देशभंजक नायक

देशभंजक नायक

मोदी आणखी पाच वर्षं राहिले तर जगातील सर्वात मोठी लोकशाही टिकू शकेल काय? अतिरिक्त लोकानुनयामुळे जे लोकशाही देश लयाला जातील त्यातील भारत हा पहिला देश असेल!

नकवींच्या निवृत्तीनंतर भाजपचा एकही मुस्लिम सदस्य संसदेत नाही
भाजपला टाटाकडून ३५० कोटींची देणगी
राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण

(टाइम मॅगॅझिनच्या मुखपृष्ठावरील ‘DIVIDER IN CHIEF’ या शीर्षकाचा आतिश तासीर यांचा लेख मुग्धा कर्णिक यांनी वायर मराठी साठी अनुवादित केला आहे. )

गुजरातचे मुख्यमंत्रीपद अनेक वर्षं भोगल्यानंतर २०१४मध्ये हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी लोकसभेचा प्रचंड बहुमताचा कौल मिळून निवडून आले. असे प्रचंड बहुमत गेल्या तीस वर्षांत कुणालाही मिळाले नव्हते. इथपर भारतावर मुख्यतः काँग्रेसचीच सत्ता होती. स्वातंत्र्यानंतरच्या ६७ पैकी ५४ वर्षांत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याच पक्षाची सत्ता होती.

आज भारत, पुन्हा मोदी आणि भाजपच सत्ता गाजवणार की नाही याचा निर्णय देण्यासाठी मतदान करतो आहे. साडेपाच आठवडे चालणारा हा जंगी कार्यक्रम, सात टप्प्यांत पार पडणार असून पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठा मतदार समुदाय- ९० कोटी जनता – मतदान करणार आहे.

मतदान प्रक्रियेच्या या प्रचंड आवाक्याचे सखोल भान येण्यासाठी केवळ राजकारणच नव्हे, तर देशात खोलवर दडलेल्या सांस्कृतिक विग्रहांचीही माहिती असायला हवी. मोदींच्या कहाणीच्या अगदी सुरुवातीच्या अध्यायांकडे आपण लक्षपूर्वक पाहिले तरच आपल्याला मोदी अपरिहार्य का ठरले तेही कळेल, आणि आता आपत्ती का ठरले हे सुद्धा समजू शकेल.

या देशात जे घडते आहे त्यातून लोकानुनयाचा स्तर जसा दिसतो त्याचबरोबर कल्पनारम्य मिथ्थ्यकथा कशी घडत जाते हेही झर्रकन दिसून जाते. भारतातच नव्हे, तर टर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिका या देशांतली लोकानुनयी राजकारणातून बहुसंख्यकांना नाहक असुरक्षिततेच्या भावनेने कसे घेरले जाते हे समजून घेणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही. या राजकारणाच्या खेळ्यांतून जे जग आकाराला येते आहे, ते ना न्याय्य आहे ना आकर्षक!

स्वांतत्र्यप्राप्तीनंतरच ही कहाणी सुरू होते. १९४७मध्ये ब्रिटिश अंमलाखालील भारताचे दोन तुकडे झाले. भारतीय मुसलमानांसाठी पाकिस्तानची भूमी आखून देण्यात आली. पण भारताचे नेतृत्व केंब्रिजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंकडे होते, आणि भारत हिंदूंचा देश म्हणवला जाऊ नये असाच निर्णय त्यांनी घेतला. फाळणीनंतरही देशात भरपूर मुस्लिम जनता होती. (३ कोटी ५० लाख तेव्हा आणि आता जवळपास १७ कोटी मुसलमान आहेत.) नेहरूंनी त्यांच्या आदर्शवादा नुसार या नवजात देशाला निधर्मी राष्ट्र म्हणून ओळख दिली. हा निधर्मवाद केवळ धर्म आणि राज्यव्यवस्था यांच्यातील फारकत म्हणूनच नव्हता, तर राज्यव्यवस्थेने सर्व धर्मांना सारखा दर्जा, सारखी वागणूक द्यावी ही अपेक्षा हे भारतीय निधर्मवादाचे वैशिष्ट्य होते. अनेक टीकाकारांच्या मते या अपेक्षेला ऑर्वेलियन संदर्भ लाभतो आणि काहीजण काहीजणांपेक्षा अधिक समान आहेत अशी सामाजिक रचना होऊ लागते. भारतीय मुसलमानांना शारियत वर आधारलेला कौटुंबिक कायदा लागू होतो – त्यामुळे पुरुषाला आपल्या पत्नीला तीन वेळा ‘तलाक तलाक तलाक’ म्हणून, जेमतेम मोबदला देऊन सोडता येते. मात्र हिंदू पुरुषांना सुधारित कुटुंब कायदा लागू होतो. त्यांची पूजास्थळे शासनाच्या ताब्यात जातात हा ही फरक होता.

(हा तथाकथित त्रिवार तोंडी तलाकचा प्रकार २०१८मध्ये कायद्याच्या कक्षेत आणून तो गुन्हा ठरेल यासाठी मोदींनी निर्णय घेतला.)

नेहरुंचे राजकीय वारस स्वातंत्र्यानंतरचा बहुतांश काळ देशाचे शासक होते. लोकशाही तत्वे आणि प्रथा पाळणे हे जरी वरवर दिसत असले तरीही हा एक संरजामी घराणेशाहीचाच भाग होता. भारतातील ही राजवट उच्चभ्रूशासित, आंग्लाळलेली, रस्त्यावरच्या लुंग्यासुंग्यांची भीती बाळगणारी होती. २०१४मध्ये ही भिंत पडली, दारे उघडली आणि भाजप, मोदींच्या नेतृत्वाखाली ५४३पैकी २८२ जागा निवडून लोकसभेत जिंकून आला. काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या. देशातील हा सर्वात जुना पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही प्रभावी काम करू शकला नाही.

लोकानुनयी नेते दोन छटांचे असतात.

– काही नेते टर्कीचा एर्डोगान किंवा ब्राझीलचा बोल्सोनारो यांच्याप्रमाणे त्यांच्या जनतेतूनच पुढे आलेले असतात.

– दुसऱ्या प्रकारातले लोकांशी थेट काहीही संबंध नसूनही, केवळ लोकांच्या लालसा, आकांक्षांचे भांडवल करून पुढे आलेले असतात. (अशा नेत्यांत शॅम्पेनप्रिय निओनाझी आहेत- ब्रेक्झिटवाले, डॉनल्ड ट्रम्प, पाकिस्तानचा इम्रानखान).

नरेंद्र मोदी निश्चितपणे लोकांतून पुढे आलेले आहेत. चहावाल्याचा मुलगा! त्यांची निवड म्हणजे एका परीने वर्गसंघर्षाचा विद्रोहच म्हणता आला असता. अमेरिकन इतिहासकार ऍन ऍपलबॉम म्हणतात ‘लोकांमध्ये त्यांना माहितही नसलेल्या, न पार करता येणाऱ्या दऱ्या असतात, पण त्यांना आपले एकमेकांत पटत नाही याची कल्पनाच नसते.’ या प्रकारच्या अनभिज्ञतेचा शोध लागण्याची ही निवड होती असे म्हणता येईल. या अगोदरही लोकांमध्ये राजकीय मतभेद होते, पण मोदींच्या निवडीमुळे लोकांमधील सांस्कृतिक दरी उघड झाली. पार न करता येणारी खोलखोल घळ! यात डावे किंवा उजवे हा प्रश्न फारसा उरला नाही. अतिशय मूलभूत तत्त्वांचा हा फरक होता असे उघड झाले.

देशाची अगदी प्राथमिक अशी परंपरा, भारतीय प्रजासत्ताक राज्याची वैशिष्ट्यपूर्ण घडण, देशाचे संस्थापक, अल्पसंख्यांकांचे स्थान, देशातील विद्यापीठांपासून, कॉर्पोरेट कंपन्यांपासून, माध्यमांपर्यंतच्या सर्व संस्था या सर्वांवरच अविश्वास दाखवण्याचे सत्र सुरू झाले. स्वतंत्र भारताची थोर मानचिन्ह समजल्या जाणाऱ्या निधर्मवाद, उदारमतवाद, मुक्त-निर्भय पत्रकारिता या सर्व गोष्टी म्हणजे देशातील हिंदूंविरुद्ध असलेले कारस्थान असल्याची चर्चा सुरू झाली. इस्लाम, इसाई या एकेश्वरी धर्मांच्या साथीला, या देशात न रुजलेल्या उच्चभ्रूंनी ही हिंदू बहुसंख्यांकांविरुद्ध कारस्थानं चालवली आहेत असा समज पसरवण्यात आला.

