डॉ. बाबा आढाव-सामाजिक कार्याची नवनीती

डॉ. बाबा आढाव-सामाजिक कार्याची नवनीती

कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांनी वयाची ९१ वर्षे नुकतीच पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा लेख.

भाजपच्या हिंदुत्वाला तमीळनाडूत स्थान नाही!
आमार कोलकाता – भाग ४ : ८५ अँमहर्स्ट स्ट्रीट
सातपाटील कुलवृत्तांत: काळाचा अजस्त्र पट उलगडणारी महाकादंबरी

एका योग्य वळणावर बाबा आढाव या लढाऊ व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. साल १९६८ असावे. डॉ. व्दारकानाथ लोहिया आणि प्रा. शैला लोहिया या पती-पत्नीमुळे त्यांची ओळख झाली आणि त्यांचा विचार समजून घेता आला. ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीपासून त्यांचा संबंध आला. तरुणपण हे सळसळत्या रक्ताचे असल्याने बाबांसारख्या आक्रमक विचाराच्या माणसाजवळ जाणे आवडले. तो काळही तसाच. अभ्यास करत करत ज्वलंत प्रश्नांना सामोरे जाण्याची, संघर्ष करण्याची वृत्ती अंगात भिनायला सुरुवात झाली होती. पिचलेल्यांवर सत्ताधार्‍यांनी आणि समाजाने केलेल्या संघर्षाला तोंड फोडण्याचा तो काळ होता. मी ज्या दैनिकात कार्यरत होतो त्या दैनिकात तेव्हा ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे रिपोर्ताज येत होते. ते सुंदर अक्षरात लिहून काढण्याचे काम माझ्यासारख्या पत्रकारितेचे शिक्षण घेणार्‍या तरुणावर होते. दलित व उपेक्षितांना गावातील आड-विहिरीवर पाणीभरण्यासाठी मोकळीक असावी हा त्यामागील हेतू होता.

तिथून मग नवे तत्त्वज्ञान अंगीकारायला सुरुवात झाली.  माझे वय असावे तेव्हा २२-२४ वर्षांचे. समाजकारण आणि राजकारण फारसं कळत नव्हतं. परंतु काहीतरी चांगल्यासाठी केलं जातं यावर हळूहळू विश्वास बसत गेला. पुढे तो विश्वास दृढ झाला. संस्कृती आणि परंपरा यांच्या बंधनात अडकलेल्या समाजाला कशा पद्धतीने करकचून आवळले जात आहे, याविषयीचा गुंता उलगडत गेला. मग मला एका अभंगाच्या निमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली. तो अभंग असा होता,
‘पारंबीच्यासाठी । शाख होई मूळ ।
      तसे माझे कूळ । होऊ द्यावे ॥’

संत साहित्य वाचताना लक्षात राहिलेल्या या ओळी बाबा आढाव यांना आज बघताना पुन्हा पुन्हा आठवतात. समाजातील अनेक घटकांकडून अंधश्रद्धेचा आधार घेऊन अनेक गोष्टी खेड्यापाड्यात चाललेल्या असतात. ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीच्या रूपानं खेड्यापाड्यात हिंडताना झापडबंद डोळ्यांनी पाटील-तलाठ्यांचा व्यवहार कशा पद्धतीने शोषत असतो हे हळूहळू समजत गेले. लक्षात आले. अंबाजोगाई, माजलगाव या पट्ट्यातील अनेक तरुणमित्र चळवळीत दाखल झाले आणि मग मलाही विचारांची दिशा मिळाली. पंडितांनी निर्माण केलेल्या धर्मसंस्कृतीची चिरफाड करतानाची बाबांची भाववृत्ती समजून आली. चळवळीतील त्यांची निष्ठा आणि मूलभूत चिकित्सा कशा पद्धतीने व्यक्त होते हे समजायला लागले. खेड्यापाड्यातील समाजाच्या जगण्याचे खोलवर केलेले चिंतन बाबांच्या व्यवहारातून अनेकदा दिसले आणि मग वाटले की बाबांचं भाषण हे भाषण नसतं, त्यात स्वतंत्रपणे मांडलेला विचार असतो. आणि मग तुकारामाचे एक एक अभंग साक्षीला आम्हा तरुणांच्यापुढे उभे राहात. त्यामुळे श्रमकर्‍यांना बाबा आपले का वाटतात, या प्रश्नाचे आकलन झाले. एक म्हणजे खर्‍या विचाराभोवती खर्‍या विचारशक्तीची दार्शनिक चळवळ आपोआप समजत गेली. विचारशून्यतेच्या काळात तो माझा प्रारंभ होता, हे इथे नमूद केले पाहिजे. वेगवेगळ्या परंपरा सांगणार्‍या, निर्माण करणार्‍या घटकांचा या निमित्ताने अभ्यासही झाला. माजलगावचा दलित वस्तीमधील एक प्रसंग आठवतो, तो बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आम्हा तरुणांसमोर ठेवीत होता. माजलगावच्या वस्तीतून फिरत असताना एक ऐंशी वर्षांची माय, बाबा आढावांना पाहून तिने त्यांचे पाय धरले. बाबा ओशाळले आणि त्या मायचे बाबांनी दर्शन घेतले. बाबा म्हणाले,
“पाण्यासाठी दिवसभर वणवण भटकणारी तू माझ्या आईसारखी आहेस.”
इथे पुन्हा त्या बाईच्या डोळ्यांत घळघळा पाणी आले. ती म्हणाली,
“तू पोरासारखा असला तरी आम्हा गरीब समाजाविषयी तू करीत असलेल्या कामात मला माझा बाबासाहेब आंबेडकर दिसतो. म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची जाणीव होते.”
‘एक गाव एक पाणवठा’ या मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात हा प्रसंग नाही. कदाचित, तो बाबांनीच टाळला असावा. अशा पद्धतीचे अनेक गौरवाचे क्षण बाबांनी या पुस्तकात सांगितलेच नाहीत.

चळवळीत अभिनवता यावी म्हणून विचारांची बैठक तसूभरही हिकडं तिकडं होऊ न देता कार्य करीत राहणं तेवढं सोपं नसतं. गाडीवर श्रमिकांच्या निष्ठेचं प्रतीक असेलेलं निशाण फडकत राहते, ते त्यांच्यामुळं. वंचितांची पराभूत मानसिकता हवं तर त्याला मनोवृत्तीही म्हणूया. ती समजून घेऊन, तिच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी गेली ६० वर्षे चालवलेला यज्ञ आजही तसाच धगधगताना दिसतो. सोपा समाजवाद आणि त्यातील तथ्य खालच्या तळापर्यंत पोहचवण्यासाठी महात्मा गांधी आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दाखवलेला मार्ग आणि त्या मार्गावरून बाबा आढावांची चळवळ चालत राहिली. मोठी झाली.

परब्रह्माच्या सावलीला जवळ न येऊ देता कडक उन्हातच फिरून या यज्ञाची ज्योत सतत तळपत ठेवण्याचे काम बाबा करतात. त्यासाठी लागणारी धडाडी आणि त्यासाठी लागणारं रसायन ते ठामपणे बाबांना राम मनोहर लोहिया यांच्या सामाजिक विचारातून मिळाले आहे. त्यातील एक सांकेतिक लिपी बाबांनी आत्मसात केली आहे. चळवळीचं आणि त्यातील कामाचं प्रतिबिंब काळानुरूप पडत राहणं या वाक्याला अधोरेखित करीत राहण्याची त्यांची सवय अनुकरणीय वाटते. या सगळ्या सूत्रांचा समाजशास्त्रीय अभ्यास समाज विज्ञानात ठळकपणे यायला हवा. केवळ चार्चित नव्हे, तर काही ज्वलंत प्रश्नाची उत्तरे पुढील पिढ्यांना मिळू शकतील अशी. ती अनेक चळवळीच्या अंगाने मिळावी, त्यामुळे चळवळीचे महत्त्व तरुण पिढीला कळून येईल.

