आदरणीय इब्राहिम अल्काझी सर…

आदरणीय इब्राहिम अल्काझी सर…

मला तुमच्या या साऱ्या प्रवासाकडे पाहताना पुनः पुनः असं वाटतं की तुमच्यासारख्या असामान्य कलाकाराने, भारतीय थिएटर खऱ्या अर्थाने जगभर पोचवलं, समृद्ध केलं.

प्रति,

आदरणीय इब्राहिम अल्काझी सर,

तुमच्याविषयी मी काही लिहावं अशी विचारणा झाल्यानंतर काही प्रश्न पडले, मी काय लिहिणार ? मी तुम्हाला कधी भेटलेलो नाही. मी एनएसडीमध्ये शिकलेलो पण नाही. एनएसडीला राजा लिअर (King Lear) चा एक प्रयोग, तो पण १९९३ साली म्हणजे तुम्ही एनएसडीमधून गेल्यानंतर साधारण २५ वर्षानंतर केलेला, इतकाच माझा एनएसडीशी संबंध. तुमच्याविषयी जी काही माहिती होती ती वाचून, आणि ऐकून मिळालेली. मग कोणत्या अधिकाराने तुमच्यावर लिहिण्याचं धाडस करावं ? पण मग असाच आणखी एक विचार आला, तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले, तुम्हाला जवळून पाहिलेले लोक लिहितीलच, पण ज्यांनी तुम्हाला पाहिलेलंच नाही, त्यांच्यापर्यंत तुम्ही आणि तुमचं काम किती आणि कसं पोचलं असावं याचा अंदाज आपल्यालाच आपल्या लिखाणातून येऊ शकेल ! म्हणूनच हे धाडस करण्याचा प्रयत्न करतोय.

४ ऑगस्टला तुम्ही गेलात आणि भारतामधील इब्राहिम अल्काझी या एका नाट्यविद्यापीठाचा, एका देदिप्यमान पर्वाचा अस्त झाला.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील तुमची कारकीर्द संपवून, तुम्ही तुमच्या पेंटिंग्जकडे वळलात, तेव्हा नाटकातला न सुद्धा माहीत नसणारा मी महाराष्ट्रातील कोल्हापूरसारख्या एका छोट्याशा शहरातील गल्ली बोळातून भटकत असेन. पुढे नाटकाची आवड निर्माण होऊन या क्षेत्रात रमू लागल्यानंतर, वेगवेगळ्या लोकांची ओळख होऊ लागली, माहिती मिळू लागली, मिळवू लागलो. व्यवसाय म्हणून हेच क्षेत्र निवडून मुंबईत आल्यानंतर आणि त्या आधी सुद्धा काही लोकांच्या व्यक्तिमत्वाचं, कर्तृत्वाचं मनावर गारुड होतंच. सत्यदेव दुबेजी, विजयाबाई मेहता, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, ….अनेकांचं ! दुबेजी तर आमचं दैवतच ! त्याच दरम्यान, त्यांच्याकडे थिएटरचे धडे गिरवत असताना एक नाव वारंवार कानावर पडायला सुरुवात झाली होती. इब्राहिम अल्काझी ! दुबेजी, विजयाबाई हे ज्यांच्या तालमीत तयार झाले ते इब्राहिम अल्काझी !

तूघलक - खुला रंगमंच - जुना किल्ला, दिल्ली

तूघलक – खुला रंगमंच – जुना किल्ला, दिल्ली

तो साधारण १९९३/९४ चा हा काळ, जेव्हा गुगलराव दुकान मांडून बसले नव्हते. त्यामुळे काही माहिती मिळवायची असेल तर, एक तर ऐकीव माहिती मिळवणे किंवा कुठे लेख छापून आला असेल तर तो लेख किंवा पुस्तकं यातून माहिती मिळवणे या शिवाय पर्याय नव्हताच. पण प्रचंड कुतूहलापोटी तुमच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतोच. बरीच माहिती मिळाली देखील. पुढे मग आम्हाला सिनिअर असलेले तुमचे अनेक विद्यार्थी आम्हाला कामाच्या निमित्ताने भेटत गेले, तुमच्या बद्दलची माहिती वाढतच होती, आदर आणि उत्सुकता वाढतच होती.

एका सधन अरबी कुटुंबामधील तुमचा जन्म. १९२५ सालचा, पुण्यातला. तुम्ही नऊ भावंडं. सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलमध्ये तुमचं शिक्षण झालं. मग तुम्ही मुंबईत आलात, तिथून पुणे, पुण्यात शिक्षण, तिथून इंग्लंडमधील रॉयल ऍकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (RADA) इथे नाट्यशिक्षण, मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील विलक्षण काम, मग पेंटींग्ज,नमग फोटो प्रदर्शन, अल्झायमर….. हे सर्व नेटवर सापडतंच, मला उत्सुकता होती ते तुम्ही हे केलं कसं असेल ? हेच सर्व करावं असं का वाटलं असेल ? याची.

एका अत्यंत सधन कुटुंबातील, उत्तम शाळेत शिक्षण घेतलेल्या, विविध भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाला इतर कोणत्याही क्षेत्रात काहीही करता येणं शक्य होतं. त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य नाट्य आणि कला क्षेत्रात झोकून द्यावं असं का वाटलं असेल ? आणि मग करायचंच होतं तर, त्याला इंग्लंडमध्ये हेच करण्याची संधी असताना, मागणी असताना देखील त्यांनी भारतात येऊन इथेच काम करण्याचा निर्णय का घेतला असावा, काय असं घडलं असेल आयुष्याच्या पूर्वार्धात, ज्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला असेल ? ही मानसिकता कशी तयार झाली असेल ? हे प्रश्न मला भेडसावू लागले आणि त्यादृष्टीने मी काही शोधण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे शिकलेल्या तुमच्या विद्यार्थ्यांशी बोललो आणि जे काही आढळलं ते मांडायचा प्रयत्न करावा असं वाटलं. विकिपीडियावर मिळणारी माहिती तारखेनिशी टाकून लेखाची लांबी वाढवण्यात मला गंमत नाही वाटत. तर त्या सर्व माहितीमधील शब्दांच्या मागे काही सापडतं का ते पाहायचा प्रयत्न करून जे मला आढळलं ते मांडायचा प्रयत्न करतो.

तर, तुम्ही मूळचे अरबस्तान मधले असला तरी तुमचा जन्म पुण्यात झाला. तुमच्या मधील नाटकाची आवड तुमच्या वडिलांच्यामुळे जोपासली गेली. तुमची आवड आणि इच्छा पाहून त्यांनी नेहमीच तुम्हाला प्रोत्साहित केलं, तुमच्यातील कलाकाराला पोषक असं वातावरण निर्माण केलं. तुमच्या बालपणाकडे पाहता तुमचे वडील हे खूप उत्तम दूरदृष्टी असलेले, आणि कला आणि व्यवहार याची उत्तम जाण असलेले व्यक्ती म्हणून समोर उभे राहतात. तुमच्या शिक्षणामध्ये नेमकेपणाने काय असायला हवं याकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवलं होतं. तुमचं संपूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये झालं, पण रोज संध्याकाळी घरी अरबी आणि कुराण शरीफ सुद्धा तुम्हाला शिकवलं जायचं. वाचनासाठी घरामध्येच विविध पुस्तकांची एक लायब्ररी बनवून दिली होती त्यांनी तुम्हाला. फ्रेंच तुमची शिक्षणात दुसरी भाषा. तुम्ही राहायचा पुण्यात, त्यामुळे मराठी कानावर पडतच होती. याचबरोबर तुम्ही जिथं राहायचा तिथे भारतातील इतर भाषिक सुद्धा असायचेच. त्यामुळे भारतात बोलली जाणारी हिंदी, पारशी सर्व भाषा आणि सर्व भाषिक, प्रांतिक, आंतरराष्ट्रीय संस्कृतींशी तुमचा परिचय होत होता आणि तोच भारतातील थिएटर वैश्विक पातळीवर तुम्ही घेऊन गेलात त्याचा पाया असावा. तो साधारण दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता, तुमच्या भावाच्या ओळखीचा एक ब्रिटिश सैनिक एका रात्री तुमच्या घरी आला आणि तो वीकएंड तुमच्या बरोबर घालवून गेला असं तुम्ही एका मुलाखतीत म्हणालात. हे जे सांस्कृतिक वैविध्य तुमच्या आसपास वावरत होतं तिथेच इब्राहिम अल्काझी यांचं थिएटर रुजत होतं आणि या वातावरणात तुम्हाला तुमच्या धार्मिक वडिलांनी बागडण्याची संपूर्ण मोकळीक दिली होती.

सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल, पुणे मध्ये आधीपासूनच सांस्कृतिक उपक्रम राबवले जायचे. तिथे तुम्ही छोटे छोटे प्रसंग सादर करू लागला. झेवियर्स कॉलेजमध्ये रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. इथेच बॉबी पद्मसी यांच्या नाट्यसंस्थेस जोडले गेला. शाळा कॉलेजमधील तुमची प्रगती पाहून तुमच्या कॉलेजच्या फादरनी तुम्हाला इंग्लंडमधील, रॉयल ऍकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (RADA) इथे जाऊन थिएटरचं शास्त्रोक्त शिक्षण घेण्याविषयी सुचवलं, आणि वयाच्या २३ व्या वर्षी तुम्ही त्यासाठी इंग्लंडला गेलात. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुमच्यातील प्रतिभा पाहून तुम्हाला तिथेच पुढे काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती, पण तुम्ही भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि तीच भारतीय थिएटर बदलण्याची सुरुवात ठरली.

दरम्यान स्वातंत्र्य मिळालं होतं. फाळणी झाली होती. तुम्ही सोडून तुमचं सारं कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थायिक झालं होत. पण तुम्ही मात्र भारतातच राहिलात.

भारतात परतल्यानंतर तुम्ही थिएटर युनिट ही संस्था सुरू केली. या संस्थेमधून इंग्रजी नाटके बसवू लागलात. विजयाबाई मेहता, सत्यदेव दुबेजी त्यांच्या तरुण वयात तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागले. तुम्ही सर्व प्रकारची नाटके केली असली तरी, तुमची आवड क्लासिकल थिएटरची जास्त. त्याच दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची सुरुवात झाली. सुरुवात झाली पण ती नावारूपाला आणण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज होती. यासाठी रॉयल ऍकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (RADA) ला संपर्क करण्यात आला. त्यांनी शिक्षण पूर्ण करून भारतात परत येऊन थिएटर करणाऱ्या तुमचं नाव सुचवलं, आणि पंतप्रधान नेहरूंनी तुम्हाला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला येण्याचं आमंत्रण दिलं. तुम्ही दिल्लीला येऊन सूत्र हाती घेतली. स्वतः एक अप्रतिम लेखक असलेल्या पंडितजींनी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. स्वतः साहित्यिक असलेल्या पंडितजींना कला आणि कलाकार यांच्या स्वातंत्र्याची गरज किती आणि का असते याची पूर्ण जाणीव होती.

सूत्र हाती घेतल्यानंतर तुम्ही नाटकाला रंमांचावरून बाहेर काढून, दिल्लीमधील विविध ठिकाणी सादर करून वेगवेगळे प्रयोग केले. पुराना किला, फिरोजशहा कोटला मैदान, वेगवेगळ्या बागा, इमारती, चौथरे सर्व ठिकाणी तुम्ही प्रयोग केले. वेगवेगळ्या भाषेतील नाटके केली. ‘तुघलक’, ‘अंधायुग’, ‘आषाढ का एक दिन’…. अशी अनेक. तुम्ही वेगवेगळ्या देशातून दिग्दर्शक बोलवून त्यांची नाटके इथे बसवली आहेत. पंडित नेहरू स्वतः काही नाटकांच्या प्रयोगांना उपस्थित राहून तुमचं आणि कलाकारांचं कौतुक करून गेलेले आहेत. अशी राजकीय इच्छाशक्ती असेल आणि कलेविषयी खरी जाण आणि प्रेम असेल तरच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारखी संस्था यशस्वीपणे उभी राहू शकते आणि अल्काझी सर, तुमच्यासारखे मार्गदर्शक मिळू शकतात.

