‘ब्लाइंडनेस’ – आपली कृतिशून्यता जाणवून देणारी रुपककथा

‘ब्लाइंडनेस’ – आपली कृतिशून्यता जाणवून देणारी रुपककथा

होसे सारामागोंची ‘ब्लाइंडनेस’ ही कुणा एका विशिष्ट प्रदेशाची, समूहाची कथा नाही. ती कुठेही घडू शकेल, किंबहुना घडणारी अशी सार्वत्रिक कथा आहे. कादंबरीतल्या एकाही पात्राला सारामागो नाव देत नाहीत. शहराला, देशालाही नाव नाही. त्यातून सारामागोंना हेच सुचवायचं आहे, की ही आपल्या साऱ्यांची कथा आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाण्याचे वृत्त दिल्याने संपादकांवर गुन्हा
कर्नाटकात हिजाबास शाळांकडून विरोध कायम
लक्षद्वीपमध्ये दारुबंदी उठवली पण गोमांस विक्रीवर बंदी

लेखकाला त्याच्या कादंबरीची, कथेची बीजं कुठं गवसतात? नित्शेच्या झरतृष्ट्रसारखे त्याला चिंतनासाठी निर्जन पहाडावर अथवा गुहेत निवारा शोधावा लागत नाही. चांगल्या लेखकाला त्याच्या कथासूत्राची बीजं त्याच्या आजूबाजूच्या जगात, निकटच्या भवतालात विखुरलेली आढळतात.

लेखकाला त्याच्या भवतालात दिसणाऱ्या वास्तवाचं लेखक त्याच्या प्रतिभेने आणि कल्पनेच्या साहाय्याने साहित्यात रूपांतर करतो. विलक्षण प्रतिभेचा लेखक कथासूत्रांची अशी बीजं घेऊन त्याचं महाकाव्यसदृश्य कादंबरीत विस्तार करतो. त्यासाठी लेखकाला प्रचंड कल्पनाशक्ती वापरावी लागते. ही कल्पित संरचना रचण्याची लेखकाची प्रतिभाच त्याचं लेखक म्हणून असणारं सामर्थ्य निर्देशित करते. आधुनिक काळात विश्वसाहित्यात अनेक लेखकांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर महाकाव्यसदृश्य कादंबऱ्यांची निर्मिती केली आहे. विशेषतः लॅटिन अमेरिकन देशांत. गेल्या काही दशकांत अनेक उत्तम कादंबऱ्या लॅटिन अमेरिकेत निर्माण झाल्या. साहित्यासाठी नोबेल पुरस्काराचा अक्षरशः या खंडावर वर्षाव झाला.

वास्तवाची छोटी बीजं घेऊन त्याचं महाकाव्यात रूपांतर करणारी अशी जादू मराठीसारख्या भाषेत मात्र फारशी घडली नाही. वास्तवाच्या आखीव वर्तुळाबाहेर न पडण्याच्या या कोत्या वृत्तीमुळे वास्तवाच्या या बीजांचं महाकाव्यात रूपांतर न होता, खुरट्या बोन्साय कादंबऱ्यांत रूपांतर झालं आहे.

वास्तववादाची ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न मराठी लेखकांनी केलेच नाहीत असे नाही. पण असे लेखक एकूण मराठी साहित्यव्यवहारात उपेक्षित राहिले. विलास सारंग, किरण नगरकर यांसारख्या प्रतिभाशाली लेखकांना इंग्रजीकडे वळावंसं वाटलं. एक छोटा लघुकथासंग्रह आणि एक दीर्घकथा म्हणता येतील एवढ्या आकाराचा कादंबरीका संग्रह लिहून दि. पु. चित्रेंना गद्यलेखन थांबवावंसं वाटलं. या घटना कशाचे द्योतक आहेत? केवळ वास्तववादाचा सरधोपट मार्ग स्वीकारणाऱ्या लेखकांना दोष देणे उचित ठरणार नाही. प्रयोगशील लेखकांकडे वाचकांनी, साहित्यप्रेमींनी किती गांभीर्याने पाहिले हेही तपासून पाहावे लागेल. वास्तववाद किंवा अशा तत्सम कुठल्याही कात्रीत न अडकून पडलेल्या भाषेत डोळे दिपवून टाकणाऱ्या साहित्यकृतीची निर्मिती होणे शक्य आहे. लॅटिन अमेरिकन साहित्य याचं जागतं उदाहरण आहे.

