भयापासून सुटका नसते आणि भयात आनंदही असतो म्हणून त्यांची कथा घटनेपेक्षा वातावरण निर्मितीमुळे अनेकांना वाचायला लावते. त्यांना गूढकथा आकृतिबंधाचा ओढा असला तरी किंवा लहानपण खेड्यापाड्यात गेले असल्याने त्यांच्या मनावर तत्कालीन विषयांचा पडलेला प्रभाव पुढे या वाटचालीला कारण ठरलेला असावा.
कलावंत हा मानव समूहापेक्षा वेगळा असतो, हीच एक धारणा मनाशी ठेवून स्वत:च्या कोशात ही मंडळी वावरत असतात. मग ती लेखनाच्या प्रांतातील किंवा संगीताच्या क्षेत्रातील असतील, चित्रकार किंवा नट असतील. त्यांनी म्हणून त्यांचा एक वर्ग तयार केलेला असतो. तो छोटासा असला तरी सामान्य माणसापेक्षा आपण वेगळेच असतो, अशा भ्रमात अनेकजण वावरत असतात. नाटककार, कथालेखक रत्नाकर मतकरी हे या पठडीतले नाहीत. सृजनशीलता ही समाजासाठी असते असे समजून ते वावरत. रसिकांत आणि कलावंतात अंतर पडू नये, या मताचे ते होते.
लहान मुलांसाठी त्यांनी ‘मधुमंजिरी’ या बालनाट्यापासून सुरुवात केली. मुलांसाठी नभोनाट्य लिहिता लिहिता साहित्य संघाच्या आग्रहामुळे ते बालनाट्य चळवळीत आले. काशीनाथ घाणेकर, सुधा करमकर, राजा पटवर्धन ही मंडळी त्यांच्या मागे लागल्याने बालनाट्यामध्ये त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यातील कल्पकता, मुलांशी संवाद साधण्यासाठी लागणारी अर्थपूर्णता, लवचिकता यांच्यामुळे त्यांनी ‘इंद्राचे आसन नारदाची शेंडी’, ‘निम्माशिम्मा राक्षस’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘बडबडे मारकुटे’, ‘आलबत्या गलबत्या’, ‘सावळा तांडेल’ इत्यादी सोळा नाटकांद्वारे बाल रंगभूमीच्या चळवळीला आकार दिला. आकार देत असतानाच स्वत:ही भूमिका करून बालप्रेक्षकांना मनोरंजनात सहभागी करून घेतले. परिकथांचा उपयोग करीत करीत अद्भूततेकडे घेऊन जाण्यासाठी रंगभूमीवरील तंत्रशैलीत बदल घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणूनही मतकरींच्या कामाची नोंद घ्यावीच लागते. बालनाट्य चळवळीत त्यांच्याबरोबर असलेले दिलीप प्रभावळकर, अजय वढावकर हे रंगभूमी गाजवीत होते. लहान मुलांसाठी कार्य करण्याची त्यांची तळमळ शेवटपर्यंत संपलेली नव्हती. कारण, त्यांच्यातील लहान मूल हे अधूनमधून डोके वर काढीत होते. ‘एकला चलो रे’, असं म्हणत म्हणत माणसासाठी लेखन करीत राहणे हाच धर्म त्यांनी मानला. केवळ लेखनापुरता हा माणूस प्रायोगिक राहिला नाही. दिग्दर्शनापासून रंगकर्मीपर्यंत विविध विभागात वाट्याला आलेले काम, निर्माण केलेला आकृतिबंध समृद्ध करण्यासाठी गतिमानतेचा वापर करून वेगळ्या ढंगाची नाटके आणण्यात यशस्वी ठरला.
