‘स्थलांतर ही विघातक राजकारणातून उद्भवलेली समस्या’

‘स्थलांतर ही विघातक राजकारणातून उद्भवलेली समस्या’

कोरोना लॉकडाऊन काळाच्या लाखो स्थलांतरित मजूर, कामगार शेकडो-हजारो मैल रस्ते तुडवत आपापल्या गावी परतू लागल्याचे दृश्य या देशाने पाहिले.

कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?
सार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध
अयोध्याः स्वैर टीव्ही वृत्तांकन व चर्चांवर निर्बंध

कोरोना लॉकडाऊन काळाच्या लाखो स्थलांतरित मजूर, कामगार शेकडो-हजारो मैल रस्ते तुडवत आपापल्या गावी परतू लागल्याचे दृश्य या देशाने पाहिले. तोवर आकडेवारी-अहवालापुरती मर्यादित राहिलेली स्थलांतरितांची समस्या या काळात सर्वार्थाने दृश्यमान झाली. तत्पूर्वी, पत्रकार या नात्याने शेखर देशमुख यांनी गेली जवळपास १५ वर्षे या प्रक्रियेचा माग काढला आहे. या काळातली त्यांची निरीक्षणे, त्यांचे अनुभव आणि नोंदी असलेले ‘उपरे विश्व’ हे संशोधनपर पुस्तक नुकतेच ‘मनोविकास प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाले आहे. त्या निमित्ताने त्यांची मनोविकास प्रकाशनाचे संपादक विलास पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत…

प्रश्नः मानवी स्थलांतर या विषयाचे महत्व तुम्हाला कधी नि कसे उमजले ?

शेखर देशमुखः साधारणपणे १५ वर्षांपूर्वी म्हणजे, २००४-०५च्या सुमारास भारतात एचआयव्ही-एड्सच्या समस्येने कहर माजवला होता. त्याच सुमारास या विषयावरच्या संशोधनपर अभ्यासासाठी मला हेन्री जे. कैसर आणि बिल अँड मेलिंदा गेट्स फाउण्डेशनची फेलोशिप मिळाली होती. या निमित्ताने माझे महाराष्ट्रासह, उ. प्रदेश-बिहार, आंध्र-तामिळनाडू, दिल्ली-राजस्थान, प. बंगाल, मणिपूर आदी राज्यांमध्ये जाणे झाले. अगदी शहरांपासून गावखेड्यांपर्यंत मी या समस्येचा माग काढला. कुटुंबच्या कुटुंबे एचआयव्ही-एड्समुळे उद्ध्वस्त होत असल्याचे त्या वेळी मी पाहिले. अनंतपूर, खम्मम सारख्या काही काही गावांमध्ये तर लहान मुले आणि वृद्ध एवढेच मागे राहिलेले मला दिसले. जस- जसा अधिकाधिक या समस्येच्या खोलात शिरत गेलो, मानवी वेदनेचा विस्तृत पट उलगडत गेला. एक प्रकारची हतबलता, नैराश्य आणि आगतिकता मला समाजाच्या पातळीवर जाणवली. या सगळ्याची नोंद तेव्हा मी ‘पॉझिटिव्ह माणसं’ (पद्मगंधा प्रकाशन-२०१०) या पुस्तकाद्वारे करण्याचा प्रयत्न केला.

या काळात जेव्हा जेव्हा पीडित कुटुंबांना भेटायचो, एक गोष्ट सगळ्यांकडून ऐकायला मिळायची. ती म्हणजे, गावात रोजगार नाही म्हणून माझा नवरा, माझा भाऊ, माझे वडील शहरात गेले आणि घरी येताना एचआयव्ही-एड्सचा संसर्ग घेऊन आले. त्या क्षणी पहिल्यांदा युपी-बिहार, आंध्र-तामिळनाडू-राजस्थान-बंगाल आदी राज्यातल्या खेड्यांमधल्या एचआयव्ही-एड्सच्या समस्या सक्तीच्या स्थलांतराच्या मार्गाने गावात आल्याचे माझ्या ध्यानात आले. ते एका पातळीवर खरेही होते. स्थलांतराच्याच मार्गाने एड्स गावखेड्यांत पोहोचला होता. त्यामुळे सुरुवातीला स्थलांतराकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक होता. माझ्या दृष्टीने स्थानिकांना रोजगार न देऊ शकणारे नेते, बेफिकीर त्या त्या राज्यांचे शासन खलनायक होतेच, पण स्थलांतराची प्रक्रियादेखील तितकीच दोषी होती.

