भारतीय रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा प्रणेता

भारतीय रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्राचा प्रणेता

भारतीय नाट्य क्षेत्राच्या इतिहासातील आपलं महत्त्वपूर्ण स्थान अल्काझींना ठाऊक होतं. त्यामुळेच शिस्तबद्धतेसोबतच सुसंस्कृतपणाही त्यांनी रंगभूमीवर उतरवला. नाटकाच्या निर्मितीत विषयाचा आवाका मांडण्यासाठी ते संशोधन करायचे आणि ते स्वतः डिझायनर असल्याने त्यांनी तयार केलेला आराखडा देखील परिपूर्णच असायचा.

आदरणीय इब्राहिम अल्काझी सर…
इब्राहिम अल्काझी : रंगकर्मींचे श्रेष्ठ नाट्यगुरू
भारलेल्या काळाचा अंत – वामन केंद्रे  

नाट्यसृष्टीतील एक महान रंगकर्मी, इब्राहिम अल्काझी यांचं नुकतंच निधन झालं. रंगभूमीचे पितामह अशी त्यांची ओळख होती. नसिरुद्दीन शहा, ओम पुरी अशा महान कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथून केली जिथे अल्काझी १५ वर्षे संचालक होते. २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या नसिरुद्दीन शहांच्या ‘आणि एके दिवशी’ (And Then One Day) या जीवनचरित्रात (मेमोर- memoir) शहांनी अल्काझींच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. शहांवर अल्काझींचा किती प्रभाव होता हे या पुस्तकात सतत येणाऱ्या अल्काझींच्या उल्लेखातून लक्षात येतं.
१९७०मध्ये शहांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथे अभिनय वर्गात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला तेव्हापासूनच शहांवर अल्काझींच्या व्यक्तिमत्वाने मोहिनी घातली. शहा लिहितात की ‘माझ्या अभिनयाच्या आवडीमुळे सर्वांनी मला वेड्यात काढलं पण शेवटी अल्काझींमध्ये मला प्रेरणादायी शिक्षक सापडला जो इतरांप्रमाणे मला मूर्ख समजत नव्हता. उलट मी माझी क्षमता ओळखावी यासाठी त्यांनी मला प्रयत्न करण्यास उद्युक्त केलं’.
शहा पुढं लिहितात की चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य, रंगभूमी या सर्वांबाबतच अल्काझींचं ज्ञान प्रगाढ आणि प्रगल्भ होतं. या सर्वांच्या योग्य समायोजनातून त्यांनी नाटकाचा स्टेज परिपूर्ण केला. रंगभूमीच्या सौंदर्यशास्त्रात जे जे उत्तम आहे ते सर्व अल्काझींनी भारतीय नाटकांच्या सेटवर आणलं. भारतीय नाट्य क्षेत्राच्या इतिहासातील आपलं महत्वपूर्ण स्थान अल्काझींना ठाऊक होतं. त्यामुळेच शिस्तबद्धतेसोबतच सुसंस्कृतपणाही त्यांनी रंगभूमीवर उतरवला. नाटकाच्या निर्मितीत विषयाचा आवाका मांडण्यासाठी ते संशोधन करायचे आणि ते स्वतः डिझायनर असल्याने त्यांनी तयार केलेला आराखडा देखील परिपूर्णच असायचा.
नाटकांची निर्मिती म्हणजे अल्काझींसाठी फक्त रचना होती. सर्वच कलांचा प्रगाढ अभ्यास असल्यानं त्यांच्या योग्य संरचनेतून आपण हवा तो परिणाम साधू शकतो असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांच्या नाटकांत नटाला स्वतःच आपली जागा, आपल्या भूमिकेचा अर्थ शोधावा लागत होता कारण अल्काझींना अभिनयाच्या गतिमानतेबाबत (dynamics behind the action) फार आस्था नव्हती. त्यामुळे त्यांची नाटकं सर्वोत्तम असूनही त्यातील अभिनयात आत्मा नसल्यासारखं नसिरुद्दीन शहांना वाटत राहायचं.
