हरिहरेश्वर जवळ यॉटमध्ये शस्त्रास्त्रे सापडल्याने खळबळ

हरिहरेश्वर जवळ यॉटमध्ये शस्त्रास्त्रे सापडल्याने खळबळ

नवी दिल्लीः महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर किनाऱ्याला १६ मीटर लांबीच्या एका यॉटमध्ये तीन एके-४७ रायफली आढळून आल्याने खळबळ उडाली. पण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शस्त्रास्त्रे सापडलेल्या यॉटचा दहशतवादाशी कोणताही संबंध नसल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे स्पष्ट केले. या यॉटचे नाव लेरिहान असून ती एका ऑस्ट्रेलियाच्या महिलेची असून या यॉटचा कप्तान तिचा नवरा जेम्स हार्बर्ट हा आहे.

ही यॉट चार मीटर रुंदीची असून ती जूनमध्ये मस्कतहून युरोपकडे रवाना झाली होती. पण या यॉटचे इंजिन भर समुद्रात खराब झाल्याने कप्तानने मदतीसाठी सहकार्य मागितले होते. हे सहकार्य द. कोरियाच्या एका युद्धनौकेने दिले व त्यांनी कप्तानला वाचवले. पण ही यॉट त्यांना वादळामुळे ताब्यात घेता आली नाही. त्यामुळे ती सोडून देण्यात आली. मात्र या यॉटवर एके-४७ रायफली कुठून आल्या याची माहिती घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काही स्थानिकांनी भरकटलेली यॉट श्रीवर्धनच्या समुद्रात पाहिली होती व सुरक्षा यंत्रणांना तसे कळवलेही होते.

तटरक्षक दलाने या यॉटपासून काहीही धोका नाही असेही स्पष्ट केले आहे. तर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सांगितले. सर्व अंगाने या प्रकरणाची चौकशी केली जात असून दहशतवादविरोधी पथकही या कामी कार्यरत झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ही यॉट ब्रिटनमध्ये नोंद केली असून २६ जूनला ती ओमानहून युरोपकडे जात असताना तांत्रिक बिघाड झाल्याचे या यॉटच्या कप्तानने संदेश पाठवले होते. या यॉटमधील एके-४७ रायफलींवरचे सीरियल नंबर ज्या व्यापाऱ्याकडून या रायफली घेतल्या त्याच्याशी संपर्क साधून शहानिशा करण्यात आली असून एका रायफलीचा सीरियल नंबर व्यापाऱ्याकडे सापडत नसल्याचे तटरक्षक दलाच्या सूत्राचे म्हणणे आहे. ही यॉट समुद्रात कमी वेगाने जात असल्याने त्यांना शस्त्रास्त्र नेण्याची परवानगी देण्यात आली होती पण नंतर कप्तानने वादळात यॉट सोडून देताना रायफली ताब्यात घेतल्या नव्हत्या. गेल्या दीड एक महिन्यातही यॉट भरकटत भारताच्या समुद्रहद्दीत किनारपट्टीला आली. तिची अवस्थाही खराब झाल्याचे तटरक्षक दलाचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS