डुफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

डुफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

जगभर अजूनही अब्जावधी माणसं गरीब आहेत, अशिक्षित आहेत, योग्य आरोग्यापासून वंचित आहेत. जगभरची सरकारं गरीबी आणि त्यातून उद्भवलेले त्रास नष्ट करण्यासाठी अब्जावधी खर्च करत आहेत.

नोटबंदी, जीएसटी व सरकारी आकडेवारीवर प्रश्न विचारणारे दाम्पत्य
अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल
नोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता

इस्थर डुफ्लो आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर भारतात प्रतिक्रियांच्या लाटा आल्या. डावे आणि उजवे, सेक्युलर आणि देवपरमार्थवादी, अशा दोन्ही गटातल्या लोकांनी डुफ्लो-बॅनर्जीवर झोड उठवली. तिकडं बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्रपणे एक चर्चाभेट झाली.

डुफ्लो आणि बॅनर्जी यांच्यावर  झालेली टीका अनाठायी आणि अज्ञानमूलक आहे.

डुफ्लो आणि बॅनर्जी यांनी  गरीबी निर्मूलन या विषयाचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास त्यांनी इथियोपिया, केनया, रवांडा, वियेतनाम, भारत इत्यादी ठिकाणी प्रयोग आणि निरीक्षणं करून पार पाडला आहे. भारतात त्यांनी बंगाल, राजस्थान, आंध्र, हिमाचल इत्यादी ठिकाणी दोनशेपेक्षा अधिक कार्यक्रमांचा अभ्यास केला.

डुफ्लो-बॅनर्जी यांनी रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायल या पद्धतीचा वापर केला. या पद्धतीबद्दल अर्थशास्त्रींमधे मतभेद आहेत. डुफ्लो-बॅनर्जीनी मतभेद लक्षात घेऊनही ही पद्धत निवडली. गरीबी निर्मूलनाच्या कार्यक्रमाचं फलित तपासणं हा त्यांचा उद्देश स्पष्ट होता.  योजना कोणतीही असो, तिचं फळ मिळालं नाही, तिच्यामुळं माणसाचा उपभोग-आरोग्य-शिक्षण यावर परिणाम झाला नाही तर ती योजना काय कामाची असा त्यांचा प्रश्न आहे. नाना प्रकारच्या योजना  अमलात आणल्या तिथल्या लोकांच्या जीवनाचा अभ्यास करून बॅनर्जी यांनी त्यांचा अभ्यास आणि सिद्धांत मांडला आहे. गरीबी निर्मुलनाच्या प्रचलित असलेल्या सिद्धांतांपेक्षा डुफ्लो-बॅनर्जी सिद्धांत वेगळा आहे.तो सिद्धांत  प्रचलित सिद्धांतांच्या विरोधात नाही, त्या सिद्धांतांचं अपुरेपण सांगणारा, गरीबी निर्मुलन कार्यक्रमांचा अमल वेगळ्या पद्धतीनं करता येण्यासारखा आहे हे सांगणारा आहे.

डुफ्लो-बॅनर्जी सिद्धांताचं वर्णन एका वाक्यात करता येईल- विकास ही गोष्ट अभ्यासपूर्ण अनेक छोट्या नियोजित पावलांनी समाजात असलेल्या प्रस्थापित आर्थिक धोरणांची अमलबजावणी करून  शक्य होईल.

गरीबी निर्मूलनाचे तीन प्रमुख विचार प्रवाह दिसतात. एक प्रवाह जेफ्रे सॅक्स यांचा. बिग पुश असं त्यांच्या सिद्धांताचं नाव. गरीबी हा सापळा आहे. मोठ्या प्रमाणावर पैसे ओतून मोठ्या योजनांद्वारे विकास होईल आणि तो विकास तळापर्यंत झिरपत जाईल असा काहीसा सॅक्स यांचा सिद्धांत.या सिद्धांताच्या आधारे गरीब देशांमधे श्रीमंत देशांनी मदत ओतली.

विल्यम ईस्टरली यांचा सिद्धांत नेमका दुसऱ्या टोकाचा. पैसे ओतून, वरून होणाऱ्या प्रयत्नातून गरीबी दूर होणार नाही, उलट त्यामुळं गरीबी वाढेलच.  तळात, विकेंद्रीत, लोकशाही पद्धतीनं होणारे प्रयत्न आणि मार्केट हे दोन घटक गरीबी नाहिशी करतील असा त्यांचा सिद्धांत. नियोजन न करणं हेच नियोजन अशी त्यांची घोषणा.

मोठा रेटा आणि विकेंद्रीत प्रयत्न या दोन टोकांपासून काहीसा वेगळा सिद्धांत अमर्त्य सेन यांनी मांडला. लोकांना त्यांच्या क्षमतेची जाणीव नसते. शिक्षणातून ती जाणीव करून दिली आणि आरोग्याची व्यवस्था केली तर गरीबी निर्मूलन शक्य आहे असं सेन यांनी मांडलं.

जगभरचे देश वरील तीन पैकी एकादा विचार किंवा तीनही विचारांचं मिश्रण असणारी धोरणं अमलात आणतात. देशोदेशींची सरकारं आपापल्या देशात त्यासाठी साधनं खर्च करतात आणि श्रीमंत देश इतर देशांमधे त्यासाठी साधनं दान करतात किंवा कर्जाऊ देतात. साधनं म्हणजे रिसोर्सेस.

डुफ्लो-बॅनर्जीनी वरील तीनही प्रकारच्या कार्यक्रमांचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्ष असा की विकास ही कुठल्याही एका ढोबळ धोरणाची अमलबजावणी नसते तर अनेक छोटछोट्या पावलांची विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेली साखळी म्हणजे विकास असतो. गडबड अशी होते की धोरणांचा अभ्यास झालेला नसतो, कार्यक्रमांची जोडणी नीट झालेली नसते, संबंधित लोकांकडं योग्य माहिती पोचलेली नसते, त्यांच्या श्रद्धा आणि विश्वास यात योग्य बदल केलेले नसतात. एक निरीक्षण असं की उत्पन्नाची खात्री नसेल तर माणसं आपला विकास योग्य रीतीनं साधू शकत नाहीत, कर्ज या साधनाचा वापर ते करू शकत नाहीत.

हेतू कितीही चांगला असला, साधनंही भरपूर योजलेली असली तरी गरीबी जात नाही.

डुफ्लो-बानर्जीनी केलेले अभ्यास महत्वाचे आहेत. एक अभ्यास भारतातलाच. अतिसाराची लागण झाल्यानंतर मुलाला जलसंजीवनी हा घरगुती आणि स्वस्त उपाय प्रभावी ठरत असतो. तरीही गरीब माणसं डॉक्टरकडं जातात, पैसे खर्च करतात, कधी कधी त्यातून घात होतो. लोकांना अतिसाराचा धोका कळत असतो, उपाय केले पाहिजेत हेही कळत असतं आणि उपायांसाठी लोकांकडं पैसाही असतो. तरीही लोकं अयोग्य खर्चिक वाटेकडं जातात, स्वतःचं नुकसान करून घेतात. तेव्हां लोकांना योग्य माहिती देणं, त्याना ज्ञानी करणं, त्याच्या श्रद्धात बदल घडवणं या गोष्टी न होणं हा एक महत्वाचा घटक.

एक अभ्यास केनयातला. खतं वापरली तर मक्याचं उत्पन्न वाढतं हे शेतकऱ्याला माहित होतं. सरकारनं फुकट, स्वस्त खतं वाटली. शेतकऱ्यानं एक मोसम ती वापरली. पण नंतर खतांचा वापर थांबला,   शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारली नाही. कारण? शेतकऱ्यानं खतांचा वापर केला. खळं झालं. उत्पन्न आलं. झालेलं उत्पन्न शेतकऱ्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यातच खर्च झालं. पुढल्या पिकाची वेळ झाली तेव्हां पुन्हा खत विकत घेण्यासाठी त्याच्याकडं पैसे उरले नव्हते. खतांची मात्रा निश्चित वेळी देता यावी, त्यासाठी खत उपलब्ध असावं आणि ते वापरण्याची क्षमता शेतकऱ्याकडं असावी. पण ते शेतकऱ्याची गरीबी आणि एकूण सरकारी योजनेची रचना यामुळं शक्य झालं नाही. खतं फुकट किंवा स्वस्तात देणं यातून शेतकरी समृद्ध होत नाही. शेतकऱ्याला जगण्याची खात्री असणं आणि उत्पन्न व गुंतवणूक याचा तोल त्याला सांभाळता येणं आवश्यक असतं. मर्यादित जमिनीवर थोडीच खतं वापरून उत्पन्न वाढवावं आणि नंतर त्या उत्पन्नाचा थोडा भाग पुढल्या खतांसाठी राखून ठेवावा अशी उपाय योजना त्याच्याकडून होणं आवश्यक होतं. आणि अर्थातच शेतकऱ्याला जगण्याची खात्री असायला हवी होती. खतं देण्याच्या कार्यक्रमावर पैसे खर्च झाले पण अपेक्षित परिणाम साधता आला नाही.

आणखी एक अभ्यास हैदराबादमधला. अनेक कंपन्या आणि नसरकारी संस्थांनी लोकांना छोटी कर्जं (मायक्रोफायनान्स) दिली. या कर्जातून काहीनी टीव्ही घेतले, काहीनी बाईक खरेदी केल्या, काहीनी उत्पन्नाची साधनं तयार करण्यासाठी पैसे गुंतवले. (एकानं एक घर बांधायला घेतलं. त्या घरातून भाड्याच्या रुपात उत्पन्न मिळेल अशी कल्पना.) कर्ज घेतलेल्या लोकांवर त्याचा काय परिणाम झाला? त्यांची गरीबी दूर झाली नाही, स्त्रीपुरूष विषमता कमी झाली नाही, त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली नाही, त्यांचा उपभोग (कंझम्शन) सुधारला नाही. कर्ज देण्याची योजना हा एक चमत्कार ठरला, प्रचंड यशस्वी ठरला अशी जाहिरात झाली पण गरीबी निर्मुलन झालं नाही.

एक अभ्यास इथियोपियातला. कॉफी उत्पादक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं यासाठी त्याला जमीनसुधारणेचं (मल्चिंग) तंत्र शिकवण्यात आलं. शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं. पण उत्पादन झालेल्या कॉफीचा दर्जा आणि त्यामुळं किमत ठरवणारी यंत्रणा घोटाळ्याची होती. कॉफीला योग्य भाव मिळाला नाही. शेतकऱ्याकडून कॉफीच्या बिया गोळा करणाऱ्या सहकारी संस्थेला योग्य भाव नाकारला गेला. सहकारी संस्थेनं मिळालेले अपुरे पैसे स्वतःकडंच ठेवले आणि शेतकऱ्याला पैसे देण्यात चालढकल केली. शेतकरी जमिनीची सुधारणा करेनासा झाला. साराच कार्यक्रम कोसळला. बाजारातल्या घोटाळ्यामुळं एक चांगली योजना कोसळली.

डुफ्लो बॅनर्जी यांच्या अभ्यासाचं वैशिष्ट्यं असं की त्यांनी जगभरातल्या गरीबी निर्मूलन कार्यक्रमांचा अभ्यास करून त्या योजना फेल कां गेल्या याची कारणं मांडली. सॅक्स, एस्थर,मायक्रो फायनान्स या कार्यक्रमांवर डुफ्लो-बॅनर्जी टीका करत नाहीत किवा ते कार्यक्रम चुकीचे आहेत असं म्हणत नाहीत. कार्यक्रम प्रभावी का ठरले नाहीत याचा अभ्यास ते करतात.

