‘जगात कोविड-मृतांची संख्या ३० लाखाहून अधिक’

‘जगात कोविड-मृतांची संख्या ३० लाखाहून अधिक’

संयुक्त राष्ट्रेः २०२० या वर्षांत जगभरात कोविड-१९ महासाथीत मरण पावलेल्यांची संख्या ३० लाखाहून अधिक असेल असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. वास्तविक हा आकडा अनेक देशांनी संघटनेला पुरवलेल्या माहितीनुसार १८ लाख इतका नोंद केला गेला होता.

आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या रुग्णांची नोंद कमी दाखवली गेली आहे. हे मृत्यू कोरोनामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात झालेले आहेत, असे म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या आरोग्य सांख्यिकी अहवालात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जगभरात कोरोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या ८ कोटी २० लाखाहून अधिक सांगितली होती, त्यात मृतांचा आकडा १८ लाखाहून अधिक दाखवला गेला होता. ही आकडेवारी प्रत्येक देशाने त्यांच्याकडे नोंद केल्यानुसार पाठवली होती.

पण २० मे २०२१च्या संघटनेच्या आरोग्य सांख्यिकी अहवालात कोविड-१९मुळे मरण पावलेल्यांची संख्या ३३ लाख सांगितली जात आहे. हा आकडा अन्य देशांनी या संघटनेला पाठवलेल्या आकडेवारीपेक्षा १२ लाखाहून अधिक आहे.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या माहिती व विश्लेषण विभागाच्या सहा.महानियंत्रक समीर अस्मा यांनी सांगितले की, लॅटिन अमेरिका व आशियामध्ये कोविड-१९ वेगाने फैलावल्याने या आजाराने मरणार्यांच्या संख्येत दुपटीने-तिपटीने वाढ झालेली आहे. या खंडांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ६० ते ८० लाखाच्या आसपास असल्याचे अस्मा यांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे सांख्यिकी विश्लेषक विल्यम मसेम्बुरी यांच्या मते रुग्णालयांची कमतरता, वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्याने  कोरोनाने मरण पावलेल्या अनेक रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळे आकडा वाढलेला आहे.

आज घडीला जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ कोटी ६१ लाख ५७ हजार ७१ असून मरण पावलेल्यांची संख्या ३४ लाख ४३ हजार ५४४ इतकी आहे.

मूळ बातमी

COMMENTS