गेला ‘माधव’ कुणीकडे

गेला ‘माधव’ कुणीकडे

२०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर स्वबळावर सत्तेत यायचे असेल तर भाजपला पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला वापरणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत निवडणूक: शिवसेना फायद्यात!
एबीपी न्यूजचा अपप्रचार
एकनाथ खडसे : व्यक्तिगत आकसाचा भाजप पॅटर्न

आधी गोपीनाथ मुंडे यांचे दुर्देवी अपघाती निधन आणि त्यानंतर भाजपच्या जडणघडणीमध्ये आणि विस्तार वाढीसाठी तहहयात झटलेल्या आणि राजकीय साठमारीमध्ये जवळपास अडगळीत पडलेले एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधणे यामुळे एकेकाळी जनसंघ असलेल्या व नंतर भाजप नाव धारण केलेल्या पक्षामध्ये सध्या गेला ‘माधव’ कुणीकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९८०च्या दशक प्रारंभी भाजपमध्ये सत्तेची गणित जुळवण्यासाठी ‘माधव’चा जन्म झाला. पूर्वीचा जनसंघ आणि त्यानंतर भाजप झालेल्या पक्षाची ओळख खरे तर शेटजी भटजींचा पक्ष म्हणून होती. परिणामी सत्तेचा सूर्य कधी उगवणारच नाही अशी भीती व्यक्त होती. आणि त्यातूनच ‘माधव’ फॉर्म्युला अस्तित्वात आला. आणि याचे कर्तेधर्ते होते वसंतराव भागवत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तेचे गणित जुळवण्यासाठी त्याकाळी आखणी सुरू केली होती. त्यातून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात ‘माधव’ फॉर्म्युला जन्माला आला.
‘मा’ म्हणजे माळी, ‘ध’ म्हणजे धनगर आणि ‘व’ म्हणजे वंजारी. सोशल इंजिनिअरिंगचा हा अनोखा प्रयोग होता.

महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. सत्तेच्या राजकारणात याच समाजातील घराणी प्रामुख्याने आजही दिसतात. परिणामी या समाजाचे हितसंबंध जोपासत काँग्रेस सत्तेत होता. आणि नेमकी हीच वेळ साधून ‘माधव’ फॉर्म्युला जुळवण्यात आला. त्यासाठी मराठा समाज व्यतिरिक्त बहुजन समाजाची मोट बांधण्यात आली. याच मोटेत गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने वंजारी नेतृत्व आणि समाज जवळ करण्याचा प्रयत्न झाला. तर धनगर समाजातून अण्णा डांगे व माळी समाजातून ना. स. फरांदे हे नेतृत्व पुढे आले.

डांगे, फरांदे, आणि मुंडे ही ‘माधव’ प्रतिमा समाजासमोर आणून मराठा व्यतिरिक्त ओबीसी समाजाला हाताशी धरून आपली शेटजी-भटजीचा प्रतिमा बदलून सत्ता मिळविण्याचा हा मार्ग होता. पण काही कालावधी नंतर धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे यांना फारसे स्थान न देऊन पद्धतशीरपणे त्यांना बाजूला ठेवण्यात आले तर विधान परिषदेच्या अध्यक्षपदी फरांदे यांना बसवून राजकीय चौकटीतून त्यांना बाहेर काढण्यात आले. राहता राहिले मुंडे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या हाती त्यावेळी कारभार आला. प्रमोद महाजन हे स्वयंसेवक आणि ब्राह्मण. त्यामुळे बहुजन आणि ब्राह्मण असे समीकरण त्यावेळी रुजले. आणि हे समीकरण यशस्वी सुद्धा झाले.

पण २०१४च्या निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे भाजपचा बहुजन समाजाचा एक चेहरा लोपला. त्यानंतर राजकीय बुद्धिबळाच्या सारीपाटावर आणखी एक बहुजन चेहरा असलेले खडसे हे निष्क्रिय करण्यात आले. याच काळात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पारंपरिक ब्राह्मण आघाडी सांभाळणारा नेता राज्यात तर नितीन गडकरी हे दिल्लीत समोर करण्यात आले. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .

मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये शक्तिशाली बहुजन चेहरा दुसरा कोणीही तयार होऊ शकला नाही. मुंडे यांच्यासारखे नेतृत्व तयार होण्यासाठी किमान १० वर्षे तरी लागतील हे प्रमोद महाजन यांचे वाक्य खूप काही सांगून जाते. मुंडे यांच्यानंतर ब्राह्मणेतर असलेल्या मराठा समाजातील विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील हे त्यांची जागा घेतील की नाही हा खरा यक्षप्रश्न. त्यातच बहुजन चेहराही सध्या भाजपच्या पटलावर नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे हे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी काळाची पावले ओळखून धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. तर पंकजा भाजपातच राहिल्या पण त्यांची घुसमट आजही कायम आहे. धनगर समाजातील कणखर नेतृत्व आज भाजपमध्ये नाही. आधी प्रकाश शेंडगे व नंतर अनेक फडणवीस यांच्या खास मर्जीतील गोपीचंद पडळकर यांना स्थान देण्यात आले आहे पण त्यांनाही प्रचंड मर्यादा आहेत. तर माळी समाजातूनही आश्वासक नेतृत्व भाजपकडे सध्या नाही.

एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांनी थेट शरद पवार यांच्याशी संघर्षाची भूमिका घेत रान उठवले होते. खरे तर तो एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मराठा समाजाच्या नेतृत्वावरच हल्ला होता. त्यानंतर मुंडे यांनी आपला मोर्चा वळविला तो सहकारक्षेत्रावर. सत्तेचा राजमार्ग असलेल्या साखर कारखानदारीमध्ये मुंडे घुसले आणि थेट पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले.

भाजप-सेनेच्या युती सत्तेमध्ये बहुजन चेहरा असलेले नेते गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार यांनी केले. त्यामधून शिवसेनेतून छगन भुजबळ हा माळी समाजाचा शक्तिशाली नेता राष्ट्रवादीमध्ये आला.

भाजप हा विस्तारवादी पक्ष असल्याने सत्तेसाठी अनेक प्रयोग केले जातात. ओबीसी बहुजन समाजाला आपल्याकडे खेचण्याचे धोरण सर्व राज्यात अवलंबले जाते. अगदी आता बिहारमध्येही निवडणुकीच्या सत्ता संग्रामात नितीश कुमार यांच्याशी सलगी करताना चिराग पासवान याच्या रूपाने एक दलित चेहरा पडद्याआड आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्येही असा प्रयत्न करण्यात आला. येथे फक्त १८ टक्के ब्राम्हण समाजालाही भाजपने हाताशी धरून ठेवले. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या सर्वाचे फलित दिसून आले.

पण आता खरी कसोटी आहे ती महाराष्ट्रमध्ये. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर स्वबळावर सत्तेत यायचे असेल तर भाजपला पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला वापरणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी हवे पुन्हा मुंडे, डांगे आणि फरांदे यांच्यासारखे तळागाळातील लोकापर्यंत पोचलेले नेतृत्व. सत्तेची चावी ही अशा ‘मास्टर की’ने उघडली जाते. जी चावी कोणतेही कुलूप विनासायास उघडू शकते. पण सध्या तरी भाजपमध्ये गेला ‘माधव’ कुणीकडे अशीच अवस्था आहे.

अतुल माने हे मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0