इथियोपियातील यादवी

इथियोपियातील यादवी

टिग्रे-इथियोपिया प्रकरण. ही यादवी जगात इतर देशांतही आकार घेताना दिसतेय. समाज घडणीत शेकडो वर्षांत तयार झालेल्या फटी आता रुंदावत चालल्या आहेत. राज्यवस्थेची आधुनिक रचना या फटी सांभाळू शकत नाहीये. राजकारण करणारी माणसं आणि खुद्द जनता अशा दोघांनाही या स्थितीतून वाट सापडत नाहीये.

‘विद्याताई ‘साऱ्याजणीं’च्या कायम बरोबर असतील’
कप्पन यांची हमी घेण्यासाठी उभ्या राहिल्या ७९ वर्षीय शिक्षणतज्ज्ञ
स्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी

इथियोपियात आठ प्रांत किंवा राज्यं आहेत. इथियोपियात ओरोमो, अम्हारा, सोमाली, टिग्रे इत्यादी आठ प्रमुख संस्कृती आहेत. प्रत्येक संस्कृतीची एक स्वतंत्र  भाषा आहे, अनेक बोली भाषा आहेत. तीन ख्रिस्ती पंथ, दोन इस्लामी पंथ आणि अनेक स्थानिक उपासनापद्धती आहेत. शेकडो वर्ष अशा अनेक ओळखीचं मिश्रण असलेल्या ओळखी, इथियोपिया या भूप्रदेशात, अनेक राज्यं आणि साम्राज्यांचा भाग म्हणून, एकत्र नांदत आहेत.

।।

टिग्रे

इथियोपियातला एक प्रांत, एक राज्य. टिग्रे. सध्या तिथं लाखो मुलं कुपोषित आहेत, लाखो माणसं उपाशी आणि तहानलेली आहेत. त्यांना अन्न, पाणी,औषधं उपलब्ध होत नाहीयेत. वस्तू बाजारातून गायब आहेत, दुकानं फकाट मोकळी आहेत. लोकांनी किडूक मिडूक विकून टाकलंय. खिसे आणि पोटं रिकामी आहेत.

अशीच अवस्था १९७०मधे होती, १९८४ सालीही होती.

दुष्काळ आहे पण सरकारनं जाहीर केलेला नाही. म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे पण सरकार दुष्काळ जाहीर  करत नाहीये. दुष्काळ जाहीर झाला तर तिथल्या लोकांना मदत देऊ  पहाणाऱ्या बाहेरच्या संस्थांना तिथं प्रवेश द्यावा  लागेल. रेड क्रॉस, युनायटेड नेशन्स, युरोपीय संस्था तिथं उपासमारीनं ग्रासलेल्या मुला माणसांना मदत द्यायला गेल्या तर पत्रकारही त्यांच्यासोबत जातील. मग तिथल्या स्थितीचा बोभाटा होईल. सरकारला ते नकोय.

सरकारनं जाहीर केलंय की टिग्रे हा प्रांत टिग्रे लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. त्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्यासाठी इथियोपियन सरकारनं सैन्य पाठवलंय, त्या भागाची कोंडी केलीय. टिग्रेमधे इंटरनेट बंद आहे, संवादाची साधनं मूक झालीत, टेलेफोन बंद आहे, पेपर काढायला परवानगी नाही. तिथून तुरळक बातम्या पाझरतात, धाडसी पत्रकार आणि फोटोग्राफर माहिती पाठवतात, त्यावरून अंदाज बांधायचा.

उपासमारीबरोबरच इतर संकटंही आहेत.

इथियोपियन सरकारचे सैनिक टिग्रेमधे हाहाकार माजवत आहेत. वस्त्या जाळत आहेत. घरं,दुकानं,बाजार, शाळा उध्वस्थ करत आहेत. घाऊक प्रमाणावर माणसं मारली जात आहेत. स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. नरसंहार आणि सामुहीक अत्याचाराच्या शेकडो घटना मानवाधिकार जपणाऱ्या संघटनेनं नोंदल्या आहेत.

हज्जारो कुटुंबं बेघर झालीत. ती छावण्यात दाखल झालीत. पाचेक हजारांची छावणी असते आणि फक्त दहा संडास असतात. माणसं एका खोलीत पन्नास अशी गिचडी करून भरण्यात आलीत. त्या ठिकाणी ना वीज, ना पाणी, ना सांडपाण्याची व्यवस्था.

उपासमार, लढाई. इथियोपियन सरकारचे सैनिक विरुद्ध स्थानिक टिग्रे सरकारचं सैन्य अशी हाणामारी चाललीय. अगदी अलीकडंच टिग्रेच्या सैन्यानं राजधानी मेकेले ताब्यात घेतलीय. पण इतरत्र दोन सैन्यांमधे लढाई चाललीय.

धाडसी पत्रकार टिग्रेमधे फिरले. त्यांना जागोजागी प्रेतं सडताना दिसली. टिग्रे आणि इथियोपिया अशा दोन्ही बाजूंनी  लढणाऱ्यांची प्रेतं. तरूण प्रेतं. युनिफॉर्म वगैरे नाही. त्यांच्या खिशात सापडतात त्यांची ओळखपत्रं. त्यात लिहिलेलं असतं की ती कुठल्या कॉलेजात वा शाळेत शिकत होती. कित्येक ठिकाणी त्यांची वह्या पुस्तकंही सापडतात. वह्या पुस्तकं घेऊन ही मुलं लढाया करत होती? कळत नाही.

हे सारं गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२० सालच्या नव्हेंबर महिन्यापासून घडतय.

समजून घेण्यासाठी मागं जावं लागेल.

२०१८ पर्यंत इथियोपियामधे संयुक्त आघाडीचं सरकार होतं. त्या आघाडीत टिग्रेमधल्या टिग्रेप्रांतीय पक्षाचं वर्चस्व होतं. २०२० साली राज्य आणि केंद्रीय पातळीवरच्या निवडणुका व्हायच्या होत्या. केंद्रातल्या सरकारचे पंतप्रधान अबी अहमद यांनी कोविडचं कारण सांगून निवडणुका पुढं ढकलल्या.

टिग्रेतल्या लोकांना निवडणुका हव्या होत्या. टिग्रेसह इतर प्रांतातल्याही अनेकांना निवडणुका हव्या होत्या. कारण त्यांना अहमद यांचा राज्यकारभार मंजूर नव्हता, अहमद यांची हडेलहप्पी पसंत नव्हती. अहमद यांना विरोध, मतभेद सहन होत नसे. विरोध करणारी माणसं, निवडणुकीतले प्रतिस्पर्धी यांना ते तुरुंगात ढकलत असत. अहमद हा माणूस नको असं म्हणत लोक निदर्शनं करत, मिरवणुका काढत, अहमद पोलिसी बळ वापरून विरोधकांना बडवत.

तसा अहमद हा बरा माणूस. २०१८ साली पंतप्रधान झाल्यावर त्यानं शेजारच्या एरिट्रिया या देशाशी सलोखा सुरु केला. एरिट्रिया आणि इथियोपियातलं वितुष्ट अहमद यांनी दूर सारलं. एरिट्रिया हे इथियोपियातलंच एक राज्य  १९९८ साली फुटून निघून त्याचा एक स्वतंत्र देश झाला होता. इथियोपियातली अंतर्गत राजकीय व सामाजिक धुसफूस दूर सारून सर्वाना एकत्र यायचं आव्हान अहमद यांनी केलं होतं. सुदान,इजिप्त या शेजारच्या देशांचा रोष पत्करून एक  मोठं धरण अहमद यांनी नाईल नदीवर योजलं होतं. या धरणामुळं इथियोपियातल्या लाखो एकरांना पाणी मिळणार होतं.

अहमद यांचे प्रयत्न जगानं, आफ्रिकेनं वाखाणले. २०१९ साली अहमद यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं. पण त्याच वेळी त्यांचं हुकूमशाही वर्तन मात्र टिग्रेमधली लोकं आणि इतर प्रातांतल्या बऱ्याच लोकांना मान्य  नव्हतं.

टिग्रेतल्या लिबरेशन फ्रंट या संघटनेनं अहमद यांचा निर्णय अमान्य केला, आपल्या राज्यात निवडणुका घेऊन टाकल्या. ९० टक्के मतं मिळवून फ्रंट राज्यातलं सरकार चालवू लागली.

पंतप्रधान अहमद खवळले. त्यांनी टिग्रेची अडवाअडव सुरु केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु झाला.

या संघर्षाला एक ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे.१९९१ मधे इथियोपियातलं मेंजिस्टू सरकार उलथवून पाडून नवं सरकार तयार करण्यात टिग्रेचा वाटा होता. लिबरेशन फ्रंट ही संघटना त्या वेळी लष्करी संघटना झाली होती. १९९१ प्रमाणंच २०१९मधेही टिग्रे केंद्र सरकारविरोधात बंड करेल अशी भीती पंतप्रधान अहमद यांना वाटली. अहमद यांनी सैन्याची जमवाजमव करायला सुरवात केली. आपल्यावर हल्ला होणार असं टिग्रेला वाटलं, तसा अंदाज बांधून टिग्रेतल्या लिबरेशन फ्रंटच्या लष्करानं इथियोपियन लष्कराच्या स्थानिक केंद्रावर हल्ला करून ते ताब्यात घेतलं.