बाबा आढावांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ आणि ‘हमाल पंचायत’ या दोन्ही कामाचे स्वरूप हे वेगळे आहे. म्हणूनच असे वाटते की बाबा आढाव उपेक्षित वंचितांसाठी आयुष्य झिजवणारे एक विचारवंत वाटतात. त्यांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला तर सामाजिक सुधारणेसाठी आग्रह धरताना त्यांच्यासमोर विचार होता तो फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा. त्यावरच त्यांची वैचारिक बांधणी पक्की झाल्यामुळे ते आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व राजकारणात वंचित समाजाला नेमकं स्थान काय असावं, कोणतं असावं याच्याविषयी सातत्याने आग्रही असतात. समाज चिंतनात गर्क राहणारे बाबा अधिक गडदपणे दिसतात ते सत्तेपासून दूर राहणारा एक समंजस आणि वैचारिक कार्यकर्ता म्हणून. एका विशिष्ट जातीसाठी वापरल्या जाणार्‍या संस्कृती, परंपरा या शब्दांचा उलगडा ते तरुण कार्यकर्त्यांसमोर ठेवत गेले. त्या तरुणांमध्ये मी एक होतो. विज्ञानवाद, धर्म निरपेक्षता आणि त्याची चौकट समजून सांगणं जरूरीचं मानलं गेलं. धर्म, जाती आणि लिंग भेदामुळे समाजाला गेलेले तडे आणि त्यामुळे जागरूकपणे त्यावर मात करीत राहिले. परिवर्तनाच्या कामात अडथळे आणणार्‍यांना तर्कशुद्ध उत्तरे देण्याची त्यांची पद्धत अचंबित करणारी आहे. अनेेकवेळा त्यांच्या चळवळीचे मर्मग्राही विश्लेषण करताना अनेकांची लेखणी अडखळत असे. एखाद्या चळवळीचे खरे प्रतिनिधी वाटणं, हाती घेतलेलं काम निरंतर संघर्षानं फळाला येतं या पायाभूत धारणेवर त्यांनी अनेक चळवळी केल्या आणि तडीस नेल्या. त्यांचे जवळचे सहकारी सत्तेच्या अमलाखाली गेल्यानंतरही ते समताधिष्ठित लोकशाहीसाठी सतत कार्यात मग्न राहिले. कधी कधी अशाच रयतवारीची गरज असते.  चळवळीला ती परिपक्व बनवते.

महात्मा गांधींनी दिलेला समतेचा मंत्र ‘हरिजन को घर में लो…’ सानेगुरूजींचे पंढरपूरमधील उपोषण. आधी गुलामी होती आता स्वातंत्र्य आहे. एकीकडे स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्यात आता हक्कासाठी, समतेसाठी, न्यायिक बांधणीसाठी लढणारे आणि बोलणारे गांधी आणि सानेगुरुजी बाबांनी वयाच्या अवघ्या सतरा-अठराव्या वर्षात पाहिले. त्याचा खोल प्रभाव त्यांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्व घडणीवर झाला. बाबा आढाव आज वयाच्या नव्वदीतही लढतायत त्याचा पाया समतेच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यातून घेतलेली प्रेरणा हाच होता. हा समतेचा लढा राजर्षी शाहुंनी कांबळेंना काढून दिलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये जसा दिसतो तसाच तो एक गाव एक पाणवठामध्ये कृतीतून उभारणी करण्यामध्ये दिसतो. गांधीचींचा विचार, राजर्षी शाहुंचा समतेचा मूलमंत्र यासाठी प्राप्त स्वातंत्र्यात कृतीशील कार्य कोण करणार. बाबा त्या वाटेवर ठामपणे उभे राहिले. अनेक ठिकाणी तत्कालिन परिस्थितीमध्ये वेशीबाहेरच्या माणसांना सार्वजनिक ठिकाणी चहा आणि जेवणाची भांडी वेगळी असायची. पाणवठ्यावर सर्वांच्या सोबतीने माणूस म्हणून पाणी भरता येत नव्हते. माणसाला नाडणारी, माणूस म्हणून अवहेलना करणारी किती अपमानास्पद गोष्ट होती ही. महात्मा फुल्यांनी आपला पाण्याचा आड जसा खुला केला तसा गावोगावच्या पाणवठ्यांना पडलेला हीनपणाचा फास कोण काढणार. बाबा पुढे झाले.
“सत्य सुखाला आधार
बाकी सर्व अंध:कार”
ही महात्मा फुलेंची साधनासुचिता प्राणपणाने जपली. सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. ते सामान्य जणांच्या सुखाचा आधार आहे. या शब्दांतूनही बळ घेतले. जिथे जिथे अशा घटना आणि चाली होत्या तिथे तिथे पाहोचले. हा मराष्ट्राच्या मातीमध्ये प्रयोगशीलतेने धडपणारा आणि माणसांना आधार देणारा बाबा त्या काळाने पाहिला. अतिशय तडफेचा, परखड आणि वैचारिक निष्ठांनी कणखर बाणा असल्याखेरीज ही पावले दमदारपणे पडत नाहीत. महात्मा फुले आणि राजर्षी शाहुंच्या विचारप्रेरणेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायिक भूमिकेला वर्तमानामध्ये कृतीशीलपणे पुढे नेणारा नेता म्हणून सामाजिक न्यायाच्या सैद्धांतिक संकल्पनेला त्या न्यायाची गरज असलेल्या गरिबाच्या घरापर्यंत पोहोचवू शकले. तिथे पोहोचल्यानंतरचे जे डोळस ज्ञान आहे त्यानेही बाबा अधिक जागृत आणि सक्रिय झाले. एक गाव एक पाणवठ्याविषयी काम करताना त्यांना भटके विमुक्त भेटले, जोगतीणी, वाघ्या-मुरळी यांच्याही वेदनांकडे पाहिले. आपण तर पाण्याच्या हक्कासाठी लढतो आहोत, या भटक्या माणसांना तर त्यांचा गावच नाही. तिथून पुन्हा त्यांच्या लढाईसाठी हा माणूस चालत राहतो. वाटेला वाटा फुटाव्यात आणि सक्रिय भूमिकेचा विस्तार व्हावा, ही कार्यातून उभी राहिलेली त्यांची कार्ये आहेत. मग हा माणूस झोपडीतल्या, रस्त्यावरल्या, घाम गाळणार्‍या, प्राणपणाला लावून निष्ठेने राबणार्‍यांच्या जीवनाला दिलासा देणारा बाबा अविरत आजही झटतो आहे हे पाहताना विशेष वाटते आहे. अलीकडच्या काळात राजकारणाच्या उलथापालथीतून धर्मसत्तेच्या रांझणात राजसत्ता पाणी भरते आहे, याचे चित्र पाहून त्यांना मनाला वेदना होतात. राजर्षी शाहुंनी, महात्मा फुलेंनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला, विचाराला, क्रांतीला खीळ बसत असेल तर ते बाबा आढावांना सलणारे वर्तमान वाटते. त्याचीही काळजी आज या वयात त्यांच्या चिंतनशीलतेत दिसून येते.
ज्यांच्या वाट्याला काहीच नाही, याचा शोध कुठं घ्यावा हे महात्मा फुले आणि महात्मा गांधींनी खूप चांगल्या प्रकारचे कृतीतून दाखवून दिले आहे. अशा कामातील समग्रता डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याची व्याख्या करताना असे विचार मनात येऊन जातात. समग्रतेचा आभाव असलेल्या चळवळी आणि त्या ज्या पायावर उभ्या आहेत त्यांचा ढाचाच ढासळला जातो तेव्हा तेव्हा बाबांच्या कार्य पद्धतीचे स्मरण होते. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विवेचक शक्तीच नेतृत्त्वाकडे नसेल तर कार्यभाग अपुरा राहतो.  सत्याबद्दलचा विचार स्वीकारलेल्या कामाला त्याचा आधार असेल तर सत्य त्यातून दिसते.
भाषिक अस्मिता, वंशवाद आणि जात टाळून चळवळी बहुमुखी करायच्या असतील तर असा विचार करावा लागतो. अशा चळवळींचे नेतृत्त्व करणार्‍यांनी ते ध्यानी घ्यायचे असते. ते डॉ. बाबा आढावांनी पदोपदी घेतलेले दिसते. समाजवादाची व्याख्या अनेकांनी अनेकदा व्यवहाराच्या अंगाने केली. ती करताना नेमका धोका कशात आहे, याचा विचार करता करता मूळ मार्गही सोडला. पण बाबांचे तसे झाले नाही. आपल्या ताकदीचा विचार केला नाही तर चळवळीचे काय होते याचा विचार त्यांनी केलेला दिसतो. म्हणून ते कधीच आरंभशूर ठरले नाहीत आणि उगमस्थानी थांबलेही नाही. समकालीन कार्यकर्त्यांपैकी असे अनेकांचे झाले. परंतु बाबा शंभर पावले त्यांच्या पुढे राहिलेे. आपली भूमिका आग्रहपूर्वक मांडताना अर्थिक सुधारणा हाच उपेक्षितांचा, वंचिताच्या विकासाचा खरा पाया ते मानताना दिसतात. इमारतीच्या पायाचा दगड आणि त्या दगडाचा विचार बाबांनी परिपूर्णरितीने केला असल्यामुळे बाबा त्या विचाराला प्राधान्य देतात आणि प्रत्येकवेळी आग्रही भूमिका मांडतात. वंचित, उपेक्षित आणि कामगार वर्गातील प्रत्येक माणसाला न्याय मिळताना दिसत नाही. त्यावेळी त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारी आहे. चळवळीचा हा अव्यक्त भाग वर्तमानात विचारात घेणे आवश्यक आहे. त्याचा सार समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचा तर्कसंगत विचार केला तर चळवळीत येणार्‍या संभावित धोक्याचा विचार ते प्रथम करतात. मग त्यावर मात करण्याची नीति शोधून काढतात. चळवळीत जनतेच्या सहभागालाही तेवढेच महत्त्व देतात आणि लढ्यानंतरच्या आंदोलनानंतरच्या उत्तरदायित्त्वाचा स्वीकार करतात. इथे असे म्हणावेसे वाटते, की संघर्षापुरते कार्यकर्त्यांचा वापर न करणारा हा नेता गेल्या पन्नास वर्षांत अन्य कुणी दिसत नाही. कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना फेकून देणारे या क्षेत्रात काही कमी नाहीत. म्हणून बाबाचे महत्त्व आत्ताच्या काळात अधोरेखित करणे गरजेचे वाटते. सोबत असलेल्या समुहाला पटवून देण्यासाठी आवश्यक असलेली संवादशैली ही सामान्य माणसालाही आपुली वाटते. विस्तापितांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या चळवळी हा महत्त्वाचा घटक ठरतो आणि घटकाकडे बघत असताना तुकारामाचा एक अभंग डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभा राहतो. तो असा-
साधनाच्या कळा । आकार आकृती ।
कारण नवनीती । मंथनाची ॥
यातच सत्याचे दर्शन, अनुभव मी एक पत्रकार म्हणून पन्नास वर्षे झाली घेत आहे.

