भारतात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला संगणक आणि इंटरनेट यांचा वापर सुरू झाला. त्यानंतर जन्मलेल्या ‘नव्वदोत्तरी’ पिढीला पोस्टल सर्व्हिस नावाचे काही असते याची फारशी जाणीवही नाही, इतके या संवाद-माध्यमांनी त्या जुन्या व्यवस्थेला कालबाह्य करुन ठेवले आहे.
‘इंटरनेट’च्या आगमनानंतर सुरुवातीच्या काळात त्याचा सर्वाधिक वापर हा ईमेलसाठीच होत असे. चार दोन ओळींचा ईमेल काही सेकंदातच जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचू लागला. संदेशवहनाचा इतका वेग माणसाने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. प्रवासासाठी विमानांचा वापर सुरू झाल्यानंतर बोटीने प्रवास करणाऱ्या किंवा वस्तू पाठवणाऱ्या माणसाच्या आयुष्याने जसा वेग घेतला, तसेच काहीसे माहिती आदान-प्रदानाबाबत इंटरनेटमुळे घडून आले.
ज्याचा वापर सुकर होतो त्याचा वापर अधिक प्रमाणात होतो हे ओघाने आलेच. लेखनासाठी वापराच्या शाईच्या पेनाची जागा बॉल-पॉईंट पेनने हिसकावून घेतली ती अशीच. एरवी पत्र, पार्सल, टेलिफोन ही संवाद माध्यमे वापरणाऱ्या माणसाने या वेगवान माध्यमाचा वापर चटकन स्वीकारला. चार दोन ओळींच्या, एखाद्या मुद्द्याच्या देवाणघेवाणीसाठी पत्र लिहिणे किंवा टेलिफोनचा वापर करून प्रत्यक्ष बोलणे हे तुलनेने किचकट, खर्चिक आणि गैरसोयीचेही होते. ज्या व्यक्तीशी बोलावयाचे तो पलीकडे फोन घेण्यास उपलब्ध नसेल तर हा संवाद पुढे ढकलावा लागतो. कदाचित पुढच्या एखाद्या कामाच्या आड तो येऊ शकतो. त्याऐवजी ही माहिती लिहून पाठवून देणे अधिक सोयीचे. कारण वाचणारा त्याच्या सोयीने ती वाचून प्रतिसाद देऊ शकतो.
थोडक्यात ईमेल हे ‘अ-संगत’ (asynchronous) संवाद-माध्यम आहे तर फोन हे सुसंगत (synchronous) संवाद-माध्यम आहे. त्या अर्थी ईमेल हा पत्राचा डिजिटल अवतार म्हणावा लागेल. परंतु हा नवा पर्याय पत्र-संवादाला दोन मुद्द्यांवर मात देऊ लागला.
पहिला म्हणजे अर्थातच वेग. पत्र लिहिणे, त्याला आवश्यक असल्यास स्टॅम्प लावणे, जवळची पोस्टाची पेटी शोधून तिथे ते टाकणे, त्यानंतर नियत वेळेला पोस्टमनने ते तिथून काढणे, त्याला वर्गीकरणाच्या जागी पोहोचवणे, ते जिथे पोहोचवायचे त्या पत्त्यानुसार त्याची वर्गवारी करणे, मालवाहतूक-व्यवस्थेमार्फत ते अपेक्षित गावी पोहोचणे आणि पुन्हा तेथील पोस्टाच्या कर्मचाऱ्यांमार्फत उलट क्रमाने ते अपेक्षित व्यक्ती/पत्त्यावर पोहोचवणे यात तुलनेने प्रचंड कालापव्यय होत होता. यात हे पत्र एकाहून अधिक व्यक्ती, एकाहून अधिक व्यवस्थांमार्फत हाताळले जात असे. या व्यक्ती आणि व्यवस्थांच्या कार्यक्षमतेचा, त्यांच्यासमोर अडचणींमुळे कमी-जास्त होणाऱ्या वेगाचा, तसंच वातावरणीय घटकांचा परिणाम त्यावर होत असे. खराब झालेले पत्र मिळणे, अजिबातच न मिळणॆ, पाठवणाऱ्याला पोचण्याची शाश्वती नसणे अशा अनेक समस्या निर्माण होत असत. त्या तुलनेत कोणत्याही मध्यस्थाशिवाय, काही क्षणात इच्छित स्थळी जवळजवळ निश्चित पोचणारे, आणि तिकडून लगेच प्रतिसाद मिळाला, तर काही सेकंदात उत्तर मिळून त्याच्या आधारे पुढील कार्य सुरू करणे शक्य झाले. यामुळे कार्यालयीन कामाच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी पत्रव्यवहाराची जागा ईमेलने घेतली.