मोदींचा विजय हा या अविश्वासाचा परिपाक होता. त्यांनी नेहरूंसारख्या देशसंस्थापक व्यक्तीवर हल्ला चढवायला सुरुवात केली. देशापुढील पवित्र मानल्या गेलेल्या आदर्शवादी मूल्यव्यवस्थांवर, नेहरूप्रणित निधर्मीवाद, समाजवाद यावर हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची भाषा सुरू केली, हिंदू मुस्लिमांमध्ये बंधुत्वाची भावना असण्याची गरज आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी अगदी स्पष्टच बोलून दाखवायला सुरुवात केली.

त्यांच्या या राज्यारोहणामुळे एक गोष्ट अगदी उघड्यावर आली. अनेक सुसंस्कृत, उच्चस्तरातील लोकांना जी संस्कृती उदार-बहुविध वाटत होती, ती तशी नव्हती. या देशाच्या मुशीतील रसायनाच्या वरवरच्या शांत-उदार पृष्ठाच्या तळाशी धार्मिक राष्ट्रवाद उकळत होता, मुस्लिमद्वेष! जातीयद्वेष खोलवर मुरला होता. या देशाला राजकीय हेतूने पेटवलेल्या जातीय, धार्मिक दंग्यांचा फार मोठा इतिहास आहेच. १९८४मध्ये इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांची हत्या केल्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवर २७३३ शिखांच्या हत्या केल्या गेल्या. काँग्रेसचे नेतृत्व अगदी निर्दोष होते असे नाहीच, पण तरीही त्यांनी निधर्मीवादाचा पुनरुच्चार करत राहून झुंडीच्या हिंसाचारापासून पक्षाला अलग राखण्यात यश मिळवले. पण मोदींनी मात्र २००२च्या गुजरातमधील दंग्यांनंतर कानठळ्या बसवणारे मौन बाळगले होते. इतके की इतिहासातले ढोंग तरी बरेच बरे असे वाटू लागले. आळ्डस हक्सले म्हणतो त्या प्रमाणे ‘ राजकारणातले ढोंगी निदान काही मूल्ये त्यांच्या राजकीय निकडीपेक्षा, आर्थिक गरजांपेक्षा श्रेष्ठ आहेत एवढे तरी मान्य करीत असतात.’ मोदींनी कोणतेही पर्यायी नीतीमूल्य न देताच भारतापुढील आदर्श कल्पना मोडीत काढल्या आणि सर्व नीतीमूल्ये जणू संस्कृती आणि स्तर यांच्यासाठी असलेल्या लढाईपुढे दुय्यम असल्याचे प्रस्थापित केले.

त्यांच्या अमदानीत पूर्वी श्रेष्ठ मानलेले सारे आदर्श जणू राज्यकर्त्या उच्चभ्रूंनी केलेला पोकळपणा आहे असेच कथन तयार होऊ लागले. २०१९मध्ये मोदींनी ट्वीट केले- ‘त्यांच्या दृष्टीने माझा गुन्हा काय आहे माहीत आहे? गरीब कुटुंबात जन्मलेली व्यक्ती त्यांच्या घराणेशाहीला कसे काय आव्हान देते?’ ते पुन्हा एकदा २०१४ची क्रांतीकारक बदलाची वातावरण निर्मिती करण्याच्या खटपटीत आहेत. यातील ‘त्यांच्या’ला संदर्भ आहे तो भारतातील इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा! ते काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत असे ते सूचित करतात. ‘सल्तनत’ या शब्दाचा वापर करून ते काँग्रेस ही विदेशी राजवटीचे वारसदार आहे असे सुचवून कुत्र्यांना छू करण्याचे तंत्र वापरतात. या देशाचा कब्जा ब्रिटिशांनी १८५८नंतर घेतला, त्यापूर्वी येथे मुस्लिम राज्यकर्ते होते – आणि आता पुन्हा गर्वोन्नत हिंदूंचा उदय होऊ नये म्हणून हे लोक काम करीत आहेत असे त्यांनी शिताफीने सूचित केले आहे.

