अल्काझी सर कधीही कलाकाराला संवाद म्हणून दाखवायचे नाहीत. त्याच्याकडून ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलवून घ्यायचे. हालचालींच्या बाबत ते खूपच काटेकोरपणा दाखवायचे. आणि त्या हालचाली तशाच येईपर्यंत कलाकाराकडून करवून घेत. त्या हालचालीविषयीची कारणमीमांसाही ते स्पष्ट करत असत. ते इतके बारकावे सांगत असत की थक्क व्हायला व्हायचे.
मार्च १९७६मध्ये केंद्रीय नाट्य शिष्यवृत्तीच्या प्राथमिक फेरीत माझी निवड झाली आणि अंतिम निवडीसाठी मला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’, (एनएसडी) नवी दिल्ली येथे बोलावण्यात आले. एनएसडीविषयी मला फारच जुजबी माहिती होती. तिथून शिकून आलेल्या आणि मराठी रंगभूमीवर अभिनय करणार्या सुहास जोशी तेव्हा ठाण्यात राहात होत्या. त्यांची माझी बर्यापैकी ओळख झाली होती. कारण ठाण्यात मी करत असलेली नाटके, एकांकिका पाहायला त्या आल्या होत्या. एनएसडीविषयी त्यांनी माहिती दिली त्याचवेळी ‘इब्राहिम अल्काझी’ यांच्याविषयी त्या भरभरून बोलल्या. त्यांची शिस्त, शिकवण्याची पद्धत याचे उत्तम वर्णन सुहासताईंनी केले की माझ्या डोळ्यासमोर एक चित्रच उभे राहिले. त्या इंटरव्हूमध्ये जर अंतिम निवड झाली तर तीन वर्षे एनएसडीमध्ये अल्काझी सरांकडे प्रशिक्षण घे, असे सुहासताईंनी मला बजावले. ती शिष्यवृत्ती मिळणे कठीण होते. सुमारे २५० जणांपैकी फक्त दोघांचीच निवड होणार होती.
३१ मार्च १९७६ या दिवशी सकाळी ९ वाजता मी इंटरव्हूसाठी पोहचलो. पण मला २ वाजेपर्यंत बोलावण्यात येईल असे समजले. मी तिथेच वाट बघत होतो. शेवटी ५ वाजता मला बोलावण्यात आले. पाच मान्यवर होते ज्यात मध्यभागी अल्काझी सर बसले होते. बाकी कमलाकर सोनटक्के, एम. के. रैना, दीना पाठक आणि बी. व्ही. कारंथ असे चौघेजण होते. पैकी अल्काझी सरच जास्त प्रश्न विचारत होते. सर्वजण हिंदी, इंग्रजीतूनच प्रश्न विचारत होतो. महाराष्ट्राची लोककला ‘तमाशा’ या विषयावर प्रश्न विचारला गेला. मी आत्मविश्वासाने उत्तरे देत होतो. आणि त्याचवेळी अल्काझी सरांनी मराठीतून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मी लोकनाट्यात अभिनय, दिग्दर्शन केले असल्याने उत्तरे योग्य पद्धतीने देत होतो. ते पाहून अल्काझी सरांनी माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्या नजरेतून समजत होते की, ते प्रश्न मला नामोहरम करण्यासाठी विचारले जात नाहीयेत तर मला मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी मदत करत आहेत. जवळजवळ ५० मिनिटे चाललेला इंटरव्हू संपला. तो संपता संपता अल्काझी सरांनी माझी फिरकीही घेतली होती आणि खेळकर वातावरणात तो इंटरव्हू संपला.
