भारतातील कोरोना बाधितांची संख्या दररोज लाखांमध्ये वाढतेय. मृतांची संख्याही या महासाथीत वाढत चाललीय. पण त्याच वेळी आयपीएलचा तमाशा बीसीसीआयने राजरोसपणे
भारतातील कोरोना बाधितांची संख्या दररोज लाखांमध्ये वाढतेय. मृतांची संख्याही या महासाथीत वाढत चाललीय. पण त्याच वेळी आयपीएलचा तमाशा बीसीसीआयने राजरोसपणे सुरू ठेवला आहे. देशातील जनतेला, रुग्णांना ऑक्सिजन, औषधे, खाटा यांचा प्रचंड तुटवडा भासतोय. तरीही आयपीएलचे पैसे मोजण्यात गर्क असलेल्या बीसीसीआय किंवा त्यांच्या फ्रँचायझींना आपले अशा आणीबाणीच्या प्रसंगी आर्थिक योगदान असावे असे वाटत नाही. बीसीसीआयने डोळ्यावर पट्टी ओढून घेतली आहे तर त्याच बीसीसीआयकडून सोई-सवलती घेणारे भारताचे सुपरस्टार क्रिकेटपटूही गप्प आहेत. कुणाचाही हात खिशात जात नाही. फारसे प्रकाशात नसलेले किंवा ठाऊक नसलेले काही कलावंत शंभर खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभे करू शकतात. पण एरव्ही सतत जाहिरातींमध्ये दिसणारे चित्रपट कलावंत देखील पडद्याआड लपलेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने स्वतःकडचे ५० हजार डॉलर्स पीएम केअर फंडात कोविड मदतीसाठी दिले. एका परदेशी क्रिकेटपटूचे मन देखील भारतातील परिस्थिती पाहून पाझरले. मात्र भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना या परिस्थितीतही देशवासियांसाठी काही करावे असे वाटत नाही.
अलिकडे यापैकी अनेक क्रिकेटपटूंची नावे जगातील अव्वल श्रीमंताच्या यादीत किती वरच्या क्रमांकावर आहेत, याची रसभरीत वर्णने आपण वाचली होती. मात्र तो पैसा देशवासियांवर प्रेमाची परतफेड करण्यासाठी नाही हे गेल्या वर्षभरापासून सिद्ध होतेय. कोणी आपल्या मोटारी विकून ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करून रुग्णांना देत आहे. कुणी आपली शेती-घरदार संपत्ती विकून कोविड उपचार केंद्राना साहाय्य केल्याच्या बातम्या येताहेत. मात्र बीसीसीआयला पाझर फुटत नाही.
बीसीसीआयचे सचिव जय शहा हे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र आहेत. कोरोनाचे संकट अधिक उग्र स्वरुप धारण करत असतानाही त्यांनी आयपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमांना बाधा येऊ दिली नाही. गेली आयपीएल स्पर्धेत फारसा नफा मिळाला नव्हता पण यंदाच्या कोविडच्या दुसर्या लाटेतही बीसीसीआयचे सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून तब्बल ४ हजार कोटी रु. मिळवण्याचे लक्ष्य आहे. बीसीसीआयने यावेळच्या आयपीएलमध्ये पूर्वीच्या तुलनेत आणखी एका नवा स्पॉन्सरही मिळवला आहे. त्यामुळे टीव्ही राइट्स, स्पेशल टायटल स्पॉन्सर, अन्य स्पॉन्सर, अम्पायर-स्ट्रॅटेजिक टाइम आउट स्पॉन्सर अशा माध्यमातून हा पैसा बीसीसीआय मिळवत आहे.
एवढी प्रचंड आर्थिक उलाढाल लक्षात घेऊन क्रिकेटपटू आणि सोबतच्या सर्व व्यक्तींवर बीसीसीआय आणि फ्रंचायझी करोडो रुपयांचा खर्च सध्या करत आहेत. देशात ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे माणसे दगावल्याच्या बातम्या सतत येत आहेत. अशा वेळी बीसीसीआयने आपल्या तिजोरीत पडून असलेला पैसा योग्य कामासाठी, कोरोना सोई-सुविधांसाठी वापरणे संयुक्तिक ठरले असते. त्यांनी पैसा देण्यापेक्षाही किमान ज्या राज्यांमध्ये आयपीएलचे सामने आहेत, किमान त्यांना तरी कोविड सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रसंगी योग्य ठरले असते. त्या ऐवजी आयपीएल सामने आणि आपापल्या खेळाडूंची काळजी घेण्यात त्यांनी धन्यता मानली आहे.
