'आदिवासींचा राग ओढवू नये यासाठी निवडणूक संपल्यानंतर ही अटक करण्यात आली असल्याची’ शंका ही केस लढणाऱ्या वकिलाने व्यक्त केली आहे.
हफपोस्ट इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार झारखंडमधील गव्हर्नमेंट स्कूल अँड कॉलेज फॉर विमेनमधील जीतराय हंसदा या आदिवासी प्राध्यापकाला २०१७ मध्ये लिहिलेल्या फेसबुक पोस्टसाठी अटक करण्यात आलेली आहे. २०१७ मध्ये त्याने आपल्या समाजाला गोमांस खाण्याचा अधिकार असल्याबाबतची पोस्ट फेसबुकवर लिहिलेली होती. जून २०१७ मध्ये त्याच्याविरोधात जमशेदपूर येथील साकची पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेली आहे. हंसदा हा आदिवासी कार्यकर्ता आणि नाट्य कलाकार आहे.
गोमांस खाणे ही संथाली आदिवासींची परंपरा असून त्यांच्यावर हिंदू परंपरांचे पालन करण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद त्याने आपल्या पोस्टमध्ये केलेला होता. तपास अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी तपासाअंती हंसदा याच्याविरोधात एफआयआर दाखल केला तसेच त्याची चौकशीदेखील केली. ‘आदिवासींचा राग ओढवू नये यासाठी निवडणूक संपल्यानंतर ही अटक करण्यात आली असल्याची शंका’ हंसदा यांची केस लढणाऱ्या वकिलाने गुप्ततेच्या अटीवर व्यक्त केली आहे.
२०१४ प्रमाणेच भाजपने झारखंडमधील लोकसभेच्या १४ पैकी १२ जागांवर विजय मिळवलेला आहे.
हंसदा यांना भारतीय दंडविधानाच्या कलम १५३- अ, २९५-अ ५आणि ५०५ या कलमांनुसार धार्मिक भावना दुखावणे आणि दोन गटांत तेढ पसरवणे या आरोपांखाली अटक करण्यातआलेली आहे. हंसदा सध्या कार्यरत असलेल्या कोल्हान विद्यापीठाने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिल्यांनतर माझी परगणा महलचे प्रमुख दसमथ हंसदा यांनी विद्यापीठाच्या उपकुलगुरूंना पत्र लिहिलेले आहे.
या पत्रात हंसदा यांनी नमूद केले आहे की “त्या फेसबुक पोस्टमधून आदिवासी समाजाची सांस्कृतिक-धार्मिक परंपरा आणि खाद्यजीवन यांचे वास्तव दर्शवण्यात आलेले आहे.” ते पुढे लिहितात, “अभाविप या धार्मिक संघटनेच्या सांगण्यावरून आपण हंसदा यांना निलंबित करू इच्छिता असे एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमीतून आम्हाला समजले आहे.” पत्रात असेही म्हणण्यात आले आहे की, “आदिवासी हेदेखील भारताचे नागरिक आहेत. इतर कोणाहीप्रमाणे त्यांनाही आपली सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा पाळण्याचा अधिकार आहे. जर केंद्र सरकार गोवंश हत्या बंदीचा कायदा आणत असेल तर त्यामुळे आमच्या सांस्कृतिक-धार्मिक परंपरा संपुष्टात येतील. “
COMMENTS