आमच्या पहिल्याच भेटीत अल्काझी सरांबद्दलचा आदर खूपच वाढला होता. जुलै महिन्यात मला द्वितीय क्रमांक मिळाल्याचे पत्र आले आणि मी एनएसडी-नवी दिल्ली येथे गेलो. जायच्या आधी सुहासताईंना भेटून अल्काझी सरांविषयी खूप माहिती मिळवली. अल्काझी सर वेळेच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत आणि एकूणच वागण्याच्या बाबतीत खूप कडक आहेत हे तिने सांगितले होतेच. त्यामुळे त्यांच्याबद्दलची एक प्रकारची भीतीही बसली होती. एनएसडीमध्ये आम्ही एकूण २५ जण होतो. पैकी १५ जणांना एनएसडीची शिष्यवृत्ती होती. केंद्रीय शिष्यवृत्ती असलेला मी एकटाच. कारण पहिल्या क्रमांकावरचा निरंजन गोस्वामी कलकत्त्यात शिकणार होता.
पहिल्याच दिवशी सरांनी एकूण प्रशिक्षणाची पद्धत तिथले नियम, वेळा, शिस्त यांची कल्पना दिली. ते स्वतः आम्हाला Western Drama शिकवणार होते. शेक्सपिअर, चेकॉव्ह, इब्सेन यांच्या नाटकांबद्दल त्यांनी केलेले विश्लेषण अविस्मरणीय असायचे. ते नाटक वाचायचे आणि त्याबद्दल माहिती द्यायचे तेव्हा ते प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहायचे. माझे नाव नरेंद्रकुमार नरहर सोहोनी आहे. माझे सहविद्यार्थी मला सोनी किंवा एनकेएन सोनी म्हणून हाक मारायचे. पण अल्काझी सर कायम सोहोनी असा स्पष्ट उच्चार करायचे. एनके सोहोनी असेही कधी कधी म्हणायचे. ते समोरच्याशी (विद्यार्थ्यांशी) बोलताना कधी कधी त्याच्या मातृभाषेतून संवाद साधत असत. मराठी भाषा तर ते उत्तम बोलत असत. एनएसडीमध्ये विशेष लेक्चरसाठी डॉ. श्रीराम लागू आले होते. तेव्हा अल्काझी सरांनी ‘नटसम्राट’, ‘काचेचा चंद्र’, ‘पपा सांगा कुणाचे’ या नाटकातल्या भूमिकांविषयी डॉक्टरांसोबत सविस्तर चर्चा केली होती, ती ही आमच्यासमोर. त्यातले काही प्रश्न मराठीतच विचारले होते. मराठी रंगभूमी, मराठी अभिनेते यांच्याविषयी अल्काझी सरांना खूप आदर होता. दिल्लीमधील काही जण मराठी अभिनेत्यांच्या अभिनयाविषयी, त्यांच्या पद्धतीविषयी कुचेष्टेने बोलत असत. मेलोड्रॅमॅटिक अक्टिंग म्हणत चेष्टा करत असत. पण अल्काझी सरांनी ही गोष्ट कधीच केली नाही. शाहीर दादा कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ लोकनाट्य पाहिल्यावर अल्काझी सरांनी दादा कोंडके यांना वाकून नमस्कार केला असा किस्सा ऐकला आहे.
अल्काझी सर दिग्दर्शन करत असताना पाहणे म्हणजे खरोखरी मेजवानी असायची. फ्रेंच राज्यक्रांतीवर आधारित ‘दान्तोज् डेथ’ नाटक अल्काझी सर बसवत होते. त्यावेळी द्वितीय आणि तृतीय वर्षांतले विद्यार्थी मुख्य भूमिकांत आणि प्रथम वर्गातले विद्यार्थी मॉबमध्ये असे समीकरण होते. पण मला मॉबमध्ये असल्याचा खूप आनंद व्हायचा कारण बाकी प्रमुख दृश्ये अल्काझी सर कशी बसवतात, ते कलाकारांना कशा सूचना करतात हे पाहता यायचे. सर कधीही कलाकाराला संवाद म्हणून दाखवायचे नाहीत. त्याच्याकडून ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलवून घ्यायचे. हालचालींच्या बाबत ते खूपच काटेकोरपणा दाखवायचे. आणि त्या हालचाली तशाच येईपर्यंत कलाकाराकडून करवून घेत. त्या हालचालीविषयीची कारणमीमांसाही ते स्पष्ट करत असत. ते इतके बारकावे सांगत असत
की थक्क व्हायला व्हायचे. अल्काझी सरांनी आमच्याबरोबर केलेली सर्व नाटके मुक्ताकाश रंगमंचावरच (ओपन एअर थिएटर) केली. त्यामुळे साधारण ८० ते १०० फुटाचा लांब रंगमंच व त्यावरील नेपथ्य असायचे. त्या भव्य रंगमंचावरील त्यांनी केलेली संरचना, त्यांनी अभिनेत्यांकडून करवून घेतलेले शब्दांचे/संवादांचे सादरीकरण हा प्रत्येक रंगकर्मीसाठी एक उत्तम वस्तुपाठ असायचा.
