माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू

माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू

सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय की, रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत.

साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड
नाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…
कार्यकर्ते डॉ. लागू

मी सुद्धा भारतीय आहे. भारतीय संस्कृतीत वाढलेला आहे. एका कर्मठ कुटुंबात वाढलेला आहे. तरीसुद्धा लहानपणापासून नास्तिक झालो आहे. का झालो हे आपण सोडून देऊ या. परंतु माझ्या नास्तिक होण्याचं स्वरूप सांगतो. परमेश्वर म्हणजे, मी माझ्या मनाला समाधान लाभावं म्हणून एक आधार घेतलेली संकल्पना आणि अशा संकल्पनेचा आधार घेतल्यामुळं माझ्या मनाला एक स्ट्रेंग्थ मिळते. असा परमेश्वर माझ्या मनामध्ये नाही.

परमेश्वर म्हणजे एक अतिमानवी अशी शक्ती आहे, तिनं विश्वाची निर्मिती केलेली नाही, तरी विश्वाचं नियंत्रण करणारी ती शक्ती आहे आणि त्या शक्तीला मी शरण गेलं पाहिजे, त्या शक्तीचा जर कोप झाला तर माझ्यावर दुर्दैवाचा प्रसंग कोसळेल आणि ती शक्ती जर प्रसन्न झाली तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. ही परमेश्वराविषयी जी संकल्पना आहे, अशा परमेश्वराशी माझं भांडण आहे. ही संकल्पना सामान्य माणसाची असते. एखाद्या ज्ञानेश्वराची संकल्पना ही आध्यात्मिक स्वरूपाची असते. स्वत:च्या आत्म्याला मोक्ष आणि मुक्ती मिळावी म्हणून त्या शक्तीचं ध्यान करावं, नामस्मरण करावं आणि त्यामुळं मनाला शांती मिळावी हा त्यामागं हेतू असतो. अशा संकल्पनेशी माझं भांडण नाही. भांडण नाही एवढ्याचकरिता की ती त्या त्या माणसापुरती असते, समाजाला त्याचा काही त्रास नाही. अगोदर सांगितलेले संकल्पना मात्र अतिशय उपद्रवी आहे.

ही संकल्पना निर्माण कशी झाली याचा विचार करताना असं लक्षात येतं की, परमेश्वर नावाच्या शक्तीचा कसलाही पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत माणसाला देता आलेला नाही. त्या संकल्पनेवर माणसाचा दृढविश्वास कसा बसला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

तर परमेश्वर या संकल्पनेचा उगम कसा झाला असेल ते पाहू या. अगदी पुरातन काळ म्हणजे मी पाच हजार वर्ष म्हणतोय ते अगदी मोजून घ्यायचं नाही. आपला वैदिक काळ साधारण पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणतात, त्या अर्थानं घ्यायचं तर पाच हजार वर्षांपूर्वी माणूस बौद्धिकदृष्ट्या एका सामान्य पातळीवर होता, हे अगदी निर्विवाद आहे. म्हणजे त्याला साध्या-साध्या नैसर्गिक घटनांचा अर्थ कळत नव्हता. म्हणजे पाऊसकसा पडतो, भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो हे त्याला कळत नव्हतं आणि त्याच वेळेला, वेळच्या वेळी पाऊस पडला तर शेती कशी चांगली होते हे त्याला दिसत होतं. आकाशात वीज कडाडताना पाहून सौंदर्याचा अनुभव मिळत होता. त्याच वेळेला तीच वीज खाली जमिनीवर पडली की, जो हाहाकार माजतो त्यानं तो गांगरूनही जात होता. तो या सगळ्या गोष्टींचा असा अर्थ लावत होता की, या सगळ्या शक्तीचं नियंत्रण करणारी एक अतिमानवी शक्ती आहे. ही नियंत्रण करणारी एक फार मोठी जबरदस्त ताकद आहे आणि ही आभाळात कुठंतरी आहे. त्या माणसानं अशी धारणा करून घेणं हे त्याच्या अल्पबुद्धीचं लक्षण होतं यात काही वाद नाही.परंतु त्या शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आपण शोधून काढावा हे त्या माणूस नावाच्या प्राण्याला गेल्या पाच हजार वर्षांत सुचलं नसेल का? तर त्याचं उत्तर म्हणजे, त्याला नक्कीच सुचलं असेल. ही शक्ती शोधून काढायचा त्यानं नक्की प्रयत्न केला असेल.