त्यांचे जेलमध्ये जाणे, सुटका झाली की पुन्हा कामाला लागणे यासाठीचा उत्साह सातत्यानं कामी लावताना बाबांना अनेकदा पाहिले. त्यांच्यातील सहिष्णुता जमंल तसं, जमंल तेव्हा दर्शन देत राहते. म्हणून ते कधीही मवाळ वाटत नाहीत आणि राष्ट्रीय एकता यापासून लांबही जात नाही. त्याला कारण, त्यांच्यातील विवेकशीलता हेच असावे. शोषणाविरुद्ध आवाज उठवणं आणि संघर्ष करीत राहणं एवढ्या एका कामात आयुष्य वेचूनही ते आहे तसेच आहेत. इथं मला एक अभंग आठवतो-
“न देखवे डोळां । ऐसा हा आकांत ।
परपिडे चित्त । दु:खी होत ॥”

१९७२ सालच्या दुष्काळात त्यांनी केलेला मराठवाडा दौरा अनेक स्थानिक नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घालून गेला. हाच अनुभव किल्लारीच्या भुकंपावेळीही आला. खेडीच्या खेडी बेचिराख झाली तेव्हा त्यांचे हात देणर्‍याचे हात झाले आणि हा त्यांचा स्वभावगुण अनेक पत्रकारांनी पाहिला, तरुणांनी घेतला. याची प्रतीती अनेकदा आली.
बाबा जेव्हा ‘खेड’ मतदार संघातून लोकसभेसाठी उभे होते तेव्हाही घोडनदीच्या परिसरात फिरताना हाच अनुभव पदोपदी आला. दुष्काळी परिसरातील शेतकरी आणि पाणी या दोन प्रश्नावर रान उठवणारा हा माणूस निवडूकीत विजयी झाला नाही. कामाचे रुपांतर मतपेटीतून जे व्हायला हवे होते ते झाले नाही आणि पुढे बाबा निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले. वास्तविक त्यांच्यासारखा अनुभवी माणूस विधान परिषदेत घ्यावा असे सत्ताधार्‍यांनाही वाटले नाही. कारण, त्यांचे विचार आणि भूमिका हे सत्ताधार्‍यांना कधीही पेलविणारे नव्हते.

