शैलीदार आद्यनायक

शैलीदार आद्यनायक

उणेपुरे ९८ वर्षांचे समृद्ध आयुष्य जगल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिलावहिला शैलीदार नायक ठरलेल्या दिलीपकुमार यांनी आज ७ जुलै २०२१ रोजी अखेरचा श्वास घेतला.पडद्यावरच्या विविधरंगी भूमिकांमधून समाजाशी सहज जवळीक साधणारा हा ‘पं. नेहरूंचा नायक’, विसावे शतक गाजवणारा, मानवतावादी शायर फैज अहमद फैजचा खंदा पाठिराखा आणि राज कपूर-बाळासाहेब ठाकरेंचा जिंदादिल दोस्त, वास्तवातल्या जगातही समृद्ध सामाजिक-राजकीय जाणिवांचा वाहक होता. सेक्युलॅरिझम हाच त्यांच्या विचारांचा पाया होता. त्यांची वैचारिक बांधिलकी धर्मकेंद्री नव्हे, तर समाजकेंद्री होती...

गॉसिपिंगच्या अलीकडे.. पलीकडे…
दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….
राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

अनेकांना थोरलेपण महत्प्रयासाने प्राप्त होते, पण फार थोडे असे असतात, जे थोरलेपण घेऊनच जणू जन्माला येतात. युसुफ महंमद सरवरखान पठाण ऊर्फ दिलीपकुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीचा आद्यनायक या दुसऱ्या वर्गात मोडणारा होता. प्रारंभापासूनच त्याच्या प्रत्यक्ष जगण्यातल्या वागण्या-बोलण्यात, रागा-लोभात, पडद्यावरच्या अदाकारीत, समाज आणि राजकारणातल्या सहभागात थोरलेपण तेजाने उज‌ळत होते. त्या उजळण्याने अवघी चित्रपटसृष्टी, प्रेक्षकसृष्टी आनंद नि समाधानात न्हाऊन निघत होती. वेश कोणताही असो, भूमिकेचा मुखवटा कोणताही असो त्याचा आब -रूबाब डोळे दिपवून टाकणारा होता. बुद्धीचे तेज त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाला अद्भूत वलय मिळवून देत होते. दिलीपकुमार १९४०च्या दशकात हिंदीत चित्रपटसृष्टीत प्रवेश करते झाले, तो भारताच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातला राजकीय-सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक काळ होता. जर्मनीत हिटरलच्या नाझी फौजांनी उच्छाद मांडलेला होता. जपानी फौजा अंदमान-निकोबारवर ताबा मिळवू पाहात होत्या. जगावर दुसऱ्या महायुद्धाचे काळेकुट्ट ढग दाटले होते. भारतात स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला होता. अशा या संघर्षमय वातावरणात जगण्याचे उद्दिष्ट शोधत असताना दिलीपकुमार यांचा ‘बॉम्बे टॉकिज’च्या मार्गाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता. रेल्वे स्टेशनांमध्ये ‘हिंदू चाय-हिंदू पानी, मुस्लिम चाय-मुस्लिम पानी’ विकण्याइतपत जातीय तणावाची पार्श्वभूमी असेल किंवा त्याकाळचा फिल्मी रिवाज, देविका राणीने ‘ज्वारभाटा’च्या निमित्ताने जन्माने पेशावरी, पण नाशिक-देवळाली-मुंबई-पुणे इथल्या फळबाजाराशी व्यापाराच्यानिमित्ताने जवळचे संबंध असलेल्या या देखण्या पठाणाचे ‘सेक्युलर अपील’ असलेले “दिलीपकुमार’ असे नामकरण करून जणू नशीबच उजळवले होते.

चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार यांचे चाचपडणे सुरू असतानाच, भारत स्वतंत्र झाला होता. नव्या आशा-नव्या आकांक्षा आसमंतात भरून राहिल्या होत्या. परंतु, स्वातंत्र्यापाठोपाठ झालेल्या भारत-पाक फाळणीच्या जखमांचे व्रणही अनेकांच्या शरीर-मनावर कोरले गेले होते, त्यातून ठसठसून आलेली एक वेदना दिलीपकुमार यांच्या संवेदनशील मनानेही सांभाळून ठेवली होती. एकीकडे, धार्मिक उन्मादापेक्षा समाजवादी- साम्यवादी विचारांच्या प्रसारासाठी समंजस धुरिणांची धडपड चालली होती. आर्थिक घडी नीटशी बसलेली नसल्याने इच्छा-आकांक्षापूर्तीचा परीघ मनाजोगता विस्तारत नव्हता. मात्र, मुन्शी प्रेमचंद, रवींद्रनाथ ठाकूर, शरत्चंद्र चट्टोपाध्याय, कवी इक्बाल यांचे ध्येयवादी-मानवतावादी साहित्य समाजमनाला मोठाच दिलासा देत होते. कलेच्या प्रांतात, त्यातही चित्रपट निर्मितीच्या प्रांतात, कथा-गाण्यांतून त्याचे प्रतिबिंब उमटू लागले होते. त्याकाळचे अशोककुमार आदी नट आपापल्या भूमिकांतून आदर्शवादाची विविध रूपे रुपेरी पडद्यावर साकारत होते, पण जेम्स स्टिवर्ट, पॉल म्युनी, क्लार्क गेबल या पाश्चिमात्य नटांचा प्रभाव असलेल्या दिलीपकुमार यांचा दर्जा खूप वरचा, मृतवत रुढ चौकटी ओलांडणारा होता. तोवरचे हिंदी चित्रपट नाटकांचा पगडा घेऊनच जन्माला येत होते. त्यामुळे दृश्यमांडणी, संवादफेक, अभिनयशैली या सगळ्यांत एक प्रकारचा नाट्यसुलभ भडकपणा प्रतिबिंबित होत होता. परंतु, चित्रपटाच्या नवतंत्राचे अचूक भान आलेले, जे काही मोजके नट चित्रपटसृष्टीत होते, त्यात दिलीपकुमार हे नाव अग्रभागी होते. किंबहुना, नाटक आणि चित्रपटासाठी वापरात येणारे अभिनयाचे तंत्र मूलत: भिन्न आहे, याचे चित्रपटसृष्टीला भान देणारे ते पहिले नट होते. ज्यांच्यावर नाटकांचा प्रभाव होता, त्यांना हे तंत्र पचवणे प्रारंभी जडही गेले होते, आणि त्यातूनच हा ‘पुटपुटकुमार’ आहे, अशी टिंगलटवाळी एका वर्गात होत होती. मात्र, दिलीपकुमार यांनी तंत्र आणि कलेचा सुवर्णमध्य साधत स्वत:ची संयत, सहज तरीही कमालीची आर्त अभिनयशैली निर्माण केली होती.  देखण्या, बुद्धिमान, अभ्यासू आणि निष्ठावान नटाचे ते आदर्श प्रतीक बनत चालले होते. भव्य कपाळ, वाऱ्याच्या झोतासह हलकेच कपाळावर रेंगाळणारे केस, विलक्षण बोलके डोळे आणि हिंदी-ऊर्दू लहेजा असलेली मर्मभेदी संवादफेक ही रुपेरी पडद्यावरच्या दिलीपकुमार नावाच्या प्रतिभावंताची खासियत बनली होती.

पुढे जाऊन अमिताभ-शाहरूख खान यासह अनेक नटांवर त्यांचे मॅनरिझम्स आणि त्यांच्या अभिनय शैलीचा प्रभाव पडला होता. “नया दौर’, ‘मधुमती’ वा ‘पैगाम’मधला देखणा आदर्शवादी तरुण असो, ‘मुगल-ए-आझम’मधला राजबिंडा सलीम असो, ‘देवदास’मधला दु:खातिरेकात बुडालेला निराशावादी देवदास मुखर्जी असो, ‘राम और शाम’ किंवा ‘गंगा जमुना’मधला करारी आणि मृदू स्वभावाचा मातीशी नाते सांगणारा नायक असो किंवा “शक्ती’ किंवा “मशाल’मधला आदर्शवादी बाप आणि नवरा असो, प्रत्येक भूमिकेला महाकाव्याच्या पातळीवर नेण्याची दिलीपकुमार यांच्या अभिनयात लोकविलक्षण क्षमता होती. कारकीर्दीच्या पूर्वार्धात ‘ट्रॅजेडी किंग’ आणि उत्तरार्धात अभिनयसम्राट असा प्रेक्षकांनी बहाल केलेला किताब त्या क्षमतेला दिलेली उत्फूर्त दादच होती. ‘तराना’, ‘अंदाज’, ‘लीडर’ यांपैकी  चित्रपट कोणताही असो भूमिका कोणतीही असो, त्या सगळ्याला अस्वस्थ करणाऱ्या तात्कालिक सामाजिक-राजकीय आशयाचा भरभक्कम आधार होता, म्हणूनही पडद्यावरच्या त्यांच्या प्रत्येक रुपांत प्रेक्षक स्वत:चे प्रतिबिंब पाहात होते. त्यांच्या रुपेरी पडद्यावरच्या वा प्रत्यक्षातल्या केवळ दर्शनानेच जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मिळवत होते. त्यातही स्वर्गीय सौंदर्याची मालकीण मधुबाला आणि के. आसिफ दिग्दर्शित भव्यदिव्य ‘मुगल-ए-आझम’ त्यांच्याच नव्हे प्रेक्षकांच्या आयुष्यातलेही लाडके प्रेयस होते.

पडद्यावरच्या भूमिकांमधून समाजाशी सहज जवळीक साधणारा हा ‘पं. नेहरूंचा नायक’, विसावे शतक गाजवणारा मानवतावादी शायर फैज अहमद फैजचा खंदा पाठिराखा आणि राज कपूर-बाळासाहेब ठाकरेंचा जिंदादिल दोस्त, वास्तवातल्या जगातही समृद्ध सामाजिक-राजकीय जाणिवांचा वाहक होता. सेक्युलॅरिझम हाच त्यांच्या विचारांचा पाया होता. त्यांची वैचारिक बांधिलकी धर्मकेंद्री नव्हे, तर समाजकेंद्री होती. गोर-गरीबांचा, शोषित-पीडितांचा अंत्यस्थ कळवळा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बांधिलकीच्या भावनेतून ६०-७० च्या दशकात बिहार-पं.बंगालमधल्या दुष्काळग्रस्तांना, कोयना भूकंपग्रस्तांना चित्रपटसृष्टीच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अनोळखी, रस्त्यावर भीक मागणाऱ्या अंधांच्या अडचणी जाणून घेण्याइतपत खोलवर त्यांच्यात संवेदनशीलता होती. त्याच जाणीवेतून ‘नॅशनल असोसिएशन ऑफ दी ब्लाइंड’चे अध्यक्षपद त्यांनी तन-मन-धन एकवटून अनेक वर्षे सांभाळले होते. या बांधिलकीची पोचपावती म्हणून त्यांच्याकडे मुंबईचे नगरपालपद चालून आले होते. एरवी, शोभेच्या असलेल्या या पदाला त्यांच्या निर्भेळ समाजनिष्ठेमुळे शानही आली होती. सभ्य, सुसंस्कृत आणि संयत स्वभावामुळे देशसेवा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद आदी संकल्पनांच्या राजकारणप्रेरित व्याख्या करण्यापेक्षा राज्यसभेचा सदस्य या नात्याने समाजाभिमुख कृतीतून त्या सिद्ध करण्यावर त्यांचा विशेष भर राहिला होता. मुंबईच्या प्रसिद्ध नेहरु सेंटरच्या उभारणी संकल्पनेत त्यांनी आवर्जून सहभाग नोंदवला होता. काँग्रेस पक्षाशी असलेले राजकीय नाते न लपवता, राजकीय स्वार्थासाठी स्वत:च्या प्रतिष्ठेचा गैरवापर न होऊ देणारा म्हणूनच पाकिस्तान सरकारने दिलेला “निशान-ए-इम्तियाज’ हा किताब स्वीकारण्याची हिंमत दाखवणारा, दीपा मेहताच्या ‘फायर’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून धिंगाणा घालणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना न जुमानता कलावंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास पुढाकार घेणारा, असा तो नागरिकत्वाची सर्वार्थाने जबाबदारी पेलणारा खमका भारतीय होता.

‘मुल्क दो है, पर एकही दिलसे धडकते है, धडकने चाहिए’, हे त्यांनी भारत-पाक संदर्भातले कायम उराशी जपलेले धर्मातित स्वप्न होते. याचाच परिणाम म्हणून आज जसे,अमिताभ बच्चन-शाहरूख खानच्या बंगल्यापुढ्यात सदासर्वकाळ चाहत्यांचा ठिय्या असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रसिद्ध ‘४८, पाली हिल’ बंगल्याबाहेर केवळ एक झलक घेऊ पाहणाऱ्यांची, मदतीसाठी अडलेल्यांची मंदिर-मशिदीबाहेर जमावी, तशी सदासर्वकाळ गर्दी जमत होती. त्यांच्यात भेद न होता, रोज न चुकता भुकेल्यांना अन्नवाटप आणि आजारपण-गरिबीने गांजलेल्यांना यथाशक्ती पैशाच्या आधारही मिळत होता. अर्थात, चित्रपटसृष्टीत आणि सार्वजनिक जीवनात अलोट प्रेम मिळाले असले तरीही, प्रतिमा आणि वास्तव यातले अंतर जाणण्याचे त्यांचे भान अखेरपर्यंत टिकून होते. ‘युसुफखान इज स्केअर्ड ऑफ दिलीपकुमार, ओन्ली अल्लाह नोज हु दिलीपकुमार इज, अँड व्हॉट ऑल ही कॅन डु’ ही एम. आसिफ फारुखी नावाच्या जवळच्या मित्राकडे त्यांनी व्यक्त केलेली तटस्थ भावना त्याचेच निदर्शक होती.

खऱ्या अर्थाने, दिलीपकुमार नावाच्या या नटश्रेष्ठाने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचे दालन समृद्ध  केले होते, पण त्याचबरोबर प्रगल्भ जाणिवांच्या बळावर जनसामान्यांनाही आपलेसे केले होते.  म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीने जपलेल्या अभिनयधर्माच्या आद्यनायकाचे जाणे चित्रसृष्टीला जितके पोरके करणारे आहे, तितकेच केवळ भारत-पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतल्याच नव्हे, जगभरातल्या असंख्य चाहत्यांची मने अतीव उदास करणारेही आहे.

शेखर देशमुख पत्रकार, संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0