बालनाट्य म्हणजे मतकरी व सुधा करमकर असेच समीकरण पासष्ट ते शहाहत्तरच्या काळापर्यंत होते. प्रतिभा मतकरी या दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थीनी. त्यांचेही सहकार्य पुढे रंगभूमीवरील नवनवीन कल्पक प्रयोग हाताळताना रत्नाकर मतकरींना मिळाले. साने गुरुजींवर नितांत श्रद्धा असलेल्या मतकरींनी विद्यार्थीदशेत ‘तीन मुले’ या पुस्तकावर आधारित तीन अंकी नाटक लिहिले. सहावी-सातवीत असताना टागोरांच्या पुस्तकावर आधारित काही एकांकिाकाही लिहिल्या. बालनाटकाबरोबरच मोठ्यांसाठी ‘एक जीव सदाशिव’, ‘लोककथा’, ‘शापित’, ‘विनाशाकडून विनाशाकडे’, ‘सूत्रधार’, ‘वार्यावरचा मुशाफिर’, ‘मदनबाधा’, ‘चंपा गोवेकरीन’, ‘वटवट सावित्री’ इत्यादी नाटके लिहिली.
एक यशस्वी गूढकथालेखक म्हणूनही त्यांनी मराठी साहित्याच्या प्रांतात मतकरी हे नाव कायमस्वरूपात वाचकांच्या मनामध्ये ठसविले. पाश्चिमात्य रंगभूमी परंपरा व मराठीतील प्रायोगिक रंगभूमीवर होणारी आदानप्रदानता याच्यातच नवनवीन तंत्र शोधून वेगळ्या बाजाच्या नाटकाची बांधणी केली. संगीताला प्राधान्य दिले. लोकवाङ्मयाचा आधार घेऊन रंगभूमीवरील प्रवाहीपणा कायम ठेवला. कथावास्तूची हाताळणी साध्या साध्या पद्धतीने करीत करीत ‘आरण्यक’ सारख्या कठीण विषयाला हात घालताना स्वत:ची म्हणून नाट्यशैली उपयोगात आणली. हे लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय होत नाही. महाराष्ट्राला लोकवाङ्मय परंपरेचा लळा आहे. लोककथांची बीजं खोलवर रुजलेली असल्याने त्या परंपरेचा उपयोग नव्या आकृतीबंधाच्या विकासाला कशा पद्धतीने पूरक ठरू शकतो याचा अभ्यास रत्नाकर मतकरी नावाच्या माणसाने खोलात जाऊन केलेला आहे. म्हणून ‘लोककथा ७८’ सारख्या जिवंत विषयाला न्याय देणार्या नाटकातून एका नागरी बोलीने ते नाटक जिवंत ठेवले. विषय ग्रामीण असला तरी तो शहरी आणि मध्यम शहरी रसिकांना पेलवला पाहिजे, यासाठी बोलीभाषेचा घेतलेला आधार हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. एक रंगकर्मी एवढ्यापुरतीच स्वत:ची भूमिका न वठविता लेखकला जे जे अभिप्रेत आहे ते सांगण्यासाठी कथेबरोबरच स्वत:च्या आत्मविश्वासाची गरज असते, ती गरज ओळखूनच या माणसाने कथांची निवड केली. केवळ प्रयोगापुरते प्रयोग नव्हे तर रंगभूमीच्या विकासाकडे बघत असताना मतकरींचे योगदान सर्वांपेक्षा अधिक योग्य वाटते ते यासाठी. ‘विठो-रखुमाई’ याचा आकृतिबंध हा सुद्धा विचारात घेण्यासारखाच आहे. धनगरी बोली आणि धनगरी विश्व याचा मेळ घालीत एक वेगळे विश्व रसिकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यासाठी मतकरींनी घेतलेली मेहनत त्या नाट्यप्रयोगात जाणवली. उदय टिकेकर व रीमा लागू यांच्यासारख्या त्या काळी नवीन असलेल्या नटांची प्रतिमा सुद्धा ‘विठो-रखुमाई’ने उजळून टाकली.
गूढकथालेखक म्हणून ते लक्षात राहतात ते ‘खेकडा’ नावाच्या कथेने. ही कथा वाचकांना जशी खिळवून ठेवते तेवढीच त्यातील आभासावर आरूढ होण्याची संधी वाचक ‘खेकडा’ वाचत असताना घेत राहतो. त्यांचे म्हणून एक गूढकथेचे विश्व आहे. काही काळ अंधारात घेऊन जात जात कुठंतरी भय निर्माण करीत करीत जीवनात याही पद्धतीला सामोरे जावे लागते, भयापासून सुटका नसते आणि भयात आनंदही असतो म्हणून त्यांची कथा घटनेपेक्षा वातावरण निर्मितीमुळे अनेकांना वाचायला लावते. त्यांना गूढकथा आकृतिबंधाचा ओढा असला तरी किंवा लहानपण खेड्यापाड्यात गेले असल्याने त्यांच्या मनावर तत्कालीन विषयांचा पडलेला प्रभाव पुढे या वाटचालीला कारण ठरलेला असावा. लहान वयात जे ठसते किंवा ठसविले जाते ते धुवून काढण्यात भल्याभल्यांना यश येत नाही. भीतीचे आकर्षण असतेच, तेही विशेषत: लहान वयात. आणि मूल झोपविण्यासाठी बागूलबुवा दाखविण्याची परंपरा विशेषत: एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये होती. ते कुठल्या तर्कावर होते असे नाही तर गूढतेचा ध्यास लागल्यानंतर सुद्धा त्यातील अटकळ आल्यानंतर कथाबीज शोधत असतानाही कलावंत त्यातून बाहेर पडू शकत नाही. कारण, त्यांच्या मानसिकतेने तो आकृतिबंध स्वत:चा मानलेला असतो. गूढकथा हा आकृतिबंध मतकरींच्या रक्ताच्या नात्याचा एक भाग बनला आहे आणि म्हणून गूढकथेबरोबरच भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा यांच्याशी तुलना करतानासुद्धा मतकरींनी गूढकथेत ओतलेला जीव हा वरवरचा वाटत नाही. हेच त्यांच्या लेखनकामाचे वैशिष्टय आहे.
भय जसे उलटे टांगून घेतलेल्या वटवाघळासारखे वाटते तसेच बोटांनी प्रकाशाच्या आधाराने भिंतीवर काढलेल्या चित्रासारखे असते. गर्द झाडीतून जाताना पायाखाली उमटलेल्या पाचोळ्यातही भय दडलेले असते. भय सदासर्वदा, सर्वकाळ, अटळ. त्याचा ऊहापोह म्हणजे मतकरींचे गूढरम्य लेखन. अगतिकता जेव्हा भयकंपाची जागा घेते तेव्हा ‘खेकडा’ सारखी कथा मनाचा ठाव घेते. किती तरी काळ अमल राहतो मनावर. धामिणीनं शरीराला विळखा घालावा तसेच ‘मतकरीं’च्या गूढ कथेतील विश्वाने आपल्याही डोक्याला सुन्न केलेले असते. काही क्षण का होईना रक्त गोठून गेल्याचा भास होतो. एकंदर त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचे रसायन कोणते याचाच विचार अभ्यासकांनी करावा इतके त्यांचे वेगळेपण आहे. नाटक, कथा, कादंबरी व बाल साहित्यात देखील.