डॉ. बाबा आढाव यांचे खरे रूप दिसते ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाच्यावेळी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून राम मनोहर लोहिया यांचा विचार रूजविण्याचे काम ज्या मंडळींनी केले, तिच मंडळी नामांतराच्या चळवळीत विरोधात गेल्यानंतर दु:ख करीत न बसता बाबा त्यांच्यापासून दूर राहिले. वेगळ्या पद्धतीने त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला. समविचारी माणसांनी अस्मितेचा बाऊ करून वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एस.एम. अण्णा बाबा आढाव, डॉ. ना. य. डोळे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकेकाळचे त्यांच्या विचाराचे समर्थक मंडळी बाबा आढाव बाहेरचे म्हणून त्यांना विरोध करायचे. तशा काही घटना त्यावेळी घडल्या. मराठवाड्यातील जनतेच्या अस्मितेचा भाग म्हणून नामांतरवादी नेत्यांची कोंडी करत राहिले. कायम अंधत्व पत्करलेल्या काही नेत्यांनी एखाद्याचे नाव देऊन परिवर्तन होते का असे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा त्या आरोप प्रत्यारोपात बाबांनी भाग घेतला नाही आणि मग हळूहळू ती कटूता दूर झाली.
कामगार चळवळीत विशेष भर घालताना उदारमतवादाचा आधार घ्यावाच लागतो. औद्योगिक विकास होत असताना मुख्य घटक असलेला कामगार अविकसित राहावा म्हणून कारखानदार वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्या प्रयोगांची ओळख झाल्यानंतर भांडवलदारी मानसिकता गृहीत धरणं प्रयत्नशील असते. तेव्हा श्रमिकांच्या बाजूनं पोलादी ताकद उभा करणारा बाबा आढाव नावाचा माणूस वेगवेगळ्या रूपात दिसला. १९६९ साली बघितलेले बाबा आजही तसेच आहेत.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा ते नारा देत राहतात. कायदा आणि न्याय यात पडत चाललेल्या अंतरासंबंधी अनेकदा त्यांनी केलेले भाष्य सत्ताधार्‍यांना रुचलेले नाही. पण ते त्याची फिकीर करत नाहीत. एक माणूस, एक मूल्य याचा आदर त्यांनी सोडलेला नाही. म्हणून ते कायम लक्षात राहतात. स्वातंत्र्य पायदळी तुडवून गुलामीत राहणारा समाज निर्माण करणार्‍या कायद्या विरोधात ते रस्त्यावर येऊन लढा देतात. न्यायाची बाजू घेण्यातच त्यांना रस वाटतो. सामाजिक न्यायाच्या खच्चिकरणाविरुद्ध लढताना सद्सदविवेकबुद्धिला प्राधान्य देताना दिसतात. जेव्हा धर्म बळकट होतो तेव्हा न्यायाचा तराजू जनतेच्या बाजूने राहात नाही. सर्वधर्म समभावाच्या मूळ संकल्पनेची वाट लागते आणि समाजाचे अवमूल्यन होत जाते. या परिस्थितीत समाजवृक्षाला कटू फळं कशी येतात ते अनेकांनी पाहिले आहे. रामजन्मभूमी आंदोलनच्यावेळी सांगितलेलं आज खरं ठरतं आहे. मानवी समतेला तडे देण्याचे उद्योग अनेक संघटना करीत असताना, विषमता ही निसर्गाची निर्मिती आहे असे झापडबंद विचार मांडणार्‍या विरुद्धही ते रस्त्यावर येऊन लढतात. हे पाहताना चळवळीचे मूळ अंग खर्‍या रूपाने समोर येते.

