ज्ञातिसंहाराला पाठिंबा, प्रवेशांमध्ये भ्रष्टाचार: जेएनयूच्या नवीन कुलगुरूंची ओळख

ज्ञातिसंहाराला पाठिंबा, प्रवेशांमध्ये भ्रष्टाचार: जेएनयूच्या नवीन कुलगुरूंची ओळख

नवी दिल्ली: सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र व जनप्रशासन विभागाच्या प्राध्यापक असलेल्या शांतीश्री धुलीपडी पंडित यांची, सोमवार, ७ फ

‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’
कोरोनात सरकारपुढे शरणागत सर्वोच्च न्यायालय
रात्रीत बदल : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता

नवी दिल्ली: सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र व जनप्रशासन विभागाच्या प्राध्यापक असलेल्या शांतीश्री धुलीपडी पंडित यांची, सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी, भारतातील प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून, नियुक्ती झाली आहे. त्यांची नियुक्ती एम. जगदेश कुमार यांच्या जागी झाली आहे. जगदेश कुमार यांच्या कारकिर्दीमध्ये जेएनयूत विद्यार्थी-प्राध्यापक आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात अभूतपूर्व असा संघर्ष झाला. प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमध्ये पक्षपात तसेच प्रक्रियांचे उल्लंघन करणे, उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी गटांना झुकते माप देणे, आर्थिक अनियमितता, अध्यापक आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनांना विलंब लावणे, मोठ्या संख्येतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या विरोधात चिंताजनक वाटेल एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय चौकशा करणे हे आरोप जगदेश कुमार यांच्यावर झाले होते.

जगदेश कुमार यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात आक्रमक हिंदुत्ववादी विद्यार्थी संघटनांचे सदस्य व विद्यापीठाच्या आवारातील अन्य सामाजिक-राजकीय संघटनांमध्ये अनेकदा हिंसक संघर्ष घडले. त्यांच्याच कार्यकाळात, २०१६ मध्ये, दिल्ली पोलिसांनी, देशद्रोहाच्या आरोपांवरून जेएनयूएसयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार तसेच उमर खलीद व अनिर्बान भट्टाचार्य यांना, अटक केली होती.

एवढे आरोप असूनही कुमार यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आणि त्यानंतर तर त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदावर पदोन्नती दिली आहे. त्यांचा जेएनयूतील कार्यकाळ २६ जानेवारी, २०२१ रोजी समाप्त झाला.

कुमार यांच्या विद्यापीठातील आक्रमक उजव्या विचारसरणीला केंद्र सरकारचे खंदे समर्थन होते आणि पंडित यांची नियुक्ती जेएनयूमधील सर्वोच्च प्रशासकीय स्थानावर करण्याच्या निर्णयातूनही हेच दिसून येत आहे. पंडित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) असलेल्या जवळिकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ज्ञातिसंहार तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांवरील हल्ल्यांना उघडपणे पाठिंबा दिलेला आहे.

उदाहरणार्थ, भारतीय मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे आवाहन केल्याप्रकरणी कंगना राणावतचे ट्विटर हॅण्डल निलंबित करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या, टाइम्स नाऊचे संपादक राहुल शिवशंकर यांच्या कमेंटला उत्तर म्हणून, पंडित यांनी डावे-उदारमतवाद्यांना “जिहादी” असे संबोधत हल्ला चढवला होता.

आणखी एका ट्विटमध्ये पंडित यांनी नागरी हक्क कार्यकर्त्यांचा ‘चायनीज स्टाइल’ने छळ करण्याचे समर्थन केले होते आणि त्यांना ‘मेण्टली-इल जिहादीज’ म्हटले होते.

आणखी एका ट्विटरमध्ये पंडित यांनी महात्मा गांधी यांची हत्या ‘सॅड (दु:खद)’ आहे असे म्हटले होते पण ‘एकसंघ भारता’साठी महात्मा गांधींची हत्या हा  एकमेव ‘उपाय’ आहे अशा विचारातून ही हत्या गोडसेने केली असे म्हणून, त्याचे समर्थनही केले होते.

पंडित यांनी त्यांची हिंदुत्ववादी राजकीय मते अनेकदा बिनदिक्कत मांडली आहेत. एका ट्विटमध्ये त्यांनी भाजपला मते द्या असे आवाहन जनतेला केले होते आणि “मूळच्या इटालियन” सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

आणखी एका संदर्भात त्यांनी जेएनयूमधील डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना ‘नक्षल जिहादी’ असे संबोधले होते. त्याचप्रमाणे रोहिंग्या निर्वासितांना हाकलून लावण्याचे समर्थन केले होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ तसेच सेंट स्टिफन्स कॉलेज यांसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांना निधी देणे थांबवा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले होते. ‘मुस्लिमेतरां’नी जागे होऊन ‘लव्ह जिहाद’चा प्रतिबंध करावा, हा ‘अन्य साधनांद्वारे केला जाणारा दहशतवाद’ आहे असे विधानही त्यांनी केले होते.

