सीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा

सीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा

नवी दिल्ली : चीनने सीमावाद उकरून काढल्याप्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यापुढे नापसंती व्यक्त केली असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केला असला तरी भारत सरकारमधील सूत्रांच्या मते लडाखमध्ये भारत-चीन सैन्यांमधील तणावाअगोदर मोदी व ट्रम्प यांच्यात संभाषण झाले होते. त्यानंतर सध्या ट्रम्प यांच्यासोबत कोणताही संवाद झालेला नाही, असे सांगत भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे.

पण ट्रम्प पत्रकारांना व्हाइट व्हाउसमध्ये नेमके काय म्हणत सांगत होते ते पाहा : दोन्ही देशांमध्ये मोठा वाद आहे. दोघांची लोकसंख्या प्रत्येकी दीड अब्ज एवढी आहे. दोघांचे लष्करही सामर्थ्यशाली आहे. पण भारत समाधानी नाही त्यामुळे कदाचित चीनही समाधानी नसेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की,  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी बोललो. त्यावेळी चीनबरोबर जे काही चालले आहे ते पाहता ते चांगल्या मूडमध्ये नव्हते, असे मला वाटले.

ट्रम्प यांनी यावेळी भारत-चीन सीमावादात पुन्हा मध्यस्थी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. “मी मध्यस्थी करू शकतो. त्या दोघांची इच्छा असेल तर मी त्यांच्यामध्ये मध्यस्थी किंवा लवादाची भूमिका निभावू शकतो. मी ती करेन.” असेही ट्रम्प म्हणाले.

बुधवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्रम्प यांनी भारत-चीनच्या वादात आपण मध्यस्थीस तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी भारतीय परराष्ट्रखात्याने एका वाक्यात, भारत शांततामार्गाने चीनशी चर्चा करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

मात्र चीनबाबत मोदी समाधानी नव्हते या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर भारताने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सरकारी सूत्रांच्या माध्यमातून ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावले जात आहेत. ट्रम्प व मोदी यांच्यात सध्या कोणताही थेट संपर्क झालेले नाही. शेवटचा संपर्क ४ एप्रिल २०२० रोजी हायड्रोक्सिक्लोरिक्विन संदर्भात झाला होता असे सांगण्यात येत आहे.

चीननेही ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव भारताबरोबर चीनच्या परराष्ट्र खात्यानेही धुडकावला आहे. सीमावादासंदर्भात भारत व चीनचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असून या वादावर तोडगा काढण्यास दोन्ही देश सक्षम असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS