डॉक्टर आणि मी – एकत्र आलेल्या समांतर रेषा

डॉक्टर आणि मी – एकत्र आलेल्या समांतर रेषा

डॉक्टर एक भव्य व्यक्तिमत्व होते, विचारवंत आणि सक्रिय पुरोगामी कार्यकर्ते आणि कलेच्या बाबतीत तर शिखरावरच.

नाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…
माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू
सूर्य पाहिलेला माणूस गेला

वरकरणी, डॉक्टर आणि माझ्यात थोडेही साम्य नव्हते. ते कलावंत तर मी वॉल स्ट्रीटवर कमोडिटी ट्रेडिंगसारख्या रुक्ष पेशात. ते डॉक्टर, नट तर मी इंजिनियर आणि लॉयर (Lawyer). ते भारतात तर मी अमेरिकेत अन् वयात पंचवीस एक वर्ष अंतर. डॉक्टर एक भव्य व्यक्तिमत्व होते, विचारवंत आणि सक्रिय पुरोगामी कार्यकर्ते आणि कलेच्या बाबतीत तर शिखरावरच. त्या मानाने सर्व बाबतीत मी अगदीच कच्चा बच्चा होतो. पण आमची तार जुळली, मैत्री जडली आणि सामाजिक कार्याची एकच वाट ठरली.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टरांना आम्ही अमेरिकेला बोलावले होते. त्यानिमित्ताने माझ्या घरी आठ-दहा दिवस त्यांचा पाहुणचार करण्याची संधी मला मिळाली. डॉक्टर आमच्याकडे राहायला येणार. तेव्हा आमच्यावर थोडे दडपण आल्यासारखे वाटत होते. म्हणजे इतका प्रसिद्ध नट येणार वगैरे. अशा लोकांच्या विक्षिप्त वागण्याच्या कथाही ऐकीव असतात. पण डॉक्टरांची साधी राहणी आणि निरलस स्वभाव यांनी आम्ही मोहून गेलो. एक सुखद धक्काच होता तो. वय, प्रसिद्धी, भिन्न देश, व्यवसाय सारी अंतरे गळून पडली आणि जडली ती फक्त निखळ मैत्री. ते मंतरलेले दिवस मला अजून स्पष्ट आठवतात. गप्पा, चर्चा आणि विचारमंथन तर भरपूर झाले पण त्यांना न्यूयॉर्कमधल्या ब्रॉडवे शो आणि म्युझियममध्ये नेण्यात फार मजा आली. डॉक्टरांना त्यांचे जबरदस्त आकर्षण आणि अगाढ ज्ञान. इतकी वर्ष त्या भागात राहून सुद्धा मीही त्याबाबतीत डॉक्टरांकडून शिकलो. म्हणजे आमच्या अमेरिकेत नाटककार मित्रांपेक्षाही डॉक्टरांना ब्रॉडवे शोज (नाटके)ची जाण होती. अनेकदा पाहिलेल्या त्या नाटकांतले कधी न उमजलेले बारकावे डॉक्टरांनी उलगडले. म्युझियममध्ये तर डॉक्टर फारच खूष. तिथे त्यांच्यातला कलावंत मला खरा समजला. अमेरिकेत मोठ्या प्रसिद्ध मी म्युझियममध्ये प्रत्येक दालनात त्यातला तज्ज्ञ असा एक गाईड असतो.
तिथे सॉक्रेटिस विषाचा प्याला पिण्याचे एक प्रसिद्ध चित्र होते. तिथे त्याच्या सोबतचा शिष्य कोण –प्लेटो की क्रेटो? असे प्रश्नचिन्ह होते. त्यावेळी ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नाटकाच्या तालमीत डॉक्टर अक्षरश: सॉक्रेटिस ‘जगत’ होते. डॉक्टरांनी क्षणाचा विचार न करता दालनातील गाईडला सांगितले की, सॉक्रेटिसचा शिष्य त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता तेव्हा टक्कल पडलेला वयस्कर माणूसच त्याचा शिष्य असणार. डॉक्टरांचे ज्ञान आणि बारकावे बघण्याची दृष्टीने तो गाईडही अगदीच चाट पडला. खरा कलावंत भूमिका कशी जगतो हे डॉक्टरांनी दाखवले.

मी वर्षातून दोन-तीनदा सामाजिक कामाच्या निमित्ताने भारतात येत असे. मग  दरवेळी ताहीरभाई पूनावालांच्या घरी हमखास एक संध्याकाळ आमची मैफिल असे. ‘शिवास रीगल’च्या पेग पे चर्चा – सामाजिक, कला, नाटके, कुठल्याही विषयावर. डॉक्टरांच्या बोलण्यात प्रांजळपणा, प्रखर बुद्धिवाद आणि एक प्रकारची निरागसता ओतप्रोत भरलेली असे. ताहीरभाईच्या बिर्याणी इतकीच छान वैचारिक मेजवानीही आणि डॉक्टरांच्या कंपनीचा आनंद अविस्मरणीय आहे. याचे साक्षीदार  दाभोळकर, विद्याताई बाळ आणि कित्येक जण – नारळाचे पाणी आणि शाकाहारी जेवणावर तितक्याच आनंदाने डॉक्टरांबरोबर एका अविस्मरणीय संध्याकाळची मेजवानी एन्जॉय करणारे.

सारेजण डॉक्टरांना कलेच्या अंगाने ओळखतात. माझी मात्र त्यांच्याशी वैचारिक नाळ जुळली. आम्ही दोघेही पुरोगामी, निरीश्वरवादी आणि गांधीवादी. साने गुरुजी दोघांचे आदर्श. सत्य आणि अहिंसा ही आमची कॉमन मूल्ये. मी डॉक्टरइतका सडेतोड नसलो तरी विचारांची स्पष्टता आणि शाश्वत मानवी मूल्यांवर विश्वास, सेक्युलर डेमोक्रसीची आस इ. कितीतरी समान धाग्यांनी आमची मैत्री किती घट्ट विणली गेली ते कळलेही नाही.

शब्दांनी न शिकवता त्यांनी आचरणाने शिकवले. “जरा हटके, जरा बचके”च्या जमान्यात त्यांचा प्रांजळपणा आणि झोकून देणे कितीतरी शिकवून गेला. डॉक्टरांनी मला मित्र मानले आणि तसे मनापासून वागवले यातच धन्य झालो.
ताहीरभाई, निळूभाऊ गेले. दाभोळकरांचे अचानक जाणे आणि आता डॉक्टर. काळ कोणासाठी थांबत नाही पण जाताना एकेक घाव घालून जातो. डॉक्टरांचे जाणे हा तर मोठाच  घाव. पण डॉक्टर माझ्याकडे बरेच काही देऊन आणि ठेवून गेले. डॉक्टरांची जिद्द, पुरोगामी विचार आणि निखळपणा माझ्यावर ठसा उमटवून राहिला. म्हणजे एका प्रकारे डॉक्टर अजून माझ्यासोबत आहेतच की.

हीच पुरोगामी कार्याची प्रेरणा, हेच समाधान.

सुनील देशमुख, महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रवर्तक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0