२०१४मध्ये मोदींनी सांस्कृतिक आघाडीवर असलेल्या सार्वत्रिक संतापाला आर्थिक प्रगतीच्या वचनांनी एकवटून आणले. ते नोकऱ्यांबद्दल बोलत, विकासाबद्दल बोलत. समाजवादी राज्यव्यवस्थेवर त्यांनी काढलेले उद्गार प्रसिद्ध झाले- ते म्हणाले गवर्न्मेंट हॅज नो बिझनेस बिइंग इन बिझनेस- शासनाने उद्योगधंद्यात असण्याचा धंदा करू नये. आता खरंही वाटणार नाही पण ती निवडणूक अनेक दृष्टीने एक आशादायक निवडणूक होती. १९९२मध्ये अयोध्येत सोळाव्या शतकातील मशीद नष्ट केल्याची घटना घडली होती, पण २०१४मध्ये दिल्लीच्या पत्रकारांनी जेव्हा मोदींच्या मतदारापुढे अय़ोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचा प्रश्न टाकला तेव्हा त्यांनी संतप्त होऊन उलटा प्रश्न केलेला- आम्हाला मंदिरांबद्दल का विचारताय- आम्ही त्यांना मत देणार कारण आम्हाला विकास हवा आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ ही मोदींची तेव्हाची घोषणा होती.

आज जेव्हा भारतीय मतदानास उतरत आहेत, तेव्हा या शब्दांचे फोलपण कुणाच्याही लक्षात येत चालले आहे. मोदींचा आर्थिक चमत्कार प्रत्यक्षात आला नाहीच, पण देशात जहरी धार्मिक उन्मादी राष्ट्रवादाचे वातावरण तेवढे त्यांनी तयार केले. त्यांच्या पक्षाचा एक तरुण नेता तेजस्वी सूर्य आपल्या मार्च २०१९च्या भाषणात अगदी धडधडीत म्हणतो, ‘तुम्ही मोदींबरोबर असलात तर देशभक्त आहात. मोदीबरोबर नसलात तर तुम्ही देशद्रोह्यांनाच ताकद देत आहात.’

भारतीय मुस्लिमांची लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या १४ टक्के आहे, आणि त्यांना एकामागोमाग एक हिंसक घटनांना सामोरे जावे लागले आहे. अनेकदा हिंदूंना पवित्र समजल्या जाणाऱ्या गोमातेच्या नावाने हिंदूंच्या झुंडी, बरेचदा शासनाच्या छुप्या पाठिंब्याने त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करत आहेत… क्वचित एखादा महिना असल्या झुंडींच्या हल्ल्यांचे व्हिडिओ स्मार्टफोनच्या स्क्रीन्सवर पाहिल्याविना जात असेल. २०१७मधले महंमद नईम याला झालेल्या मारहाणीचे दृश्य हे मोदीकाळातील सर्वात अविस्मरणीय ठरावे. रक्तमाखल्या बनियनमधला डोळे विस्फारून झुंडीकडे जीवदान मागणारा तो… अखेर झुंडीने त्याला ठार मारलं. अशा घटनांनंतरचा नेत्यांचा प्रतिसाद अगदी सारखाच ठरीव आहे… ठार शांतता! चिरंतन नैतिक मूल्ये आणि किमान नागर संवेदना यांच्या इतक्या चिंध्या झाल्या आहेत की आता मोदीही या हिंसाचाराला आवर घालू शकणार नाही, दिशा देऊ शकणार नाही. एकदा द्वेषाला अधिष्ठान दिले की मग त्याचे लक्ष्य काय असेल ते मर्यादेत राखता येणार नाही. आणि आता भाजपच्या दुर्दैवाने त्यांना हे कळत चालले आहे की मुस्लिमांविरुद्ध पेटलेला हिंसक द्वेष जातीच्या उतरंडीतल्या खालच्या हिंदूंच्या वाट्यालाही येऊ लागला आहे. या पक्षाला आपले दलित वा खालच्या जातींचे मत गमावणे परवडणार नाही. पण मोदींच्या घरच्या राज्यातच २०१६मध्ये एक अतिशय गलिच्छ घटना घडली. उच्च जातीच्या पुरुषांनी चार खालच्या जातीच्या तरुणांना भर रस्त्यात नागवे करून लोखंडी कांबींनी फटकावले आणि रस्त्यात फिरवले. आरोप होता त्यांनी गाय मारली- त्यांनी मेलेल्या गायीचे कातडे काढले होते.

मोदींची पाटी स्त्रियांच्या प्रश्नांसंबधाने डागाळलेलीच आहे. एकीकडे त्यांनी स्त्रियांची सुरक्षितता हा निवडणुकीतला महत्त्वाचा प्रश्न केला होता (२०१८चा एक अहवाल भारत देश जगाच्या पाठीवर स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित असल्याची नोंद करतो), आणि दुसरीकडे त्यांचा दृष्टीकोन, त्यांच्या पक्षाचा दृष्टीकोन हा पितृसत्ताकवादीच आहे. २०१५मध्ये त्यांनी बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना या ‘स्त्री असूनही’ दहशतवादाचा सामना करतात असे म्हणून घोडचूक केली. मोदींचे उजवे हात अमित शहा सतत स्त्रियांना देवीचं स्थान देत असतात… धार्मिक दिखाऊपणाचाच तो एक भाग आहे, स्त्रियांना देवीची मूर्ती बनवून गप्प बसवून ठेवणे सोयीचे असते. पण तरीही, मोदींनी एका स्त्रीला संरक्षण मंत्री बनवले ही गोष्टही आहेच.

पाश्चिमात्य व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना रुजवून घेताना अनेक ठिकाणी समाज असमतल असल्यामुळे या साऱ्या विसंगती या भारतीय समाजाचाच एक भाग असल्या तरीही मोदींच्या अमदानीत अनेक अल्पसंख्य गट- मग ते केवळ मुस्लिम वा ख्रिश्चन नव्हेत, तर खालच्या जाती आणि उदारमतवादी यांचेही अल्पसंख्य गट विविध प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देत आहेत हे तर दिसतेच. सब का विकास या आपल्या आश्वासनापासून योजने दूर जात मोदींनी काय साध्य केले- तर एक अशी स्थिती, ज्यात प्रत्येक भारतीयाच्या मानगुटीवर आपल्या वेगळेपणाची अस्मिता स्वार झालेली दिसते.

२०१४मध्ये त्यांनी या वेगळे असण्याच्या भावनेचा फायदा घेत एक आशादायक वातावरण तयार केले असे वाटले असेल तर आता २०१९मध्ये ते लोकांना आपापला वेगळेपणा जपण्यासाठी बाकी साऱ्या निराशाजनक परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला सांगताना दिसतात. कदाचित् ते सत्ता टिकवून ठेवतीलही- नेहरूंचे वंशज राहूल गांधीं यांच्या नेतृत्वाखालील विरोधक, कशातूनही काही शिकत नाहीत इतके सुमार आहेत आणि विखुरलेले आहेत, पण मोदी २०१४प्रमाणे आशाआकांक्षा आणि स्वप्नांचे इंद्रधनुष् कधीच पुन्हा उभे करू शकणार नाही. त्या वेळी ते जवळपास प्रेषितच होते, लखलखत्या भविष्याचे आश्वासन- हिंदुत्ववादी प्रबोधनाचे युग एकीकडे आणि दुसरीकडे दक्षिण कोरियासारखा आर्थिक कार्यक्रम. आता त्यांची किंमत केवळ दुसरी एक निवडणूक जिंकू पाहाणारा एक अपयशी राजकारणी इतकीच उरली आहे. बाकी काही असेल नसेल, पण त्यांच्याकडून कुणीही नवी आशा करू शकत नाही.

२०१४मध्ये मी वाराणसी नगरीतील निवडणुकीचे वार्तापत्र केले होते. मोदींनी हा मतदारसंघ निवडला होता, हिंदू कल्पनाविश्वाला नवा आकार देण्यासाठी. जेरुसलेम, रोम किंवा मक्का यांच्या तोडीची धार्मिक वलयाची ही जागा होती, आणि त्यांच्या पुनरुज्जीवनवादी राजकारणाला उपकारक. या निवडणुकीत मी जणू दुभंगलो होतो. माझे वडील पाकिस्तानी मुस्लिम आणि भारतातील इंग्रजीभाषक उच्चभ्रूंतील एक- मला माहीत होते की मोदींच्या भारतात मला जागा असणार नाही. पण तरीही मी मोदींच्या देशाबाबतच्या सांस्कृतिक विश्लेषणाशी भारतात सत्ताधारी कसे असावेत, कसे दिसावेत या कथनाशी सहमत होऊ शकत होतो… उदारमतवाद, डावा विचार हे सारे प्रतिष्ठित सत्ताधारी वर्गाकडूनच येते हा आरोप तसा नव्याने होऊ लागला आहे आणि त्याला मागे सारता येते. पण भारतात गेली अनेक दशके डावे लोक किंवा उदारमतवादी लोक हे एका अतिशय प्रतिष्ठित, संपन्न अशा वर्गातूनच येतात. अगदी अलिकडेपर्यंत उजव्या पक्षाकडे तितका बलवान गट नव्हताच. न्यू इंग्लंड रिपब्लिकन्स नव्हते किंवा जुनाट टोरीज् नव्हते. डावा विचार करणारे बहुतेक सगळे विदेशी विद्यापीठांत शिकून आलेले असतात, तिथे जाऊन या राजकीय वा बौद्धिक फॅशन्स ते उचलत असतात असा समज होणे अगदी सहज शक्य होते.