पुढे काही प्रमाणात वैयक्तिक संवादासाठीही ईमेलचा वापर सुरू झाला… पण तो अगदी कमी काळ. पुढे ‘चॅट’ नावाचे सुसंगत संवाद-माध्यम उपलब्ध झाल्यावर वैयक्तिक, सामान्य संवादाच्या क्षेत्रात त्याने ईमेलसारख्या अ-संगत संवाद-माध्यमाचे स्थान हिरावून घेतले. भारतात नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला संगणक आणि इंटरनेट यांचा वापर सुरू झाला. त्यानंतर जन्मलेल्या ‘नव्वदोत्तरी’ पिढीला पोस्टल सर्व्हिस नावाचे काही असते याची फारशी जाणीवही नाही, इतके या संवाद-माध्यमांनी त्या जुन्या व्यवस्थेला कालबाह्य करुन ठेवले आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माहितीचे स्वरूप. पत्रामध्ये माहितीचे स्वरूप हे केवळ भाषिक आणि म्हणून मजकूर स्वरूपातील होते. संगणकावर मजकूर, ध्वनि, चित्रे आणि चलच्चित्रे या चारही माहिती-प्रकारांचे एकत्रीकरण झाल्याने ईमेल या माध्यमातून या चारही प्रकारची माहिती हस्तांतरित करणे शक्य झाले. यामुळे संवादाची व्याप्ती प्रचंड वाढली. ध्वनि अथवा चलच्चित्रांचा ईमेलमार्फत होणारी देवाणघेवाण नगण्य असली, तरी ‘ईमेल’मार्फत चित्रांची (image, photos) देवाणघेवाण आपल्याला अंगवळणी पडली आहे. कंपनीच्या अधिकृत लेटरहेडची डिजिटल आवृत्ती ईमेलमध्ये वापरताना त्यात कंपनीचा लोगो चित्राच्या स्वरूपात समाविष्ट केला जातो. बॅँकेतील बचत खात्याचा मासिक, त्रैमासिक अथवा वार्षिक ताळेबंद ईमेलमार्फत डिजिटल स्वरूपात ग्राहकाला मिळू शकतो. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कागदी पासबुकाऐवजी अशा ई-प्रतीचाच वापर करावा यासाठी बॅँक आणि अन्य अनेक संस्था प्रबोधन करत असतात. वीज, टेलिफोनची देयके (बिले), भरणा केल्याची पावती आदी सामान्य देवाणघेवाण व्यवहार डिजिटल स्वरूपात ईमेलमार्फत होऊ लागली आहे. लेखन हा अगदी कागद-लेखणीशी एकनिष्ठ असलेला व्यवहारदेखील आता डिजिटल झाला आहे. ‘पांढऱ्यावरती काळे’ करणारे बहुतेक लेखकही आपले लेखन थेट संगणकावर करून ईमेल मार्फत वृत्तपत्रे, नियतकालिके, प्रकाशक, माध्यम-संपादक यांच्याकडे डिजिटल स्वरूपातच पाठवू लागले आहेत. यातून त्या लेखनाच्या प्रकाशनाचा लागणारा कालावधी कमालीचा घटतो आहे.
पण ईमेल काही केवळ व्यावहारिक देवाणघेवाणीचे माध्यम नाही. वैयक्तिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणूनही त्याचा वापर होतोच. परंतु ईमेल आयडी हा एका सर्व्हरशी निगडित असल्याने संगणक उपलब्ध असलेल्या कार्यालयाखेरीज अन्य ठिकाणी काम करणाऱ्यांना तो सहजी उपलब्ध नव्हता. मग टेलिफोन क्रमांकाच्या धर्तीवर ईमेल ही सेवा म्हणून पुरवली जाऊ लागली. त्यासाठी माफक रक्कम देऊन कोणीही व्यक्ती ती पुरवणाऱ्या कंपनीच्या सर्व्हरवर ईमेल आयडी स्वरूप ओळख तयार करून तिच्यामार्फत इतरांशी संवाद साधू शके. अर्थात यासाठी त्याला त्या सर्व्हरला जोडून घेणाऱ्या संगणकाची गरज भासे. तसा इंटरनेट सेवेसह उपलब्ध असणारा कोणताही संगणक त्यासाठी पुरेसा होई. (याला जोडूनच ही सेवा पुरवणारा ‘सायबर कॅफे’ हा नवा स्थानिक व्यवसाय उभा राहिला.) सुरुवातीच्या काळात अशा ईमेल सेवा देणाऱ्या मोजक्याच कंपन्या होत्या आणि त्यासाठी मोजावा लागणारा पैसा मोजण्याची कुवत समाजातील फार थोड्या लोकांकडे असे. या टप्प्यावर सर्वसामान्यांसाठी एक क्रांतिकारक संकल्पनेचा उदय झाला. ही संकल्पना आज संगणकाबरोबरच स्मार्टफोनच्या क्षेत्रातही मुसंडी मारून बस्तान बसवून आहे. तिने इंटरनेट-नियंत्रित जगाचे अथवा सायबरविश्वाचे अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकले आहे. ही संकल्पना म्हणजे ’फ्री टू यूज सर्व्हिस’.
जगात काहीही फुकट मिळते यावर अगदी भाबडे लोक सोडून कुणाचा विश्वास बसत नाही… किंवा इंटरनेट-पूर्व काळात नव्हता असे म्हणू. पण एक पैसाही न मोजता आमच्या सर्व्हरवर ईमेल आयडी तयार करा आणि जगभरात कुणाशीही त्या आधारे संवाद साधा अशी ‘हॉटमेल’ (hotmail.com) ही सेवा साबीर भाटिया या भारतीय वंशाच्या व्यक्तीने सुरू केली, आणि सर्वसामान्यांच्या त्यावर उड्या पडल्या. टेलिफोन कंपनीकडून टेलिफोन कनेक्शन आणि फोन क्रमांक मिळवण्यासाठी जी जाचक प्रक्रिया होती तिला ‘हॉटमेल’ने संपूर्ण फाटा दिला होता. कोणत्याही संगणकावरून आमच्या सर्व्हरशी संपर्क साधा, हवे ते आभासी नाव/ओळख (ईमेल आयडी) निवडा आणि त्याला एक पासवर्ड किंवा संगणकीय किल्लीची जोड द्या. बस्स. टेलिफोन कंपनीसारखे पत्त्याचे पुरावे नकोत, फोटो नकोत, एक पैसाही भरायला नको. बरे आभासी नाव आणि व्यक्तीचे वास्तव जगातील नाव यांचा काही संबंध असायला हवा, असेही काही बंधन नाही. एका व्यक्तीने एकच ओळख निर्माण करावी हे ही! थोडक्यात आपल्या ईमेल आयडीच्या बुरख्याआड खरी व्यक्ती संपूर्णपणे झाकली जात होती. त्यामुळे याचा गैरवापरही होऊ शकत होता, होऊ शकतो. (काळ पुढे सरकला तसे त्याला काही बंधने आली.)
‘हॉटमेल’ने ईमेल वापर स्वस्त झाल्यामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला. खासगी संदेशांची, मजकुरांची, चित्रांची, फोटोंची देवाणघेवाण सुरू झाली. एखाद्या सुटीच्या काळातील पर्यटनाचे अथवा कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो, सणांच्या अथवा वैयक्तिक आयुष्यातील खास दिवसांच्या शुभेच्छा देणारे देणारे सचित्र संदेश परस्परांना सहजपणे पाठवता येऊ लागले.
आयुष्यातील वाढदिवस, लग्नासारख्या दिवसांच्या शुभेच्छा लोक आता कागदी शुभेच्छा-पत्रांऐवजी संगणकीय शुभेच्छा-पत्रांमार्फत पाठवू लागले. तयार कागदी शुभेच्छा पत्रांप्रमाणेच तयार ई-शुभेच्छापत्रे उपलब्ध करुन देणाऱ्या सेवा, व्यवसाय सुरू झाले. एखाद्या मित्राचा, परिचिताचा, व्यावसायिक हितसंबंधियाचा वाढदिवस आउटलुकसारख्या सेवांमध्ये साठवून ठेवला की दरवर्षी न चुकता ती त्या दिवशी आठवण देणारा संदेश संगणकावर देऊ लागली. तो आला की अशा एखाद्या सेवेच्या माध्यमातून एक साजेसे शुभेच्छापत्र निवडून त्या व्यक्तीला पाठवून देणे सुरू झाले. पुढे तर हा मधला टप्पाही गाळून संगणकीय सेवेमार्फत अशा शुभेच्छा आपोआप पाठवता येऊ लागल्या.
बॅँकाचे आपल्या ग्राहकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश मिळू लागले. शुभेच्छा न चुकता मिळू लागल्या, पण त्यातले अगत्य नि आपलेपणा संपून गेला नि कर्मकांड तेवढे शिल्लक राहिले.
