उद्योजकता : निवृत्त सैनिकांसाठी उपयुक्त पर्याय

उद्योजकता : निवृत्त सैनिकांसाठी उपयुक्त पर्याय

उद्योजक होण्यासाठी आर्थिक पाठबळाबरोबरच व्यवसायात ‘रिस्क’ घेण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची ठरते आणि सैनिकांमध्ये ती प्रशिक्षणादरम्यानच विकसित केली जाते. त्याचसोबत सैन्यदलातील शिस्त, मेहनत, जिद्द, देशभक्ती आदी कौशल्यगुणांची गुंतवणूक निवृत्त सैनिकांना उद्योगधंद्यांतही करता येईल....

देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
लघुउद्योगांपुढील आव्हाने आणि उपाययोजना

अनेकविध लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून ‘उद्योजकता’ ही नेहमीच आपल्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटक ठरली आहे. बदलत्या परिस्थितीनुरूप सरकारी व आर्थिक धोरणांची मोठी व परिणामकारक साथ आता सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना लाभत असून, त्याचे आशादायी परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्र व विशेषत: सैन्यदलातील विविध स्तरावर काम करणार्‍यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर उद्योजकतेचा विचार करायला हरकत नाही. तसे केल्यास केवळ उद्योजकलाच नव्हे, तर एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रासही हे योगदान विशेष उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे याचा विचार करणे आवश्यक आहे.

यासंदर्भात निवृत्त अथवा माजी सैनिकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, सैन्यदलातील त्यांच्या कार्यकाळात त्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाहतूक-नियोजन इ. विविध विभागांमध्ये नियोजनपूर्ण, सातत्याने शिक्षण-प्रशिक्षण व प्रत्यक्ष कामाच्या सराव-संधी दिल्या जातात. याद्वारे त्यांचे कौशल्य त्या-त्या क्षेत्रांत अद्ययावत केले जाते.

थोडक्यात, पण उदाहरणांसह सांगायचे म्हणजे, विमानांची दुरुस्ती-निगा राखणे, वाहनदुरुस्ती, जहाजांवरील इंजिन व अन्य व्यवस्थांवर काम करणे, संगणकीय पद्धतीवर आधारित कार्यपद्धतींचा सराव करणे, सामानाची वाहतूक करणे, वैद्यकीय क्षेत्रांसह इतर प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ व पद्धतशीर आणि शिस्तबद्ध कामांचा अनुभव माजी सैनिकांच्या संदर्भात सर्वाधिक उपयुक्त ठरतो. याच उपयुक्त बाबींना उद्योजकतेची जोड देणे, म्हणूनच सर्वाथाने हितकारी ठरते.

वरील तंत्रज्ञान व कामकाजाशी संबंधित प्रमुख व महत्त्वाच्या मुद्द्यांच्या जोडीलाच माजी सैनिक सैन्यदलात काम करताना त्यांच्या ठिकाणी उद्योग अणि उद्योजकतेला पूरक अशा काही बाबी प्रमुख्याने व प्रकर्षाने दिसून येतात. त्या म्हणजे सैन्यदलातून विशिष्टकालीन सेवेनंतर त्यांचे असणारे सरासरी चाळिशीतील वयोमान, कौशल्य, लघु उद्योगांसाठी आवश्यक असा विविध क्षेत्रांत काम करण्याचा पूरक अनुभव, शारीरिक क्षमता, काम करण्याची मानसिकता इत्यादी. या सार्‍या महत्त्वाच्या पुंजीसह माजी सैनिकांनी त्यांचा पूर्वानुभव, कौशल्य इत्यादीला उद्योजकतेची कास दिल्यास, ती बाब निश्चितच परस्पर पूरक व फायदेशीर ठरू शकते.

स्वत:चा व्यवसाय सुरू करून अथवा लघु उद्योजक होण्यासाठी माजी सैनिकांपुढे मध्यमवयीन व्यावसायिक पर्याय सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. वैयक्तिक स्तरावर अशाप्रकारचा निर्णय घेण्यासाठी त्यांचा वयोगटही पूरक ठरतो. आयुष्याच्या या टप्प्यावर प्रत्यक्ष कामकाज व अनुभवांवर आधारित व्यवसायाला सुरुवात केल्यास व त्याला विचारपूर्वक प्रयत्नांची साथ दिल्यास, त्यांना विविध व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतात व त्यातून त्यांना निवडक उद्योग पर्याय सहजपणे स्वीकारता येतो.

सैन्यातील निवृत्तीनंतर माजी सैनिकांनी आपला स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करताना खालील मुद्दे आणि बाबींची पडताळणी करणे आवश्यक ठरते. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या मनातील उद्योग-व्यवसायाची उपयुक्तता व व्यवसायाचे स्वरूप आणि प्रारूप, व्यवसाय संकल्पनेचे अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपातील फायदे, उत्पादन अथवा सेवा यांची प्रचलित स्थिती यांचा समावेश करता येईल.