मी प्रथम वर्षांत असताना अनुपम खेर, सतीश कौशिक, करण राझदान, कविता चौधरी, अनिता कंवर असे कलाकार दुसर्या वर्षांत शिकत होते. तर रघुवीर यादव, राजा बुंदेला, मधु मालती मेहता हे तिसर्या वर्षांत तर रेपिर्टरी कंपनीत मनोहर सिंग, सुरेखा सिक्री, उत्तरा बावकर, राजेश विवेक असे कलाकार होते. या कलाकारांबरोबर काम करताना सरांनी त्यांना केलेल्या सूचना, त्यांना केलेले दिग्दर्शन खूप काही शिकवून गेले. सरांनी ‘अंधायुग’ नाटक पुनर्निर्मिले ते ही पुराना किलामध्ये तेव्हाचा अनुभव तर अविस्मरणीय होता.
उ. प्रदेशचा लोककला प्रकार ‘नौटंकी’ सादर करायचे ठरले. त्यासाठी ‘नौटंकी’मधील मान्यवर गायक कलाकारांना बोलावून त्यांच्याकडून संगीताचे धडे देण्यात आले. ‘संगीत लैला मजून’ ही नौटंकी करायचे ठरले. अनिल चौधरींवर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली पण मार्गदर्शन अल्काझी
सरांनी केले. मुक्ताकाश रंगमंचावर ही सादर होणारी नौटंकी सादर करताना वरच्या आवाजात गाणारे कलाकार हवे होते. आमच्या प्रथम वर्षांतले अन्नू कपूर आणि मी यांची निवड प्रमुख कलाकारांमध्ये झाली, त्यातही लैला-मजनू या कथेतील एकमेव विनोदी पात्र ‘बहराम’ मला करायला मिळाले. या नौटंकीमध्ये फक्त संगीतातूनच संवाद म्हणायचे होते. साथीला ‘नक्कारा’ (म्हणजे नगारा) विनोदी पात्र असल्याने माझे पात्र उठावदार होत असे. एका प्रयोगात मी गाण्यानंतर हालचालीत अतिरेक करून हशे वसूल करू लागलो. प्रेक्षक हसताहेत म्हटल्यावर मला चेव आला आणि न सांगितलेल्या हालचाली मी करू लागलो. प्रेक्षक खूष झाले. पण प्रयोग संपल्यावर अल्काझी सरांनी मला खूप खडसावले. कॉमेडी आणि फार्स यातील अंतर समजावणारे बरेच मुद्दे सर्व कलाकारांना समजावून दिले. नंतरच्या प्रयोगात मी जो अभिनय केला त्यावर माझ्या पाठीवर शाबासकीची थापही त्यांनी दिली.
