पुराचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांचे राजकारण

पुराचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांचे राजकारण

उशिरा जागे झालेल्या सत्ताधाऱ्यांनी पूरस्थितीचा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन फायदा करून घ्यायला सुरुवात केली आहे. तांदूळ आणि गव्हाच्या पुड्यांवर मुख्यमंत्र्यांचे स्टीकर लावून वाटप केले जात आहे. प्रश्न असा आहे, की हे स्टीकर छापून, ते ठीकठीकाणी पाठवून चिकटवण्यासाठी वेळ कधी मिळाला? आणि हो या सगळ्या स्थितीमध्ये शिवसेना कुठे आहे?

श्रीवास्तव ग्रुपच्या संस्थापकाची सुरस कहाणी
सोन्याचे मासे, चवऱ्या आणि सोन्याचा तराजू!
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी

सांगली-कोल्हापूर भागामध्ये पूरपरिस्थिती भयानक स्वरूपाची असताना, सत्ताधाऱ्यांचे मात्र त्यातही राजकारण सुरु झाले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, पूरपरिस्थितीचा उपयोग करण्यात येत असून, सरकार कसे उशिरा जागे झाले, याची कबुली स्वतः मंत्र्यांनीच दिली आहे. यामुळे सरकार किती गंभीर आहे, हे समोर आले आहे.

कोल्हापूरमध्ये पुराची पाहणी करण्याऐवजी पूर ट्रीप करीत सेल्फी घेणाऱ्या आणि व्हिडिओमध्ये आनंदाने हात हलवणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा व्हिडिओ काल समोर आला होता. त्यावर समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आज महाजन यांचे समर्थन केले. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, की महाजन सोडवायला आलेल्या लोकांना हात दाखवत होते. पूरपरिस्थितीचे राजकारण करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. तर हे सेल्फिश सरकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. आता अंत्ययात्राही थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टीकर तयार नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केलेले ट्वीट

मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केलेले ट्वीट

महाराष्ट्र शासनातर्फे पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पुड्यांवर मुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे छायाचित्र आणि नावे असलेली स्टीकर्स सकाळी समोर आली आणि सत्ताधारी मदतीमधून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका करीत, सरकार उपकार करीत नाही, घरातून मदत देताय, का असा सवाल केला.

पूरग्रस्तांना त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी दिला जाईल, असा काल रात्री शासनाने एक आदेश काढल्याने आज पूरग्रस्तांच्या संतापात भर पडली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद बाणखेले यांनी समाजमाध्यमावर संताप व्यक्त करून, ‘लोकांचे आधार, पासबुक, पॅन जागेवर असतील का?की सरकारचं डोकं जागेवर नाही?’ असा सवाल केला. अखेर आज दुपारी सरकारने हा आदेश मागे घेऊन पैसे रोख देण्याचा निर्णय घेतला.

२००५ पेक्षाही १२ पट अधिक पाऊस पडला, मात्र प्रशासनाच्या नियोजनात चूक आहे, अशी टीका खुद्द भाजपचे खासदार धैर्यशील माने यांनीच केली.

दरम्यान पाऊस सुरु असताना आणि लोक पुराच्या पाण्यात वेढले जात असतानाही, ४ दिवस कोणीच कसे पोहोचले नाही, अशी कबुली खुद्द गिरीश महाजन यांनीच दिली. गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावामध्ये पोहोचलो, असे ट्वीट त्यांनीच केले आहे.

या सगळ्या पूरस्थितीमध्ये प्रश्न असा आहे, की शिवसेना कुठे आहे? आपण दौरा करणार आहोत, या पत्रकार परिषदेतील उल्लेखाशिवाय शिवसेनेचे नेते अजूनही पुग्रस्त भागामध्ये दिसलेले नाहीत.

दरम्यान निवडणुका पुढे ढकला, आचारसंहितेचे कारण पुढे करून सरकार पूरग्रस्तांना मदत नाकारेल, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0