दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….

दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….

हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनय सम्राट आज काळाने हिरावून नेला. विश्वास बसत नाही. एका अभिनय युगाचा आज शेवट झाला. त्याने हजारो सिने कलाकारांना अभिनयाची प्रेरणा दिली. प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न दिलीप कुमार व्हावे म्हणून. अशा या मनस्वी कलाकाराच्या सिने कारकीर्दीचा घेतलेला आढावा.

काही अभिनेते तिकीटबारीवर चमत्कार करतात, काही वास्तववादी अभिनयासाठी ओळखले जातात, काही अभिनेते नशीब घेऊन जन्मतात तर काही मल्टी स्टार कास्ट चित्रपटात भूमिका करत तरून जातात. पण दिलीप कुमार या अभिनेत्याचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक जन्मजात कलाकार. ज्याने हिंदी सिनेसृष्टीला Method Actor Technique दिले. सर्व प्रकारच्या भूमिका पडद्यावर यशस्वीरीत्या सादर करून ठेवलेला अभिनेता, आपल्या संवादफेकीने ओळखल्या जाणारा, उत्कट अभिनयाने लक्षात राहणारा, तितक्याच सहजतेने विनोदी भूमिका सादर करणारा हरहुन्नरी कलाकार. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आणि जगल्या. कुठलाही कलाकार जेव्हा स्वतःला सिद्ध करतो तेव्हा त्याला समोर ठेवून भूमिका लिहिल्या जातात. दिलीप कुमारची अभिनयक्षमता लक्षांत घेऊन बहुतेक भूमिका त्याच्यासाठीच लिहिल्या गेल्या आहेत असे जाणवते. सर्व सामान्यांच्या जीवनातील असा कुठलाही प्रसंग नाही जो त्याने पडद्यावर अभिनित केला नाही. ‘मुगल ए आझम’ मधील सलीम, ‘देवदास’चा देव, ‘राम और श्याम’ मधील राम आणि श्याम, ‘गंगा जमुना’मधील गंगा, ‘पैगाम’मधील रतन अशा अनेक भूमिका उदाहरण म्हणून घेता येतील. त्याच्या अभिनयाने नटलेले अनेक प्रसंग भविष्यात अनेक कलाकारांनी पडद्यावर सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. दिलीप कुमारने अभिनयाचे व्याकरणच लिहून ठेवले. दिलीप कुमार व्हावे म्हणून अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत आले आणि त्यांनी बऱ्यापैकी नावं पण कमाविले. बऱ्याच कलाकारांनी आपली अभिनय शैली दिलीप कुमारच्या अभिनय शैलीवर आधारित केली होती, इतका त्याच्या अभिनय कौशल्याचा प्रभाव होता.

चित्रपटसृष्टी म्हणजे असुरक्षितता. बऱ्याच अभिनेत्यांनी याच असुरक्षिततेपायी वाटेला येतील ते चित्रपट स्वीकारले आणि शेवटी overexposure चे शिकार झाले. याउलट दिलीप कुमारने वर्षाकाठी एखाद दुसरा चित्रपट करून आपले वेगळेपण टिकवून ठेवले. हे रहस्य त्याने स्वतः पुरते मर्यादित ठेवले नाही तर काही यशस्वी कलाकारांना सुद्धा त्याने हा सल्ला दिला.

हिंदी चित्रपटसृष्टी प्रामुख्याने दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या जबरदस्त त्रिमूर्तींमुळे ओळखली जाते. तिन्ही कलाकारांनी भरपूर यशस्वी चित्रपट दिलेत. प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होते. प्रत्येकाची अभिनय शैली भिन्न असल्याने त्यांच्यात स्पर्धा जरी असली तरी ती चित्रपट व्यवसायापुरतीच मर्यादित होती. प्रत्येकाने आपला स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला होता. ७०च्या दशकापर्यंत तिघांच्याही चित्रपटाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत असत. राज कपूरची निर्मिती संस्था ‘आर.के. फिल्म्स्’ , देव आनंदची ‘नवकेतन’. दिलीप कुमारने फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित केले. एक ‘गंगा जमुना’ आणि ‘लीडर’ जर सोडले तर त्याने चित्रपट निर्मितीत किंवा दिग्दर्शनात लक्ष घातले नाही. काही चित्रपटाच्या दिग्दर्शनात मात्र त्याने वाजवीपेक्षा जास्त लक्ष घातले अशी टीका त्याच्यावर अनेकदा झाली. काही चित्रपटातील प्रसंग अधिक चांगले व्हावे या उद्देशाने पुनःचित्रित केले अशा वावड्या नेहमीच उठल्या. राज-दिलीप अंदाज आणि देव – दिलीप ‘इन्सानियत’मध्ये बरोबर दिसले. दिलीप-राजकुमार अभिनित ‘पैगाम’ चित्रपट खूप गाजला. सुभाष घई यांच्या प्रयत्नांनी ही जोडी अनेक वर्षांनी ‘सौदागर’ चित्रपटात पडद्यावर एकत्र आली.

१९४४मध्ये प्रदर्शित झालेला ‘ज्वार भाटा’ हा त्याचा पहिला चित्रपट. सिनेरसिकांनी त्या काळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका रानीचे आभार मानावयास हवे कारण तिच्याच सांगण्यावरून दिलीप कुमारला चित्रपटसृष्टीत येण्याची प्रेरणा मिळाली. दिलीपचे पहिले व्यावसायिक यश म्हणजे ‘जुगनू’. सोबत नायिका म्हणून होती नूरजहान. फाळणीनंतर नूरजहान पाकिस्तानात निघून गेली. दिलीप कुमार मूळचा पेशावरचा. खरे नाव मोहम्मद युसुफ खान. देविका रानीनेच त्याचे दिलीप कुमार म्हणून नामानिधान केले. १९४४ ते १९५० या कालावधीत त्याने अमिया चक्रवर्ती, नितीन बोस, रमेश सैगल, किशोर साहू, मेहबूब खान, केदारनाथ शर्मा सारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केल्याने त्याची अभिनयाची मुळाक्षरे पक्की झाली. किशोर साहूच्या ‘नदियाँ के पार’ चित्रपटाच्या यशाने अभिनय क्षेत्रात दिलीप कुमारचे पाय घट्ट रोवले गेले. मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून मान्यता दिली. सहकलाकार राज कपूर आणि नर्गिस आणि संगीतकार नौशादचे अप्रतिम संगीत असल्याने चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. दिलीपसाठी या चित्रपटात पार्श्वगायन मुकेशने केले होते. १९५३ साली फिल्मफेअर मॅगझिनने हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी पुरस्कार देणे सुरू केले. दिलीपने सर्वोत्कृष्ट नायक म्हणून पहिला पुरस्कार ‘दाग’ चित्रपटासाठी मिळविला. दिलीप कुमारची कारकीर्द ५४ वर्षांची (१९४४-९८), त्यात त्याने फक्त ६२ चित्रपट केलेत आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ८ चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळविला. ते चित्रपट होते… ‘दाग’, ‘आझाद’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘कोहिनूर’, ‘लीडर’, ‘राम और श्याम’ आणि ‘शक्ती’. पुढे बरेच पुरस्कार सोहळे झालेत. आयोजकांनी दिलीप कुमारला जीवन गौरव पुरस्कार देऊन स्वतःचा गौरव करून घेतला. ‘पद्मभूषण’ (१९९१), ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (१९९५) देऊन सरकारने सुद्धा त्याच्या कार्याचा गौरव केला. पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ (१९९७) देऊन दिलीप कुमारला गौरविले.

१९६६ मधे दिलीप कुमारचा सायरा बानोशी निकाह झाला. तत्पूर्वी त्यांचे नाव कामिनी कौशल, मधुबाला आणि वैजयंतीमाला या अभिनेत्रीं बरोबर जोडल्या गेले होते. ‘मुगल-ए- आझम’मधील मधुबाला सोबतचे पडद्यावरील प्रेमप्रसंग अतिशय उत्कटपणे चित्रित झाले होते. दिलीप कुमारने वैजयंती सोबत सर्वाधिक ७ चित्रपट केले. सातही चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले. पडद्यावर दिलीप-वैजयंती ही जोडी सिनेरसिकांना खूप आवडली. ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘गंगा जमुना’, ‘पैगाम’, ‘लीडर’, ‘संघर्ष’ या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली.

कारकिर्दीच्या सुरवातीला दिलीपने अतिशय उत्कट भूमिका केल्या. ‘दाग’, ‘देवदास’, ‘मुसाफिर’ इत्यादी दुःखांत भूमिका केल्याने त्याला नैराश्य आले होते. विदेशात जाऊन त्याने उपचारही केले होते. त्याला काही काळ उत्कट भूमिका न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून त्याने ‘आझाद’, ‘कोहिनूर’, ‘नया दौर’, ‘लीडर’ सारखे चित्रपट केलेत. त्याने केलेल्या गंभीर आणि उत्कट भूमिकांमुळे त्याला “The Tragedy King” संबोधले जाते.

दिलीप कुमार अभिनित उल्लेखनीय चित्रपटाची चर्चा करायची झाल्यास ‘दाग’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘मुगल-ए- आझम’, ‘यहुदी’, ‘कोहिनूर’, ‘लीडर’, ‘मधुमती’, ‘आदमी’, ‘राम और श्याम’, ‘बैराग’, ‘सगिना महातो’, ‘मशाल’, ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘सौदागर’ चित्रपटातील भूमिका डोळ्यासमोर येतात. ‘दाग’मधील व्यसनाधीन नायक, प्रेमात असफल ठरलेला ‘देवदास’, ‘मधुमती’तील पुनर्जन्माच्या चक्रात अडकलेला नायक, ‘आझाद’, ‘कोहिनूर’, ‘यहुदी’सारख्या पोशाखी चित्रपटातील नायक, ‘मशाल’ चित्रपटातील अगतिक आणि असहाय नायक, ‘शक्ती’ चित्रपटातील कर्तव्यदक्ष पोलिस ऑफिसर आणि वाईट मार्गाला लागलेल्या त्याच्या मुलाची गोष्ट आणि त्यात अनुभवलेली अमिताभ बरोबरची अभिनयातील जुगलबंदी, ‘विधाता’मध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला नायक पडद्यावर बघतांना सिनेरसिक त्याच्याशी समरस होऊन जातात. दुहेरी भूमिका कशी अभिनित करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘राम और श्याम’. दिलीप कुमारने असे अनेक मापदंड आपल्या अभिनय कौशल्याने सिद्ध करून ठेवले आहेत. एकूण ६२ चित्रपटात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालेले ८ फिल्मफेअर पुरस्कार सोडून ११ वेळा नामांकन प्राप्त झालेला दिलीप कुमार हा श्रेष्ठतम कलाकारच.

दिलीप कुमारच्या सुरवातीच्या चित्रपटात त्याच्यासाठी तलत मेहमूदने पार्श्वगायन केले. पुढे नौशादने दिलीप कुमारसाठी नियमितपणे मोहम्मद रफीचा आवाज वापरला आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. दिलीप कुमारसाठी जास्ती जास्त गाणी रफीनेच गायली. त्याचा स्वतःचा आवाज सुद्धा छान होता. ‘मुसाफिर’ चित्रपटात दिलीप कुमारने लतादीदींबरोबर एक शास्त्रोक्त गीत गायले. संगीतकार सलील चौधरी यांनी हा योग जुळवून आणला. गीताचे बोल होते .. “लागी नाही छुटे रामा चाहे जिया जाये”. तसे ६-७ गीतांमध्ये दिलीप कुमारने एखादं दुसरी ओळ गायली आहे, पण संपूर्ण गीत आणि तेही लतादीदी बरोबर त्याने फक्त ‘मुसाफिर’ चित्रपटासाठी गायले होते.

दिलीप कुमारची सेकण्ड इनिंग्ज खऱ्या अर्थाने सुरू झाली ‘बैराग’ चित्रपटात सादर केलेल्या तिहेरी भूमिकेनंतर. पहिल्या डावात त्याने जुन्या काळाला अनुरुप भूमिका केल्या होत्या. पण बदलत्या काळानुसार आणि वयाला अनुरूप अशा भूमिका स्वीकारल्यामुळे दिलीप कुमारच्या अभिनयाला वेगळीच धार आली. खरंतर दिलीप कुमारसारख्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला वयाचे बंधन नसते. ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘दुनिया’, ‘मजदुर’, ‘सौदागर’ इत्यादी चित्रपटात त्याने स्वतःला नवीन काळात परत एकदा सिद्ध केले. नवीन कलाकारांच्या बरोबर पुरस्कारांसाठी नामांकने मिळवली.

दिलीपकुमार म्हणजे पडदा व्यापून टाकणारा, भूमिकेत सहज शिरण्याचे कसब असलेला, विशिष्ट संवादफेकीसाठी ओळखल्या जाणारा मनस्वी कलाकार. ट्रॅजेडी किंग हे बिरूद लागले असले तरी विनोदी भूमिकेत रमणारा कलाकार. खरंच असे कलाकार दुर्मिळच, त्यातही दिलीपकुमार म्हणजे या सम हाच.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चांगले कलाकार आलेत, गेलेत आणि येतीलही पण दिलीप कुमार हा दिलीप कुमार राहील, आपल्या संयमित अभिनयाने, साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे. त्याच्या अभिनयाने सिनेरसिकांना निर्भेळ आनंद मिळाला. दिलीप कुमारसारखे अभिनेते काळाच्या पडद्याआड जरी गेले तरी ते रसिकांच्या हृदयात निश्चित आणि कायमस्वरूपी जागा करून जातात. असा दिलीप कुमार परत होणे नाही हेच खरे. अभिनयाचे नेमके मर्म ओळखून अर्ध शतकापेक्षा जास्त वर्षे सिनेरसिकांच्या मनावर गारूड करणाऱ्या दिलीप कुमारच्या अभिनय कर्तृत्वाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

‘दिलीप कुमार जैसे कलाकार मरते नही हैं, वो तो हमारी यादोंमे हमेशा जिंदा रहेंगे।

जयंत देशपांडे हे सिनेरसिक व अभ्यासक आहेत.

COMMENTS