२०१४मध्ये मोदींनी भारतीय उच्चशिक्षित उदारमतवादी प्रतिष्ठितांना सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचे यशस्वी राजकीय प्रयोग केले- खऱ्या भारताला विकल करण्यासाठी ही विदेशींची कारस्थाने आहेत वगैरे सांगितले गेले. देशातील एक फार मोठा बलवान वर्ग आपल्या कोषात किंवा बुडबुड्यात जगतो आहे हे त्यांचे लाडके लोकप्रिय कथन बनले होते. पण त्याच वेळी खरा भारतही एका विशिष्ट बुडबुड्यात जीवन व्यतीत करतो आहे हे लपवले गेले. नेहरूंनी नेहमीच हे सांगितले होते की भारत स्वतःच्याच रीतीभातींना चिकटून राहून आधुनिक होऊ शकणार नाही. त्याला पाश्चात्यांची गरज आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाची गरज आहे, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाची गरज आहे, परंपारिक जीवनातील अंध समजुती, जादूटोणा या दूर करण्याची गरज आहे. मोदींनी कळतनकळत एक विचित्रच बौद्धिक वातावरण तयार करून ठेवले आहे, ज्यामुळे आज भारतीयांना वाटते आहे की दक्षिण कोरियासारखे यशस्वी होण्याचा मार्ग प्राचीन भारताच्या रम्य इतिहासातूनच जातो.

२०१४मध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय संशोधकांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले, “प्राचीन भारतीयांना अनुवंशशास्त्राची माहिती होती, प्लास्टिक शल्यकर्माची माहिती होती- आम्ही गणेशाची पूजा करतो- त्या काळी नक्कीच कुणीतरी प्लास्टिक सर्जन असला पाहिजे ज्याने हत्तीचे मस्तक मानवी शरीराला जोडले… आणि प्लास्टिक सर्जरीची सुरुवात केली.”

राजकारणापासून, अर्थशास्त्रापर्यंत ते भारताचा अभ्यास करणाऱ्या इंडॉलजीपर्यंत त्यांनी जी काही अनभ्यस्त विधाने केली आहेत त्याचे पर्यवसान भारतात बौद्धिक प्रयत्नांना शत्रूसमान मानण्यात होऊ लागले आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या मंडळावर त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचे विचारक असलेल्या एस्. गुरूमूर्तींना नेमले. कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवतींनी या बाबतीत एवढेच म्हटले की ते अर्थशास्त्रज्ञ असतील तर मी भरतनाट्यम नर्तक आहे. असे म्हणतात की काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी  गुरूमूर्ती यांनीच मोदींना भारताच्या चलनातील ८६% नोटा एका रात्रीत रद्द करण्याचा सल्ला दिला. यातून माजलेल्या अंदाधुंदीतून देश अजूनही सावरलेला नाही. आजकाल मोदी राष्ट्रवादाचा ज्वर वाढवून सत्ता राखण्याची शर्थ करताना दिसत आहेत. आर्थिक विकासाबद्दल फार काही न बोलता राष्ट्राची सुरक्षा, भारत-पाक तणाव यासंबंधातील मुद्दे चावले जात आहेत.

२०१७मध्ये भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात त्यांनी निवडणुका जिंकल्या. या राज्यात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्याही आहे. भाजपने इथे द्वेषमूलक भाषणांची बरसात करणाऱ्या भगवेवस्त्रधारी योग्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. योगी आदित्यनाथांचा चेहरा निवडणुकीच्या वेळी फारसा समोर आणला गेला नव्हता. त्यांची कीर्ती हिंसक, चिथावणीखोर भाषणबाजीसाठी होती. एक हिंदू मारला तर शंभर मुसलमानांना मारू ही भाषा ते स्वतः करीत होते आणि गाडलेल्या मुस्लिम स्त्रियांवरही बलात्कार करू म्हणणाऱ्या एका नेत्याच्या व्यासपीठावर तेही होते.

मोदींनी सातत्याने शैक्षणिक जगतावरही स्वतः पुढारपण करून हल्लाबोल केला आहे. या शैक्षणिक संस्थांमध्ये आता लायकी नसलेले अर्धशिक्षित डेरेदाखल झाले आहेत. भारतातील विद्वत्क्षेत्रात डाव्यांचा प्रथमपासूनच भरणा आहे. पण या संस्थांतील राजकीयतेत बदल करण्याऐवजी  मोदींनी विद्वत्तेच्या निकषांच्या मूलगामी गृहीतकांवरच हल्ला केला. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर)  या संस्थेपासून जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी (जेएनयू) सारख्या ज्या संस्थांनी उत्तमोत्तम राजकारणी आणि विद्वानांची निर्मितीच केली- त्या संस्था पोखरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तेथील प्रशासक, प्राध्यापक या सर्वांची निवड त्यांची राजकीय मते काय आहेत ते तपासून केली जाते, अर्हता दुय्यम!

भारतात आधुनिकता म्हणजे पाश्चात्य प्रभाव असतो अशी टीका मोदींनी करणे योग्यच आहे. कारण फक्त युरोपीय वा अमेरिकन संस्कृतीशी ओळख असलेल्यांनाच वैश्विक कल्पना किंवा तत्वांची माहिती असते असे अजिबातच नाही. पण एक गोष्ट मोदी भारतीयांना कधीच स्पष्ट सांगत नाहीत, सांगणार नाहीत, ती म्हणजे भारताने हिंदू धर्मराष्ट्र व्हायचे आहे की महासत्ता व्हायचे आहे हे ठरवावे. महासत्ता व्हायची मनीषा असेल तर मग मध्ययुगीन भारतातील अंधश्रद्धा, जादूटोणा यांना गाडून टाकलेच पाहिजे. फक्त भारतीयतेचे खरे स्वत्व जपणे पुरेसे नाही.

श्रीलंकेचे सुप्रसिद्ध इतिहासकार ए.के. कुमारस्वामी लिहितात, “भारतात काय, किंवा युरोपात काय, प्राचीन संस्कृतींचे मूल्यावशेष सोडून दिले पाहिजेत. आपण भूतकाळापासून दूर आलो आहोत आणि आता भविष्यातच आपल्याला नांदायचे आहे. पण तरीही आपल्या भूतकाळाची स्मृती जपणे, त्यावर प्रेम ठेवणे यात आपल्या शक्तीचे अधिष्ठान असेल.”

पण मोदींच्या भारतात लोक भूतकाळाला आततायीपणे चिकटून रहाताना दिसत आहेत, ते आधुनिक जगात टिकण्यासाठी सज्ज नाहीत, या लोकांमधील देशासाठी उन्मादी भक्ती म्हणजे देशाबद्दल आत्मविश्वास नक्कीच नाही.

भारतीयांच्या मनात सतत अस्सल आपले काय आणि बाहेरचे काय याबद्दल साशंकता दिसते. यातूनच भारतीय उच्चशिक्षित प्रस्थापितांना देशी असून विदेशी मानले जाते. ‘फॉरेनर्स इन देअर ओन लॅन्ड’ असे शब्द महात्मा गांधींनी वापरले होते. जे लोक विदेशाच्या, विदेशी संस्कृतीच्या कधीच संपर्कात आलेले नाहीत ते सारे लोक, सर्व वर्गांतील, सर्व गटांतील लोक हाच समज जपतात.

भारतातील सर्वात बलशाली युवा संघटना असलेल्या अभाविपचा एक तरुण सदस्य मला वाराणसीत सांगत होता, “आमची संस्कृती दुबळी होत चालली आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोकांकडे कॉमर्सच्या पदव्या आहेत. पण मी माझ्या संस्कृतीच्या निकट रहाण्याची निवड केली. आमच्या संस्कृतीसारखी महान संस्कृती केवळ आमचे लोक सुस्त आहेत किंवा आमच्या विरुद्ध आहेत म्हणूनच पराभूत होऊ शकते. कुणीतरी- कोण ते मी सांगू शकत नाही आमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. विकास आणि विनाश यामध्ये केवळ एका व्यंजनाचा फरक आहे.” हा तरूण हिंदू राष्ट्रभक्त नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे – त्याला वसाहतवादाचा स्पर्श झाला नसला तरीही जागतिकीकरणाचा चेहरा त्याला माहीत आहे. त्यांच्या मनात सतत आपल्याला डावलल्याची जाणीव असावी. त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती हीन मानली जात असल्याची त्यांची भावना झाली आहे. त्यांना वाटते लोकांना हिंदूफोबिया आहे. ते सिक्युलर्स, लिब्टार्ड्स वगैरे शब्द तुच्छतेने फेकतात- ‘न्यू यक् टाइम्स’ म्हणतात. त्यांच्या मनातील सांस्कृतिक हानीची भावना ते राजकीय विचारप्रणालीमध्ये गुंफतात.