गेल्या काही दशकांत मार्केझ, सारामागो, योस्सा या विलक्षण प्रतिभेच्या लेखकांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर असामान्य आणि श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती केली. गेल्या ५० वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या कादंबऱ्यांची चर्चा करताना होसे सारामागो यांच्या ‘ब्लाइंडनेस’ या कादंबरीला टाळून पुढे जाता येणार नाही. सारामागो यांना ब्लाइंडनेस कादंबरीचा प्लॉट कसा सुचला? सारामागो सांगतात, ते हॉटेलात त्यांच्या पत्नीसोबत डीनरला गेले असताना त्यांना अशी कल्पना सुचली. अचानक त्यांना वाटलं, समजा आता याक्षणी हॉटेलातील सारे लोक अंध झाले तर? ही एक अतिशय प्राथमिक स्वरूपातील कल्पना आहे. मात्र ज्या खुबीने सारामागो यांनी ती खुलवली आहे ते विलक्षण आहे.

एका अनाम देशातल्या अनाम शहरातील एका रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागतो. त्याबरोबर रहदारीचा वेग मंदावून वाहने विलक्षण शिस्तीने आखून दिलेल्या रेषेबाहेर उभी राहतात. विरुद्ध दिशेने येणारा वाहतुकीचा प्रवाह शेजारच्या मार्गावरून वाहत राहतो. नंतर काटकोनातली रहदारी पुढे सरकते. पादचारी रस्ता ओलांडतात. हिरवा दिवा लागतो. आता थांबलेला रहदारीचा प्रवाह सुरू व्हायला हरकत नाही. पण तसे होत नाही. रेषेवरील एक वाहन पुढे सरकत नाही. त्यामुळे त्याच्या मागील वाहनांना पुढे जाता येत नाही. कर्णकर्कश हॉर्न्सचा गोंगाट होतो. काय झालं आहे ते पाहायला काही लोक थांबलेल्या वाहनाजवळ जातात. वाहनचालक गर्दीला सांगतो, की त्याला काहीही दिसत नाहीय. क्षणभरापूर्वी त्याचे डोळे सामान्य होते. आणि अचानक त्याला आता काही दिसेनासे झाले आहे. अचानक अंध झालेल्या त्या व्यक्तीला गर्दीतला एक मनुष्य मदत करण्याची तयारी दाखवतो. त्याला घरी सोडतो, त्याची कारची चोरी करतो आणि स्वतःच्या घरी निघत असताना तोही अंध होतो.

सिग्नलवर अंध झालेला मनुष्य त्याच्या पत्नीसोबत डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला त्याच्या डोळ्यांत काही दोष दिसत नाही. पुढील तपासण्या करण्यासाठी दुसऱ्या दिवशी येण्याची सूचना देतो. त्याच रात्री स्वतः डॉक्टर सुद्धा अंध होतो. केवळ डॉक्टरच नव्हे तर या अंधाच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि इतरही अनेक लोक अंध बनतात. डॉक्टर या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीची मंत्रालयाला कल्पना देतो. सरकारला अनेक स्तरांवरून या साथी सारख्या फैलावलेल्या अंधत्वाची माहिती मिळतच असते. खबरदारीचा उपाय म्हणून सरकार अशा अंधांना इतरांपासून अलग ठेवण्याची व्यवस्था करते. साऱ्या अंधाना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी एका इस्पितळात हलवलं जातं. डॉक्टरलाही. डॉक्टरसोबत त्याची अंध नसलेली पत्नी अंध असल्याचं भासवून त्याच्यासोबत येते.

साऱ्या अंधांना एका बंद इस्पितळात ठेवण्यात येते. इस्पितळाच्या इमारतीभोवती कडक सुरक्षा व्यवस्था रोवली जाते. सुरवातीला पुरेशा प्रमाणात बेड आणि इतर गोष्टी उपलब्ध असतात. मात्र अंधांची आवक सतत आणि मोठ्या संख्येने वाढत जाते. सारेच अंध. त्यामुळे त्यांचे व्यवहारही तसेच. इमारतीत सारीकडे घाण साचलेली. कोण कुठेही झोपलेले. अपुरा अन्न पुरवठा. त्यातून निर्माण झालेली युद्धसदृश्य परिस्थिती. मृत झालेल्या अंधांचे काहीही विल्हेवाट न लावता सडत पडलेले देह. इमारतीचा नरक बनतो.

त्यात परिस्थिती आणखी भयानक होते ती शस्त्र बाळगलेल्या अंधांच्या येण्याने. जवळ असणाऱ्या शस्त्रामुळे नव्याने आलेल्या अंधांचा समूह आणि त्यांच्या म्होरक्या इतरांकडे जास्ती अन्नाची मागणी करतात. त्यानंतर त्यांच्याजवळच्या मौल्यवान वस्तूंची आणि अखेरीस शरीरसुखासाठी स्त्रिया पुरवण्याची मागणी करतात. स्त्रियांनी नकार दिला, तर कुणालाही अन्न मिळणार नाही, औषधं मिळणार नाहीत अशी व्यवस्था करतात. हिंसा आणि बलात्काराचं एक सत्रच सुरू होतं.

अखेरीस अंध असल्याचं नाटक करणारी डॉक्टरची पत्नी या साऱ्यांचा बदला घ्यायचं ठरवते आणि हिंसक टोळीच्या म्होरक्याला मारून टाकते. हे सारेच असह्य झालेली दुसरी एक अंध स्त्री इमारतीला आग लावून देते. इमारत भस्मसात होते. डॉक्टरची पाहू शकणारी पत्नी मात्र त्या आगीतून तिच्या वॉर्डमधील लोकांना सहीसलामत बाहेर काढते. इमारतीवर बसवलेला पहारा केव्हाच उठलेला असतो. अंधांची पलटण शहरात प्रवेश करून डॉक्टरच्या घराच्या दिशेने जात असताना समोर दिसणारी वस्तुस्थिती  डॉक्टरच्या पत्नीची धडकी भरवणारी असते.

जी गत इस्पितळाच्या इमारतीची, तीच शहराची झालेली असते. शहरातले, देशातले सारेच अंधत्वाच्या साथीला बळी पडलेले असतात. साऱ्या देशाचा नरक बनतो. सगळ्या संस्था निकामी, उध्वस्त झालेल्या. कुटुंबं एकमेकांना दुरावलेली आणि जिवाच्या आकांताने एकमेकांना शोधणारी. मानवी जीवनव्यवस्था संपूर्ण कोसळून उध्वस्त झालेली. असह्य नरकातून वाट काढत सारे डॉक्टरच्या घरी पोहोचतात.

घरी आल्यानंतरचा दुसरा दिवस. प्रथम अंध झालेला मनुष्य अचानक ओरडू लागतो. त्याला पुन्हा दिसू लागतं. अचानक. जेवढ्या अचानक तो अंध झाला तेवढ्याच अचानक पुन्हा त्याची दृष्टी परत येते. सारे अंध आनंदून जातात. आपलीही दृष्टी परत येईल या आशेने हरखून जातात. हळूहळू साऱ्यांचीच दृष्टी परत येते. अचानक उद्भवलेल्या साथीला बळी पडलेल्या साऱ्याच अंधांना दिसू लागते. आनंद आणि उत्साहाचा भर ओसरल्यावर डॉक्टर म्हणतो, तो कधीच अंध झालेला नव्हता. खरंतर कुणीच अंध झालेलं नव्हतं. कारण आपण सारे आधीपासूनच अंध होतो. अंध, पण पाहू शकणारे.

इथे कादंबरी संपते. पण कादंबरीने उभे केलेले प्रश्न डोक्यात ठाण मांडून बसतात. ही नक्कीच एक रूपककथा आहे. समुद्रातून वर दिसणारा केवळ एक हिमखंड आहे. त्याच्या तळाशी असणारा मुख्य भाग तर वर दिसणाऱ्या भागाच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. महाकाय आहे.

सरामागोंची ही कथा केवळ अचानक अंध झालेल्या समूहाची कल्पित कथा नाही. या रुपककथेत त्याहून खूप अधिक काही ठासून भरलेले आहे.

सारामागो सांगतात तसे, आपण सारेच अंध आहोत. अंध पण पाहू शकणारे. आपल्या समोर, आपल्या पुढ्यात असणाऱ्या गोष्टीही आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला दिसल्या तरी आपण पाहू शकत नाही. पाहिलं तरी त्याचं निरीक्षण करत नाही. आपण सारे नक्कीच अंध आहोत.

सारामागोंची ‘ब्लाइंडनेस’ ही कुणा एका विशिष्ट प्रदेशाची, समूहाची कथा नाही. ती कुठेही घडू शकेल, किंबहुना घडणारी अशी सार्वत्रिक कथा आहे. कादंबरीतल्या एकाही पात्राला सारामागो नाव देत नाहीत. शहराला, देशालाही नाव नाही. त्यातून सारामागोंना हेच सुचवायचं आहे, की ही आपल्या साऱ्यांची कथा आहे.

अंधत्वाची हीच रूपककथा आपल्यालाही लागू आहे. आपल्या समोर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. अमेझॉनचं जंगल कित्येक दिवस जळत राहिलं. मानवी मूल्यं पायदळी तुडवली जातायत. खोट्या, निर्जीव संकल्पना डोक्यावर स्वार झालेल्या झुंडी जिवंत, श्वास घेणारी माणसं मारून टाकतायत. सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीविषयी संशय यावा अशी भयं पेरली जातायत. या साऱ्याला आपण कसा प्रतिसाद देतो? बहुधा काहीच नाही. कारण हे आपल्याला दिसतंच नाही मुळी. आपण खरेच अंध झालो आहोत. आपली कृतिशून्यता हेच दर्शवते.

आपण कृती करत नाही. कारण त्या घटनेची भयावहता आपल्याला दिसत नाही. कादंबरीत डॉक्टरसोबत राहण्यासाठी त्याची पत्नी अंध असण्याचं नाटक करते. तिथे परिस्थिती अशी उद्भवते की हिंसक टोळीच्या म्होरक्याचा ती खून करते. सामान्य परिस्थितीत अशी गोष्ट तिच्या हातून कदापी घडू शकली नसती. त्याऐवजी तिने स्वतः जीव देणं पसंद केलं असतं. पण समाजाचं अतिनिम्न स्तरावर झालेलं पतन तिला तशी कृती करायला भाग पाडतं. मानवी समूहाचं अशा तऱ्हेने पतन होणं कुठल्याही विचारी मनुष्याला अविचारी कृत्य करायला भाग पाडू शकतं ही भयंकर वस्तुस्थिती सारामागो अतिशय प्रभावी रुपकातून आपल्यापर्यंत पोचवतात. कादंबरीच्या शेवटी साऱ्या अंधांची दृष्टी परत येते. सारामागोंनी यातून मानवी समूहाबद्दल आशा व्यक्त केली आहे. संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या परिस्थितीतूनही मनुष्य पुन्हा उभारी घेऊ शकेल, विनाशाच्या उंबरठा गाठण्याआधीच डोळे उघडून स्वच्छपणे पाहू शकेल अशी ती आशा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1