काही व्यक्तींना साक्षात्कार झालेले आहेत आणि त्यावरून काहींनी असं म्हटलं की, ज्ञानेश्वरांना साक्षात्कार झाला, साक्षात देव दिसला. तुकाराममहाराजांना साक्षात विठोबा दिसला. अशा साक्षात्काराच्या बातम्या ऐकताना माणसाची बरीच शक्ती खर्च झाली. ही साक्षात्कार झालेली माणसं भोंदू नाहीत. प्रामाणिक आहेत. सामाजिक काहीतरी तळमळीनं काम करणारी आहेत. त्यांना साक्षात्कार झाले असतीलही. पण मला साक्षात्कार होत नाही, याचा अर्थ मी पापी माणूस आहे. तुकाराम-ज्ञानेश्वर यांच्या लेव्हलवर जात नाही अशी समजूत त्यांनी करून घेतली आणि याला पहिला धक्का बसला विज्ञानाच्या उदयानं.

विज्ञानाची सुरुवात झाली चारशे वर्षांपूर्वी. कोपर्निकस या शास्त्रज्ञानं पहिला धक्का दिला. त्यानं सांगितलं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फरित नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. बायबलमध्ये सांगितलं होतं की, पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सगळे तारे-ग्रह तिच्याभोवती फिरतात. धर्मगुरूंनी जाहीर केलं की, हा माणूस पाखंडी आहे. कोपर्निकस काही परमेश्वराच्या वा धर्माच्या विरुद्ध निघालेला नव्हता. तो सत्याच्या शोधात निघालेला होता. त्याला अनुभव व प्रयत्नांनी सत्य दिसलं ते असं की, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, आणि हे सत्य मांडण्याचं धैर्य त्यानं दाखवलं. आणि विज्ञाननिष्ठ माणसाला प्राण गमवावे लागले. कारण धर्मविरोधी मत मांडलं होतं. इतकं ते माणसाच्या डोक्यात तीन हजार वर्ष घट्ट बसलं होतं. कोपर्निकसचं संशोधन पकडून पुढं दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काम  केलं. विशेषत: गॅलिलिओला त्याच्या दुर्बिणीच्या शोधामुळं जवळपास हेच भोगावं लागलं. त्यानं माफी मागितल्यामुळे तो सुटका. पण त्याच्या दुर्बिणीतून त्यानं सिद्ध करून दाखवलं की, पृथ्वी सूर्याभोवतीच कशी फिरत आहे ते. मात्र माणसाच्या मनात ही परमेश्वराची संकल्पना एवढी घट्ट बसली होती की, तिचा त्याग करण्यास तो सहजासहजी तयार होत नव्हता. तो त्याग केल्याशिवाय माणसाला घरेलू वृत्तीच्या आयुष्यात सुख नांदेल असं दिसत नाही. कारण माणसानं परमेश्वर या संकल्पनेचा पाच हजार वर्षांत एवढा उदो उदो केला आहे. तो विश्वाचा पालनकर्ता आहे, अत्यंत दयाळू अशी ती शक्ती आहे, भक्तानं बोलावल्याबरोबर तो धावून जातो वगैरे वगैरे विधानं त्यानंकेली आहेत. याच्यावर विश्वास ठेवणं आलं. तरीसुद्धा परमेश्वराच्या दृष्टीनं एकापाठोपाठ एक धर्म स्थापन झाले. प्रथम फक्त हिंदु धर्म होता. नंतर ख्रिश्चॅनिटी आली आणि बाराशे वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्थापन झाला. या सर्व धर्मांमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ही एकच कॉमन गोष्ट आहे. अशी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा आतापर्यंत माणसाला मिळालेला नाही, अगदी इस्लाम धर्म स्थापन होईपर्यंत आणि हे सर्व धर्म विज्ञानाच्या उदयाच्या अगोदरचे आहेत. त्या नैसर्गिक प्रश्नांची उत्तरं माणसाला सापडत नव्हती. म्हणून एका परमेश्वर या संकल्पनेची कल्पना केली गेली.

आज या बहुतेक प्रश्नांचा उलगडा विज्ञानानं केला. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला सापडली असा विज्ञानाचा दावा नाही. विज्ञानाचा हा दावा प्रामाणिकपणाचा आहे. नम्रतेचा आहे. विज्ञानाचं काही शोध लावलेले आहेत. काही शोध लागताहेत आणि पुढेही लागतील. विज्ञान उद्धटपणे असं सांगत नाही की, माझ्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, जसं गीता वा कुराण वा बायबल या धर्मग्रंथांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत असं सांगितलं जातं. असं उद्धटपण विज्ञानाकडं नाही. हे विश्व कुणी निर्माण केलं हे आता नाही सांगू शकत; पण आणखी काही वर्षांनी त्याचा शोध लागेल अशी चिन्हं दिसत आहेत. या चारशे वर्षांत धडाधडा इतक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत की, आणखी चारशे वर्ष गेली की, याही प्रश्नांची उत्तरं ते देईल असं दिसतंय.

परंतु आता प्रश्न असा आहे की, आज अस्तित्वात असलेले सर्व धर्म विज्ञानाच्या उदयापूर्वीचे असल्यामुळं ते सर्व कालबाह्य झालेले आहेत. ते सर्व रद्दबातल केले पाहिजेत. या सर्व धर्मांची सर्वधर्मसमभाव ही भोंगळ संकल्पना आहे. म्हणजे सर्व धर्म सारखे आहेत. परंतु हे खरं नाही हे मला उघड दिसत आहे. सर्व धर्म एकमेकांहून वेगळे आहेत म्हणूनच ते एकमेकांशी भांडताहेत. हे धर्म स्थापन झाल्यापासून धर्माधर्मात कलह चालू आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर एवढा रक्तपात केलाय की, रक्तपात होण्याचे जे दुसरे अनेक मार्ग आहेत, म्हणजे रोगराई, दैवी-प्रकोप यांच्यामुळे जेवढी माणसं मारली जातात त्याहून कितीतरी अधिक माणसं धर्माधर्मात जे कलह झाले, जी युद्धे झाली त्यांमध्ये मारली गेली आहेत. उदाहरणं द्यायची झाल्यास ख्रिश्चनांची बूचर्डस म्हणा, मुसलमानांचे जिहाद म्हणा किंवा आपल्या सहिष्णू अशा हिंदु धर्मातही वर्णव्यवस्थेखाली उच्चवर्णीयांनी नीचवर्णीयांची केलेली कत्तर म्हणा, हाल म्हणा, किंवा अगदी अलीकडील १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखधर्मीयांची दिल्लीत झालेली भयानक कत्तल- अशा कत्तलींमध्ये माणसांचं इतकं रक्त सांडलं गेलंय की, धर्म शांतिप्रेमाचा संदेश देतात असं म्हणतात त्याचा अर्थ मला कळत नाही. धर्मग्रंथांत हे सगळं प्रेमाबद्दल असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो, पाच हजार वर्षांचे व्यवहार पाहतो, तेव्हा असं दिसतं की, हे धर्म एकमेकांशी भांडत आहेत. हे धर्म कालबाह्य झाले आहेत म्हणून ते सर्व रिटायर केले पाहिजेत. परमेश्वराला रिटायर करण्याचा अर्थ हा की, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाकल्याशिवाय निधर्मीपणाची संकल्पना तुमच्या डोक्यात घुसणार नाही. सर्व मानवाचा एक धर्म केला पाहिजे. त्यात परमेश्वराचं अधिष्ठान नाही. त्यात केवळ नीतिमत्तेचं अधिष्ठान असेल. त्यात केवळ शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. त्यात सौंदर्यदृष्टीचं अधिष्ठान असेल. असा सबंध मानवजातीला कवेत घेऊ शकेल असा एक धर्म (धर्म हा शब्द वापरायचा असेल तर) असेल. समाजाची धारणा करतो तो धर्म या अर्थानं हा शब्द मी वापरतो आहे. मात्र समाजाचे काही नीतिनियम हे पाळलेच पाहिजेत.

तर सर्व धर्म बाद करायचे असतील, तर आपल्या डोक्यातील परमेश्वर ही संकल्पना नाहीशी केली पाहिजे, तर मानवतेच्या एका प्लॅटफॉर्मवर आपण जगाला काही देऊ शकू. विश्वधर्माची कल्पना अनेक लोकांनी मांडली आहे. विवेकानंदांनी मांडली आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, बुद्ध हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? त्यानं आपला हिंदु धर्म सोडून स्वत:चा बौद्ध धर्म स्थापन केला. तो सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ हिंदू आहे. इतकं भोंगळ विधान विवेकानंद करूच शकत नाहीत. त्याचा अर्थ असा असावा की, जो लोककल्याणाकरिता सातत्यानं कर्मयोग आचारणात आणतो तो खरा हिंदू. मग त्याचा धर्म कुठलाही असेल. हिंदु धर्माची व्याख्या त्यांनी इतकी व्यापक केली आहे, असं मला वाटतं. बुद्धाला त्यांनी खरा कर्मयोगी अशाकरिता म्हटलं की, तो सातत्यानं लोककल्याणाकरता झटला. तो कुठल्या धर्माचा हे विचारत राहिला नाही आणि इतकी ‘वाईट’ व्याख्याच जर तुम्हाला हिंदु धर्माची वा कुठल्याही धर्माची करायची असेल तर ती आम्हाला मान्य आहे.

(श्रीराम लागू लिखित ‘रुपवेध’ या पुस्तकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0