त्यांच्या मनात, ‘ते’ म्हणजे मुस्लिम,  कनिष्ठ जाती, भारतीय उच्चभ्रू शिक्षित इ. आतली मंडळी, तर   पाश्चात्य वर्तणुकीचे लोक हे बाहेरचे, असा भेदभाव जागा असतो. गेल्याच महिन्यात अमित शहांनी मुस्लिम निर्वासितांना वाळवीची उपमा दिली. भाजपचे अधिकृत ट्वीटर हॅंडल आता आडून काही करायचीही तसदी घेत नाही. “आम्ही बौद्ध, हिंदू आणि शीख वगळता देशातील सर्व घुसखोरांना हाकलून काढू.” असे त्यांनी लगेच ट्वीट केले. हे पुरेसे नाही म्हणून की काय भोपाळसारख्या हिंदु मुस्लिम दोन्ही धर्माच्या समृद्ध ऐतिहासिक शहरात भाजपने एक हिंदू साध्वी उमेदवार म्हणून उभी केली. एका मशिदीजवळ दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणून त्यात सहा माणसे मारल्याचा आरोप असलेली प्रज्ञा ठाकूर आता जामिनावर आहे. तिच्या उमेदवारीतून अतिरेकी राष्ट्रवाद आणि गुन्हेगारी कशी हातात हात घालून चालते हेच स्पष्ट होत आहे.

मोदींच्या भारतात जुनी व्यवस्था ध्वस्त झाली आहे, पण नवीन व्यवस्था उभारली गेली नाही नाही असे चित्र आहे. मोदी जिंकले आणि कदाचित् पुन्हा जिंकतील – पण साध्य काय होणार? त्यांच्या लोकप्रिय लोकानुनयाचा विशिष्ट ब्रॅन्ड बनला आहे. ज्या भारतीय समाजावर तो आघात करत असतो, त्या समाजाचे प्रतीक आहे काँग्रेस पक्ष! त्यांच्याकडे घराणेशाहीपलिकडे फारसे काहीही नाही… नेहरू-गांधी घराण्याचा आणखी एक सदस्य. भारतातील या जुन्या पक्षाकडे प्रियांका गांधीला राहूलसोबत पाठवण्यापलिकडे फारसे कल्पनाचातुर्य नाही. हिलरी क्लिंटनने २०२०च्या निवडणुकीत उभे रहाताना सोबत चेल्सीला व्हाइस प्रेसिडेंट म्हणून घेतल्यासारखेच ते आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले छोटे-छोटे पक्ष, आणि मोदींचा पराभव करण्यासाठी कोणताच नसलेला ठोस कार्यक्रम अशी विरोधकांची अवस्था आहे. मोदींना इतके दुबळे विरोधक लाभले हे त्यांचे सुदैवच म्हणायचे. तरीही मोदी संशयग्रस्त आहेत आपल्या विजयाबद्दल. कारण त्यांना पक्के माहीत आहे की २०१४ची आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. म्हणून तर ते अंतर्गत शत्रूंच्या मुद्द्यावर सुटले आहेत. इतर लोकानुनयी नेत्यांप्रमाणेच तेही आपल्या व्हाइट हाऊसमध्ये बसून ‘त्यांच्या’ सल्तनतीवर हताश संतापातून ट्वीट करत रहातात.

आणि… भारतीयांच्या मर्यादांचे जणू प्रतीकच असलेल्या या दुराग्रही व्यक्तीच्या हाती भारत दुसऱ्यांदा सत्ता द्यायला सज्ज झाला आहे… स्वतःच्या अपयशाची शिक्षा जगाला देण्यासाठी तो दुराग्रही आणखी कायकाय करेल या विचारानेच थरकाप होतो.

(आतिश तासिर हे कादंबरीकार आहेत, पत्रकार आहेत.)

‘टाइम मॅगॅझिन’च्या सौजन्याने साभार.

मूळ लेख इथे वाचावा.

या अंकामध्येच ‘मोदी हाच भारताच्या अर्थकरणाचा तारक आहे’ अशा आशयाचा लेखही प्रसिद्ध झाला होता. तो येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0