आम्ही एक तात्पुरते स्वच्छतागृहही बनवले आहे.” रुग्णवाहिकांना जायला रस्ता मिळावा म्हणून निदर्शकांनी एक गल्ली रिकामी ठेवली आहे.

रिझवानने पुढे सांगितले, “त्या दिवशी आम्ही एका रुग्णवाहिकेला जायला रस्ता दिला, तेव्हा त्यांनी आम्हाला खूप धन्यवाद दिले आणि म्हणाले असे आंदोलन त्यांनी कधी पाहिले नाही.”

महिला पहिल्यांदा रस्त्यावर येऊन बसल्या त्या पहिल्या दिवसापासूनच हितचिंतकांनी खाद्यपदार्थ, चहा, शेकोटीसाठी जळण, उबदार ब्लँकेट, मॅट्रेस, हीटर, पाणी, वैद्यकीय वस्तू शाहीनबागमध्ये पोहोचवल्या आहेत. कधीकधी नवरे घरात स्वयंपाक कोण करणार म्हणून कुरकूर करतात, पण त्यांना लगेचच गप्प केले जाते आणि ते शाहीन बागमधील इतरांसारखेच रस्त्यावरच जेवण करतात.

“लोक आमच्याकडून पैसे घ्यायला नकार देतात,” रिझवानने सांगितले. वस्तू शाहीन बागमध्ये अशाच येत राहतात. “या मॉलमधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिम दुकानदारांना हंगाम असताना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत, पण तरीही तेही आमच्या समर्थनार्थ येतात. त्यांच्यापैकी एकजण कुटुंबासह रोज येतो. एक शीख मनुष्य दुसऱ्याच दिवशी अन्नपदार्थ आणि इतर वस्तू घेऊन आला होता,” रमीझ म्हणाला.

रिझवानने सांगितले, अगदी फरीदाबादपासून ते जवळच्या सरिता विहार आणि जसोला या बिगरमुस्लिम वसाहतींमधूनही मदत आली आहे. “हे मुस्लिम आंदोलन नाही. जवळपास राहणारे आमचे बिगरमुस्लिम मित्र आणि वर्गमित्र आम्हाला रोज मदत करतात आणि समर्थनार्थ येतात. आम्ही तिथेही असे काही करावे असे त्यांना वाटते.”

जेव्हा पॉश साऊथ दिल्लीमधील लोक येतात तेव्हा शाहीन बागमधले रहिवासी कधीकधी त्यांना धन्यवाद देतात आणि ते लोकही त्यांना धन्यवाद देतात. ‘No-CAA’ आणि ‘no-NRC’ हे स्टिकर स्थानिक कॅफे, एटीएमचे दरवाजे इथे तर दिसतातच, पण ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजच्या टोप्यांवरही ते दिसले. छोट्या रस्त्यांवरून मुले “इन्किलाब” आणि “आजादी”च्या घोषणा देत पळापळ करतात. एकदा एकजण मोठ्याने “हिंदू मुस्लिम सिख्ख सिपाही” असे ओरडत होता.

राजकीय संबंध असलेले काही जुन्या प्रभावी स्थानिक संयोजकांना आंदोलनात जागा मिळत नसल्यामुळे ते नाराज होऊन कुरकूर करत असतात. आंदोलनाला शांत करण्यासाठी ते पोलिसांना मदत करू इच्छितात, पण पोलिस म्हणतात, तुम्हीच करा. पण आंदोलनाच्या मागे शाहीन बाग आहे, ही त्यांची मोठी समस्या आहे. या स्त्रियांशी थेट बोलण्याची कोणीच हिंमत करत नाही. आणि नेता नसल्यामुळे, संपर्क तरी कुणाला करायचा?

तंबूमध्ये, मंचापासून काही फूट अंतरावर ९० वर्षांच्या एक आजी आहेत. त्यांच्या तोंडाचे बोळके झाले आहे. त्या म्हणतात, “माझ्या मुलाचे नाव फैजान आहे, त्याच्या वडिलांचे नाव इम्तियाझ, त्यांच्या वडिलांचे नाव होत फक्रुद्दिन, त्यांच्या वडिलांचे रियाझ, त्यांच्या वडिलांचे अकबरुद्दिन. मोदींना येऊ दे इथे आणि विचारू दे मला मी इथली आहे का ते. मी दाखवते त्यांना.”

त्यांच्या शेजारच्या ५५ वर्षीय महिलेने मला सांगितले, “आमच्यासारख्या गरीबांना स्थलांतर करावे लागते तेव्हा आम्ही कपड्यांचे बोचके आणि उचलून नेता येईल असे सामान घेऊन बाहेर पडतो. ते आम्हाला आमची कागदपत्रे मागणार आहेत? आता बास झाले. आता त्यांनी इतकेसे जरी काही केले तरी आम्ही रस्त्यावर येऊ. ही देशाची लढाई आहे. आम्ही आत्ता शांत बसलो तर आम्हाला अल्लाकडे जाब द्यावा लागेल. त्यापेक्षा मी आत्ता बोलून मी जिथे जन्मले त्या देशासाठी प्राण देईन. मोदी चारीठाव जेवतात तरी त्यांनी थंडी वाजते. आम्ही फक्त नमक रोटी खातो, तरी आम्ही आगीत जळत आहोत.”

COMMENTS