‘हाउडी मोदी’ ते ‘नमस्ते ट्रम्प’ – केवळ कौतुक सोहळा

‘हाउडी मोदी’ ते ‘नमस्ते ट्रम्प’ – केवळ कौतुक सोहळा

मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ हा सोहळा ‘हाऊडी मोदी’ची सरळ सरळ नक्कल होती. या दोन्ही सोहळ्यात दहशतवादाचा सामूहिक मुकाबला करू अशी विधाने दोन्ही नेत्यांनी केली.

खोटारडे पंतप्रधान
आपत्तीची विविध रंगरूपे आणि करोना
ट्रम्प आणि ‘चौघीजणी’

नवी दिल्ली : पाच महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ‘हाउडी मोदी’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ह्युस्टन येथे केले होते. त्या कार्यक्रमात मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी आपापल्या सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले होते. एकमेकांना शाबासक्या दिल्या होत्या. आता ट्रम्प भारतदौऱ्यावर आले असून अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये सुमारे लाखाहून अधिक उपस्थितांपुढे ट्रम्प व मोदी यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले.

मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ हा सोहळा ‘हाऊडी मोदी’ची सरळ सरळ नक्कल होती. या दोन्ही सोहळ्यात दहशतवादाचा सामूहिक मुकाबला करू अशी विधाने दोन्ही नेत्यांनी केली.

मोटेरा स्टेडियममध्ये जेव्हा ट्रम्प यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी व्हिलेज पीपलचे ‘माचो मॅन’ हे क्लासिकल पॉप गाणे वाजवण्यात आले. सुमारे १ लाख १० हजार प्रेक्षकांनी ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया व मोदी यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

जेव्हा मोदींनी भाषण करण्यास सुरूवात केली तर प्रेक्षकातून ‘मोदी.. मोदी’ अशा घोषणा येऊ लागल्या. आपल्या भाषणाच्या शेवटी मोदींनी प्रेक्षकांना ‘भारत माता की जय’, ‘नमस्ते ट्रम्प’, ‘लाँग लिव्ह इंडिया-यूएस फ्रेंडशिप’ अशा घोषणा म्हणावयास लावल्या.

अमेरिकेत भारतीय वंशाचे सुमारे ४० लाख नागरिक राहतात आणि या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होत असून ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी ट्रम्प भारतात विशेष दौरा म्हणून आले आहेत. अमेरिकेत राहणारे बहुतांश भारतीय वंशाचे नागरिक हे अत्यंत सधन आहेत आणि ते राजकीय दृष्ट्या सक्रीय आहेत.

मोदींनी आपल्या भाषणात अमेरिका व भारतातील अनेक गोष्टींमध्ये समानता असल्याचा धागा पकडत दोन्ही देशांपुढे एकसमान आव्हाने असल्याचा मुद्दा मांडला. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली भारत व अमेरिका संबंध अधिक दृढ व मैत्रीचे होतील असे ते म्हणाले. आजच्या ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या इतिहासात प्रगती व समृद्धतेचा एक अध्याय लिहिला जात आहे, असेही ते म्हणाले.

मोदींनी भारतातल्या बहुविविधता व एकतेचाही मुद्दा मांडला. ट्रम्प हे व्यापक विचार करतात आणि अमेरिकन ड्रीमसाठी त्यांनी काय प्रयत्न केले आहेत, हे सर्वांना माहित आहे, असे मोदी म्हणाले.

मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांची कन्या इवान्का व जावई जेरार्ड यांचाही उल्लेख करत या दोघांच्या मदतीबाबत आभार मानले. विशेषत: जेरार्ड जेव्हा भेटतात ते त्यांच्या कॉलेजच्या जीवनातील एका भारतीय मित्राचा जरूर उल्लेख करतात, त्यामुळे तुम्हाला भेटण्यास मला अतीव आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले.

जेरार्ड कुशनर हे व्हाइट हाउसमधून अरब जगताशी संबंध कसे ठेवावेत त्याबाबतचे सल्ले ट्रम्प यांना देतात. काही दिवसांपूर्वी इस्रायल-पॅलेस्टाइन शांतता तोडगा कुशनर यांनी सुचवला होता, त्याचे कौतुक ट्रम्प व नेत्यान्याहू यांनी केले होते पण पॅलेस्टाइनने हा तोडगा अमान्य केला आहे.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मोदींचे तोंडभरून कौतुक केले. मोदी एक रात्रंदिवस काम करणारे नेते असून ते माझे खरे मित्र असल्याबद्दल मला अभिमान वाटतो, असे ट्रम्प म्हणाले. मोदी हे चहा विकणारे होते, याचा उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केला. मोदींचे जीवन हे या देशातील अमर्याद आश्वासनांचे उदाहरण असून प्रत्येक जण मोदींवर प्रेम करतो पण मोदी हे कणखर आहेत असे मला वाटते, असे ट्रम्प म्हणाले. त्यावर प्रेक्षकांनी मोदी, मोदी असा जयघोष केला.

मी माझ्या पत्नीसह सुमारे ८ हजार किमी अंतराचा प्रवास करून भारतात आलो आहे, याचे कारण अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे, अमेरिकेला भारताच्या मैत्रीवर विश्वास आहे, असे ट्रम्प म्हणाले. भारत देश अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा जसा पुतळा आहे तसा तो समतेचा देश असल्याचा गौरव ट्रम्प यांनी केला. या देशाने अथक प्रयत्न करून विषमतेवर मात केली आहे. गेल्या दशकभरात सुमारे २७ कोटी नागरिकांना दारिद्ऱ्य रेषेच्या वर आणले गेले असून मोदी सरकारने देशातल्या प्रत्येक घरात वीज पोहचवली आहे, ७ कोटी घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस पुरवल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेक भारतीय संदर्भ वापरले. त्यांनी होळी व दिवाळीचा विशेष उल्लेख करून दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजे), शोले, ते सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांची नावे घेतली. भारतासारख्या विशाल खंडात सर्व धर्माचे लोक आनंदाने राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ज्यू, ख्रिश्चनांमध्ये एकोपा आहे, असे ते म्हणाले. गंगेचा पवित्रा किनारा ते सुवर्णमंदिर, जामा मशीद, हिमालय, गोवा असे उल्लेख त्यांनी केले.

अमेरिका सरकार भारताशी आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी ३ अब्ज डॉलरचे हेलिकॉप्टर खरेदीचे करार करणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. दोन्ही देशांपुढे दहशतवाद ही समस्या असल्याचे मान्य करत ट्रम्प यांनी अमेरिकेने इसिसचा व त्यांचा म्होरक्या बगदादी याचा खातमा कसा केला हे सांगत पाकिस्तानच्या मदतीने दहशतवाद नेस्तनाबूत करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. अमेरिका व पाकिस्तानचे संबंध अत्यंत चांगले आहेत व द. आशियातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. भारत व अमेरिकेदरम्यान एक बडा व्यापार करार होण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली. या करारावर विचारविनिमय सुरू असून तो उत्तम करार असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम दुपारी दीड वाजता सुरू झालेला असला तरी सुरक्षेच्या कारणावरून सकाळपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास सांगितले जात होते.

या कार्यक्रमाच्या शेवटी रोलिंग स्टोनचे प्रसिद्ध ‘यू कांट ऑलवेज गेट व्हॉट यू वॉन्ट’ हे गाणे वाजवले जात होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0