जयपूरः काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान दिल्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना निरुपयोगी व बि
जयपूरः काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आव्हान दिल्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना निरुपयोगी व बिनकामाचा (निक्कमा और नकारा) अशा शिव्या दिल्या होत्या. पायलट यांच्यावरचा हा शाब्दिक हल्ला अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. पण हेच गेहलोत आता पायलट व त्यांच्यासोबत गेलेले १९ बंडखोर काँग्रेस आमदारांशी समेट करण्याच्या तयारीत आहेत. जर काँग्रेस हायकमांड या बंडखोरांना माफी देत असेल तर या सर्वांचे पक्षात स्वागत आहे, असे गेहलोत म्हणू लागले आहेत.
गेहलोत यांच्या भूमिकेमध्ये आलेला बदल राज्यपाल कलराज मिश्रा यांनी विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टला बोलावण्यास मंजुरी दिल्यानंतर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या पायलट यांनीही अधिक टोकाची भूमिका घेतलेली दिसत नाही.
गेहलोत यांनी बंडखोर काँग्रेस आमदारांविरोधातही काही विधाने केलेली नाहीत. आता काँग्रेसचे सर्व आमदार १४ ऑगस्टपर्यंत जैसलमेरमधील एका हॉटेलात राहतील व तेथून पुढील रणनीती ठरवली जात आहे. पण गेहलोत यांनी भाजप व मायावती यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदारांच्या घोडेबाजार हाताबाहेर गेला, आमदारांची किंमत अमर्याद वाढवली जात असल्याचेही वक्तव्य त्यांनी भाजप व मायावतींना उद्देशून केले होते.
आता १४ ऑगस्टला विधानसभेत होणार्या शक्तीप्रदर्शनात कस दाखवण्याची वेळ गेहलोत यांच्यावर आली आहे. गेहलोत यांच्याकडे ९९ आमदार आहेत. पूर्वी त्यांनी १०९ आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यात अपक्ष, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन व कम्युनिस्ट पार्टीचा एक असे आमदार होते. पण काही वृत्तांनुसार १०९ आमदारांपैकी ९२ आमदार जैसलमेरमध्ये पोहचले असून ७ पैकी ४ मंत्री जयपूरमध्ये आहे व ते नंतर जैसलमेरला पोहचतील असे सांगण्यात येत आहे. एक आमदार भंवरलाल यांची प्रकृती चिंताजनक असून ते अविश्वासदर्शक ठरावादरम्यान उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे २०० सदस्यांची राजस्थान विधानसभा १९९ सदस्यांची होईल आणि बहुमताचा आकडा १०० राहील. पण या घडीला गेहलोत यांच्यामागे ९९ आमदार आहेत.
दुसरीकडे भाजपकडे ७२ आमदार असून त्यांच्यासोबत राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे ३ आमदार आहे. बसपाचे ६ व पायलट गटाचे १९ आमदार यांचा पाठिंबा भाजपला मिळाल्यास त्यांची संख्या १०० होते. हा आकडा काँग्रेसपेक्षा एकाने जास्त आहे.
सत्तेवर पुन्हा दावा सांगण्यासाठी गेहलोत यांच्याकडे एक आमदार कमी आहे. तो मिळवण्यासाठी गेहलोत यांची बंडखोर काँग्रेस आमदारांविषयीची भूमिका मवाळ झालेली आहे.
या घडीला हिंदीभाषिक पट्ट्यातील राजस्थान राज्य हातातून घालवण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस नाही. त्यामुळे हे राज्य हातातून जाऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
अगोदर बंडखोर आमदारांचे सदस्यत्व निलंबित होईल यावर गेहलोत समाधानी होते आता ते काँग्रेसचा चेहरा वाचवण्याच्या प्रयत्नात अधिक दिसत आहेत.
बंडखोर आमदारांनीही काँग्रेसशी तडजोडीचे संकेत दाखवले आहेत. सचिन पायलट यांनी राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष गोविंद दोतासरा यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष काँग्रेस बंडखोर आमदारांच्या भूमिकेवर कोणताही भेदभाव न बाळगता, दबाव न बाळगता विचार करेल अशी अपेक्षा केली आहे.
पायलट गटातील एक आमदार गजेंद्रसिंग शेखावत यांनी पायलट जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका घेतली आहे. आम्ही पक्ष सोडण्याची भाषा कधीही केली नव्हती. जर काँग्रेसने व्हीप काढला तर मी नक्कीच अधिवेशनाला जाईन व माझा आवाज पक्षामध्ये उठवेन असे त्यांचे विधान आहे.
मूळ लेख
COMMENTS