अर्थातच हे बंड होतं.

अहमद यांनी फ्रंटला दहशतवादी लेबल चिकटवून टिग्रेवर हल्ला केला. ही घटना २०२० च्या नव्हेंबर महिन्यातली. तिथून संघर्ष आणि उपासमारीला सुरवात झाली.

टिग्रेमधे यादवी चाललीय, सिविल वॉर चाललंय. टिग्रे हा प्रांत आणि इथियोपिया हा देश यांच्यातले संबंध बिघडलेत. १९९८ साली इरिट्रिया या इथियोपियातल्याच प्रांताचे आणि इथियोपियाचे संबंध बिघडले, एरिट्रिया फुटून निघाला, एरिट्रिया हा स्वतंत्र देश तयार झाला. एरिट्रिया फुटून निघाला कारण इथियोपियातलं मेंजिस्टू यांची कम्युनिष्ट राजवट एरिट्रियाला पसंत नव्हती.

इथियोपियात साताठ संस्कृती, साताठ भाषा, चारपाच धर्म आहेत. शिवाय गावोगाव बोली भाषा आहेत, पंथ आहेत, चालीरीती आणि परंपरा आहेत. मोठे साताठ प्रमुख समाजगट आणि त्यात पुन्हा उपसमाजगट अशी इथियोपियाची रचना आहे. समाजगट आणि उपसमाजगट शेकडो वर्षं एकाद्या राज्याचा किंवा साम्राज्याचा भाग असत. असं म्हणूया की गर्दी केल्यागत ते एकाद्या राज्यकर्त्याच्या अधिपत्याखाली जगत असत, आपसातले दुरावे जपत जपत. इथियोपिया ही राजकीय ओळख आणि पोटात आपापल्या स्वतंत्र ओळखी अशा रीतीनं इथियोपियातली माणसं जगत होती.

समाजगट आणि उपसमाजगट यांच्या अस्मिता अलिकडं अधिकाधीक तीव्र होत चालल्या आहेत. प्रत्येक गटाला राजकीय स्वातंत्र्य हवंसं वाटू लागलंय. लोकशाही पद्धतीनं तयार झालेली सरकारं असोत की इतर वाटांनी तयार झालेली सरकारं असोत, तीव्र ओळखीनं पछाडलेल्या समाजगटांचं समाधान करणं सरकारांना जमत नाहीये, त्यांना एकत्र ठेवणं जमत नाहीये.

फार फार ठिकाणी असंतोष उफाळून येताना दिसतोय.

म्यानमारमधेही किती तरी समाजगट आणि किती तरी उपसमाजगट आहेत. प्रत्येक गटाला वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय. प्रत्येक गटाला वाटतं की सत्ता आपल्या हाती आली तरच आपल्या गटाचा विकास होणार आहे. लष्कर या हडेलहप्पी संघटनेनं या गटांना एकत्र ठेवलं. पण आतली धुसफूस शिल्लकच होती. रोहिंग्या या गटावर, म्यानमारचं लष्कर आणि म्यानमारमधला बहुसंख्य समाजगट यांनी हल्ला केला. रोहिंग्यांचा नरसंहार केला.

शांततेचं नोबेल प्राप्त झालेल्या आंग सॉन सू की यांनी रोहिंग्या नरसंहाराकडं काणाडोळा केला, तो थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

अन्यथा ज्यांचं वर्णन भले अशा शब्दात करता येईल असे राज्यकर्तेही कसं विसंगत वर्तन करतात याचं उदाहरण म्हणून सू की आणि अहमद यांच्याकडं बोट दाखवता येईल. अन्यथा उदारमती, स्वातंत्र्यप्रेमी आणि मानवप्रेमी असणाऱ्या सू की आणि अहमद हडेलहप्पी करतात, हटवादी होतात, इतरांचं ऐकून घ्यायला तयार होत नाहीत हे वर्तन बुचकळ्यात पाडणारं आहे.

टिग्रे-इथियोपिया प्रकरण ही यादवी जगात इतर देशांतही आकार घेताना दिसतेय.

समाज घडणीत शेकडो वर्षांत तयार झालेल्या फटी आता रुंदावत चालल्या आहेत. राज्यवस्थेची आधुनिक रचना या फटी सांभाळू शकत नाहीये. राजकारण करणारी माणसं आणि खुद्द जनता अशा दोघांनाही या स्थितीतून वाट सापडत नाहीये.

तातडीनं वाट निघाली नाही तर ही अनवस्था फार स्फोटक वळण घेईल.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0