तुमच्याबद्दल तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. तुमचा वक्तशीरपणा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट जशी ठरली आहे तशीच व्हायला हवी असा तुमचा आग्रह असायचा. मग ती होत नसेल तर तुम्ही ओरडायचा, समजावून सांगायचा, चिडवायचा पण आग्रहावर ठाम असायचा. प्रत्येक प्रसंगाच्या दृश्य रूपाबद्दल तुम्ही खूप काम करवून घ्यायचा. रंगभूमीच्या प्रत्येक विभागावर तुमचं लक्ष असायचं. तुमच्या पत्नी कपडेपट सांभाळायच्या. वेळप्रसंगी जुने कपडे ही प्रयोगाची गरज असेल तर जामा मशिदीच्या समोरील जुन्या बाजारातून सुद्धा कपडे वस्तू खरेदी केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विभागात काम करायला लावून संपूर्ण नाटकाच्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व पटवून दिले आहे आणि कलेचा आणि जगण्याचं नातंही समजावून दिलं आहे. अनेक मोठ मोठे अभिनेते तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. मनोहर सिंग, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी … कितीतरी.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सोडल्यानंतर तुम्ही आर्ट हेरिटेज आणि अल्काझी फाउंडेशन सुरू केलं. तुम्ही स्वतः एक उत्तम चित्रकार आहात. तो छंद तुम्ही पुढे सुरू ठेवलात आणि तो फक्त छंद न ठेवता तो जगभर पोचवलात. भारतीय फोटोग्राफीचा इतिहास तुम्ही जगासमोर आणलात. फोटोग्राफी सुरू झाली तेव्हापासूनचे वेगवेगळे कॅमेरे, ग्रामोफोन, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मीळ फोटोंचे प्रदर्शन भरवले. फक्त भारतातच नाही तर जगभरात.

मला तुमच्या या साऱ्या प्रवासाकडे पाहताना पुनः पुनः असं वाटतं की तुमच्यासारख्या असामान्य कलाकाराला, ज्याने भारतीय थिएटर खऱ्या अर्थाने जगभर पोचवलं, समृद्ध केलं, देशातील विविध ठिकाणाहून आलेल्या असंख्य अभिनेते, दिग्दर्शक,कलाकारांना त्यांच्यातील नैपुण्य ओळखून, त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या न्यूनगंडातून बाहेर काढून समर्थपणे उभं केलं आणि कलाक्षेत्र खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात मोठी भूमिका निभावली, फक्त कलाकारच नाही तर ती जाणणारा एक प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग जगभर निर्माण केला, अशा एका बुद्धिमान प्रत्येक कलेची जाण असणाऱ्या आणि व्यवस्थापनात कुशल असणाऱ्या कलाकाराला जसा त्याचा कल जाणणारे, जोपासणारे वडील मिळाले, शालेय आणि महाविद्यालयात त्याची प्रतिभा जाणणारे शिक्षक मिळाले आणि त्यांची उपयुक्तता जाणणारे आणि त्याचा योग्य वापर करणारे पंडितजींसारखी इच्छाशक्ती असणारे राजकीय नेतृत्व मिळाले तसे प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला मिळत राहिले तर सर, आणखी काही इब्राहिम अल्काझी तयार होतील, आणि तीच तुमच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल !

लिखाणात काही आगळीक घडली असेल तर क्षमस्व सर !

सागर तळाशीकर, हे चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत.

COMMENTS