कोविड युद्धासाठी बीसीसीआयला अशीही मदत करता येईल. आयसीसीशी संलग्न असणार्या देशांकडे कोविड लस किंवा वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतील तर बीसीसीआयने आपल्या क्रिकेट संबंधांचा वापर करून ती वस्तू रुपातील मदत, तत्काळ मागवून घ्यावी. त्या गोष्टींची आर्थिक बाबींची पूर्तता बीसीसीआयनेच थेट करावी. केंद्र सरकारच्या परवानगीने त्या गोष्टी भारतात आणाव्यात आणि त्यांच्या वितरणाची व्यवस्था करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडे द्यावे.
काही आयपीएल फ्रंचायझींची मालकी किंवा सहमालकी उद्योगपतींकडे आहे. बीसीसीआयच्या कृतीची वाट न पाहता त्यांना थेट आर्थिक मदत किंवा वस्तूरुपाने मदत करता येईल. नाही तर आयपीएल हा केवळ तमाशा होऊन बसेल. बीसीसीआयची ओळख एक क्रिकेट कंपनी अशीच यापुढे राहील. आणि आपण ज्यांना देवांची उपमा देतो ते त्या कंपनीचे पगारावर काम करणारे कर्मचारी म्हणून यापुढे ओळखले जातील.
कोविड रुग्णांना मदत न करण्याबाबत ना बीसीसीआयला खेद ना खंत तशीच परिस्थिती देशाच्या संघातून खेळून हिरो झालेल्या खेळाडूंची आहे. परदेशी खेळाडू मदत करत असतानाही त्यांना कंठ फुटत नाही, अर्जुन, द्रोणाचार्य, भारत रत्न, क्रीडाभूषण, राजीव गांधी खेलरत्न आदी पुरस्कार ज्या देशाने दिले त्या देशांप्रती आपले काही कर्तव्य आहे असे त्यांना वाटते का? देशवासियांच्या म्हणजेच क्रिकेट रसिकांच्या प्रेमाची परतफेड करण्याची ही खरी त्यांना नामी संधी होती. जाहिरातींद्वारा जनजागृतीचे संदेश दिले, त्यासाठी बिदागी घेतली नाही म्हणजे आपले काम संपले, असे त्यांचे एकूण वर्तन दिसत आहे. प्रत्यक्षाच त्यांनी आता मदतीचा हात देण्यास सुरूवात केली तर त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून समाजातातील आणखीही काही घटक पुढे सरसावतील. प्रत्येकाचा खारीचा वाटा कोविड रुग्णांना जगण्याची नवी आशा-आकांक्षा, बळ देऊन जाईल.
अजूनही वेळ गेलेली नाही. क्रिकेटपटूंनी तरी पुढाकार घ्यावा. स्वतःचे पैसे कोविड गरजूंच्या वस्तूंसाठी द्यावेत. सरकार एकटे पुरे पडणार नाही. मात्र प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मदतीमुळे हिंमत वाढत जाईल.
मूग गिळून बसणार्या भारताच्या क्रिकेटपटूंनी, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे उदाहरण पाहा. त्याने भारताविरुद्धचे क्रिकेट मैदानावरचे वैर विसरून आपल्या पाकिस्तानातील चाहत्यांना आणि पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे की, भारताला ऑक्सिजन टँक देण्यासाठी निधी उभारा, त्यांना ऑक्सिजनचे टँकर द्या.
एरव्ही मोठ्या बाता मारणारे आणि तत्वज्ञान सांगणारे भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू आहेत कुठे? आयपीएलच्या सोन्याच्या पिंजर्यातून बाहेर या. ज्या क्रिकेट रसिकांनी तुमच्यावर प्रेम केले त्यांच्या अस्तित्वाचा, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते क्रिकेट रसिक जिवंत राहिले तर तुमचे भविष्यात कौतुक होईल. किमान त्यासाठी तरी, त्यांना जगवण्यासाठी माणसात या. परदेशी क्रिकेटपटूंनाही कोविड विरुद्धच्या युद्धासाठी साहाय्य करावेसे वाटते, तुमचे देशप्रेम बेगडी नाही हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे.
विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
COMMENTS