लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….

नाॅटिंगहॅम कसोटीतला पाचव्या दिवशीचा थरार पावसामुळे धुवून निघाला. शेवटच्या दिवशी भारताला 157 धावा काढायच्या होत्या, जे अशक्य नव्हते. पण इंग्लंडची जलदगत

जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)
संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?
अमित शहांच्या मतदारसंघात ‘कलम ३७०’ क्रिकेट स्पर्धा

नाॅटिंगहॅम कसोटीतला पाचव्या दिवशीचा थरार पावसामुळे धुवून निघाला. शेवटच्या दिवशी भारताला 157 धावा काढायच्या होत्या, जे अशक्य नव्हते. पण इंग्लंडची जलदगती गोलंदाजी लक्षात घेता ते तितकेसे सोपेही नव्हते. पुजारा, कोहली आणि रहाणेची वर्तमान कामगिरी लक्षात घेता पहिल्या कसोटीत भारताला जिंकण्याची संधी 60:40 होती. तरी पहिल्या कसोटीत भारताचेच पारडे जडच होते. दुसरी कसोटी लॉर्डस् मैदानावर 12 ऑगस्टला सुरू झाली. रूट नाणे फेकीत परत एकदा नशीबवान ठरला. आणि आश्चर्य ते काय, त्याने भारताला फलंदाजीस बोलावले. क्रिकेट पंडित आणि सर्व समालोचक रूटच्या निर्णयाची आलोचना करत होते. पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 276 धावा काढून रूटच्या निर्णयाला सपशेल चुकीचे ठरविले. रोहितच्या चमकदार 83 धावा, राहुलचे जमून काढलेले नाबाद शतक आणि कोहलीच्या सर्वस्व पणास लाऊन काढलेल्या 42 धावांच्या मदतीने भारताने डावाची धावसंख्या पहिल्याच दिवशी तीनशेच्या घरात पोहचवली. लॉर्डस् खेळपट्टीवर चेंडू चौथा दिवसापासून वळू लागतो असा इतिहास आहे. आश्विनची निवड न होणे अनाकलनीय होते. जायबंदी शार्दुलच्या ऐवजी अनुभवी इशांतची निवड योग्य होती. इंग्लंडने क्राॅली, लाॅरेन्स आणि ब्राॅडच्या ऐवजी हसीब हमीद, मोईन अली, मार्क वुडला संधी दिली. भारताचा पहिला डाव 364 धावांवर संपला. दुसऱ्या दिवशी पंत (37) आणि जडेजा (40) शिवाय कोणी धावात भर टाकु शकले नाही. राहुलच्या 129 धावा भारताच्या पहिल्या डावाचे प्रमुख आकर्षण ठरले. रहाणे, पुजाराचे अपयश भारतासाठी परत एकदा काळजीचे कारण ठरले. पहिल्या डावात भारताने 500 धावा काढल्या असत्या तर इंग्लंडवर अतिरिक्त दबाव टाकता आला असता. अँडरसनने पांच गडी बाद करून आपले श्रेष्ठत्व परत एकदा सिद्ध केले. कसोटी क्रिकेटमधे 600 च्या वर गडी बाद करणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. अँडरसनला रॉबिन्सन आणि वूडने चांगली साथ दिली.

इंग्लंडचा पहिला डाव जो रूटच्या दमदार आणि झुंजार 180 (नाबाद) धावांसाठी लक्षात ठेवल्या जाईल. इंग्लंडची फलंदाजी रुटच्या भोवती फिरते हे परत एकदा दिसून आले. बर्न्स (49) आणि बेस्ट्रो (57) शिवाय बाकी फलंदाजांचे योगदान यथातथाच राहिले. सिब्ली आणि हमीदला लागोपाठच्या चेंडुंवर बाद करून सिराजने धमाल उडवून दिली. इंग्लंडने पहिल्या डावात 27 धावांची बढत मिळवली. बुमराहचे गोलंदाजीतले अपयश भारताला भोवले. बुमराहने 12 नो बॉल टाकले. पूर्ण डावात त्याला गोलंदाजीत लय सापडली नाही. आश्विनची कमी जाणवत होती. रुटची 180 धावांची खेळी लाजवाब होती. सद्य परिस्थितीत जो रूट कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे हे निर्विवाद सत्य आहे.