याच टप्प्यावर कधी तरी या विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला पाहिजे, असे मनात होते. ती संधी दुसऱ्या फेलोशिपच्या निमित्ताने २००७ मध्ये चालून आली. परंतु, जेव्हा मुंबई-दिल्ली-कोलकाता-गुरगाव, जयपूर, लखनौ, पटना, चेन्नई आदी शहरांमधल्या स्थलांतरितांच्या जगण्याचा वेध घेतला, दिल्ली-मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरलो. युपी-बिहारमधल्या दलित वस्त्यांमध्ये जाऊन स्थलांतरित कुटुंबाचे जगणे समजून घेतले. या काळात, शेतात दिवसभर राबल्याचा मोबदला म्हणून हातभर बटाटे घरी घेऊन जाणाऱ्या मुसहर जमातीतल्या लोकांची दयनीय अवस्थाही पाहिली, बांगला देश सीमेवरच्या स्थलांतरितांच्या गावात गेल्यानंतर ‘यहा दुख के सिवा कुछ नही है…’असे म्हणणाऱ्या बायांची असहाय्यताही अनुभवली आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमधून गुलामीसदृश जीणे जगणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा मूक आक्रोशही टिपला. तेव्हा समस्येचा भयावह चेहरा समोर आलाच, पण स्थलांतराच्या प्रक्रियेने ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम, पोटाला अन्न आणि किमान सन्मान मिळत असल्याचेही दिसले. म्हणजेच, अधोगती आणि माफक का होईना, होत गेलेल्या प्रगतीचे समांतर विश्व माझ्या डोळ्यांसमोर कालौघात उलगडत गेले.

प्रश्नः स्थलांतर या प्रक्रियेविषयीचे तुमचे आकलन, निरीक्षण काय आहे ?

शेखर देशमुखः स्थलांतराच्या प्रक्रियेकडे बघताना सुटासुटा विचार करून चालत नाही. याचे एक कारण, अवघ्या मानव जातीचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे, दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपला पूर्वज असलेल्या आदिमानवाने अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेपायी गुहेबाहेर पाऊल टाकलं, ते आजही थांबलेले नाही. स्थलांतराची ही प्रक्रिया मानवाच्या जन्मापासून अव्याहत सुरूच आहे. अमेरिकी इतिहासकार-तत्वज्ञ हॅना अॅरेंड यांनी त्यांच्या ‘दी ह्युमन कंडिशन’ या पुस्तकात लेबर, वर्क आणि अॅक्शन या तीन कृतीतून मानवी समाज आणि राजकारणाच्या उत्क्रांती- प्रगतीचा पट उलगडला आहे. त्यात लेबर-अर्थात शारिरीक श्रम हे मानवी जगण्यातले समाधान देणारे सर्वोच्च मूल्य मानले आहे. शारिरीक श्रमाविना माणूस जगू शकत नाही, असे हे प्रतिपादन आहे. माझे असे मत आहे, की अॅरेंड म्हणतात ते शारिरीक श्रम आणि स्थलांतर या दोन क्षमता मानवी जगण्याच्या मूलाआधार राहिल्या आहेत.

