आपली कला जगवली पाहिजे व आपणच त्याचे पाईक आहोत, असा हरीश कुमारचा आग्रह होता. अनेक सार्वजनिक ठिकाणी स्त्री-वेषधारी नृत्याविष्कार का करतात असा खोचक प्रश्न हरीशला विचारला जात असे. अशा लोकांच्या कलाबाह्य प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा त्याने आपल्या कलेवर लक्ष केंद्रीत केले. आपल्या कलेला एक सामाजिक दर्जा मिळावा यासाठी स्वतःला वाहून घेतले.
‘आज मेरे कदम थिरक नही पायेंगे, क्योंकी हमारी कला को नयी पेहचान देनेवाला सदा के लिए चला गया है, मैनें कई बार उसके साथ स्टेज पर परफॉर्म किया है, बार बार वही याद आ रहा है…’, गुलाब सपेरा या आंतरराष्ट्रीय लोककलावंताची हरीश कुमार ऊर्फ क्वीन हरीश यांच्या अपघाती मृत्यूनंतरची प्रतिक्रिया!
हरीश कुमार गेल्या रविवारी जोधपूरनजीक एका मोटार दुर्घटनेत मरण पावले. त्यांच्या अशा दुर्दैवी अपघाती मृत्यूची बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की जगभरातील लोककलावंतांना, साहित्यिकांना, नाट्य कलावंताना तो जबर धक्का होता. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक कलाकारांनी या कलावंताच्या आठवणी जागवल्या. ‘डेझर्ट क्वीन’ अशा नावाने ओळखले जाणाऱ्या या कलावंताचे राजस्थानच्या लोककलेतील असाधारण महत्त्व अनेकांनी अधोरेखित केले.
हरीश कुमार हे राजस्थानच्या लोककलेतील एक आदराचे नाव होते. राजस्थानच्या लोककलेतील नृत्यशैलीला आज जी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा लाभली आहे, त्याचे बरेचसे श्रेय हरीश कुमार याच्या बहारदार लोकनृत्याला दिले जाते. राजस्थानातील सुतार जातीत जन्मास आलेल्या हरीशचे आईवडील १३व्या वर्षी असतानाच वारले. एवढ्या लहान वयात आई-वडीलांचे कृपाछत्र हरवल्यानंतर हरीश यांच्यावर बहिणींच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आणि त्यातून पोटापाण्यासाठी त्यांनी नृत्यकलेला जवळ केले.
एखाद्या पुरुषाने स्त्री वेषात नृत्य करणे याकडे समाजाची नजर दूषित असते. पण हरीशने समाजाच्या अशा बुरसट मानसिकतेची पर्वा न करता, लहानपणापासून भीड न बाळगता, स्त्री वेषातून नृत्याचे विविध आविष्कार सादर करण्यास सुरवात केली. स्वतःचे बहुतांश बालपण राजस्थानमधील मांगनीयार या पारपंरिक लोकनृत्य करणाऱ्या जमाती बरोबर घालवले. पण नंतर घुमर, कालबेलिया, भवाई अशा विविध राजस्थानी लोकनृत्याचे कसबही आत्मसात केले. त्यावर स्वत:चा ठसा उमटवला.
राजस्थानच्या प्रत्येक लोकनृत्यात त्यानी आपली वैशिष्ट्यपूर्ण अदाकारी सादर करत ही कला जगभरात नेली. अगदी जपान, कोरियामध्ये त्याचे शिष्यगण होते. या देशातही काही काळ आपल्या शैलीच्या नृत्यकलेचे वर्ग घेतले होते. कलेशी असलेल्या तादात्म्य भावातून त्यांनी स्वत:चे नाव बदलून ‘क्वीन हरीश’ असे ठेवले. याच नावाने ते फेसबुक, ट्विटरवर लोकप्रिय आहेत. त्यांचे हजारो फॉलोअर्स याची साक्ष देतात.
हरीश कुमार जागतिकीकरणाचे एक अपत्य होते असे म्हणावयास हरकत नाही. लोककलेला जो साचेबंदपणा आला होता, त्याला एक मर्यादित विश्व होते, त्या विश्वाला हादरे देत जागतिकीकरणाने एक मोठा अवकाश प्राप्त करून दिला. २००० सालानंतर टीव्ही, इंटरनेट, समाज माध्यमे अशा विविध माध्यमांमुळे हरीशची कला बहरली, विकसित होत गेली, आणि तिला विविध आयाम मिळाले. सुमारे ६० देशात ही राजस्थानी नृत्यकला सादर केली व नवा प्रेक्षक वर्ग मिळवला.