कोकणाचा विलक्षण लळा असलेल्या या माणसाने तिथल्या निसर्गातून आपल्या मनात आणलेले वातावरण अक्षरबद्ध करताना ज्यांनी कोकणातील माणसं पाहिली, बुटकी घरं पाहिली, आकाशाला भिडणारी झाडे पाहिली, चमचमणारे काजवे पाहिले, डोंगरकपारी पायाखालून घातल्या, धर्मप्रार्थना कानाच्या पडद्यावर आदळू दिल्या, खळखळणारे पाणी बघितले, सापांची सळसळ बघितली, फाटक्या कपड्यातील पण उदार माणसाच्या सावल्यांशी ज्यांनी नाते जोडले त्यांनाच मतकरींच्या गूढकथांमधील चित्रविचित्र भासांची जवळीक निर्माण करता येईल. कोकणातला पाऊस हा घाटावरच्या पावसापेक्षा वेगळा असतो. नाद वेगळा असतो. लय वेगळी असते आणि थेंबाचा आकारपण वेगळ असतो. कोळणीच्या केसातील सुवासिक फुलांच्या गजर्यासारखी मत्त वासाने घमघमणारी अनेक माणसे मतकरींच्या कथालेखनातून डोकावून जातात. मतकरींच्या कथालेखनाची पार्श्वभूमी ही कोकणातील स्वच्छंद जीवन जगणारी माणसेच आहेत. त्यांच्याही वाट्याला भय आलेले आहे, चित्रविचित्रपणा आलेला आहे आणि हा चित्रविचित्रपणाच त्यांच्या कथालेखनाचा धागा बनलेला आहे. म्हणून कोकणची अंत:प्रेरणा लाभलेल्या मतकरींचा साहित्य सहवास हा अधिकाधिक प्रगल्भ होत जाताना दिसतो.
कोणतीही पोज न घेता लेखन करीत राहणे, तेही दर्जा टिकवून, एवढ्या दोन महत्त्वाच्या पायावर त्यांचे लेखन आधारलेले आहे. समुद्रगाज कानावर पडल्यानंतर डोळ्यांसमोर उभे राहणारे विश्व हे अनेकविध असू शकते. त्यात सरळपणा जसा असतो तसा तिरकसपणाही. नाण्याला दोन बाजू असतात असे म्हणतात, त्या बाजू संस्कृती आणि असंस्कृती यांच्या संघर्षातून जेव्हा भयाला टोकाला नेऊन सोडतात, तेव्हा वाचकांच्या मनात मतकरींची कथा घर करून राहते. एखाद्या संगीतकाराने एकच गाणे विविध रागातून साकार करावे, तशी कोकणातील माणसांची उत्कट मनोभूमी हा मतकरींच्या साहित्याचा मूळ गाभा आहे. कथालेखनासाठी किंवा नाटकातील कथानक ज्या पात्रांच्या माध्यमातून साकार करायचे असते त्या त्या पात्रांना लेखक पहिल्यांदा स्वत: सोलून काढीत असतो. अगदी त्वचा सोलावी तशी. पात्रांच्या अंतरंगातील आशयाला रूप देण्यासाठी व्यक्तिरेखा या स्वत:च्या पद्धतीने सोलायच्या असतात, नागड्या उघड्या करायच्या असतात. ज्यांच्यात हे करण्याचे सामर्थ्य असते तेच फक्त आपण वेगळ्या वाटेने चालत आहोत याची जाणीव करून देत असतात. ‘गहिरे पाणी’ या मालिकेत तुम्हाला मतकरींनी शोधून काढलेली माणसे दिसतील. एक ताजे उदाहरण म्हणून याचा इथे उल्लेख करावा लागतो. कारण, मतकरींचा साहित्यप्रवास हा जवळजवळ पन्नास वर्षांचा आहे. इतक्या मागे जाऊन त्यांच्या साहित्यिक मनाचा तळ शोधणे आपल्याला शक्य नसते म्हणून ताजेतवाने तेवढे बरे वाटते. इथे रहाटगाडग्याचे किंवा अंधार्या रात्री विहिरीत सोडलेल्या पोहर्याचे उहाहरण देणे महत्त्वाचे वाटते ते यासाठी की, किर्रर्र अंधारात सोडलेल्या पोहर्याचा आवाज ज्यांनी अनुभवला आहे, तसाच आवाज मतकरी यांच्या गूढकथा वाचताना रसिकांच्या मनावर सतत आदळत राहतो. अक्षरधनाशी इमान राखणार्या निष्ठावंतांना अशा सन्मानापासून नेहमीच दूर राहावे लागले आहे. ज्यांनी कोकण प्रदेश फिरून पाहिला त्यालाच मतकरींच्या विश्वासाची कल्पना येईल.
महावीर जोंधळे, हे लेखक आणि ज्येष्ठ संपादक आहेत.
COMMENTS