पुढे जेव्हा चित्रपटांत काम करण्यासाठी शहा मुंबईला आले तेव्हा अजून एका महान रंगकर्मीबरोबर त्यांनी नाटक करायला सुरुवात केली, ते होते सत्यदेव दुबे. अल्काझी आणि दुबे या भारतीय रंगभूमीच्या दोन महान निर्मात्यांसोबत काम केल्यानं साहजिकच त्यांच्या कामाची तुलना अनेक ठिकाणी शहांच्या पुस्तकात येते. अल्काझी प्रसंगांच्या रचनेवर भर द्यायचे तर दुबेजी प्रसंगांच्या गाभ्यावर लक्ष केंद्रित करायचे. अल्काझींप्रमाणेच दुबेंच्या नाटकात सुद्धा नटाला स्वतःच्या भूमिकेचा अर्थ शोधावा लागायचा. हे दोघेही shit-detector होते आणि exploration सारख्या संकल्पनासाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. शिवाय नाटकांच्या तालमीत कलाकारांवर दोघेही प्रचंड ओरडायचे, असं नसिरुद्दीन शहा सांगतात.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पहिल्या वर्षी जसपाल (शहांचा मित्र) आणि शहा अनुक्रमे पहिले आणि दुसरे आले. तेव्हा अल्काझींनी दोघांच्याही इच्छेविरुद्ध दुसऱ्या वर्षासाठी त्यांना दिग्दर्शनात घेतलं. त्याकाळी NSD मध्ये बाहेर अपयशी ठरलेले सामान्य दर्जाचे लोक अभिनय शिकवायला यायचे. त्यांच्या शिकवणुकीचा या दोघा प्रतिभावंतांवर परिणाम पडू नये म्हणून अल्काझींनी त्यांना आपल्या छत्राखाली घेतलं असं नसिरुद्दीनला वाटत होतं. पण दिग्दर्शनाच्या विद्यार्थ्यांना नाटकात काम करता न येत असल्यानं आणि अभिनयाचं विलक्षण वेड असल्यानं जसपाल /शहा यांनी पुन्हा एक वर्षानंतर अल्काझींना साकडं घातलं. “दिग्दर्शनाच्या अभ्यासातून आमचा अधिक फायदा झाला असता, अधिक शिकता आलं असतं. पण तेव्हा आम्हाला शिकायचं नव्हतं, अभिनय करायचा होता.”
इच्छा नसतांनाही अल्काझींनी परत शहाना अभिनयाच्या वर्गात जाऊ दिलं. मात्र चित्रपटांत जाण्यासाठी अतिशय उत्सुक असलेल्या शहांना एकदा शेवटचा अल्काझींच्या रागाचा सामना करावा लागला. NSD मधला अभ्यासक्रम संपल्यानंतर शहांना FTII पुणे येथे प्रवेश घ्यायचा होता कारण ‘FTII म्हणजे हिंदी सिनेमात सरळ प्रवेशाचं तिकीट’ हा विचार त्यांच्या डोक्यात पक्कं घरं करून बसला होता. त्यांनी हा मानस जेव्हा अल्काझींना सांगितला तेव्हा त्यांच्या रागाचा स्फोट झाला. शहांना त्यांनी दूषणं लावली, रंगभूमी चळवळीचा विश्वासघात केल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर अल्काझींचा शहांसोबतचा संवाद सुद्धा कमी झाला होता.
शहां सांगतात, “मला आजवर त्यांच्या रोषाच कारण कळलं नाही. पण मला वाटतं की कदाचित आता त्यांना हे कळालं असेल की मुंबईतील त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी फार कमी असे आहेत ज्यांनी आजही रंगभूमीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे, ज्यापैकी मी एक आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: