कोरोनाने दुभंगलेला इटली

कोरोनाने दुभंगलेला इटली

चार आठवड्याच्या लॉकडाऊन नंतर इटलीमधील अनेक वस्त्यांमधून आता गाणी, वाद्ये, थाळ्या, ताटं वाजवण्याचे प्रकार कमी झाले आहेत. त्या ऐवजी इमारतींवर, घराच्या बाल्कनीत इटलीचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले दिसत आहे. गेल्या २३ फेब्रुवारीपासून इटलीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्गा वार्यासारखा पसरला आणि हाहा म्हणता १५ हजारांचे बळी घेऊन गेला. यात डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन : १५ राज्यांमध्ये केवळ २२ टक्के अन्नधान्याचे वाटप
कोरोनाचा हवेतून संसर्गः लॅन्सेटचा अहवाल
महानगरांत महिलांचे लसीकरण कमी

इटलीमधील लॉकडाऊन शुक्रवारी ३ फेब्रुवारीला संपणार होता पण सरकारने खबरदारी म्हणून लॉकडाउन इस्टरपर्यंत वाढवला आहे. त्याचे कारण म्हणजे उत्तर व दक्षिण इटलीला दुभंगणारा कोरोना विषाणूचा संसर्ग जवळपास संपुष्टात आला आहे. सध्या जे मृतांचे आकडे दिसत आहेत त्या रुग्णांना कोरोनाची लागण पूर्वी झालेली आहे.

कोरोनाने इटलीचा गर्भश्रीमंत समजल्या जाणार्या उत्तरेला आपल्या कब्ज्यात घेतले. देशात जेवढे काही कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत वा संसर्ग झाला आहे त्यापैकी ७५ टक्के मृत्यू व बाधित रुग्ण टस्कनीच्या उत्तरेकडील भागातले आहेत. हाच भाग कोरोनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.

कोरोना विषाणूमुळे इटलीच्या उत्तरेकडील भागातील सुमारे १० हजार आरोग्य सेवकांना बाधित केले आहे. या आरोग्यसेवकांकडे पर्याप्त मास्क नव्हते व अन्य संरक्षण व्यवस्था नव्हती. वास्तविक युरोपमधील सर्वाधिक उत्तम अशी आरोग्य व्यवस्था उत्तर इटलीमध्ये आहे, पण कोरोना विषाणूने ती पूर्ण मोडीत काढली आहे.

हा संसर्ग जर इटलीच्या दक्षिणेकडे पसरला असता तर मृत्यूंचा आकडा अधिक झाला असता, कारण दक्षिण इटलीमध्ये गरीब नागरिकांची संख्या अधिक आहे, तेथे आरोग्य व्यवस्था सक्षम व पुरेशी नाही. पण तरीही दक्षिण इटली स्वतःशी झुंज देत आहे. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. दक्षिण इटली हा काळ्या पैशावर चालणारा भाग समजला जातो. येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व  बेरोजगारी आहे. आता कोरोनाची साथ आल्याने बेरोजगार्यांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे, समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरलेली आहे. एका आकडेवारीनुसार दक्षिण इटलीमधील ३० लाख लोकसंख्या काळ्या पैशावर जगते.

दक्षिण इटलीतील रोम, पालेरमो, नेपल्स, बारी या भागात चोर्यामार्यांच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात वाढल्याचे दिसून आले आहेत. त्यात मोटारींच्या चोर्यांपासून पाळीव प्राण्यांच्या चोर्यांपर्यंत सर्व प्रकार आहेत. वेश्या वस्तींमध्येही बेरोजगारी दिसून येते. रेशनसाठी रांगा लागलेल्या दिसतात. अनेक वेश्यावस्तीत एक दिवसाचे जेवण मिळणेही अशक्य झालेले दिसून येते. लॉकडाऊन केव्हा संपतोय असे येथे प्रत्येकाला झाले आहे.

देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला पाहून अनेक दयाळू मदतीला धावून आले आहेत. देशात अन्नधान्यांच्या दुकानांसमोर गरीबाला आपल्या वाट्यातील धान्य द्यावे, असे आवाहन केले जात आहेत. पॅकबंद डबे गरजूंपर्यंत पोहचवले जात आहेत. अनेक इमारतींबाहेर बेरोजगार, गरजूंना जेवण मिळावे म्हणून लोक रोज जेवण ठेवत आहेत. पोलिस व स्वयंसेवक मंडळींकडून काही ठिकाणी जेवणही पोहचवले जात आहे. पालेरमो येथील एका पोलिस अधिकार्याने आपला महिन्याचा सुमारे २,१०० डॉलर पगार गरजूंना किराणा सामान आणण्यासाठी मदत म्हणून दिल्याचे वृत्त आहे.

माणसं एकमेकांना समजावून घेत आलेल्या संकटातून पुढे जात असली तरी काही संकटे ही पोलिसांसाठी डोकेदुखीची ठरली आहेत. दक्षिणेकडील पुगलिया प्रांतात अन्न घेऊन जाणारा एक ट्रक लुटारूंनी गेल्या आठवड्यात पळवला होता. या घटनेत ट्रक चालकाला मारहाण झाली नाही पण जेव्हा ट्रक पोलिसांना सापडला तेव्हा ट्रकमधील एकूण एक सामान लुटारूंनी चोरून नेले होते.

इटलीत अनेक किराणामाल दुकानांमध्ये अन्नधान्य भरताना सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येत आहेत. पालेरमोच्या महापौरांनी इटलीच्या सरकारला विनंती करून गरजू नागरिकांच्या घरी जीवनावश्यक पोहचवल्या जाव्यात, त्यांच्या हातात किमान पैसे द्यावेत अशी विनंती केली आहे. तसे प्रयत्न न केल्यास चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

पालेरमोमध्ये अनेक संघटित टोळ्या आहेत. त्यांचे डोके वर येऊ नये म्हणून सरकारने तातडीने येथे मदत करावे असेही महापौरांचे म्हणणे आहे. सध्या पालेरमोमध्ये काही टोळ्या रस्त्यावर येऊन सरकारशी संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचीही काही वृत्ते येत आहेत. फेसबुकवर काही प्रायव्हेट गट स्थापन करण्यात आले आहेत, त्याद्वारे लोकांना संघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एक गट नॅशनल रिव्ह्यूलेशनने तर दुकाने कशी फोडायची याची माहिती लोकांमध्ये पसरवण्यास सुरूवात केली आहे. लोकांनी बहुसंख्येने रस्त्यावर जमावे, निदर्शने करावीत अशी आवाहने केली जात आहेत. केवळ दुकाने फोडण्यासाठी नव्हे तर लोकांनी घरभाडे, डिपॉझिट, अन्य बिले यांच्याविरोधातही रस्त्यावर यावे असे सांगण्यात येत आहे.

काही माफिया संघटना समाजातील असंतुष्ट वर्गाला हेरून त्याच्यापर्यंत मदत पोहचवत आहेत, त्या बदल्यात ते या वर्गाकडून व्याज व अन्य प्रकारची मदत मागत आहेत.

आता जेव्हा इटलीतील लॉकडाऊन मागे घेतला जाईल तेव्हा या संघटित टोळ्या कर्जवाटपासाठी पुढे येतील आणि सरकारपुढे अडचणी निर्माण करतील. अशा परिस्थितीत जर सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत तर लॉकडाऊन नंतर निर्माण होणार्या आर्थिक-सामाजिक पोकळीत उडी मारण्याची तयारी माफिया गटांची आहे. त्यांच्याकडे असलेला पैसा ते गुंतवण्यात तयार आहेत.

इटलीचे पंतप्रधान काँते यांनी ४४० दशलक्ष डॉलरची अन्नाची व्हाउचर्स वाटण्याची तयारी दाखवली आहे. त्याचबरोबर ४.५ अब्ज डॉलरचा आर्थिक निधी इटलीतील सर्व प्रांताना वाटण्यात येणार आहे.

इटलीच्या उत्तरेत कोरोनाने हाहाकार माजवला असला तरी दक्षिणेत त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. आताच या भागात असंतोष वाढत चालला आहे. त्याची दखल सरकारला तातडीने घ्यावी लागेल.

मूळ लेख सीएनएनच्या संकेतस्थळावरून घेतला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0