‘हॉटमेल’च्या संकल्पनेमधील क्रांतिकारक शक्ती खऱ्या अर्थाने ओळखली ती गुगल (Google) या आजच्या सर्व-व्यापी, सर्वात बलशाली अशा कंपनीने. ‘हॉटमेल’ने ईमेल वापरासाठी ग्राहकाकडून प्रचलित चलनात पैसे घेतले नसले, तरी त्या ईमेलमधील मजकुराचा वापर करण्याचा हक्क मिळवला होता. त्याच्या आधारे विविध उत्पादक, जाहिरातदार यांच्या जाहिराती त्या ईमेलला जोडून ग्राहकासमोर ठेवण्याचा प्रयोग त्यांनी केला. हॉटमेलने ग्राहकाऐवजी या जाहिरातींमधून आपले उत्पन्न मिळवण्याचा मार्ग निवडला. हा मार्ग साधारणत: दूरचित्रवाणी वाहिन्या अथवा चॅनेल्सवर वापरात असलेलाच आहे. फक्त दूरचित्रवाहिन्या प्रेक्षक आणि जाहिरातदार या दोघांकडून पैसे मिळवतात तर ‘हॉटमेल’ने ग्राहकाला ही सेवा संपूर्णपणे नि:शुल्क देऊ केली होती. ग्राहकाच्या ईमेलमधील मजकूर, ध्वनि अथवा चित्र याच्या आधारे जाहिरातीची निवड करण्याचे तंत्र गुगल या कंपनीने उचलले आणि एक मोठे साम्राज्य उभे केले.
पूर्वी मायक्रोसॉफ्ट या संगणक-प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीने अशाच काहीशा तंत्राचा वापर आपल्या व्यवसाय-वृद्धीसाठी करुन घेतला होता. आपल्या प्रणालीचा चोरून वापर करणाऱ्यांकडे त्यांनी कानाडोळा केल्याने त्यांची विंडोज ही प्रणाली वैयक्तिक वापराच्या संगणकांवर अधिक पसरली. त्या तुलनेत युनिक्स या स्पर्धक प्रणालीच्या वितरक कंपनीने अशा वापरावर कडक कारवाई करण्याचे धोरण राबवल्याने, तिचा वापर सोडून अनेकांनी विंडोजची कास धरली. अशा संगणकांवर वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रणालींच्या उत्पादकांना आपल्या प्रणाली विंडोज-साठी तयार करणे अधिक फायद्याचे ठरू लागले. कारण त्या विकण्यासाठी ग्राहक अधिक संख्येने उपलब्ध होते. याचा मायक्रोसॉफ्टला फायदा असा झाला, की त्या विकसित करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, कच्चा माल आणि साधने या त्यांच्या उत्पादनांचे ग्राहक वाढले. आणि हे ग्राहक व्यावसायिक असल्याने छोट्या वैयक्तिक वापरकर्त्याहून बराच अधिक पैसा ते त्या माहिती आणि साधनांच्या हस्तांतरणासाठी देऊ शकत होते.
गुगलने हेच तंत्र वेगळ्या प्रकारे वापरले. पण त्यांनी आपली किंमत वसूल केली ती या वापरातून निर्माण होणाऱ्या ‘डेटा’ अथवा माहिती-स्वरूपात. याला अलिकडेच ‘जिओ’ या आपल्या मोबाईल-सर्व्हिसच्या उद्घाटनाच्या वेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ‘डेटागिरी’ असे संबोधले होते. थोडक्यात गुगलने माहितीला ‘आभासी चलन’ स्वरूपात पाहिले आहे.
संगणक क्रांतीतला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. गुगलने विकसित केलेली आणि आज स्मार्टफोनमध्ये वापरली जाणारी ‘अँड्रॉइड’ ही नियंत्रक प्रणाली वापरकर्त्याला संपूर्ण मोफत मिळते. त्यामुळे बहुतेक स्मार्टफोन उत्पादक आपल्या उत्पादनाच्या खर्चात बचत करावी म्हणून तिचाच वापर करतात. त्यामुळे यत्र तत्र सर्वत्र ‘अँड्रॉइड’ असल्याने त्यावर विशिष्ट सेवा देणाऱ्या प्रणाली विकसित करणाऱ्यांमध्येही तिचाच वापर अधिक होतो. जितका वापर अधिक तितका डेटा अधिक निर्माण होतो आणि त्या आभासी चलनाचे वास्तविक चलनात रूपांतर करण्याचे तंत्र गुगलला चांगलेच अवगत झाले आहे.
डॉ. मंदार काळे,संख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.
COMMENTS