रमाकांत गुंदेचा – धृपद परंपरेचा नामांकित पाईक

रमाकांत गुंदेचा – धृपद परंपरेचा नामांकित पाईक

‘ख्याल' गायकी ही एक प्राचीन परंपरा आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीत हे लोकप्रिय होण्यास या गायकीचा मोठा वाटा आहेच. परंतु ‘ख्याल' या प्रकाराइतकीच आणि बऱ्याच विद्वानांच्या मते त्याच्यापेक्षा प्राचीन अशी धृपद गायकी ही देखील देशात अस्तित्वात आहे. काही विद्वान कलाकारांमुळे धृपद या गायकीला देशात आणि विदेशात प्रतिष्ठा मिळालेली आहे. या मोजक्या, पण तरीही महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते रमाकांत गुंदेचा. गेल्या ८ नोव्हेंबरला रमाकांत गुंदेचा यांचे निधन झाले.

भाजपमध्ये येण्याची ऑफर आली: मनीष सिसोदिया
एनएसएसच्या सर्वेक्षणातून दिसत आहे शेतकऱ्यांची स्थिती
श्रीमंत शेतकरी.. आंतररराष्ट्रीय कारस्थान.. मूर्खपणा

शास्त्रीय संगीत म्हटलं की आपल्या सर्वांच्या (जवळ-जवळ प्रत्येकाच्या) डोक्यात एक विशिष्ट चित्र डोळ्यासमोर येतं. काही कलाकार आठवतात. थोडा अजून विचार केला तर काही वाद्य, कुठेतरी ऐकलेल्या काही रचना डोळ्यासमोर येतात. मात्र नीट विचार केला तर असं लक्षात येतं की ही ‘ख्याल’ गायकी आहे.

‘ख्याल’ गायकी ही एक प्राचीन परंपरा आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीत हे लोकप्रिय होण्यास या गायकीचा मोठा वाटा आहेच. परंतु ‘ख्याल’ या प्रकाराइतकीच आणि बऱ्याच विद्वानांच्या मते त्याच्यापेक्षा प्राचीन अशी धृपद गायकी ही देखील देशात अस्तित्वात आहे. काही विद्वान कलाकारांमुळे धृपद या गायकीला देशात आणि विदेशात प्रतिष्ठा मिळालेली आहे. या मोजक्या, पण तरीही महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते रमाकांत गुंदेचा. त्यांचे बंधू उमाकांत गुंदेचा यांच्याबरोबर धृपद सह-गायनाचे कार्यक्रम करून ‘गुंदेचा बंधू’ हे नाव संगीत वर्तुळात परिचित आणि प्रचलित होते.

कोणत्याही प्रमुख संगीत संमेलनात ‘गुंदेचा बंधू’ यांचे कार्यक्रम होणे ही काही नवीन गोष्ट राहिली नव्हती. स्वतःच्या आणि त्याचबरोबर धृपद गायकीचा एक खास श्रोता- वर्ग त्यांनी तयार केला होता. त्यामुळे ८ नोव्हेंबरला रमाकांत गुंदेचा यांच्या निधनामुळे संगीत विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सगळीकडे व्यक्त केली जात आहे. धृपद शैलीचा श्रोतावर्ग तर या घटनेचे दुःख पुढे अनेक वर्ष व्यक्त करत राहील.

रमाकांत गुंदेचा यांच्याबद्दल लिहायच्या आधी आपल्याला धृपद या संगीतशैलीबद्दल थोडी चर्चा करणं भाग आहे. आधी सांगितल्याप्रमाणे धृपद ही शैली ‘ख्याल’ या शैलीपॆक्षा वेगळी आहे.

‘ख्याल’ संगीतात तबला हे तालवाद्य असते आणि धृपद शैलीत त्याची जागा पखावज घेतं. धृपद शैलीचे सादरीकरण साधारण अशाप्रकारे होते – सुरुवातीला आलाप गायले जातात आणि अर्थात हा धृपद गायकीचा आत्मा मानला जातो. आलाप याचा अर्थ स्वरांचे मुक्त-गायन. जो राग सादर होतो त्याच सूरांचे मुक्त-गायन होते. नंतर हे आलाप एक गती धारण करतात ज्याला ‘जोर’ असं म्हणतात. हीच लय आणखी जलद होते ज्याला ‘झाला’ असं म्हणतात. ही सारी बढत प्रत्येक स्वराला महत्त्व देऊन केली जाते. उदाहरणार्थ – री, रे, ना, ना अशा अक्षरात स्वर गायले जातात आणि जलदगतीमध्ये गाताना ही अक्षरं एका विशिष्ट क्रमाने गायली जातात. या शैलीचे उच्चारण आणि बढत ही मंत्रोच्चारासारखी होते. अनेक संगीततज्ज्ञ असं मानतात की धृपद शैली ही मंत्रोच्चारातून विकसित झाली आहे.

हेच कारण आहे की धृपद शैलीला प्राचीन रूप प्राप्त झालं आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारखे थोर संगीतकार हे जाहीरपणे मांडतात की आजची ‘ख्याल’ शैली ही धृपद आणि कव्वाली यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे. याचे श्रेय जाते आमिर खुसरोला. भारतात मुसलमान राजांच्या येण्याआधी धृपद संगीत गायले वाजवले जायचे. मुसलमान प्रभाव वाढायला लागल्यावर सुफी पद्धती प्रचलित होऊ लागली आणि त्यातील काही घटक – जसेकी कौल, कलबना – हे इथल्या धृपद शैलीशी (जिचा विकास मंदिरांमध्ये झाला) संवाद साधू लागले.

परिणामी, ‘ख्याल’ संगीताचा जन्म झाला जी आज उत्तर-भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्रचलित आणि लोकप्रिय संगीतशैली आहे. धृपद शैली मागे पडली आणि काही मोजकीच कलाकार मंडळी ती मांडू लागली. परंतु त्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात धार्मिक महत्त्व अजिबात कमी नाही. रमाकांत गुंदेचा हे याच परंपरेचे आणि गायन शैलीचे पाईक होते.

धृपद शैली सादर करायच्या अनेक पद्धती आहेत ज्यांना ‘वाणी’ (किंवा बानी) असं म्हणतात. त्यात ‘डागर बानी’ नावाचे अतिशय प्राचीन ‘वाणी’ आहे. रमाकांत गुंदेचा हे या शैलीचे वारसदार होते. या संबंधित अधिक माहिती dhrupad.org या वेबसाईटवर सविस्तरपणे वाचायला मिळते.

रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा यांना ऐकलेल्या लोकांना ही शैली अगदी उत्कृष्टपणे अनुभवायला मिळाली. सुदैवाने यु-ट्यूबवर त्यांची अनेक सादरीकरणं उपलब्ध आहेत. ही शैली अनुभवायची असल्यास त्यांचे एका रागाचे विस्तारित एक तासाचे सादरीकरण ऐकावे ही या लेखामार्फत सर्वांना विनंती! स्वराचे स्वच्छ उच्चारण, आवाजात रियाजामुळे निर्माण झालेली गोलाई आणि खोली (depth), तिन्ही सप्तकात सहज फिरणारा आवाज, जलद गतीचे ‘जोर’ आणि ‘झाला’ गाताना टिकवून ठेवलेली स्पष्टता, थक्क करून टाकणारे श्वासावरचे नियंत्रण ही त्यांच्या गायकीची विशेषता म्हणता येईल. शिवाय सह-गायन करायला एक वेगळ्या प्रकारचं ट्युनिंग लागतं. कलाकार जसे परिपक्व होतात आणि त्यांच्या सादरीकरणाला एक दिशा मिळू लागली की त्यांना साथ करणारे कलाकार कोणते हे देखील ठरते. याचं कारण की हे कलाकार व्यासपीठावरील संवादाला एकमेकांना पूरक ठरतात. अशी जोडी जेव्हा ठरते तेव्हा कुणीही कुणावर वरचढ होत नाही, आणि तसा प्रयत्न देखील करत नाही. शिवाय, भारतीय शास्त्रीय संगीताचे सौंदर्य आणि प्रकृती ही बढत करणे आणि व्यासपीठावरील उत्स्फूर्तता ह्या दोन प्रमुख निकषांवर प्रकट होते. सह-गायन (किंवा सह-वादन होत असेल) तर दोन्ही कलाकारांकडून उत्स्फूर्तता प्रकट होते आणि जर पूरकता नसेल तर कितीही मोठे कलाकार असले तरी मैफल बिघडू शकते. गुंदेचा बंधूंच्या बाबतीत हे कधीच होताना दिसले नाही आणि यु-ट्यूबवर असलेल्या त्यांच्या रेकॉर्ड ऐकून याची जाणीव नक्कीच होईल. कदाचित याचे कारण त्यांचा एकमेकांच्या बाबतीत असलेला स्नेह हे असेल.

उमाकांत गुंदेचा हे जाहीरपणे सांगायचे की त्यांच्या कार्यक्रमांच्या संदर्भातील ज्या गोष्टी असतील, जसे की माध्यमांशी बोलणे, आयोजकांशी संवाद साधणे हे सारे रमाकांत गुंदेचा करत होते. हा स्नेह, आदर आणि एकमेकांच्या स्वभावाला दिली जाणारी दाद व्यासपीठावर समोर येते आणि मैफल रंगत जाते.

गुंदेचा बंधूंनी केवळ कला-प्रकार आत्मसात करून त्याचे सादरीकरण नाही केले. उलट, त्यांनी धृपद शैलीची सेवा त्याचा प्रचार आणि प्रसार करून निभावली. कला ही केवल एका कलाकारामुळे टिकत नसते. कलेची दालनं इतरांसाठी देखील उपलब्ध करून द्यावी लागतात. संगीत महोत्सव आयोजित करणं ही एक पद्धत झाली. मात्र त्याने श्रोता तयार होऊ शकतो. भावी कलाकार तयार होण्यासाठी गुरुकुल अथवा संगीत विद्यालय स्थापन करावी लागतात. अन्यथा कलेचे मरण अटळ असते. अगदी ती संपुष्टात नाही आली तरीही तिचे सादरीकरण बदलून तिची एखादी नवी शैली विकसित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गुंदेचा बंधूंनी भोपाळला स्थापन केलेले ‘धृपद संस्थान’ एक महत्त्वाचे पाऊल ठरते.

भारतीय सांगीतिक परंपरा या मौखिक आहेत. हे जरी त्यांचे वैशिष्ट्य असलं तरीही तो त्याचा दोष देखील आहे. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरांमध्ये लिखित संस्थात्मक रुप धारण न झाल्यामुळे अनेक पैलू मागे पडण्याची भीती असते. ‘धृपद संस्थान’ सारख्या वास्तू हे प्रश्न सोडविण्यात मदत करतात. त्याच्या व्यतिरिक्त धृपदचा प्रचार करण्यासाठी या दोन भावांनी-रमाकांत-उमाकांत गुंदेचा- अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या, व्याख्यानं दिली. इतकेच नव्हे, तर इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे देखील या दोघांनी अनेक तरुणांशी संवाद साधला.

‘धृपद संस्थान’ मुळे अनेक मुलं शिकतायत आणि ही परंपरा जिवंत राहते आहे. कदाचित या नवीन प्रयोगांकडे पारंपरिक पद्धतींवर विश्वास ठेवणारे लोक नाखुशीने बघतील. पण जर काहीच प्रयोग केले नाहीत तर कला बदलत्या काळानुसार नवीन रुप कसं धारण करणार?  या दोघांनी कबीर, तुलसीदास या संतांच्या रचना आणि हिंदी महाकवी निराला यांच्या कविता धृपद अंगाने सादर केल्या आणि हा एक अभिनव प्रयोग मानावा लागेल.

आता उमाकांत गुंदेचा हे मोलाचे कार्य पुढे नेतील, पण त्यांना रमाकांत यांची साथ नसेल. रमाकांत यांचा मुलगा अनंत गुंदेचा त्यांच्या जागी बसून उमाकांत गुंदेचा यांच्या बरोबर गायन सादर करणार आहे. धृपद या कलाप्रकारासाठी हा परिवार किती वचनबद्ध आहे हे स्पष्ट आहे.

धृपद आणि एकूण भारतीय शास्त्रीय संगीत श्रोत्यांना रमाकांत गुंदेचा यांची उणीव पुढील बरीच वर्ष भासेल यात शंका नाही. कारण देशातील जवळ-जवळ सर्व प्रमुख कलामंचांवर ‘गुंदेचा बंधू’ हे नाव परिचयाचे आणि आवडीचे झाले होते. परंतु धृपद गायकीचे पुनरुज्जीवन इथपासून त्याला लोकप्रियता प्रदान करून शिष्यांमार्फत ही प्रक्रिया पुढे चालू ठेवणे इथपर्यंतच्या कार्यासाठी आपण संगीतप्रेमींनी रमाकांत गुंदेचा यांच्याप्रती कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करायला हवे.

‘द वायर इंग्रजी’मध्ये या विषयावर https://thewire.in/the-arts/ramakant-gundecha-tribute-tishani-doshi ही लिंक पाहावी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0