यासाठी संबंधित व्यवसाय विषयाचा अभ्यास, त्याचे विश्लेषण-नियोजन, अनुभवी मंडळींचा सल्ला-मार्गदर्शन, प्रत्यक्ष सराव व अनुभव, व्यवसाय विषयाची ज्ञानासह उद्योजकतेशी सांगड घालणे, व्यवसायातून अपेक्षित फायदे, आव्हाने व त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे व्यवसायाशी निगडित जोखीम व या आर्थिक-व्यावसायिक जोखमीचे व्यवस्थापन-नियोजन करणे, या बाबी प्रत्येक नवउद्योजकासाठी आवश्यक ठरतात, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

आपली शैक्षणिक पात्रता, सैन्यदलातील ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यावर आधारित व व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पूर्वाभ्यास करणे फायदेशीर ठरते, अशा पूर्वाभ्यास वा तयारीमध्ये मुख्यत: संबंधित व्यवसाय विषयाचे तपशीलवार ज्ञान, संबंधित क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चा, प्रत्यक्ष भेटी, यशस्वी व्यक्तींशी संपर्क, उद्योजक संस्था-संघटनांकरवी माहिती संकलन, विविध प्रकाशनांचा संदर्भ म्हणून उपयोग, विशेष चर्चासत्र वा मार्गदर्शपर सत्रांमधील सहभाग इत्यादींचा आपापल्या गरजेनुरूप उपयोग केला जाऊ शकतो. या अभ्यासापोटी केलेली वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक पुढे दीर्घकालीन स्वरूपात लाभदायी ठरते.

वर नमूद केलेल्या अभ्यास व पूर्वतयारीनंतर निवृत्ती सैनिकांनी आयुष्याच्या मध्यावर उद्यमी होताना खालील मुद्द्यांचा विचार करणे अत्यावश्यक असते. यासाठी प्रस्तावित व्यवसायसंधीचा चिकित्सकपणे अभ्यास करणे, विचारपूर्वक निर्णय घेणे, निर्णयाचा आधार केवळ भावनांवर अवलंबून न ठेवता व्यवहार्यतेवर आधारित ठेवणे, व्यवसाय-व्यवहारात आपण प्रत्यक्ष कितपत सहभागी होऊ शकतो; अथवा सहभागी होणे आवश्यक आहे, याचा पडताळा घेणे, गुंतवणुकीचा अभ्यासपूर्ण विचार, व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्याची तयारी, पर्यायांची चाचपणी व मुख्य म्हणजे, आपले व्यक्तिमत्त्व आणि व्यवहार यांची प्रत्यक्ष व व्यवहार्य सांगड घालणे, यावर समर्पक विचार करावा हे महत्त्वाचे.

नव्या संदर्भात व उद्योजक म्हणून आपली कारकीर्द सुरू करताना आपला व व्यवसायाचा ताळमेळ, परस्पर उपयुक्तता व तयारी, सेवावृत्तीसह काम करण्याची मानसिकता, व्यावसायिक कामासाठी सर्वकाही करण्याची तयारी, पुढाकाराला परिश्रमाची साथ, उद्देश व उद्दिष्ट याबद्दल स्पष्टता, आर्थिक गुंतवणूक व परताव्याबद्दलची परिपूर्ण कल्पना, व्यवसायातील आव्हाने, अडथळे आणि संधी इत्यादीची संपूर्ण माहिती करून त्यानुरूप काम करणे नेहमीच आवश्यक असते.

निवृत्त सैनिकांना व्यवसायाशी संबंधित व्यवस्थापन विषयाची माहिती असतेच असे नाही. मात्र, त्यांनी विख्यात व्यवस्थापनतज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी सांगितलेल्या पुढील काही मार्गदर्शक तत्वांचा जरुर विचार करावा. यामध्ये कोणत्याही उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हायचे असल्यास, विक्री-मार्केटिंग, व्यवसायातील नावीण्य, कर्मचारी-संसाधन, आर्थिक पाठबळ, व्यवसाय प्रक्रियेसाठी आवश्यक साधन-सामग्री, उद्योग प्रक्रिया सेवेेतील उत्पादकता, उद्योगाशी निगडित समाजाची जाणीव व सरतेशेवटी उद्योग व्यवसायातून अपेक्षित वा होणारा फायदा इत्यादी बाबींचा विचार करुन उद्योग-व्यवसाय करणे फायदेशीर ठरते.

याशिवाय प्रत्यक्ष उद्योग-व्यवसायाला सुरुवात करताना माजी सैनिकांनीसुद्धा स्वतःच्या संदर्भात प्रामाणिक आत्मपरीक्षण करणे फायदेशीर ठरते. यामध्ये मुख्यतः उद्योग सुरू करणारा व्यवसायिक म्हणून आपले तटस्थ मूल्यमापन, व्यवसाय संकल्पनेबद्दल माहितीपूर्ण स्पष्टता, व्यवसायाचा व्यवहारिक अभ्यास, वेळेत विचार, सुरुवात, व्यवसाय नियोजन व तयारी, व्यवसाय संकल्पनेची सुयोग्य अंमलबजावणी, व्यवसायाची विशिष्ट कालावधीनंतर पडताळणी व उद्योग-व्यवसायाच्या ग्राहकांच्या अपेक्षा आणि फेरआखणी इ. सांगता येतील.

सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे, माजी सैनिकांजवळ त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची क्षमता-पात्रता यांच्यासह स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान व कौशल्य असतेच. त्याला जर व्यवसायाप्रति निष्ठा व अभिमान, कौशल्याला कर्तृत्वाची साथ, स्वयंप्रेरणेसह काम करण्याची तयारी, पद्धतशीर व सातत्यपूर्ण काम करणे या प्रमुख गुणवैशिष्ट्यांची जोड दिल्यास, मध्यम व लघु उद्योग व उद्योजक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येईल. शिवाय, या महत्त्वपूर्ण उद्योगक्षेत्राला शिस्त आणि जिद्दीची अनुकरणीय साथ मिळाल्यास या क्षेत्राला शिस्तीसह यशाची साथही निश्चितपणे मिळेल.

दत्तात्रय आंबुलकर, एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0