अगदी अलीकडेच त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ‘परोपजिवी, मध्यस्थ, दलाल’ असे संबोधून शेतकरी आंदोलनावर टीकास्त्र सोडले होते. त्याचप्रमाणे शाहीन बाग येथे चाललेल्या सीएएविरोधी आंदोलकांसाठीही हीच विशेषणे वापरली होती.

त्यांनी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल हॅण्डल्सना रिट्विट केले आहे. त्यांनी ‘द वायर’च्या वरिष्ठ संपादक अर्फा खानम व प्रख्यात इतिहासकार ऑड्रे ट्रुश्क यांचा ‘व्हल्चर विथ अ प्रिडेटर’ अशी कॅप्शन असलेला एक फोटो टॅग केला होता.

पंडित यांच्या नियुक्तीच्या बातमीनंतर विद्यार्थी व पत्रकारांनी त्यांची ही ट्विट्स शेअर करणे सुरू केले. हे लक्षात आल्यानंतर पंडित यांनी ट्विटर अकाउंटच डिलीट केले आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप

केंद्रीय संस्थांमधील सर्वोच्च पदांवर संघ परिवाराशी संबंधित व्यक्तींना नियुक्त करण्याची केंद्र सरकारची सहजप्रवृत्ती पंडित यांच्या नियुक्तीतही दिसून येते. हे करताना पंडित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे सरकारने पुरेपूर डोळेझाक केली आहे.

२०११ मध्ये डीएनएमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, १,८०० भारतीय विद्यार्थ्यांना, २००२ ते २००७ या काळात अनेक वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना, भारतीय मूळ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (पीआयओ) राखीव जागांवर, प्रवेश देण्यात आले. यावेळी पंडित या पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या (आयएससी) संचालक होत्या.

पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुनंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. पंडित यांनी पीआयओ कोट्याच्या नियम व अटी धाब्यावर बसवून अपात्र व अर्हता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले, असे या समितीच्या चौकशीत आढळून आले. हे आरोप सर्वप्रथम विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अतुल बागुल यांनी केले होते. पंडित यांनी केवळ ५०-६० टक्के गुण मिळवलेल्या आणि महाराष्ट्रातूनच बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पीआयओ कोटाद्वारे प्रवेश दिल्याची माहिती बागुल यांनी बरेच प्रयत्न करून अखेरीस माहिती अधिकाराखाली प्राप्त केली. ज्या परदेशी विद्यार्थ्यांचे आईवडील किंवा आजीआजोबा भारतीय आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी पीआयओ कोट्याखाली १५ टक्के जागा राखून ठेवल्या जातात.

अपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहाय्य करण्यासाठी पंडित यांच्याकडून आर्थिक मोबदला प्राप्त झाल्याचे आयएससीमधील कर्मचाऱ्यांनी सुनंदा पवार समितीपुढे कबूल केल्याचे बागुल यांनी माध्यमांना सांगितले. २००८ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला. मात्र, तोपर्यंत कुलगुरू बदलले होते. जाधव यांच्या जागी आलेले नवीन कुलगुरू रघुनाथ शेवगावकर यांना पंडित यांच्याविरोधात कोणतीही कडक कारवाई करण्याची इच्छा नव्हती.

“निवृत्त न्यायमूर्ती जे ए पाटील यांचा समावेश असलेल्या समितीनेही पंडित यांना अयोग्य प्रवेशांसाठी दोषी ठरवले होते पण यूओपी अधिकाऱ्यांनी पंडित यांना केवळ पाच वेतनवाढी रोखण्याच्या सौम्य शिक्षेवर सोडून दिले,” असे बागुल यांनी डीएनएला सांगितले होते.

जेएनयूच्या कुलगुरूपदासाठी तीन उमेदवारांच्या नावांचा विचार केल्यानंतर पंडित यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली,  असे स्रोतांनी ‘द वायर’ला सांगितले. पंडित यांच्याशिवाय जेएनयूचे माजी विद्यार्थी तसेच स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील सेंटर फॉर युरोपीयन स्टडीजचे प्राध्यापक गुलशन सचदेव आणि  नवी दिल्ली येथील इंट्रा युनिव्हर्सिटी अॅक्सलरेटर सेंटरचे (आययूएसी) संचालक अविनाश चंद्र पांडेय यांचा समावेश होता. मात्र, पंडित यांच्या विचारसरणीमुळे त्यांना झुकते माप देण्यात आले.

पंडित यांच्या शैक्षणिक अर्हता छाप पाडणाऱ्या आहेत. त्या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरतील, असेही केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. भारतातील जनमताचे धृवीकरण करण्याच्या उद्देशाने उजव्या विचारसरणीच्या गटांनी ताब्यात घेतलेल्या जेएनयूमधील गोंधळ, पंडित यांची नियुक्ती जेएनयूच्या कुलगुरू म्हणून झाल्यामुळे, अधिकच वाढणार आहे असे दिसते. आपल्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत संघर्ष अधिक तीव्र होणार याचे संकेत पंडित यांनी  आपली अतिरेकी राजकीय मते उघड करून आधीच दिले आहेत. या राजकीय संघर्षामुळे जेएनयूच्या शैक्षणिक लौकिकाचे नुकसान होण्याची शक्यता दाट आहे.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0