त्यातूनच त्यांचा सिद्धांत तयार झाला. कोणत्याही गरीबी निर्मूलन कार्यक्रमाचं मूल्यमापन झालं पाहिजे, जर तो कार्यक्रम गरीबी दूर करू शकत नसेल तर तो उपयुक्त नाही असं ठरवलं पाहिजे आणि त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा त्यांचा सिद्धांत.

खरं म्हणजे या सिद्धांतावर राग धरायचं काहीच कारण नाही. गरीबी कार्यक्रमाची आखणी करत असाना डुफ्लो-बॅनर्जी सिद्धांताचा उपयोग होऊ शकतो.

म्हटलं तर डुफ्लो-बॅनर्जी यांच्या गरीबी निर्मुलन विचारात   एक गोष्ट राहून गेलेली दिसते.  समाजात राजकीय सत्ता कशा प्रकारे वागते, तिथलं राजकारण कसं असतं यातही गरीबी निर्मुलन कार्यक्रमाचं अपयश दडलेलं असतं. याचा अभ्यास डुफ्लो-बॅनर्जी यांच्या सिद्धांतात राहून गेला आहे. एकादा राजकीय पक्ष सत्ता स्थापन करत असतो. सत्तेत जाण्यासाठी राजकीय पक्षांना नाना भानगडी कराव्या लागतात. सत्तेच्या शिडीवर वरच्या पायरीवर पोचणारे पुढारी भ्रष्ट असतात, त्याना सत्ता महत्वाची असते, कार्यक्रम वगैरे गोष्टी कळत नसतात असं आढळून येतंय. जगभर. त्यामुळंही कार्यक्रमाची सदोष आखणी होते, सदोष अमलबजावणी होत असते.

डुफ्लो-बॅनर्जी यांनी कशाकशाचा अभ्यास करायचा? दुसऱ्या कोणी तरी गरीबी निर्मूलन आणि सत्ता-राजकारण यातील संबंधांचा अभ्यास कां करू नये?

गरीबी निर्मूलनासाठी सिद्धांत आवश्यक आहे. तो सिद्धांत अमलात आणण्यासाठी विचाराभ्यासपूर्वक योजलेल्या अनेक छोट्या पावलांची आवश्यकता आहे. डुफ्लो-बॅनर्जीमुळं गरीबी निर्मूलन विचार इथवर पोचला. गरीबी नष्ट होण्यातला  एक सुटलेला दुवा म्हणजे गरीबी निर्मूलनाच्या आड येणाऱ्या  राजकारण आणि सत्ता यांचा अभ्यास. हा तिसरा घटक सिद्ध झाला तर गरीबी दूर होण्याची शक्यता वाढेल.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

……

‘Poor Economics: rethinking poverty & the ways to end it’ – Abhijit Banerjee, Esther Duflo

डुफ्लो आणि बॅनर्जी यांना गरीबी निर्मूलनाच्या कार्यक्रमाच्या सिद्धांताला अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. या पुस्तकात त्यांचा सिद्धांत सविस्तर मांडण्यात आला आहे. दोघांनीही केलेल्या अभ्यासांचं सविस्तर चित्रण या पुस्तकात आहे. हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकातला अभ्यास आणि सिद्धांत याच्या आधारे त्याना नोबेल मिळालं. त्यानंतर त्यांनी अभ्यासाची पद्धत सांगणारं Handbook of Field Experiments हे पुस्तक २०१७ साली प्रसिद्ध केलं. त्यानंतर नुकतंच म्हणजे २०१९ साली त्यांचं Good Economics for Hard Times: Better Answers to Our Biggest Problems हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. डुफ्लो-बॅनर्जी यांच्या वैचारिक पसाऱ्याची कल्पना या पुस्तकांमधून येते. परंतू गरीबी निर्मुलनाचा सिद्धांत मात्र त्यांच्या उपरोक्त पुस्तकातून सविस्तर वाचायला मिळतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0