विलुप्त ओमीद

विलुप्त ओमीद

१९९८ पासून तर सायबेरियन क्रौंचची केवळ एकच जोडी केवलादेवला येत असे. ती सुद्धा २००१-२००२च्या हिवाळ्यात परत गेली, ती कधीही न परतण्यासाठीच. केवलादेवने आपला कोहिनूर कायमचा गमावला.

पोलिसांसमोर युवकाचा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार
पराभव मानण्यास ट्रम्प यांचा नकार
‘रफाल’ आणि राजनय

१९९८ पासून तर सायबेरियन क्रौंचची केवळ एकच जोडी केवलादेवला येत असे. ती सुद्धा २००१-२००२च्या हिवाळ्यात परत गेली, ती कधीही न परतण्यासाठीच. केवलादेवने आपला कोहिनूर कायमचा गमावला.    

भरतपूर पक्षी अभयारण्य नावाने प्रसिद्ध असलेल्या केवलादेव घनाला १९८२ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. पुढे १९८५ साली त्याला युनेस्कोतर्फे जागतिक ‘नैसर्गिक’ वारसा स्थळ म्हणूनही गौरविण्यात आलं. पण सर्वप्रथम या उद्यानाची स्थापना केली ती भरतपूरचे महाराजा सूरज मल यांनी. इ.स. १८५० साली त्यांनी ही जागा शिकारीसाठी राखीव क्षेत्र म्हणून घोषित केली.

राजघराणं, ब्रिटिश आणि सशस्त्र बल सर्वांनाच हे स्थळ शिकारीसाठी सारखंच आवडतं असे. इथं एक दगडी फलक आहे ज्यावर १९०२ ते १९६४ दरम्यान कोणी किती शिकार केली याच्या नोंदी आहेत. यातील ‘सर्वोच्च स्कोर’ व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्डच्या नावावर आहे. त्यांनी २० नोव्हेंबर, १९१६ रोजी ५० बंदुकींनी ४,२०६ पाणपक्षी मारले! या फलकावरील शेवटची नोंद जनरल जे. एन. चौधरी यांच्या नावे असून त्यांनी २३ फेब्रुवारी, १९६४ रोजी फक्त अर्ध्या दिवसात ५१ बंदुकींनी ५५६ पाणपक्ष्यांची शिकार केली.

शिकारीच्या या कालखंडानंतर साधारण २००० सालापर्यंत सायबेरियन क्रौंच हीच केवलादेवची ओळख बनली होती. पक्षीप्रेमींमध्ये साइब्स या नावाने लोकप्रिय असलेले हे पक्षी उत्तर ध्रुवापासून साधारण २००  किलोमीटरवरील युरल पर्वतांच्या पूर्वेकडील आपल्या प्रजनन भूमीपासून मध्य आशिया आणि अफगाणिस्तानातील मैदानं, नद्या आणि उंच पर्वत ओलांडून दर हिवाळ्यात न चुकता केवलादेवला येत असत. या पक्ष्यांचे दोन प्रजननक्षम समूह वेगवेगळ्या तीन गटांमध्ये स्थलांतर करत – पूर्वी समूह पूर्वेकडील स्थलांतर मार्गाने चीनला तर पश्चिमी समूह मध्य आणि पश्चिमी स्थलांतर मार्गांनी अनुक्रमे भारत आणि इराणला येत असे.

बादशाह जहांगीरच्या दरबारातील कुशल चित्रकार उस्ताद मन्सूर यांनी काढलेलं सायबेरियन क्रौंचचं चित्र. 'स्टडी ऑफ अ व्हाईट क्रेन'

बादशाह जहांगीरच्या दरबारातील कुशल चित्रकार उस्ताद मन्सूर यांनी काढलेलं सायबेरियन क्रौंचचं चित्र. ‘स्टडी ऑफ अ व्हाईट क्रेन’

केवलादेवमधील सायबेरियन क्रौंचची सर्वात जुनी नोंद ही १७व्या शतकातलं एक चित्र असून ते बादशाह जहांगीरच्या दरबारातील कुशल चित्रकार उस्ताद मन्सूर यांनी काढलं आहे. त्यावेळी भारतातील वेगवेगळ्या ८ ठिकाणी मिळून अंदाजे ४०० सायबेरियन क्रौंच येत असतं. परंतु भारतात त्यांना संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलं त्या १९६७ सालापर्यंत भारतात येणाऱ्या साइब्सची संख्या १०० पर्यंत खाली आली होती, आणि हिवाळ्यातील त्यांचं एकमेव आश्रयस्थान होतं केवलादेव.

