‘डंबो’ आपले केवळ मनोरंजन करत नाही तर या सर्व गोष्टींचा विचार करायला भाग पाडतो. उडणारा हत्ती ही नुसती फॅन्टसी म्हणून उरत नाही तर मनोबल वाढवणारी गोष्ट ठरते.
आणि परत एकदा संकटात असलेल्या वॉल्ट डिस्नेच्या मदतीला ‘उंदीर’ धावून आला.. फक्त या वेळेस त्याने मित्रकर्तव्य बजावतांना जोडीला एका हत्तीच्या पिल्लूला पण सोबत घेतले होते. त्याचं नाव ‘डंबो.’
‘डंबो’कडे वळण्याआधी वॉल्ट डिस्ने आणि उंदीर यांच्या मैत्रीची गंमत.
या दोघांची मैत्री ही वॉल्ट डिस्नेच्या यशाची भक्कम बाजू आहे. तुफान लोकप्रिय झालेली ‘ओस्वाल्ड’ या कार्टून मालिकेचे हक्क व सर्व अनिमिटर्सला वितरक चार्ली मिंट्झ याने धूर्तपणे, कावेबाजपद्धतीने विकत घेऊन वॉल्ट डिस्नेला अडचणी आणले होते. खरं तर वॉल्ट डिस्नेच्या पायाखालची जमीन सरकली होती.. पण वॉल्ट डिस्ने काय चीज आहे, हे चार्लीला कुठे माहिती होत? ‘ओस्वाल्ड’ तुम्हाला लखलाभ! असं म्हणून वॉल्ट डिस्ने बाहेर पडला खरा पण लोकांना दाखवणार काय ? तेच तेच प्राणी बघून लोकं कंटाळली होती. तेव्हा वॉल्ट डिस्नेला कधीकाळच्या आपल्या मित्राची, उंदराची आठवण झाली. एक पिटुकला, धिटुकला उंदीर वॉल्ट डिस्ने अभ्यास करत असताना त्याच्या अवतीभवती खेळत असायचा. कधी चीज खायचा, अंगाखांद्यावर खेळायचा, तर कधीकधी तो खुशाल वॉल्ट डिस्नेच्या तळहातावर झोपायचा. त्याच्या हालचालींचे केलेले बारीकसारीक निरीक्षण वॉल्ट डिस्नेला संकटकाळी आठवले. उंदीर मदतीला धावून आला..
आणि ‘मिकी माऊसचा’ जन्म झाला. नंतरची यशोगाथा सर्वाना माहिती आहेच…
तसाच परत एकदा वॉल्ट डिस्नेने अडचणीत आला.
‘स्नोव्हाईट अँड सेव्हन ड्वार्फ्स’च्या अफाट यशानंतर काढलेले ‘पिनोचिओ’ व ‘फँटँशिया’ या दोन्ही सिनेमांनी फारसा धंदा केला नव्हता. दुसर्या महायुद्धाला नुकतीच सुरवात झाली होती. प्रेक्षकांची अनिमेश फिल्म बघण्याची मनस्थिती नव्हती. त्यानंतर वॉल्ट डिस्नेला चांगला धंदा करून देईल असा चित्रपट काढणे जरुरीचे झाले आणि एक छोटा हत्ती व त्याच्या उंदीर मित्राची गोष्ट घेऊन ‘डंबो’ हा लो बजेट, कमी लांबीचा पण फुललेन्थ मुव्हीमध्ये बसणारा हलकाफुलका सिनेमा वॉल्ट डिस्नेने निर्माण केला. ‘डंबो’ने जादू केली आणि डिस्ने स्टुडिओची बिघडलेली आर्थिक घडी परत सुस्थितीत आणली. मित्रप्रेमाची अनोखी प्रचिती हा ‘डंबो’ सिनेमाचा मूळ गाभा आहे.
‘डंबो’चे कथानक- ज्यांना बाळाची अभिलाषा आहे, त्यांना आकाशातून स्टॉर्क (करकोचे) बाळ आणून देतात, अशी ग्रीक आख्यायिका आहे. फ्लोरिडा येथील एका सर्कशीतील काही प्राण्यांना त्याचं बाळाचं ‘पार्सल’ मिळत. पण खूप वाट पाहणाऱ्या जंबो हत्तीणीला राहून गेलेलं पार्सल उशीरा मिळत. जंबो हत्तीणीची इच्छा पूर्ण होते. तिला मिळतं गोड, गोंडस छोटे पिल्लू ! तिच्या सहकारी हत्तीणी त्या गोजिऱ्या बाळाला बघून खुश होतात. त्याचं कौतुक करतात. तितक्यात पिल्लूला शिंक येते आणि मानेला झटका बसतो, त्यासरशी त्याचे मिटलेले कान मोकळे होतात. ते कान वाजवीपेक्षा मोठे असतात. इतक्या वेळ कौतुक करणाऱ्या हत्तीणी त्याची टिंगलटवाळी करायला लागतात. त्याला ‘डंबो sss डंबो’ चिडवायला लागतात. जंबो इतर हत्तीणीपासून आपल्या पिल्लाचे संरक्षण करते. पुढे ही सर्कस जिथे जाते, तिथे सर्कशीतील प्राण्यांना बघायला आलेल्या प्रेक्षकांपैकी, एक वात्रट मुलगा डंबोचे कान खेचतो. त्याची चेष्टा, मस्करी करतो.. तेव्हा जंबो हत्तीण मुलाला धडा शिकवण्यासाठी सोंडेने गरागरा फिरवून गवतात फेकते. त्यामुळे हाहाकार माजतो. तिच्या या वागण्यामुळे तिला ‘खतरनाक’ हत्तीण घोषित करून एका वेगळ्या पिंजऱ्यात कैद केले जाते.
डंबो बिचारा एकटा पडतो.. बाकीच्या हत्तीणी त्याला आपल्या जवळपास फिरकू देत नाही.
‘डंबो कसा आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही. त्याला आपल्यात घेणे म्हणजे आपल्या इज्जत धोक्यात आणणं. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हेच आपल्या भल्याचे..’ हे सर्व गॉसिप क्वीन्सचे संभाषण पिटुकला टिमोथी (उंदीर) ऐकत असतो. दुःखी व एकट्या डंबोला आपल्या मैत्रीची गरज आहे. त्या निरागस जीवाला आपण मदत करायची असं मनोमन ठरवून तो डंबोशी मैत्री करतो. डंबोचं जगणं सुकर व्हावे, यासाठी डंबोला फेमस करणे जरुरीचे. म्हणून रिंगमास्टर झोपलेला असताना, त्यांच्या कानाजवळ जाऊन जणू रिंगमास्टरचा आतला आवाज बोलतोय अस भासवून तो आपली कल्पना रिंगमास्टरच्या गळी उतरवतो. पण शो च्या दरम्यान आपल्याच मोठ्या कानांमुळे डंबो जोरात आपटतो.. आणि खेळाचे बारा वाजतात. हत्तींणीनां खूप लागतं. त्याचा राग येऊन त्या हत्तीणी त्याला वाळीत टाकतात. रिंगमास्टर डंबोला जोकर बनवून टाकतो, तो शो एकदम लोकांना आवडतो. डंबो मात्र अधिक दुःखी होतो. जे घडत असत त्यामुळे त्याच्या आईची सुटका होणार नसते. तेव्हा टिमोथी डंबोची जंबो आईशी दुरून का होईना भेट घडवून आणतो. इकडे सर्कशीत लोक आनंदाच्या भरात पार्टी करतात आणि चुकून एक दारूची बाटली पिण्याच्या पाण्याच्या टबात पडते. आईला भेटून आलेला डंबो आणि टिमोथी ते पाणी पितात. त्या ‘पाण्याचा’ असर होऊन ती दोघे एक ‘स्वप्नरंजित भ्रमाची दुनिया’ तयार करतात व त्या दुनियेत तरंगतात..
सकाळी कावळ्याच्या कलकलाटाने वैतागून जागे होऊन, बघतात तर काय? ती दोघे चक्क उंच झाडाच्या फांदीवर झोपलेले असतात.. आपण फांदीवर कसे आलो याचा विचार करत असताना, कावळ्याच्या चिडवण्यावरून टिमोथीच्या लक्षात येत की डंबो आपल्या लांब कानामुळे उडू शकतो. त्याचे कान हे पंखासारखे काम करू शकतात. हे ऐकून कावळेसुद्धा जोरजोरात विनोद करून हसू लागतात. पण टिमोथी त्यांना डंबोची कहाणी सांगतो, तेव्हा त्यांनादेखील वाईट वाटत. ते डंबोला उडायला शिकवण्यासाठी राजी होतात. कावळ्यांच्या मदतीने तो डंबोला उडायला शिकवतो. खेळाच्या दरम्यान जोकर बनलेला डंबो टिमोथीच्या उत्तेजनामुळे उडायला लागतो.. सर्व जण आश्चर्यचकित होतात. उडणारा हत्ती म्हणून क्षणार्धात डंबो फेमस होतो.
आता तो सर्कशीच्या स्टार हिरो झालेला असतो, त्यामुळे त्याच्या आईची सुटका होते. तिला एखाद्या राजमातेसारखी वागणूक मिळते. टिमोथी आणि डंबो दोघे आनंदी होतात..
मनावर विलक्षण पकड घेणारा हा सिनेमा, बालप्रेक्षकांच्या बरोबर मोठ्या लोकांनाही आवडणारा. अगदी वॉल्ट डिस्नेच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक होता. सर्कशीची पार्श्वभूमी असल्याने डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगाची उधळण आहे. उत्तम संगीताबद्दल याला पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात जमेची बाजू म्हणजे पात्रांचे हावभाव. संपूर्ण सिनेमात डंबो एकदाही बोलत नाही, त्याचे निरागस हावभाव आणि बोलके डोळे याच्या साह्याने डंबो आपल्याला खिळवून ठेवतो.
जंबो आणि डंबो यांच्या सहवासाची, भेटीची दृश्य ही काळजाला थेट भिडणारी.. जगातील सर्व आयांचा प्रेमळपणा जंबोच्या डोळ्यातून व्यक्त होतो. आपल्या बाळाची टर उडवत असतानाचे वर्तन हे आपल्या आई वर्गासारखेच.
सहकारी हत्तीणी या समाजात असणाऱ्या टिपिकल खोचक, भोचक साळकाया माळकायाचा अर्क. अशी एखाद्याच्या जखमेवर मीठ, मिरची चोळणाऱ्या आपल्या आजूबाजूलाच्या लोकांची हमखास आठवण येते.
यात लख्ख, लख्ख करून जातो तो टिमोथीचा स्वभाव. मैत्रीचा हा इंद्रधनुषी रंग अंत:करणाला भिजवत जातो. ‘फक्त लढ म्हणा’च्यापुढे जाणारा अनुभव. डंबो उडणे शिकत असतांना त्याला आत्मविश्वास यावा, म्हणून कावळ्याचे एक पीस हे मंतरलेले पीस आहे, असे सांगून यामुळे तू नक्कीच उडू शकशील व पुढे ते पीस हातातून निसटल्यावर पण त्याच्यातील आत्मशक्तीला जागृत करणारा टिमोथी जणू मोटिव्हेशन गुरू. रिंगमास्टरचा आतला आवाज बनून टिमोथी त्याच्या अंतर्मनाला अशा पद्धतीने सूचना देतो, तो सीन हिप्नॉटिझमचा गंमतदार आविष्कार.
टिमोथी हा ‘डंबो’चा खरा हिरो आहे. त्याचा कोणताच वैयक्तिक फायदा नसताना, आपल्या मित्रासाठी सारखी धडपड करत असतो. या सिनेमात माणसांचा वावर ना के बराबर. रिंगमास्टर आणि खोडी काढणार मुलगा फक्त याचे चेहेरे ठळकपणे दिसतात. बाकीच्या वेळी माणसांच्या सावल्या व आउट ऑफ फोकस लोकं दिसतात. आगगाडीसुद्धा एक अफलातून व्यक्तिरेखाच आहे. चढउतार करतानांची दमछाक, सुसाट पळणे हे भन्नाटच ! प्राण्यांना दुसऱ्या शहरात नेण्यासाठी प्राण्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे डिझाईनर डब्बे म्हणजे कल्पनेची भरारी.
कावळे हे तिरकस, आपल्या कंपूत राहणारे, टोचून बोलणारे पण वस्तुस्थिती समजतात मदतीला धावणारे. अशी सुद्धा माणसं सुद्धा आठवतात.
या सिनेमाला लागलेलं गालबोट म्हणजे दारूचे पाणी प्यायचा सीन. असे सीन बालचित्रपटात दाखवायला नको, असा एक नाराजीचा सूर उमटला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘डंबो’ नाव आणि उडणारा हत्ती याचं प्रयोजन.
‘डंबो’ याचा अर्थ मूर्ख, बावळट व्यक्ती. ‘डंबो’ हा ज्याच्यावर असे लेबल चिटकवली जातात, अशा लहान मुलांचे प्रतिनिधित्व करतो.
व्यक्तीच्या काही वैगुण्यामुळे, कमतरतेमुळे ढब्बू, लल्लू, पप्पू अशी विशेषण सर्रास वापरली जातात. मुलांच्या चुकीचा पाढा असल्या शब्दांशिवाय पूर्ण होत नाही. त्याचे होणारे खोल परिणाम कोणाच्या लक्षात येत नाही. शिवाय जगात दिसण्याच्या, यशाच्या इतक्या साचेबद्ध कल्पना आहेत की त्यात न बसणारे मुलं म्हणजे डंबो, .….
शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या नजरेत स्थान मिळवण्याच्या धडपडीत अशा मुलांची सतत परवड होत असते. त्यात या मुलाच्या वयाचे ‘विशेष’ गुण असलेले दुसरे मुल घरी-दारी असेल तर ती परवड अजून गर्तेत नेणारी ठरते. ‘विशेष’ गुण प्राप्त मुलांचे अवगुण केवळ त्याच्या विशेषतेमुळे झाकले जातात. आणि त्या उलट काही कमतरता असणाऱ्या मुलांच्यातील न्यूनगंड वाढीस लागेल, असे कडूडोस रोज मिळतात..
मुलांचा बिनशर्त स्वीकार करण्याची मानसिकता लोकांच्यात नसते. प्रत्येक मुलाला लाड, कौतुक हे हवे हवेसे वाटते. आईवडिलांइतकेच मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, खास असते.. हा ‘खासपणा’ बघण्यासाठी स्वच्छ नजर हवी. ही खास मोकळी दृष्टी ‘डंबो’ आपल्याला देतो. ‘डंबो’ आपले केवळ मनोरंजन करत नाही तर या सर्व गोष्टींचा विचार करायला भाग पाडतो. उडणारा हत्ती ही नुसती फॅन्टसी म्हणून उरत नाही तर मनोबल वाढवणारी गोष्ट ठरते.
हत्ती हा सर्वात अवजड प्राणी. तो उडताना दाखवणे म्हणजे अशक्यप्राय गोष्टी या इच्छाशक्तीने, प्रोत्साहनाच्या जोरावर साध्य होऊ शकतात. सगळ्या अडचणींवर मात करून, मोकळ्या आकाशात उडणे, ही सशक्त मनोवस्था आहे.
‘फरियाद से क्या हासिल रोने से नतीजा क्या’
या अवस्थेतून कधी ना कधी प्रत्येक जण जातोच..
त्यावर उत्तर ‘डंबो’ हे आहे.
टिमोथी आपल्याला निकोप दृष्टी देतो..
तर डंबो आपल्याला उडाण्याचे भान देतो..
डंबो – टिमोथी – वॉल्ट डिस्ने – उंदीर..
असा हा मैत्रीचा जागर प्रफुल्लित करणारा..
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.
COMMENTS