अल्काझी सर तसे उंच धिप्पाड नव्हतेच. साधारण पाच/सव्वापाच फूट उंच असले तरी त्यांची करारी नजर समोरच्याच्या मनात जरब बसवू शकेल अशीच होती. त्यांच्याकडे पाहिले की, समोरच्या व्यक्तिच्या तोंडून शब्द फुटत नसे. मी प्रथम वर्षांत असतानाच माझी बहिण साधना सोहोनी आणि मैत्रिण उज्वला टकले (आता माझी पत्नी) दिल्लीला मला भेटायला एनएसडीमध्ये आल्या होत्या. त्या दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत. मी अल्काझी सरांकडे त्यांना घेऊन गेलो. त्यांची ओळख करून दिली. सरांनी अत्यंत आपुलकीने त्यांची चौकशी केली. त्यांच्याशी ते मराठीतच बोलले पण या दोघींनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शब्दच फुटत नव्हते. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं. त्यांनी नाट्यशिक्षणाबरोबरच व्यावहारिक जगात कसे वागायचे याचे प्रशिक्षण दिले. आपल्या कलेबद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल अभिमान बाळगायला त्यांनी शिकवले. त्यांनी नाट्यकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. त्यांच्यामुळेच एनएसडीचे प्रशिक्षण संपल्यावर आम्हाला पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ६ आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली. १९७७च्या जूनमध्ये अल्काझी
सरांनी एनएसडीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आमच्या पदवीदान समारंभाचेवेळी सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते पदवी घेण्याऐवजी अल्काझी सरांच्या हस्ते ती मिळावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आणि ती मान्य झाल्याने अल्काझी सरांच्या हस्ते आम्हाला पदवी मिळाली.
पण तरीही आम्ही त्यांना Art Heritage या त्यांच्या Art Galleryमध्ये भेटायला जायचो. नंतर जेव्हा जेव्हा मी दिल्लीत गेलो तेव्हा त्यांची भेट घ्यायचो. २००४साली तन्वीर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्या समारंभाला पुण्यात त्यांना भेटण्याचा योग आला. इतक्या वर्षानंतरही त्यांनी आपुलकीने माझी चौकशी केली तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रु आले.
इब्राहिम अल्काझी यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९२५रोजी पुणे येथे झाला. अल्काझी सर दिल्लीत १९५९मध्ये स्थापन झालेल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’- एनएसडीचे पहिले संचालक झाले. या नाट्यशाळेत त्यांनी तीन वर्षांचा एक नाट्य पदविका अभ्यासक्रम तयार केला. तो शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांकडून संस्कृत आणि भारतीय भाषेतील उत्तमोत्तम नाटके हिंदीत रुपांतरीत करून घेतली आणि त्यांचे प्रयोग केले. भारतीय नाटकांबरोबरच अल्काझी सरांनी ग्रीक शोकांतिका, इब्सेन,
चेकॉव्ह, बेकेट, ब्रेख्त, मॉलियर यांची नाटके आणि शेक्सपिअरची मुख्य नाटके विद्यार्थ्यांकडून बसवून घेऊन त्यांचे दिल्लीत रंगमंचीय प्रयोग केले. एनएसडीच्या माजी विद्यार्थ्यांची एक संस्था (Repertory) त्यांनी स्थापन केली आणि त्याद्वारे वेगवेगळ्या शैलीतील नाटके सादर केली. दिल्लीत खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग करायची सुरूवात अल्काझी सरांनीच केली. पुराना किल्ला आणि असेच खुले पटांगण असणार्या ऐतिहासिक वास्तूत ‘तुघलक’, ‘अंधायुग’ या नाटकांचे नाट्यप्रयोग कायम स्मरणात राहतील.
१९५०मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे पारितोषिक त्यांना मिळाले, १९६२ सालचे दिग्दर्शनाचे अकॅडमी अवॉर्ड, १९६६ साली पद्मश्री मिळाली. १९६७साली राष्ट्रीय अकादमीचे सन्माननीय सदस्यत्व मिळाले. १९८८ सालचा कालिदास पुरस्कार, १९९१साली पद्मभूषण तर २००४ साली तन्वीर पुरस्कार अल्काझी सरांना मिळाला. अनेक रंगकर्मींचे ते श्रेष्ठ नाट्यगुरू होते.
कुमार सोहोनी, मराठी नाट्य-चित्रपट, मालिका निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक आहेत.
COMMENTS