या पक्ष्यांची संख्या पुढे आणखी कमी-कमी होत गेली, १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला ती ७५ वर आली, १९८८ला २३ आणि १९९० मध्ये फक्त १० वर. त्यांची शिकार होतच राहिली आणि कधीकधी अभ्यासासाठी नमुना म्हणूनही त्यांचं संकलन करण्यात आलं. मध्य आशियावरून जाणाऱ्या त्यांच्या नित्याच्या स्थलांतर मार्गातील पीक पद्धती बदलल्या, लोकसंख्या वाढली, परिणामी त्यांचे अधिवास नष्ट झाले. यात भर पडली ती अफगाणिस्तानातील संघर्षानं, जो आता आणखीनच वाढताना दिसतो आहे. १९९८ पासून तर सायबेरियन क्रौंचची केवळ एकच जोडी केवलादेवला येत असे. ती सुद्धा २००१-२००२च्या हिवाळ्यात परत गेली, ती कधीही न परतण्यासाठीच. केवलादेवने आपला कोहिनूर कायमचा गमावला.

पश्चिम इराणमध्ये हिवाळ्यात येणाऱ्या सायबेरियन क्रौंचची कहाणी सुद्धा याच वळणाने गेली. या ठिकाणी पहिल्यांदा सायबेरियन क्रौंचचा शोध लागला तो १९७४ साली, फेरेयडून केनर या पाणथळ स्थळी १४ पक्षी दिसले. पण २००६-२००७ मध्ये तिथं फक्त एकच सायबेरियन क्रौंच दिसला ज्याचं नाव प्रेमानं ‘ओमीद’ ठेवण्यात आलं – फारसी भाषेत ओमीदचा अर्थ होतो, ‘आशा’. ओमीद एकटाच ७,८०० किलोमीटरचा प्रवास करून इराणला आला होता. इराणमध्येही त्याचे शेवटचं दर्शन झालं ते २०२० साली.

पूर्वेतील सायबेरियन क्रौंचची संख्या ३००० हून थोडीशी जास्त असावी असा अंदाज आहे पण ती सुद्धा सातत्याने घटत चालली आहे. या पक्ष्यांचा भारतातील उप-समूह तर नामशेष झालाच आहे पण इराणमधील उप-समूह सुद्धा (केवळ एकच पक्षी आल्याने आणि तोही मागील वर्षी) नामशेष झाल्यातच जमा आहेत.

भरतपूरमधील पक्षी दर्शनात माझा सप्ताह आनंदात गेला होता आणि आता ही परतण्याची वेळ होती. या अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळील दुकानाबद्दल मी बरंच ऐकलं होतं. मी त्या दुकानाच्या भरपूर वस्तू असलेल्या एका खोलीत शिरलो. तिथं टी-शर्ट, पुस्तकं, टोप्या, कप, जॅकेट्स आणि आणखीही बऱ्याच वस्तू होत्या. त्यातच मला काही लघुचित्रे दिसली. ए-फोर आकाराच्या कागदावर पुनर्चित्रित करण्यात आलेल्या मोठ्या चित्रांच्या या लघु प्रतिकृती प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवलेल्या होत्या. त्या मालिकेत अगदी मधोमध सायबेरियन क्रौंचचं एक मोहक चित्र होतं आणि त्या खाली उर्दूतील काही अक्षर होते, कदाचित ते चित्र एखाद्या मूळ कलाकृतीवरून प्रेरित असावं. त्याची किंमत ४०० रुपये होती.

मी त्या दुकानातील मृदूभाषी विक्रेत्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तो एक निवृत्त सैनिक होता. मी त्याला त्या चित्राबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “या चित्रकाराचं नाव कटारा आहे. तो भरतपूरजवळच राहतो आणि खूप चांगली चित्र काढतो. पण फक्त ‘फिरंग’च (गोऱ्या विदेशी लोकांना इथं फिरंग म्हणतात) या चित्रांची कदर करतात.” मी एक टी-शर्ट, एक मग आणि एक अॅल्युमिनियमची पाण्याची बॉटल विकत घेतली. दुकानात निरव शांतता होती, मी तेथील वस्तूंवर पुन्हा एक दृष्टीक्षेप टाकला आणि माझी नजर त्या चित्रावर रेंगाळली.

मला सत्यजित रे यांच्या कांचनजंगा या १९६२च्या प्रसिद्ध चित्रपटातील एक प्रसंग आठवला. उत्फुल्ल संगीत असलेला हा चित्रपट दार्जिलिंगमध्ये चित्रित करण्यात आला आहे. यात रे यांनी दार्जिलिंगमध्ये दरवर्षी सुट्ट्या घालवण्यासाठी येणाऱ्या एका श्रीमंत बंगाली कुटुंबातील अनेक पिढ्यांचे यशापयश, संघर्ष, आणि ताण्याबाण्यांचे मनोज्ञ दर्शन घडवले आहे.

सिक्कीममधील पेलिंगमधून टिपलेले कांचनजंगाचे मनोहर दृश्य. छाया: discoverytourstv/Flickr, CC BY 2.0

एका प्रसंगात जगदीश (पहारी सन्याल यांनी अत्यंत ताकदीने हे पात्र साकारले आहे) डोळ्यांना घट्ट दुर्बीण लावून मोठ्या उत्सुकतेने देवदारच्या जंगलातून उडणारा एक दुर्लभ पक्षी न्याहाळत आहे. तो अशोकला (अरुण मुखर्जी) सांगतो की, कशाप्रकारे त्याच्या पत्नीच्या निधनानंतर भटकत असताना ऋषिकेशमध्ये त्याला पक्ष्यांचा अभ्यास करणारा एक माणूस भेटला. आपले राग हे पक्ष्यांच्या गीतांपासून प्रेरित असल्याचं त्यानं जगदीशला सांगितलं आणि तेव्हापासून संगीतप्रेमी जगदीश पक्ष्यांच्या प्रेमात पडला. संवादाच्या ओघात पक्ष्यांच्या स्थलांतराचा विषय निघतो तेव्हा जगदीश सोनटिटवी (Golden Plower) या पक्ष्याचं उदाहरण देतो. आर्क्टिक ते उष्णकटिबंधीय प्रदेशापर्यंत प्रवास करणाऱ्या या पक्ष्याबद्दल बोलताना तो म्हणतो, “२००० मैलांचं  उड्डाण, तेही दरवर्षी, न चुकता… इतकं लहान शरीर आणि त्याहूनही लहान मेंदू, तरीही या पक्ष्यांना हे दिव्य पार पाडणं कसं शक्य होतं? कसं जमतं त्यांना हे? कोणालाच माहीत नाही.”

सत्यजित रे यांचा कांचनजंगा (इस्टमन कलर) हा १९६२ मधील प्रसिद्ध चित्रपट.

सत्यजित रे यांचा कांचनजंगा (इस्टमन कलर) हा १९६२ मधील प्रसिद्ध चित्रपट.

संगीत हळूहळू बदलत अधिकाधिक अशुभसूचक होत जात, जगदीश खिन्नपणे कबूल करतो की तो भीतीच्या सावटाखाली जगतो, रात्री बिछान्यावर पडल्यावर ‘अणू चाचण्यां’मुळे हवेत विषारी किरणोत्सारी वायू भरत असल्याचे विचार त्याच्या मनात येतात. त्याला भीती वाटते की, एखाद्या दिवशी कदाचित त्याला दिसेल की पक्षी आलेच नाहीत. “त्यांची बुद्धी भ्रमित झाली असून ते रस्ता विसरले आहेत, त्यांना दिशेचं भान राहिलेलं नाही… किंवा कदाचित ते सर्व रस्त्यातच मरून गेले आहेत आणि पावसाच्या थेंबांप्रमाणं एक-एक करून आकाशातून जमिनीवर पडत आहेत, टीप, टीप, टीप…”

कशामुळे तरी माझी विचारांची तंद्री भंगली आणि मी त्या विक्रेत्याला ४०० रुपये दिले. तो फडताळाजवळ गेला, प्लास्टिकचं पाऊच उघडलं, किमतीची चिट्ठी काढली आणि स्मितहास्यासह ते चित्र माझ्या हातात दिलं.

साइबचं ते चित्र मी माझ्या बॅगमध्ये ठेवलं आणि दुकानातून बाहेर पडलो. तीव्र दुःखानं माझ्या छातीत जणू खड्डा पडला. कायमचं विलुप्त होणं म्हणजे नेमकं काय असतं याची जाणीव मला त्यावेळी झाली. साइबनं व्यापलेली जागा आता रिकामी झाली होती.

(लेखाचे छायाचित्र – केवलादेव घनातील सायबेरियन क्रौंच पक्ष्यांचे एक जोडपे, फेब्रुवारी 1994. छाया: Bernard Dupont/Wikimedia Commons, CC BY-SA 2.0)

पीयूष सेखसरीया हे एक निसर्गप्रेमी आहेत.

अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0