आजवरच्या इतिहासात स्थलांतराच्या या अव्याहत प्रक्रियेला चालना देणारे, रोखणारे अनेक टप्पे येऊन गेले आहेत. म्हणजेच, साधारण दहा-एक हजार वर्षांपूर्वी जेव्हा भटके जगणे टाळून माणूस शेती करू लागला तेव्हा, टोळ्यांनी स्थलांतर करणारा माणूस काही काळापुरता स्थिरावला. मग दळणवळणाची साधने विकसित होत गेली, महासाथी, युद्धे, महापूरासारख्या आपत्ती कोसळत गेल्या तशी स्थलांतराची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत गेली. युरोपात प्रबोधनाचे पर्व अवतरले. पाठोपाठ सरंजामशाही लयास जावून भांडवलशाही उदयास आली, औद्योगिक क्रांती झाली, तसे ग्रामीण ते शहरी असा स्थलांतराचा प्रवाह वेगवान झाला. एकोणीस आणि विसाव्या शतकात साम्राज्यवादी सत्तांच्या विस्तारवादी धोरणांनी सक्तीच्या स्थलांतराचा प्रवाह रुजवला केला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पहिले आणि दुसरे महायुद्ध, भारताची झालेली फाळणी या घटनांनी समूहांच्या स्थलांतराला धग दिली. पुढचा स्थलांतराचा टप्पा आखाती युद्ध आणि त्याला समांतर जागतिकीकरण, उदारीकरण या प्रक्रियांमुळे आला. मधल्या काळात हे विश्व जणू खेडे झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले. परंतु एकविसावे शतक उजाडता-उजाडता पुन्हा एकदा जगाची पावले माघारी पडू लागली.

आज अशी स्थिती आहे, की अमेरिकेसमोर युरोपातले अनेक पुढारलेले देश, भारतासारखे दक्षिण आशियातले देश कुंपणवादी, अस्मितावादी राजकारण रेटू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत स्थलांतराच्या प्रक्रियेवरही होऊ लागला आहे. देशांतर्गत विचार करता आपल्या अस्मिता जातीशी, धर्माशी निगडित आहेत. त्या कोणते टोक गाठू शकतात, आपण परराज्यातल्या स्थलांतरितांना किती अमानुष वागणूक देतो, हे लॉकडाऊन काळातल्या भारतातल्या कोट्यवधी स्थलांतरितांना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टांवरून दिसलेच आहे.

प्रश्नः ‘उपरे विश्व या पुस्तकाची मांडणी कशी करण्यात आली आहे. साधारणपणे संशोधनपर पुस्तकांमध्ये अहवाल, आलेखांना महत्व दिले जाते, तुम्ही कोणत्या पैलूंवर अधिक भर दिला आहे ?

शेखर देशमुखः हे खरेच की, संशोधनपर पुस्तक म्हटले की, आकडेवारी अहवाल-आलेख यावर सर्वसाधारणपणे भर दिलेला असतो. मात्र, ‘उपरे विश्व’मध्ये ते निवेदनाला पूरक म्हणून आले आहेत. वाचकांचे डोके भंजाळून जावे, या पेक्षा मुद्याचे सहन आकलन व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. एरवी,

शेखर देशमुख

शेखर देशमुख

पत्रकार-संशोधक म्हणून माझा भर समस्येशी जोडलेल्या माणसांवर अधिक राहिला आहे. विषयाची मानवकेंद्री मांडणी करण्याकडे मी प्रांरभापासूनच भर देत आलो आहे. याही पुस्तकात स्थलांतराच्या प्रश्नाचा वेध घेताना माणसांच्या गोष्टी प्राधान्याने आलेल्या आहेत. त्यांच्या जगण्याचे वाचकांना आकलन व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे.

तसे पाहता, हा विषय बहुपदरी आहे. म्हटले तर याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. निरंतर, अव्याहत असे याचे स्वरुप आहे. त्यामुळे जेव्हा अरविंद पाटकर-आशीष पाटकर आणि प्रसाद मणेरीकर यांनी या विषयावर पुस्तक लिहाल का, असा प्रस्ताव मांडला, तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न, या विषयाची सुरुवात कुठे करावी नि शेवट कुठे करावा, हाच आला. पण जसे मांडणी करायला घेतली, तो प्रश्न बऱ्यापैकी सुटला. पुस्तकात सहा-सात प्रकरणात प्रादेशिक-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा स्तरावरची मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात स्थलांतराचा इतिहास, इतिहासाला आकार देणाऱ्या घडामोडींची नोंद घेतली आहे. दुसरे प्रकरण स्थलांतराची समस्या जिथे जन्म घेते त्या ‘सोर्स’ अर्थात, खेड्यांच्या समाजजीवनाचा आणि ‘डेस्टिनेशन’ अर्थात स्थलांतरितांचे मुक्कामाचे ठिकाण असलेल्या महानगरांमधल्या स्थितीचा वेध घेतला आहे. काही प्रकरणे समस्यांच्या कारणांची चिकित्सा करणारी आहेत. एका प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या प्रक्रियेचा माग काढला आहे. स्थलांतराच्या प्रक्रियेची धग आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या सामाजिक सरमिसळीची नोंद घेणाऱ्या मानवकेंद्री कहाण्या एका प्रकरणात आलेल्या आहेत. यात अर्थातच लॉकडाऊन काळात देशाने नुकत्याच अनुभवलेल्या स्थलांतरितांच्या कुतरओढीची सविस्तर मांडणी करणारे दीर्घ टिपणही आहे. एक प्रकरण स्थलांतराशी निगडित आजचे वास्तव मांडणारे आणि भविष्याचे सूचन करणारे आहे. पुस्तकाच्या शेवटी संयुक्त राष्ट्र संघाने या प्रक्रियेतली जटिलता ध्यानात घेऊन स्थलांतरित-विस्थापितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी दिलेले अभिवचन, त्यातली सदस्य देशांना बंधनकार असलेली कलमे याचीही नोंद घेतली आहे. एकूणच, मानवी स्थलांतराच्या प्रक्रियेचा अभ्यास करताना नोंदलेली निरीक्षणे, प्रत्यक्ष घेतलेले अनुभव, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडींचे लावलेले अन्वयार्थ या सगळ्याची गोळाबेरीज या पुस्तकात आहे.

प्रश्नः स्थलांतर ही प्रक्रिया समस्या का बनली ? या समस्येचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विचार करता, समस्येवरची पाळंमुळं कशात दडली आहेत? याचे साधारण सद्यचित्र काय आहे ?

शेखर देशमुखः हे आपण मान्य केले पाहिजे की, स्थलांतर ही अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेतून स्फुरलेली म्हटली तर नैसर्गिक क्रिया आहे. मात्र गेल्या शतकभरातल्या देशोदेशींच्या नेत्यांनी केलेल्या शत्रूकेंद्री राजकारणामुळे ही प्रक्रिया समस्या बनलेली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. नेता अमेरिकचा अध्यक्ष असो, भारताचा पंतप्रधान वा अस्मितावादी राजकारण करणारे प्रादेशिक नेते,  या सगळ्यांनी आपल्या अनुयायांपुढ्यात कधी काल्पनिक तर कधी वास्तवातला शत्रू उभा करून आपापले राजकारण रेटले आहे. वर्तमानातलेच दाखले द्यायचे तर ‘अमेरिका फर्स्ट’ अशी कुंपणवादी हाळी देऊन ट्रम्प यांनी स्थलांतरितांना दरवाजे बंद केले आहेत. भारताच्या विद्यमान गृहमंत्र्यांनी हिंदू मतांवर डोळा ठेवून बांगला देशी स्थलांतरितांचा उल्लेख ‘वाळवी’ असा केला आहे. जर्मनीचा अपवाद वगळता, नागरी युद्धांत होरपळलेल्या आखाती देशातल्या कोट्यवधी विस्थापितांना ऑस्ट्रिया, हंगेरी या देशांनी दरवाजे बंद केले आहेत. अगदी उदारमतवादी इंग्लंडमध्येदेखील स्थलांतरितांविरोधात स्थानिक नेत्यांनी आगडोंब उसळवला आहे.

