इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन

इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे निधन

कैरो : सुमारे ३० वर्षे इजिप्तवर सत्ता गाजवणारे व २०११ मध्ये  लोकक्षोभामुळे पदच्युत झालेले होस्नी मुबारक यांचे मंगळवारी निधन झाले ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पण त्याची विस्तृत माहिती इजिप्तच्या सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही.

२०११मध्ये इजिप्तमध्ये लोकक्रांती होऊन मुबारक यांना पद सोडावे लागले होते व त्यांच्यावर २३९ आंदोलकांना ठार मारल्याप्रकरणात न्यायालयीन खटले सुरू होते. पण वयोमानामुळे २०१७मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती.  पण त्यांच्यावर सार्वजनिक संपत्तीची लूट केल्याप्रकरणात खटले सुरू होते व त्याप्रकरणात ते तीन वर्षे तुरुंगात होते.

२०१०मध्ये ट्युनिशियात उठाव झाल्यानंतर तेथील अध्यक्ष झैन अल अबादीन बेन अली यांना देश सोडून जावे लागले होते. ट्युनिशियातील या क्रांतीचे लोण इजिप्तमध्ये पसरले व सुमारे १८ दिवस इजिप्तच्या जनतेने मुबारक यांना राजीनामा देण्यासाठी राजधानी कैरोतील तहरीर चौकात निदर्शने केली होती. ही निदर्शने ऐतिहासिक अशी ठरली व त्याने इजिप्तच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. मुबारक यांच्या तीन दशकांच्या एकाधिकारशाही राजकारणाला व मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचारामुळे जनतेमध्ये असंतोष घुमसत होता. त्यामुळे मुबारक यांनी जनमताच्या दबावापुढे झुकून राजीनामा दिला खरा पण त्यांनी देश सोडला नाही. २०११ पासून मुबारक यांचे कुटुंब प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले होते.

होस्नी मुबारक यांना पर्याय म्हणून इजिप्तच्या जनतेने कट्‌टर इस्लामवादी नेते मोहम्मद मोर्सी यांना सत्तेवर आणले पण मोर्सी यांना केवळ एक वर्षच सत्ता मिळाली. त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी २०१३मध्ये पुन्हा सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले व मोर्सींच्या जागी इजिप्तचे तत्कालिन लष्करप्रमुख अब्देल फताह अल-सिसी हे नवे अध्यक्ष बनले.

होस्नी मुबारक यांच्या निधनाने इजिप्तच्या इतिहासातील एक मोठे पर्व संपले आहे. प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप असूनही इजिप्तच्या बांधणीत मुबारक यांचा मोठा वाटा होता. अरब जगतातल्या धगधगत्या वातावरणात त्यांनी इजिप्तला आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण एकाधिकारशाहीचा अतिरेक व भांडवली व्यवस्थेला देशात मोकाट रान दिल्याने लोकांमध्ये त्यांच्या प्रती मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत गेला व त्यांना अत्यंत अपमानित अवस्थेत सत्ता सोडावी लागली. युरोप व विशेषत: अमेरिकेशी नेहमी उत्तम संबंध ठेवल्याने इस्रायल व पॅलेस्टाइन संघर्षाची झळ त्यांनी इजिप्तवर पडू दिली नाही.

मूळ बातमी

COMMENTS