तिसऱ्या दिवशी लॉर्ड्स कसोटीचा निर्णय काय होईल हे कोणीही सांगू शकत नव्हते. भारत चौथ्या दिवशी कसा खेळ करेल यावर सर्व निर्धारित होते. पण मार्क वूडच्या मनांत काहीतरी वेगळेच होते. राहुल आणि रोहितला लवकर आऊट करून त्याने इंग्लंडला पहल मिळवून दिली. कोहलीला करणने वीस धावावर बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली. भारताच्या दृष्टीने ही चांगली परिस्थिती नव्हती. इंग्लंडचे द्रुतगती गोलंदाज भारताचा दुसरा डाव गुंडाळतात की काय असे वाटू लागले. पुजारा (45) आणि रहाणे (61) यांनी चांगल्या धावा काढत शतकी भागीदारी केली आणि भारताच्या डावाला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. त्यांना लय सापडणे ही भारताकरिता समाधानाची बाब आहे. पंत आणि ईशांत शर्मा शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले. चौथा दिवस संपला तेंव्हा भारताने 6 गडी बाद 181 धावा जमविल्या. भारताला एकूण 154 धावांची बढत मिळाली, पण ती वाढविण्याची गरज होती.

पाचव्या दिवसाचा थरार….

सामना इंग्लंड जिंकणार की भारत हे अद्याप गुलदस्त्यात होते. बरेच काही पंतच्या कामगिरीवर अवलंबून होते. पण तो लवकर बाद झाल्याने इंग्लंडची सामन्यावरील पकड घट्ट होत होती. शमी आणि बुमराह यांनी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडच्या सामना जिंकण्याच्या आशा धुळीस मिळविल्या. ईशांत, शमी आणि बुमराहने 106 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. शमीने 56 धावा काढून क्रिकेट जीवनातील त्याचा सर्वोत्कृष्ट डाव खेळला. दोघेही अगदी निष्णात फलंदाजासारखे खेळले. त्यांच्या 89 धावांच्या भागीदारीने भारताने इंग्लंड कडून सामना हिसकावून घेतला. इंग्लंडतर्फे वूड, रॉबिन्सन, मोईन अलीने अप्रतिम गोलंदाजी केली. करणने विराटची महत्वपूर्ण विकेट घेतली. उपहारानंतर लगेचच भारताने 8 बाद 298 धावांवर डाव घोषित केला आणि इंग्लंडला सरासरी 4.5 धावा प्रती षटक या गतीने 272 धावांचे लक्ष दिले. बुमराह आणि शमीने बर्न्स व सिब्लीला शून्यावर बाद करत इंग्लंडच्या अडचणी वाढविल्या. रूट (33), बटलर (25) शिवाय कोणीही भारतीय द्रुतगती आक्रमणासमोर टिकू शकला नाही. सिराज, बुमराह, ईशांत आणि शमी यांनी अप्रतिम जलदगती गोलंदाजी करत इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 120 धावात गुंडाळला. भारताच्या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडला दोन्ही डावात गुंडाळणे ही महत्वपूर्ण बाब.

लॉर्डस् मैदानावर हा भारताचा तिसरा विजय. लॉर्डस् मैदानावरील पराभव इंग्लंड संघाला नेहमीच बोचणारा असतो. लॉर्डस् वर शतकी खेळी करणे ही परदेशी खेळाडूसाठी सन्मानाची गोष्ट. राहुलने 129 धावा काढून हा सन्मान मिळविला आणि सामनावीर ठरला. लॉर्डस् मैदानावरील हा विजय कायमच भारताला सुखावत राहील. जरी हा सांघिक विजय असला तरी राहुलचे शतक, रहाणेच्या 61 धावा, शमी – बुमराहची भागीदारी, सिराज व ईशांतने दोन्ही डावात बाद केलेले इंग्लंडचे फलंदाज हे लॉर्डस् कसोटीचे प्रमुख आकर्षण ठरेल. भारताने क्षेत्ररक्षणात मात्र सुधारणा करावयास हवी. विजयी ठरल्यावर त्रुटींकडे दुर्लक्ष होते. आश्विन सारख्या फिरकीपटूला जास्त काळ बाहेर बसविणे योग्य होणार नाही. तळाच्या गोलंदाजाकडून नेहमीच फलंदाजीची अपेक्षा करणे बरोबर नाही. पहिल्या सहा फलंदाजांनी ह्याची खबरदारी बाळगावयास हवी. लॉर्डस् कसोटीतील थरार क्रिकेट रसिकांसाठी उत्साहवर्धक राहील आणि त्यांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. कसोटीचा निर्णय काय राहील हे शेवटपर्यंत कोणीही सांगू शकत नव्हते. असे उत्कंठापूर्ण सामने जागतिक पातळीवर कसोटी क्रिकेटचे महत्त्व निश्चितपणे वाढवितात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0