भारताचा संदर्भ घ्यायचा तर अगदी अलीकडेपर्यंत शिवसेना-मनसेसारख्या प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करणाऱ्या पक्षांनी स्थलांतरितांना विरोध करण्याचे धोरण अवलंबले होते, परंतु बदलत्या राजकीय अपरिहार्यतेपोटी हा विरोध काहीसा मावळलेला दिसतो आहे. तरीही स्थलांतरितांविरोधात रोष, द्वेषभावना कमी झालेली नाही. ‘कुठून साले हे भय्ये येतात नि आमचे शहर घाण करतात’, ही सर्वसामान्यांमधली भावना अजूनही विरलेली नाही. वास्तविक, हे तथाकथित भैय्येच मुंबई-दिल्ली-कोलकातासारख्या शहरांचे चक्र गतिमान ठेवत आले आहेत. ते वजा करता, शहरी व्यवस्था कोलमडण्याचीच शक्यता अधिक आहे.

याच संदर्भात वर्तमानाचा विचार करता असे दिसते की, कोरोना महासाथीनंतर तसेही स्थलांतरावर निर्बंध आलेले आहेत. तत्पूर्वी अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे जगाचे समीकरण बिघडत गेले, तसे त्याचा परिणाम स्थलांतराच्या प्रक्रियेवर होणार हे स्पष्ट आहे. सीरिया-अफगाणिस्तान-इराक-इराण-सुदान (उत्तर-दक्षिण), काँगो आदी देश दहशतवाद, नागरी युद्धात असे काही होरपळले आहेत, की या देशातून पलायन केलेल्यांना युरोपीय देशांत आश्रय घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. परंतु, स्थलांतरविरोधी धोरणांमुळे त्यांचेही जीणे अधिकाधिक केविलवाणे होत जाणार आहे. एकीकडे, सौदी अरेबिया, कतार आदी देशांनी भारतीय स्थलांतरितांची परतपाठवणी सुरू केली आहे. याला, एक संदर्भ जसा कोरोना महासाथीचा आहे, तसाच तो देशात वाढत चाललेल्या धार्मिक उन्मादाचा, मुस्लिम विरोधी धोरणांचाही आहे. आतापर्यंत आर्थिक क्षमता असल्यामुळे शेजारील देशातल्या स्थलांतरितांचा ओढा भारताकडे राहिला होता, परंतु येत्या काळात हेही चित्र बदलणार आहे. आपण पाहिले, कोरोना काळात लाखो स्थलांतरित गावी परतले परंतु, योगी आदित्य नाथांसारख्या नेत्यांनी कितीही मोठ्या बाता मारल्या तरीही तिथे रोजगाराच्या संधीच नाहीत, हे वास्तव असल्याने त्यांनी पुन्हा शहरांकडे परतण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. आपल्याकडे शेती दिवसेंदिवस संकटात सापडते आहे. शेतीचा तुकडा कमी आणि वाटेकरी अधिक यामुळे ग्रामीण बेरोजगारांना शहरांकडे येण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. मात्र, शहरात येऊनही रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही, अशी सध्याची दयनीय स्थिती आहे.    

प्रश्नः या समस्येला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकाराने हाताळले जात आहेत, त्याचे परिणाम साधारणपणे कसे संभवतात, याबाबत तुमचे मत काय आहे ?

शेखर देशमुखः जर्मनी आणि काही प्रमाणात स्पेन वगळता जगातल्या फार कमी देशांनी स्थलांतरितांची समस्या मानवी पातळीवर हाताळलेली आहे. अर्थात, जर्मनीतही अल्टरनेटिव फ्यू ड्यूशलँड (एएफडी) नावाचा कट्टर उजव्या विचारांचा पक्ष अँजेला मार्केल यांच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न करतो आहे. मार्केल यांनी सीरियन शरणार्थींना केवळ जर्मनीत प्रवेश दिला नाही, तर तो सन्मानाने दिला, त्यामुळे स्थानिक कट्टरपंथींनी विद्वेषाची भाषा सुरु केली आहे. इतर युरोपीय राष्ट्रांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर आहे. अमेरिकेत जो बायडन यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर स्थलांतरितांच्या जगाला थोड्याफार आशा आहेत. दुसरीकडे युनो, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संघटनांनी वारंवार धोक्याच्या सूचना देऊनही, जगाच्या पातळीवर युद्धखोरी, अस्मितावादी राजकारण थांबलेले नाही. हे इतके स्पष्ट आहे, की एकदा व्यापारासाठी सीमा रोखल्या, की त्याचा थेट परिणाम देशांच्या परस्पर संबंधांवर होतो. त्यातून स्थलांतराच्या प्रक्रियेला खीळ बसत जाते. ही बेफिकीरी पर्यावरण बदलाबाबतही जगभर जाणवत आली आहे. म्हणजे, आपल्या हे लक्षातच येत नाही, की समुद्र पातळीत वाढ होऊन समुद्र किनाऱ्यांची गावे पाण्याखाली जाणे, महापुरात गावे वाहून जाणे आदी घटना घडल्या की, बांगला देशातले हातावर पोट असलेले स्थलांतरित भारताची वाट धरतात. ते इथे भाजपविरोधी मतदान करण्याच्या हेतूने वा भारतीय साधन-संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आलेले नसतात. चतूर राजकारणी त्यांच्या या दुर्दशेचा गैरफायदा घेतात, अस्मितावादी पक्ष-संघटना अपप्रचार करून या स्थलांतरितांविरोधात स्थानिकांमध्ये हेतूपुरस्सर द्वेष पसरवतात, हा भाग आलाच. एकूणातच, भारत असो वा युरोप-अमेरिका स्थलांतरितांच्या समस्या सुटण्यापेक्षा चिघळण्याचीच शक्यता अधिक आहे, असे दिसते.

प्रश्नः लॉकडाऊन काळात स्थलांतरितांची जी फरफट झाली, त्याची या पुस्तकात प्रदीर्घ नोंद घेण्यात आली आहे, त्याकाळात जे दिसले त्याकडे तुम्ही कसे पाहिले ?

शेखर देशमुखः मला स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या नागरी समाजाने आणि विकासाच्या मोठमोठ्या बाता करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने स्थलांतरित समूहाचा माणूस म्हणून केलेला हा अपमान वाटला. कोरोनाचे संकट जीवघेणे होते, हे खरेच पण त्यावरच्या उपाययोजना करताना आपल्या धोरणकर्त्यांनी कोट्यवधी स्थलांतरितांचा विचारच केला नाही. नाईलाजास्तव जेव्हा हे स्थलांतरित रस्त्यावर आले, सत्ताधाऱ्यांनी प्रवचने देण्यापलीकडे त्यांची दखल घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्य ओळखून वेळीच हस्तक्षेप केला नाही. संसदेत जेव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा चूक कबूलच करायची नाही, म्हणून कोरोनाकाळात किती स्थलांतरित मरण पावले, कितींना मदत केली, याची साधी आकडेवारी दिली गेली नाही.

एरवी, आपल्याकडे धर्माचे राजकारण खुलेआम होत राहते, कोरोनाकाळात स्थलांतरितांना वागणूक देताना धर्माचे आणि जातीचे राजकारण उघड झाले. तुम्ही लक्षात घ्या, आज देशात जे काही ४०-५० कोटी स्थलांतरित आहेत, त्यातले ९० टक्के हे बहुजन, दलित, आदिवासी, मुस्लिम आदी समूहांतले आहेत. या सगळ्यांना कोरोना काळात ज्या प्रकारे वाऱ्यावर सोडले गेले, त्यातून समाजाचा, सत्तेचा, प्रशासनाचा वर्चस्ववादी दृष्टिकोन उघड झाला. यात दुर्दैव हे की, कोरोना काळात जे काही घडले, ते तुमचे कर्म होते अशी भावना स्थलांतरितांमध्ये पेरण्यास आजचे सत्ताधारी यशस्वी ठरले आहेत.

मात्र, या सगळ्यात एक बरे झाले, स्वातंत्र्योत्तर भारताच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थलांतरितांची मोठी समस्या आहे याची किमान जाणीव इथल्या समाजाला आणि सरकारला झाली.  

प्रश्नः स्थलांतर थांबले, माणूस संपला…असे विधान पुस्तकात आले आहे. असे तुम्हाला का वाटते ?

शेखर देशमुखः या विषयावरच्या इतक्या वर्षांच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की, आधुनिक जगाच्या इतिहासात स्थलांतराच्या प्रक्रियेने ठिकठिकाणच्या समाज समूहांना भलेही संकटात लोटले असेल, परंतु या प्रक्रियेने संस्कृती-परंपरांचे अभिसरण घडवून आणले आहे. कल्पना-संकल्पनांचा संकर घडवून आणला आहे, या प्रक्रियेची उकल करताना ब्रिटिश जीवशास्त्र तज्ज्ञ, तत्वज्ञ असलेले मॅट रिडली यांनी ‘मेटिंग माइंड्स’ अशी संज्ञा वापरली आहे. किंबहुना, रिडली यांनी त्यांच्या ‘दी रॅशनल ऑप्टिमिस्ट’ या पुस्तकाच्या निवेदनवजा प्रस्तावनेला ‘व्हेन आयडियाज हॅव सेक्स’ असे शीर्षक देऊन संकल्पनेच्या संकरातून प्रगतीकडे झालेल्या मानवी प्रवासाचे खूप सुंदर चित्र रेखाटले आहे. म्हणजे, माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, त्यातून ज्ञान, सृजन, श्रम आणि कलाकौशल्याचेही स्थलांतर झाले. यातून मानव जात केवळ टिकून राहिली नाही, तर ती उत्तरोत्तर समृद्धही होत गेली. आता या सगळ्यांवर निर्बंध म्हणजे प्रगतीऐवजी अधोगतीची उलटी दिशा पकडणे आहे. हे उलटी दिशा पकडणे आणि मानवाची अधोगती होणे म्हणजे काय, हे या पुस्तकात सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी ऑस्ट्रेलियातल्या टास्मानियन आदिवासी जमातीचे उदाहरण दिले आहे. जग जेव्हा शिडाच्या नावेने प्रवास करू लागले होते,  नव्या नव्या आयुधांसह आपले जगणे सुकर करू लागले होते, तेव्हा ही जमात गवताच्या गंजीपासून बनलेल्या तराफांचाच वापर करत होती. त्यांच्याकडे मासेमारी आणि वन्य प्राण्यांसाठी शिकारीसाठी उपयुक्त साधने नव्हती. त्यामुळे जेव्हा समुद्रातून प्रवास करण्याचा प्रसंग यायचा, तेव्हा गवताच्या गंजीचा तराफा वापरला जायचा. हा तराफा कधी समुद्रातच तुटायचा किंवा तो पुढे जात राहावा म्हणून आदिवासी महिलांना पाण्यात उतरून तो ढकलावा लागायचा. याच तंत्र कौशल्यातल्या वैगुण्यामुळे जगाशी असलेला संपर्क हळूहळू तुटत गेला, नि कालौघात ही जमात मागे पडत गेली. म्हणजेच असेही म्हणता येते की, मानवी जातीचा आजचा जो महाप्रचंड डोलारा उभा आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण स्थलांतर आहे. मी तर म्हणेन, स्थलांतर हा अवघ्या मानवजातीचा स्थायीभाव आहे. त्याला आडकाठी आणणे म्हणजे, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. उपऱ्यांनी आमच्या नोकऱ्या बळकावल्या, आमचे उद्योगधंदे ताब्यात घेतले, हा खूपच संकुचित नि थिल्लर विचार आहे. स्थलांतराला असलेले पदर खूप व्यापक आहेत.  

प्रश्नः संकट गहिरे असूनही पर्यावरणाची समस्या आजवर जशी सर्वसामान्यांची झालेली नाही, तसेच स्थलांतराच्या समस्येची शासन-प्रशासनाने आजवर फारशी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर यापुढील काळात स्थलांतराच्या प्रक्रियेची दिशा कशी असणार आहे ?

शेखर देशमुखः रोजगाराच्या संधी, पोषक वातावरण आणि पूरक सरकारी धोरणे पाहून स्थलांतर हे नेहमी अशांत ते शांत, मागास ते प्रगत या दिशेने झालेले आहे. आजच्या जगाचा विचार करता, वृद्धत्वाकडे झुकलेली लोकसंख्या असलेल्या युरोपीय देशांना आपले गाडे सुरळीतपणे चालवण्यासाठी स्थलांतरितांची असलेली गरज येत्या काळात अधिकच भासणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला आर्थिकदृष्ट्या प्रगती साधायची तर प्रदेशांतर्गत स्थलांतराला पर्याय नाही. त्यामुळे एका पातळीवर ही प्रक्रिया कायम राहील तर दुसरीकडे पर्यावरण बदलाचे धोके, सततचे राजकीय- लष्करी संघर्ष यामुळे त्यात अडथळे येत राहतील. परंतु ही प्रक्रिया कधी थांबणार नाही.  लोक असे म्हणतात, आतातर इंटरनेटमुळे तसेही माणसाचे आभासी स्थलांतर घडतेच आहे. अमेरिकेच्या विद्यापीठात आकारास आलेले ज्ञान केनियातल्या मसाई मारा जमातीपर्यंत पोहोचतेच आहे. मग माणसांचे स्थलांतर नाही झाले, तर काय बिघडले? माझ्या मते, खूप बिघडते, इथे माणसांचे स्थलांतर ही अत्यंत महत्वाची क्रिया आहे. स्वअस्तित्वाच्या शाश्वतीसाठी माणूस माणसाच्या संपर्कात येणे, मानवी स्पर्शाची अनुभूती होत राहणे, अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्नः स्थलांतर या विषयावरचे कोणाकोणाचे संशोधन-लेखन तुम्हाला लक्षवेधी वाटत आले आहे ?

शेखर देशमुखः केविन बेल्स (डिस्पोजेबल पीपल), प्रा. देवेश कपूर (डायस्पोरा, डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी), इयान गोल्डिन, जेफ्री कॅमेरॉन, मीरा बालराजन (एक्सेप्शनल पीपल), पार्थ घोष (मायग्रंट्स रेफ्युजिस अँड स्टेटलेस इन साऊथ एशिया) आदी अभ्यासकांनी संकल्पना-सिद्धांताच्या अंगाने विद्यापीठ पातळीवर या विषयावर भरीव काम केलेले आहे. याच सोबत सुकेतू मेहता (अॅन इमिग्रंट्स मॅनिफेस्टो), दी कुली वुमेन (गाइत्रा बहादूर), चिन्मय तुंबे (इंडिया मुव्हिंग) यांनी, तसेच मोहसिन हमीद (एक्झिट वेस्ट), अमिताव घोष (गन आयलंड) आदींनी फिक्शन-नॉन फिक्शन प्रकारात या विषयाचा अत्यंत भेदक वेध घेतलेला आहे. हे सारेच लेखन मला या दरम्यान खूप सहाय्यभूत ठरले आहे.  

प्रश्नः या पुस्तकाकडून विशेषतः वाचकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ?

शेखर देशमुखः स्थलांतराच्या प्रक्रियेत आपल्या प्रगतीच्या सर्व शक्यता दडलेल्या आहेत. त्यामुळे वाचकांनी या समस्येकडे सहानुभूतीपूर्वक, आत्मियतेच्या भावनेने पाहावे, असे मला वाटते. कोणाला तरी, कोणी तरी स्थलांतरित वाईट वागताना दिसतो, लोक त्यावरून आपले अंदाज बांधत राहतात. आपला निर्णय देऊन टाकतात. मला वाटते, हे या प्रश्नाचे समग्र आकलन ठरत नाही. स्थलांतराच्या समस्येचा विचार हा समूह म्हणूनच होणे गरजेचे आहे. या अपेक्षेला पूरक अशी मांडणी या पुस्तकाद्वारे करण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेरणा हा शब्द मी वापरणार नाही, पण या लिखाणाची नोंद घेऊन पुढे जावून विशेषतः मराठीत कोणी भरीव काम केले तर ती माझ्यादृष्टीने निश्चितच आनंदाची बाब असेल.

उपरे विश्व : वेध मानवी स्थलांतराचा
शेखर देशमुख
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य-२९९ रुपये.

(पुस्तक https://manovikasprakashan.com/ या प्रकाशनाच्या वेबसाइटवर २५ टक्के सवलतीत उपलब्ध आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0