जगभरात कोविड-१९वरची लस विकसित केली जात आहे. तर बुधवारी फायझर-बायोनटेकने आपली लस अंतिम चाचणीत ९५ टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे. तीनचार दिवसांपूर
जगभरात कोविड-१९वरची लस विकसित केली जात आहे. तर बुधवारी फायझर-बायोनटेकने आपली लस अंतिम चाचणीत ९५ टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे. तीनचार दिवसांपूर्वी मॉडर्ना या अमेरिकी कंपनीने त्यांची लस ९४.५ टक्के गुणकारी असल्याचा दावा केला होता. पण या दोन्ही लसींची साठवण अत्यंत कमी तापमानात करावी लागणार असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
लस साठवणुकीसाठी शीतगृहांची कमतरता ही भारताच्या संदर्भात महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे फायझर व मॉडर्नाच्या लसींचा उपयोग भारताला होण्याची शक्यता कमी असल्याचे मत प्रसिद्ध लस शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
फायझर कंपनीच्या लसीची साठवणूक उणे ७० अंश सेल्सियस ते उणे ८० अंश सेल्सियस तापमानात करावी लागणार आहे व या कंपनीची लस २४ ते ४८ तासात वापरावी लागणार आहे. तर मॉडर्नाची लस ९४.५ टक्के गुणकारी असून ती उणे २० अंश सेल्सियस तापमानात साठवणूक करता येते व ही लस ३० दिवसात वापरता येऊ शकते. मॉडर्नाच्या लसीची किंमत ३७.५० डॉलर इतकी आहे, ही किंमत भारतासाठी अत्यंत महाग असल्याचे डॉ. कांग यांचे म्हणणे आहे. ही लस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, भारताने आजपर्यंत कोणत्याही लसीसाठी ३ डॉलरपेक्षा अधिक रक्कम मोजली नव्हती. पण भारताची बाजारपेठ मोठी असल्याने या लसीची किंमत कमी होऊ शकते, अशी शक्यता त्या व्यक्त करतात. पण या दोन कंपन्यांच्या लसीपेक्षा ऑक्सफोर्ड-अस्ट्राझेन्काची लस भारतासाठी फायद्याची ठरू शकते असे त्यांचे मत आहे. कारण या लसीची साठवणूक उणे २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात केली जाऊ शकते व ही लस सर्व सामान्यांकडे असलेल्या साध्या फ्रीजमध्ये होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
सुमारे ५० मिनिटांच्या मुलाखतीत कांग यांनी लस व भारताची आरोग्य व्यवस्था यावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. कांग यांनी कॉलरा व टायफॉइडवर विकसित केली जाणारी रोटाव्हायरस लस विकसित करण्याच्या टीममध्ये काम केले होते. त्या रॉयल सोसायटीच्या फेलो असून वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील वेलकम ट्रस्ट रिसर्च लॅबोरेटरिजमध्ये त्या अध्यापनाचे काम करतात.
कोरोना लसीबाबत त्या म्हणतात, भारताने लसवितरणासंदर्भात एक व्यापक योजना तयार केली पाहिजे. वयोगटाला केंद्रीत धरून लस कार्यक्रम आखला गेला पाहिजे. पण भारत सरकारने चार गट निश्चित केले असून त्यांना केंद्रीत धरून लस कार्यक्रम आखला आहे. उतरत्या क्रमांनुसार हे चार गट आरोग्य सेवक, पोलिस, लष्कर व शरीरात अनेक व्याधी असलेले ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक व ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक असे आहेत. पण हे गट निश्चित करताना अनेक समस्या आहेत. उदा. भारतात आरोग्य सेवक घटकांपैकी काही जण थेट कोविड रुग्णांच्या संपर्कात आहेत तर काही जण कोविड संदर्भातल्या सेवांवर काम करत आहेत. त्यांना आपण लस कार्यक्रमात वेगळे करणार आहोत का, हा प्रश्न आहे. जर असेल तर कोणत्या आधारावर? खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टर व नर्स असा भेद करता येऊ शकतो. पण या दोन्ही घटकांवर बरोबरीनेच उपचार केले जाणार का?
डॉ. कांग यांनी देशातील सद्य कोरोनास्थितीविषयी व दिवाळीनंतर हिवाळ्यातील स्थितीविषयी माहिती दिली. त्या म्हणतात, भारतातील कोरोनाची लाट निश्चित खाली येत आहे पण नागरिकांच्या सामाजिक वर्तनावर कोरोनाची दुसरी लाट येईल की नाही, हे ठरणार आहे. कोरडा हिवाळा, मास्क न घालण्याची मानसिकता व शारिरीक अंतर न पाळल्यास भारतात कोरोनाची दुसरी लाट सहजशक्य आहे. पण ही लाट पूर्वीपेक्षा भयंकर असेल असे वाटत नाही.
COMMENTS