देखणे ते चेहरे

देखणे ते चेहरे

गौरवर्णाला आपल्या देशात, विविध समाजात एक वेगळे स्थान, महत्त्व आले जे खरे तर भेदभाव करणारे आहे. थोडक्यात इंग्रजांचा वर्णवर्चस्व आणि वर्णद्वेष आपण काही अंशी स्वीकारला.

पुण्यातील कोविड सेंटर गायब
कर्नाटक हायकोर्टाकडून राज्यातील ‘अँटी करप्शन ब्युरो’ बरखास्त
ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू

भारतात ‘फेअर अँड लव्हली’ या लोकप्रिय क्रीम तयार करणार्‍या ‘हिंदुस्तान यूनिलिव्हर’ (HUL) या कंपनीने गुरुवारी जाहीर केले की ‘फेअर’ हा शब्द ते यापुढे काढणार असून यापुढे ते सगळ्या रंगाच्या स्त्रियांसाठी चेहर्‍याला लावायची क्रीम्स तयार करतील. तसेच या सगळ्या क्रीम्सची नावे, त्यांच्या जाहिरात यांचा रिसर्च सुरू केला आहे.

ही बातमी येताच वार्तांकन करणार्‍या सगळ्या वाहिन्यांनी काही नट्या, विचारवंत, कार्यकर्त्या यांना बोलावून ऊहापोह केला. त्यातही खास करून रुढार्थाने सावळ्या किंवा काळा वर्ण असलेल्या नट्या, कार्यकर्त्या यांच्या प्रतिक्रिया तसेच संघर्ष यावर बरीच साधक बाधक चर्चा घडवून आणली जी निश्चितच आवश्यक होती.

सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याही लक्षवेधी होत्या. त्यातला महत्त्वाचा सूर हा होता की अमेरिकेत गेल्या महिन्यात कृष्णवंशीय जॉर्ज फ्लॉइडची पोलिसांकडून हत्या झाली त्यावर जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्समध्ये अनेक आठवडे निदर्शने सुरू होती. एकंदरीत कृष्णवंशीय लोकांवर होणारा अन्याय, त्यांच्या बाबतीत केला जाणारा दुजाभाव यावर जनतेत प्रक्षोभ दिसून आला. सगळ्या जगाचा विषमता, वर्णद्वेषासंबंधी विवेक आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत करणारे हे जनसामान्यांचे आंदोलन समान वागणूक आणि संधी देणार्‍या समाजाकडे नेण्याची नांदी ठरले आहे यात शंकाच नाही. मात्र हिंदुस्तान यूनिलिव्हर (HUL) या कंपनीने स्पष्ट केले आहे की ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलांनाशी त्यांच्या निर्णयाचा संबंध नाही.

ही बातमी येण्याच्या काही दिवस आधी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या कंपनीने त्यांची ‘क्लीन अँड क्लिअर’, तसेच इतर काही उत्पादनांची विक्री भारत आणि मध्य पूर्वेतील देशात बंद करत आहोत तसेच त्वचेवरचा काळे डाग काढणारी त्यांची उत्पादने व्यक्तीचा स्वत:चा रंग हा गोर्‍या रंगापेक्षा कमी आहे असा विचार आणि दृष्टी तयार करणारे असल्याने त्यांनी या उत्पादनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते हे विशेष.

या दोन्ही जागतिक दर्जाच्या कंपन्यानी उत्पादने थांबवणे तसेच वेगवेगळ्या रंगाच्या त्वचांसाठी नवीन उत्पादने बाजारात आणणे हे जाहीर केले असले तरी त्यामुळे भारतातील सगळी राज्ये, त्यातील वेगवेगळे समाज यांच्यात गौरवर्णाला दिले जाणारे महत्त्व कमी होऊन अगदी संपेल असे मानणे अगदी भाबडेपणाचे ठरेल.

भारत हा उष्णकटिबंधातील एक खंडप्राय देश. असंख्य जाती, धर्म, पंथ असलेला असा देश. या कटिबंधात दिसून येणारा वर्ण किंवा रंग हा प्रामुख्याने सावळा किंवा काळाच. ढोबळमानाने उत्तरेकडे गौरवर्ण, मध्य भागात गहुवर्ण, आणि दक्षिण भागात सावळा तसेच काळा रंग असे काहीसे वर्णव्यवस्थापन दिसून येत असले तरी सगळ्या राज्यात, प्रदेशात गौरवर्ण किंवा गोरा रंगाच्या अनेक छटा दिसून येतात. तसेच गहुवर्ण, सावळा रंग आणि काळ्या रंगाच्याही अनेक सुंदर छटा दिसून येतात. मुख्य म्हणजे या सगळ्या रंगात तजेला, तुकतुकी आणि काही प्रमाणात झळाळी दिसून येते जी खरे तर फार वेगळी आणि आकर्षक आहे. पश्चिमेकडील अनेक स्त्रिया आणि पुरुष असा Tan म्हणजेच झळाळी असणारी सावळकांती तासन्तास उन्हात बसून, काही क्रीम्स लावून मुद्दाम करून घेतात. पश्चिमेकडील लोकांना खरे तर भारतीयांच्या या विविध वर्णांच्या छटांचे फार आकर्षण असले तरी आपल्याकडे मात्र गौर वर्ण हाच बहुतांश मुला-मुलींना हवा असतो. विशेषत: मुलींना. लग्नाच्या जाहिरातीत गोरी बायको हवी असण्याच्या उल्लेखांचे प्रमाण अजूनही ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शादी.कॉम या लग्न जमवून देणार्‍या पोर्टलवर तर गोर्‍या रंगाच्या मुली शोधण्यासाठी खास फिल्टर आहे. यावर हल्लकल्लोळ झाल्यावर त्यांनी नुकताच तो वादग्रस्त फिल्टर काढला आहे.

जगभरात ठिकठिकाणी चाललेली ब्लॅक लाईव्हज मॅटर' निदर्शने.

जगभरात ठिकठिकाणी चाललेली ब्लॅक लाईव्हज मॅटर’ निदर्शने.

गौरवर्णाला अतिरेकी महत्त्व कधी बरे आले असावे की ज्याचे अक्षरश: खूळ लागले? खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येते की गौरकांती किंवा गौर वर्णाला इतके महत्त्व आपल्या देशात इंग्रजी राजवटीच्या उत्तरार्धात आले. त्यापूर्वीचे साहित्य म्हणजेच अगदी रामायण, महाभारतातील व्यक्तींची वर्णने, पुराणे, त्यातील वर्णने, देव-देवता यांची वर्णने;  कथा, आरत्या, भजनं, भारुड, जात्यावरच्या ओव्या, गाणी, गौळणी यातील उल्लेख तपासले असता गौरवर्णाला फारसे महत्त्व दिलेले दिसून येत नाही. याउलट, सावळा राम, घननीळ कृष्ण म्हणजेच घनःश्याम यांचे वर्णन आढळते. शंकर हे दैवत जरी कर्पुरगौर वर्णाचे तरी राम, कृष्ण आणि विठ्ठल ही दैवते मात्र सावळी किंवा काळी. काली माता ही देखील काळी तर सौंदर्याची पुतळी मानली गेलेली द्रौपदी ही देखील श्यामा म्हणजे सुंदर सावळ कांतीची होती. गोरी राधा आणि काळा कृष्ण यांच्या लीलेत राधेच्या गोर्‍या रंगाचा नुसता उल्लेख आहे. देव- देवतांच्या अंगप्रत्यांगांची वर्णने आढळून येतात मात्र कुठेही रंगाचे उदात्तीकरण आढळून येत नाही हे विशेष.

इंग्रजी राजवटीच्या उत्तरकालापासून मात्र गोर्‍या रंगाचे महत्त्व, गोरे असणे म्हणजे काही विशेष असणे तसेच गोरा रंग असेल तर समाजात एक प्रकारचा मान, स्थान मिळणे विशेषत: बायकांच्याबाबतीत झालेले दिसून येते. पुढे जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील अनेक कविता, गीतातही दिसते जसे ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंद्रावाणी मुखडा तुझा रंग गोरा पान गं’, ‘सावळाची वर शोभे गौर वधूला’ वगैरे. असे अनेक दाखले कथा, कादंबर्‍या, गीते, कवितांतून देता येतील. त्याच बरोबर ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी…सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो’, ‘सावळा गं रामचंद्र चंद्र नभीचा’ ही गीते देखील लिहिली गेली. तरी गोरी मुलगी, बायको, मुले असणे म्हणजे काही विशेष आहे ही वृत्ती बळावली.

तसेच गोर्‍या रंगाचा हाच अट्टहास हिंदी चित्रपट, त्यातील अनेक गाणी, संवाद यातदेखील दिसून येतो. जसे ‘राधा क्यूं गोरी मै क्यूं काला’, ‘गोरे रंग पे इतना गुमा न कर’, ‘हम काले है तो क्या हुवा दिलवाले’ है वगैरे.

गौरवर्णाला आपल्या देशात, विविध समाजात एक वेगळे स्थान, महत्त्व आले जे खरे तर भेदभाव करणारे आहे. थोडक्यात इंग्रजांचा वर्णवर्चस्व आणि वर्णद्वेष आपण काही अंशी स्वीकारला. विशेष म्हणजे कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक तो बाणवला. समाजात त्यामुळे दुही, भेदभाव होऊ दिला. यातील अत्यंत वाईट आणि चिंताजनक भाग म्हणजे गोरं असणं म्हणजेच सुंदर असणे किंवा गोरेपणा हा सौंदर्याचा एक मापदंड बनला. आपल्याकडे तर म्हण देखील आहे, ‘गोरी हजार गुण चोरी’.

खरे तर राज्य करण्यासाठी जे मानसिक खच्चीकरण करावे लागते म्हणजे तुमची संस्कृती, विविध भाषा, तुमचे शिक्षण आणि तुमचं जीवनशैली ही कशी कमी, अयोग्य, असंस्कृत आणि खालच्या पातळीची आहे हे अतिशय धूर्तपणे मात्र जाहीरपणे नाही तर वागण्यातून, कधीतरी बोलण्यातून दर्शवणे. हे काम इंग्रजांनी अगदी चोख केले. त्यातूनच इंग्रजी शिकणे, त्या माध्यमातून शिकणे, शहरात राहणे तसेच गौर वर्णाचा अट्टहास अशा अनेक गोष्टी आपण स्वीकारल्या. त्यातून सावळा वर्ण किंवा काळी कांती असणार्‍या स्त्रिया आणि माणसांना हिणवणे, त्यांना चिडवणे, त्यांना डावलणे हे देखील सुरू झाले. जे अतिशयच दुर्दैवी आहे. अन्यायकारक आहे. यामुळे कोट्यवधी मुली, बायका यांना कायम असुरक्षित वाटते, आपल्यात काही कमी आहे याची बोच, याची खंत वाटते.

अगदी याच असुरक्षित भावनेचा, या कमतरतेचा फायदा HUL, J&J किंवा Lo’real सारख्या कंपन्यानी उठवला. त्यांनी खरेतर चटकन उजळपणा आणणारी मात्र त्वचेला पुढे काळसर (दीर्घकाळ वापरल्यास) करणारी, पार्‍यासारखी अनेक विषारी द्रव्ये असणारी क्रीम्स बाजारात आणली. जी चेहर्‍याची आणि पर्यावरणाची हानी करतात. मात्र काळे डाग काढणार्‍या किंवा कमी करणार्‍या किंवा गोरा रंगाचा दावा करणार्‍या कंपन्या या परिणामांवर बोलत नाहीत. त्या विषयीची माहिती उत्पादनावर अजिबात छापत नाहीत. छापली तरी ते अतिशय बारीक अक्षरात लिहिले असते. जे वाचण्याची तसदी कुणीही घेत नाही. गोर्‍यापान आणि सुंदर अशा अतिप्रसिद्धा तारका घेऊन ते जाहिराती करत असत. त्यामुळे विश्वास चटकन बसतो हे लक्षात आले. पुढे सावळ्या तरुणी गुणी असूनही मागे आहेत किंवा त्यांना उत्तम नवरा मिळण्यासाठीचे एकमेव आणि हुकूमी तंत्र काय तर गोरा उजळपणा किंवा गोरा निखार. हे शब्द या कंपन्या आणि जाहिरात कंपन्या यांनी अतिशय हुशारीने रुजवले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

गेल्या तीन दशकांपासून फेअर अँड लव्हली हे क्रीम तयार करणार्‍या कंपनीने अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळवले आहे,. २०१९ मध्ये या कंपनीने सुमारे ३,५०० कोटी रूपयांचा वार्षिक नफा कमावला आहे म्हणजे त्यांचे उत्पन्न (revenue) किती असले याची कल्पना येईल. ही आकडेवारी HUL च्या एका क्रीमची आहे. असे अनेक क्रीम्स बाजारात आहेत. गोरेपणाचे हे खूळ आता पुरुषांमध्ये आणण्याची होड आता या कंपन्यांनी लावली आहे. त्यात fair and handsome नावाचे क्रीम आहे. त्याची जाहिरात करायला त्यांनी दस्तुरखुद्द शाहरुख खान यास पाचारण केले होते.

जवळजवळ अडीच दशकांपूर्वी पदव्युत्तर वर्गात एका मैत्रिणीने वर्तमान पत्रात येणार्‍या लग्नाच्या जाहिरातींवर रिसर्च केला होता. त्यात सगळ्या मुलांना गोरी, convent मध्ये शिकलेली मुलगी हवी असायची. इतक्या वर्षांनंतरही गोरी मुलगी हवी हाच पहिला निकष अजूनही दिसून येतो, दुर्दैवाने.

आता फेअर अँड लव्हली सारखे क्रीम जर फेअर हा शब्द काढून टाकून नवीन नाव घेऊन येणार असेल ते निश्चित स्वागतार्ह आहे. मुख्य म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर (HUL) या कंपनीचे सीईओ संजीव मेहता म्हणतात आहेत की सगळ्या प्रकारच्या रंगांसाठी क्रीम्स करायला त्यांची कंपनी कटिबद्ध आहे.

तसेच या कंपनीच्या सौंदर्य आणि वैयक्तिक निगा या विभागाचे प्रमुख सनी जैन म्हणतात की फेअर म्हणजेच गोरेपणा हा सौंदर्याचा एकमेव निकष आहे असा अर्थ या नावामुळे निघत होता. मात्र तो बदलून सौंदर्याचे अनेक निकष सामावून घेऊन आम्हाला सगळ्या प्रकारच्या रंग आणि कांतींसाठी उत्पादने बाजारात आणायची आहेत. इथेच खरी मेख आहे. ब्लॅक लाईव्हज मॅटर या आंदोलनाशी त्यांच्या निर्णयाचा संबंध नाही असे म्हणणारी ही कंपनी नाव बदलणे, त्यातील फेअर हा शब्द किंवा विशेषण हे अन्यायकारक आणि एकांगी आहे याची जाणीव आत्ताच का व्हावी? कारण अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या अगदी काही नट्यांनी देखील या शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यावर काहींनी जागृती करण्याचा प्रयत्नही केला होता. अनेक मुलींशी, बायकांशी संवाद साधला होता. तुरळक केसेसही कोर्टात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा या कंपन्यांनी काही दाद दिली नाही किंवा त्यांच्या फसव्या, धूळफेक करणार्‍या जाहिराती देखील बदलल्या नाहीत. मग आत्ता हे शहाणपण कसे बुवा सुचले बुवा? किंवा ही सुबुद्धी आत्ताच का व्हावी? तर याचे खरे उत्तर हे आहे की ब्लॅक लाईव्हज मॅटर या आंदोलनामुळे जी जनजागृती झाली आहे, भारतातदेखील सौम्य प्रमाणात किंवा छुपा पण अतिशय तीव्र असा वर्णवाद आहे याची जाणीव झाली आहे. त्याची भीती वाटून या कंपनीने फेअर अँड लव्हली यातील फेअर हा शब्द काढून सर्व वर्णाना, कांतीना सामावणारे आणि सौंदर्याच्या अनेक निकषांना एकत्र करून नवीन सर्वसमावेशक मापदंड तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचे कारण एकच आहे ते म्हणजे बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे, जाणीवांमुळे आर्थिक नुकसान न होऊ देणे. या कंपन्यांना तसेही सामाजिक भेदभाव, अन्याय यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो पैसा!

त्यासाठी बहुधा मार्केटिंग आणि उत्पादन संरचना वगैरे विभाग यांनी मिळून ही अतिशय धोरणी आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी आखली आहे. ज्यामुळे त्यांचे अब्जावधींचे उत्पन्न दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे. कारण सगळ्या प्रकारचे रंग, वर्ण आणि कांती यांच्यासाठी ते अगदी गोंडस, आकर्षक नावे असलेली उत्पादने घेऊन येणार आणि तसेही आता नुसते गोरे असणे याला महत्त्व राहिले नाही. तर स्वत:ची उत्तम निगा घेणे म्हणजे त्यात केस, चेहरा, फिटनेस, उत्तम पेहराव अशा सगळ्या  गोष्टीना महत्त्व तरुण आणि मध्ममवयातील स्त्री आणि पुरुष देऊ लागले आहेत. हे सगळे गळी उतरवायला अनेक शब्द जसे dapper, metrosexual, alpha male, PYTs (Pretty young things), ritzy, classy, chic, swish वगैरे.

थोडक्यात काय तर अतिशय नेमक्या जाहिराती आणि स्मार्ट मार्केटिंग यामुळे या सगळ्या कंपन्यांची नवनवीन उत्पादने खपणारच आणि त्यांचे उत्पन्न आणि नफा हा चढाच राहणार. बाकी त्यांच्यामुळे होणारी अनेक पदरी हानी यावर कोणी फारसे बोलणार किंवा आवाज उठवणार नाही.

या सौंदर्य प्रसाधनांमुळे काही चांगले सामाजिक बदल घडून आले तरी भारतातील या वर्णभेदाचे समूळ उच्चाटन व्हायला अजून बराच कालावधी जावा लागणार आहे.

बाकी बा. भ. बोरकर लिहून गेले तसे

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे
गोरटे का सावळे
या मोल नाही फारसे

हे कळायला आणि आमुलाग्र बदल मानसिकतेत व्हायला अजून बराच काळ लागणार आहे.

गायत्री चंदावरकर, या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0