२०१० साली ‘इंडिया गॉट टँलेट’ या टीव्ही शोमध्ये त्यांनी भाग घेतला तेव्हा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. बॉलीवूड चित्रपटात तृतीयपंथी नर्तक मुजरा करण्यास उत्सुक नसतात; पण हरीश कुमार यांनी आपल्या कलेला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्रपट पडद्याचाही उपयोग करून घेतला. प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ चित्रपटात त्यांनी आयटम साँग केले. मध्यंतरी ईशा अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने उदयपूर येथील कार्यक्रमात त्यांचे ऐश्वर्या राय-बच्चन व त्यांची मुलगी आराध्या सोबतचा नृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रचंड गाजला होता.
आपली कला जगवली पाहिजे व आपणच त्याचे पाईक आहोत, असा हरीश कुमारचा आग्रह होता. अनेक सार्वजनिक ठिकाणी स्त्री-वेषधारी नृत्याविष्कार का करतात असा खोचक प्रश्न विचारला जात असे. पण अशा प्रश्नांकडे ते दुर्लक्ष करत असतं. अशा लोकांच्या कलाबाह्य प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा त्यांनी आपल्या कलेवर लक्ष केंद्रीत केले. आपल्या कलेला एक सामाजिक दर्जा मिळावा यासाठी त्यांचा सततचा ध्यास असे. आपली कला केवळ लब्धप्रतिष्ठितांसाठी नसून ती सामान्यांसाठीही तेवढीच आस्वादक आहे या तळमळीने त्यांचे काम सतत चालू असे.
जयपूरमध्ये गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे साहित्य संमेलन भरत असते, या संमेलनात हरीश यांची नृत्यकला नेहमीच आकर्षणाची ठरली. त्यांचे चक्री, भवाई, तराजू, तेरहा ताली व घुमर हे नृत्याविष्कार पाहण्यासाठी जगभरातील कलावंत, रसिक उपस्थित राहात असतं. हरीश कुमार हे भारतीय लोककलेचे एक संचित होते त्यांच्या जाण्याने लोककलेची हानी झाली असली तरी त्यांच्या कलेचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायकच ठरेल.
०००
मान्यवरांनी वाहिलेली श्रद्घांजली
हरीश कुमार हे लोकनृत्याचे एक विद्यापीठ होते. सामान्य हरीश ते लोकप्रिय झालेला हरीश या दरम्यानचे त्याच्यामधील माणूसपण मी अगदी जवळून पाहिले होते. रंगमंचाचा एकदा ताबा घेतल्यास हरीशचे नृत्य पाहणे हा स्वर्गीय अनुभव असायचा. रंगमंचावर त्याचे बहारदर नृत्य म्हणजे एक सळसळती ऊर्जा, एक सकारात्मक दृष्टीकोन व चिरंतन आनंदाचा अनुभव असायचा. त्याचे असे अकाली जाणे हे भारतीय लोककलेचे मोठे नुकसानच आहे कारण त्याने राजस्थानी लोकनृत्य जगाच्या रंगमंचावर नेले होेते. – विल्यम डँलरमपेल – प्रसिद्ध इतिहास संशोधक.
००००००
हरीश कुमारसोबत एक कार्यक्रम करावा यासाठी माझी बोलणी चालली होती. माझा बँड व राजस्थानातील अनेक लोकनृत्य कलाकार यांचा मिळून एक कार्यक्रम करण्याची आमची कल्पना होती. हरीश रंगमंचावर असायचा तेव्हा तो त्याच्या सहकलाकारांमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचा. त्याच्यामुळे रंगमंच जिवंत वाटायचा. या कलाकाराने राजस्थानचे लोकनृत्य तसेच देशाच्या सीमा ओलांडल्या; जगाने त्याच्या कलेला दाद दिली. हरीश केवळ कलाकार नव्हता तर तो साहसी आणि बेडर माणूस होता, अनुकंपा त्याच्या स्वभावात होती. पण त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूने आपण एक मोठा कलावंत गमावल्याची माझी भावना आहे.
राम संपत – संगीतकार
००००
एखाद्या कलाकारासोबत अनेक वर्ष काम करणे व एकाएकी तो आपल्यातून कायमचा जाणे हे मनाला पटत नाही. हरीश हा गारुडी होता. सततचा प्रवास व कार्यक्रम असा त्याचा दिनक्रम असे. महिन्यातून चार दिवस तो विश्रांती घेत असे. रोज संध्याकाळी तीन तास तो कार्यक्रम करत असे आणि प्रत्येक कार्यक्रमाला किमान २०० प्रेक्षकांची उपस्थिती असे. त्याच्या नृत्यसाधनेने तो लोकप्रिय होताच; त्याची कीर्ती जपान व कोरियामध्येही पसरली होती. तेथे त्याने क्लासेसही सुरू केले होते. त्याचे जाणे हे माझे व्यक्तिगत नुकसान आहे असे मी समजतो.
– मयांक भाटिया, द क्वीन हरीश शो या टीव्ही कार्यक्रमाचा सूत्रधार.
मूळ लेख येथे वाचा.
COMMENTS