व्यावसायावर आधारित सामजिक प्रतिष्ठा वाढविण्याचा सध्याचा काळ आहे. त्याला आलेले विकृत रूप आणि त्या रूपाविषयी त्यांना सतत चिंता वाटते आणि धर्मकांड वाढविणार्‍या जथ्याला बाबा नावाच्या वादळाची पुन्हा पुन्हा भिती वाटते. कारण, तर्कनिष्ठ विचाराच्या आधारवर ते ठाम आहेत. अंधश्रद्धा पेरून स्वत:च्या पोटासाठी दुसर्‍याच्या पोटावर पाय देऊन उभ्या असणार्‍या समुहाचा अनेकदा त्यांनी पर्दाफाश केलेला आहे. क्रमबद्ध आयुष्य सामाजिक नेत्यासाठी किती महत्त्वाचं असतं याची प्रचिती त्यांच्या कार्यपद्धतीतून कार्यकर्त्यांना आल्यामुळे चळवळ वाढते आहे, संगोपन होते आहे.

‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे । जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पथदलित तया जाऊन उठवावे ’। हे लहानपणी झालेले संस्कार आढावांच्या कार्याची पे्रेरणा आहे. वादविवादात न पडता त्यापेक्षा कामाची प्रेरणाच उद्याचे भविष्य ठरवित असते. परकेपणा, अपमान आणि दास्य ज्यांच्या पाचवीला पुजले आहे त्यांच्या पूर्ण बाजूने उभं राहणं हे त्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेले आहे. सामाजिक जाणीवांची सूत्रबद्धता इथे अधिक लक्षात राहते. आधीच्या पिढीला ते माहित आहे. उद्याच्या पिढीला ते माहित व्हावे म्हणून समजून देण्याचं काम ते करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधनाला, धम्माला आणि तत्त्वज्ञानाला संघ परिवाराने जेव्हा जेव्हा वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळीही त्या घातक चाली विरुद्ध बाबांनी दंड थोपटले. चिंतनशीलतेतून विषयाची मांडणी केली व तर्काने तर्कालाच उत्तर देणारा एक नेता म्हणून आपले स्थान कायम केले. मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाची असलेली ही भूमिका भावी प्रगतीच्या संभाव्यतेसाठी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. सोपा समाजवाद समजून घेण्यासाठी या भूमिकेचे महत्त्व आजही अबाधित आहे. अबाधित राहिल. समाजवादाचे तत्त्वज्ञान मानवकेंद्रित असायला हवे याचे भान सतत ठेवण्यासाठी तेवढे ते वाचन करतात. विविध समाजात मिसळतात. त्यांचे म्हणणे समजून घेतात. फक्त समजून घेण्यातच त्यांना रस नाही, तर ते समजून घेतलेले अनेक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरत करीत आले आहेत. कल्पनेच्या खेळात न रमणारे बाबा ते अनेकदा विचारवंतांच्या भूमिकेत दिसले की वेगवेगळ्या नेत्यांचे विचार आपल्या समोर येतात. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे एके ठिकाणी सांगून गेलेले आहे, ते बाबा आढाव यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात-‘आयुष्याचा खरा अर्थ आकडेवारीच्या बळावर कोणालाही सांगता येत नाही. तर अढळ श्रद्धा आणि सुयोग्य कृती या मार्गानेच समूजन घ्यावा लागतो. समजून द्यावा लागतो.’
वर्ग विरहीत, जाती विरहीत समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात कोण कसे योगदान देते त्याची यादी बाबांकडे आहे. मूळात या विचाराला खो घालणार्‍यात पराक्रम मानणारे संघशाखीय विचारवंत बाबांना पुरेपूर माहीत आहेत. त्यावर आढाव म्हणतात- ‘कामाचं स्वरूप समजून घेऊन वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या पुढेही करावं लागेल. संस्कृती आणि परंपरा टिकावी म्हणून आडमार्गाने बहुजन समाजात काम करणार्‍या विरुद्ध पुढेही झुंजावे लागेल. कठीण काळी पदोपदी याची जाणीव ठेवावी लागेल.’ म्हणून असे वाटते की बाबा आढाव हे महात्मा गांधींच्या विचारांचे खरे वंशज वाटतात.

महावीर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: