दिएगो मॅरॅडोनाः फुटबॉलचे दैवत

दिएगो मॅरॅडोनाः फुटबॉलचे दैवत

मॅरॅडोना फुटबॉल मैदानावरचा चमत्कार होता. विदुल्लतेप्रमाणे तो मैदानावर वावरायचा. क्षणार्धात तो गोल पोस्टजवळ दिसायचा. त्यावेळी तो जादूगर वाटायचा. प्रतिस्पर्ध्याची बचाव फळी भेदून त्याचा गोल पोस्टपर्यंतचा प्रवास पाहणे एक पर्वणी असायची. त्याच्या खेळाला लॅटिन अमेरिकन फुटबॉल शैलीची वेगळीच ‘टेस्ट’ होती. पाहायला आकर्षक, चव घ्यायला झणझणीत.

चन्नी हेच पंजाब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
उ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन
उ. प्रदेशात धर्मांतरविरोधातला पहिला गुन्हा दाखल

फुटबॉलमधला एक अध्याय संपला. अर्जेंटिनाचा स्टार दिएगो मॅरॅडोना गेला. नैसर्गिक गुणवत्ता लाभलेली फुटबॉल क्षेत्रातील कर्तृत्वाची एक गाथा संपली. पदन्यासावर कर्तृत्व घडवणारा एक क्रीडापटू गेला. फुटबॉलमध्ये ‘पेले’ कर्तृत्वाच्या, परिपूर्णतेच्या सीमेवर उभा होता. मॅरॅडोनाने ती परिसीमाही ओलांडली. ‘फिफा’चा या शतकाच्या आरंभातला तो सर्वोत्तम फुटबॉलपटू होता. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने त्यावेळी पेलेलाही मागे टाकले होते.

५ फूट ४ इंचाचा हा देह फुटबॉल मैदानावर झंझावातासारखा वावरला. त्याचे आयुष्यही खेळासारखेच वादळी होते. दोन पावलांच्या पदन्यासावर १९८६मध्ये त्याने अर्जेंटिनाला विश्वचषक मिळवून दिला. नापोलीला युरोपियन फुटबॉलचे विजेतेपद मिळवून दिले. या दोन घटनांनी त्या त्या ठिकाणचे भविष्यच बदलले. अर्जेंटिनामध्ये जोश आला तर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला नापोली क्लब विजेतेपदामुळे सावरला. दोन पायांवरच्या या तुफानाने तमाम विश्वात आपले चाहते निर्माण केले आपल्या खेळामुळे व वर्तणुकीमुळे. त्याची जीभही तिखट व धारदार होती. बोलताना कुणाचीही पर्वा तो करायचा नाही. त्यामुळे जेवढे मित्र-चाहते निर्माण झाले तेवढेच शत्रूही. तिरस्काराबरोबरच तेवढेच प्रेम करायला लावणारा असा उमदा फुटबॉलपटू होणे नाही.

नियतीही त्याच्यावर फिदा होती. त्याच्या कारकिर्दीतील अनेक घटनांमुळे ते सिद्ध होत राहिले. अगदी इंग्लंडविरुद्ध केलेला ‘हँड ऑफ गॉड’ गोलापासून ते २००० साली परतलेल्या मृत्यूच्या जबड्यापर्यंत. अशा अनेक घटना त्याच्या दैवी चमत्काराची साक्ष देतात. मादक पदार्थांचे सेवन आणि त्यानंतर त्यातूनही बाहेर पडण्याची जिद्द. लॅटिन अमेरिकेतील साम्यवादी, समाजवादी सरकारांना समर्थन, फिडेल कॅस्ट्रो, ह्युगो चावेझ यांच्या सारख्यांचे प्रेम आदी गोष्टींनी तो फुटबॉल मैदानाबाहेरही सतत प्रकाशित राहीला.

फुटबॉल मैदानावरचा तो चमत्कार होता. विदुल्लतेप्रमाणे तो मैदानावर वावरायचा. क्षणार्धात तो गोल पोस्टजवळ दिसायचा. त्यावेळी तो जादूगर वाटायचा. प्रतिस्पर्ध्याची बचाव फळी भेदून त्याचा गोल पोस्टपर्यंतचा प्रवास पाहणे एक पर्वणी असायची. त्याच्या खेळाला लॅटिन अमेरिकन फुटबॉल शैलीची वेगळीच ‘टेस्ट’ होती. पाहायला आकर्षक, चव घ्यायला झणझणीत.

तशीच त्याची जीभही तिखट होती. बोलताना कुणाचाही भीडभाड ठेवायचा नाही. फिफाच्या मूर्खपणाबाबत तो जाहीररित्या बोलायचा. त्याच तिखट जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याने आपली शरीर संपदाही गमावली होती.

मॅरॅडोना अर्जेंटिनाच्या अत्यंत उपेक्षित समाजघटकातून आला होता. त्या समाजाला तो अखेरपर्यंत विसरला नाही. फुटब़ॉल कर्तृत्वाच्या शिखरावर असताना, श्रीमंती, सुख, पंचतारांकित आयुष्य जगतानाही त्याची श्रमजीवी वस्तीशी नाळ जुळलेलीच राहिली. अगदी अखेरच्या क्षणी मृत्यू समीप असतानाही, आपल्या देशाच्या गरीब जनतेबद्दल त्याला काळजी वाटत होती. कोरोनाच्या महासाथीत उपाशी राहणार्या मुलांबद्दल त्याला कणव होती. तो म्हणायचा, भूक काय असते ते मी अनुभवले आहे. दिवसभर अन्न न मिळाल्यानंतरची अवस्था मला ठावूक आहे. मरण्याअगोदरची त्याची अंतिम इच्छा होती, अर्जेंटिनामध्ये कुणीही उपाशी राहू नये. प्रत्येकाला काहीतरी काम मिळावे.

२९ ऑक्टोबर २००१ मध्ये क्युबा येथे क्युबाचे तत्कालीन अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो याना आपल्या पायावर काढलेला फिडेल यांचा टॅटू दाखवताना दिएगो मॅरॅडोना.

२९ ऑक्टोबर २००१ मध्ये क्युबा येथे क्युबाचे तत्कालीन अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो याना आपल्या पायावर काढलेला फिडेल यांचा टॅटू दाखवताना दिएगो मॅरॅडोना.

अशा त्याच्या वृत्तीमुळे त्याने केलेल्या अनेक प्रमादांना, गुन्ह्यांना, अप्रिय घटनांना तमाम फुटबॉल विश्वाने माफ केले. फक्त अर्जेंटिनाच्या नव्हे तर लॅटिन अमेरिकेतील जनतेनेही त्याच्यावर मनापासून प्रेम केले. फुटबॉल मैदानावरचा हा प्रतिस्पर्धी त्यांच्या गळ्यातला ताईत बनला. नापोली क्लबला त्याने युरोपिय फुटब़ॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर तर तेथील घराघरात त्याकाळी जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे नामकरण दिएगो असे करण्याची फॅशन तयार झाली. फक्त मुलांचेच नव्हे तर मुलींची नावेही दिएगो अशी ठेवण्यात आली. यावरून त्याच्या फुटबॉल कर्तृत्वाचा पगडा समाजावर किती होता याचा अंदाज येतो.

ब्युनोस आयर्सच्या उपनगरातील एका झोपडपट्टीत तो जन्मला. चिखलात कमळ उगवावे तसा. फाटक्या कपड्याच्या चिध्यांनी तयार केलेल्या चेंडूच्या फुटबॉलने त्याच्यातील ती गुणवत्ता नजरेत भरायला लागली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तो अर्जेंटिनाच्या संघात आला. त्यानंतर फुटब़ॉल या खेळातील एक महान अध्याय लिहिला गेला.

फुटब़ॉल मैदानाबाहेर गेल्यानंतरही तो फुटबॉलपासून, समाजापासून, चाहत्यांपासून दूर राहीला नाही. साम्यवादी विचारसरणीच्या प्रेमात पडलेल्या दिएगोने, क्युबाचे महान नेते फिडेल कॅस्ट्रो यांना आपले आदर्श मानले. तो त्यांना वडिलांसमान मानायचा. कॅस्ट्रोंच्या विचारांच्या त्याच्या मनावर पगडा बसत गेला. हळूहळू तो जाहीर भाषणेही द्यायला लागला. सामाजिक न्यायाबद्दल बोलायला लागला. अमेरिकेच्या फ्री ट्रेड एरिया प्रस्तावाला त्याने लॅटिन अमेरिकी देशांसह जाहीर विरोध केला. अमेरिकेच्या व्यापारी वृत्तीच्या लढ्यात तो लॅटिन अमेरिकेचा सेनानी ठरला. अमेरिका हरली. दिएगोचा एक सामाजिक नेता म्हणून उदय झाला. पेले किंवा झिको सारख्यांनी सामाजिक न्याय व्यवस्थेला कधीच आव्हान दिले नव्हते. दिएगोने त्यामुळे जनमानसात आपली वेगळीच प्रतिमा निर्माण केली, खेळाडूंच्या हक्कांसाठी तो भांडला. सामान्यांच्या कल्याणकारी गोष्टींसाठी झटला. फिफा या प्रमुख फुटबॉल संघटनेच्या विरोधातही दंड थोपटले.

दिएगो आपल्यात नाही ही लॅटिन अमेरिकेला जाणवणारी एक पोकळी असेल. हे जग त्याचा खेळ व त्याची बेधडक प्रतिमा याची आठवण सतत काढेल. पण लॅटिन अमेरिकेसाठी ते एक आशावाद व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: