भारतात फेसबुकचा वापर धार्मिक तेढ वाढवण्यासाठी

भारतात फेसबुकचा वापर धार्मिक तेढ वाढवण्यासाठी

संशोधकांनी तयार केलेल्या एका अहवालातून असे दिसून आले आहे की, दिल्ली दंगलींच्या काळात व्हॉट्सएपवर अफवा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मेसेजेसचा पूर आला होता.

रिलायन्सकडून पैसे घेणाऱ्या कंपनीने भाजपच्या फेसबुकवरील प्रचाराला कसे दिले बळ?
फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार
फेसबुकची भाजपवर मेहरनजर – ‘वॉल स्ट्रीट’चे वृत्त

नवी दिल्ली- फेसबुक या प्रभावी अशा सोशल मीडियाचा अभ्यास करणार्या संशोधकांनी तयार केलेल्या एका अहवालात फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलींच्या काळात अफवा आणि हिंसाचार घडवण्यास उद्युक्त करणाऱ्या मेसेजेसचा पूर आला होता असे म्हटले आहे. हे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केले आहे.

मुलाखत घेतलेल्या वापरकर्त्यांनी सांगितले की फेसबुक आणि व्हॉट्सएपवर संघर्ष, तिरस्कार आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक प्रकारचा मजकूर आणि फेसबुक व व्हॉट्सएपवर वारंवार समोर येत होता, असे वॉल स्ट्रीट जर्नलचे म्हणणे आहे.

या वृत्तपत्राने फेसबुकमधील अंतर्गत जनसंपर्कावर आधारित अलीकडेच केलेल्या मालिकेतील नवीन भागात फेसबुकला भारतात आपल्या सेवांचा वापर धार्मिक तेढ वाढवण्यासाठी आणि तिरस्काराला खतपाणी घालण्यासाठी केला जातो याची कल्पना आहे. फेसबुकचे व्हिसलब्लोर फ्रान्सेस हॉगेन यांनी काही समस्या स्पष्ट केल्या होत्या. त्याही या बातमीत अधोरेखित केल्या आहेत. त्यांनी त्यात असे म्हटले आहे की हिंदुत्ववादी समूह मुस्लिमविरोधी साहित्याचा प्रसार करतात आणि त्यांना राजकीय संवेदनशीलतेमुळे संरक्षण दिले जाते.

वॉलस्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या अंतर्गत कागदपत्रामध्ये त्यांचे नियम अभिजनांसाठी कशा प्रकारे फायदेशीर आहेत, त्यांचे अल्गोरिदम कशा प्रकारे काम करतात आणि त्यांच्या सेवांचा वापर तुलनेने निम्न तसेच वंचित वर्गातील समुदायात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जातो, हे दाखवून फेसबुकचे वाभाडे काढले आहेत.

व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेन

व्हिसल ब्लोअर फ्रान्सिस हॉगेन

जुलै २०२० मध्ये संशोधकांनी ‘कम्युनल कॉन्फ्लिक्ट इन इंडिया भाग १’ मध्ये २०१९ आणि २०२० मधल्या भारतातील तीन प्रमुख घटनांचा मागोवा घेतला. पहिली घटना म्हणजे नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) विरोधातील निदर्शने होती. या काळात चुकीची माहिती, अफवा, माहितीची मोडतोड आणि तिरस्कार निर्माण करणारी भाषणे फेसबुकच्या व्यासपीठावर पूर्वीपेक्षा ३०० टक्के जास्त असल्याचे मत नोंदवले होते.

दिल्ली दंगलीदरम्यान विशेषतः व्हॉट्सएपवर अफवा आणि हिंसाचाराला प्रवृत्त करणारे संदेश मोठ्या प्रमाणावर पाठवल्याचे आढळून आले. तिसरी घटना जागतिक कोविड महासाथीसोबत सुरू झाली. फेसबुकच्या सेवांमधून कोविड-१९च्या प्रसारासाठी मुस्लिमांना जबाबदार धरणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रसारित करून लोकांच्या मनात भीतीची भावना निर्माण करण्यात आली.

दिल्लीतील एका हिंदू व्यक्तीला सातत्याने फेसबुक आणि व्हॉट्सएपवर मेसेज आले की, “ते लोक खूप धोकादायक आहेत” आणि “हिंदूंना खूप धोका आहे. मुस्लिम लोक आपल्याला ठार मारणार आहेत,” असे त्याने संशोधकांना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुंबईतील एका मुस्लिम माणसाने सांगितले की “सध्या फेसबुकवर इतकी धार्मिक तेढ निर्माण झाली आहे की त्याला त्याच्या जीवाची भीती वाटू लागली आहे. हे सगळं धडकी भरवणारं आहे. खूप धोकादायक आहे.” तो पुढे म्हणाला की, “सोशल मीडिया आणखी दहा वर्षे असाच राहिला तर फक्त आणि फक्त तिरस्कारच आपल्याला दिसून येईल.” वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार कंपनीने त्वेष निर्माण करणाऱ्या साहित्याला आळा घातला नाही तर भारत हा देश कुणाहीसाठी जगण्यासाठी खूप कठीण ठिकाण होऊन बसेल.

अनेक वापरकर्त्यांनी फेसबुकने अशा प्रकारच्या साहित्याला आळा घातला पाहिजे असे मत व्यक्त केल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात ह्युगेन यांनी यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी)कडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत “एडव्हर्सरियल हार्मफुल नेटवर्क्स- इंडिया केस स्टडी”या नावाच्या अंतर्गत दस्तऐवजाचीही पाहणी केली आहे.

द वायरने नमूद केले होते की, फेसबुकने दाखवलेल्या कागदपत्रातून हिंदूंच्या बाजूने आणि मुस्लिमांच्या विरोधात लोकसंख्येला हिंसाचारासाठी भडकावण्यात येत असल्याचे फेसबुकला माहीत होते. त्यांनी स्पष्टपणे आरएसएस समूह, वापरकर्ते आणि भीतीला खतपाणी घालणाऱ्या पेजेसचाही उल्लेख केला.

मुस्लिमांची तुलना डुक्कर आणि कुत्रा यांच्याशी तुलना करणाऱ्या अनेक अवमानजनक पोस्ट होत्या. त्याचबरोबर कुराण आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या बलात्काराचे आवाहन करतो अशा प्रकारची चुकीची माहितीही पसरवण्यात आली होती.

या अहवालात असेही नमूद आहे की फेसबुककडे भारतीय स्थानिक भाषांमधील ही चुकीची माहिती आणि अवमानजनक भाषा शोधून काढण्याची तांत्रिक क्षमता नाही. “आमच्या बंगाली आणि हिंदी क्लासिफायर्सच्या कमतरतेमुळे अशा मुस्लिविरोधी साहित्याची कधी नोंद होत नाही आणि कारवाईही होत नाही,” असे नमूद केले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनुसार संशोधकांनी सल्ला दिला की फेसबुकने “भारतातील स्फोटक साहित्य शोधून त्यांच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक” त्या तांत्रिक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे असा सल्ला संशोधकांनी फेसबुकला दिला आहे. त्यांनी या स्फोटक साहित्याची बँक तयार करून त्याचा अभ्यास करावा असाही सल्ला दिला आहे. त्यामुळे लोक नक्की काय पोस्ट करतात हे कळू शकेल. यामुळे अशी एक रिपोर्टिंग यंत्रणा तयार होऊ शकेल ज्याद्वारे व्हॉट्सएप वापरकर्त्यांना अवमानजनक संदेश सूचित करण्याची आणि त्यांच्या साहित्याद्वारे त्यांचे वर्गीकरण करण्याची मुभा देईल.

या वर्षी तयार केलेल्या आणखी एका अंतर्गत दस्तऐवजात बजरंग दलने पूर्वी व्हॉट्सएपचा वापर हिंसाचारासाठी जमाव गोळा करून तो पार पाडण्यासाठी केला होता, असे आढळल्याचे हे वृत्तपत्र सांगते. ही संघटना धोकादायक मानली जाते आणि तिच्यावर कायमस्वरूपी बंदी येऊ शकते आणि ती मागे घेण्याचीही शिफारस करण्यात आली होती. मात्र, बजरंग दल आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे.

यातून हे दिसून येते की बजरंग दलाला भाजपशी त्यांच्या जवळच्या संपर्कामुळे संरक्षण मिळते. आधीच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात फेसुबकच्या सिक्युरिटी टीमने सांगितले की ग्रुप काढून टाकल्याने कंपनीचा भारतातील व्यवसाय आणि कर्मचारी यांच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो आणि भाजप कंपनीवर नाराज होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फेसबुकने ग्रुप काढून टाकण्यास नकार दिला होता.भारताच्या सर्वोच्च सार्वजनिक धोरण अधिकाऱ्यांनी भाजपच्या राजकीय नेत्यांविरोधात हेट-स्पीचचे नियम लागू करण्यास विरोध केला होता आणि त्यासाठी राजकीय विचार करण्याचा सल्ला दिला होता.

फेसबुकचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले की, यातील काही अहवाल हे “चालू दस्तऐवज होते आणि त्यात चौकशी आणि चर्चा सुरू होती.” त्यात संपूर्ण चौकशी नव्हती आणि वैयक्तिक धोरण शिफारशीही समाविष्ट नव्हत्या. त्यांनी दावा केला की विविध भाषांमधील हेट स्पीच शोधण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती आणि अशा प्रकारचे साहित्य काढून टाकले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0