हातातल्या पर्सला चॅनेलनी दगड म्हणून दाखवले

हातातल्या पर्सला चॅनेलनी दगड म्हणून दाखवले

नवी दिल्ली : जामिया विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यांच्या हातात दगड होते, असा दावा १६ फेब्रुवारी रोजी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने केला होता. या वृत्तवाहिनीने पुढे जाऊन विद्यार्थ्याच्या हातात दगड असल्याचे व्हीडिओ फुटेज दिल्ली पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाने तपासले असल्याने व त्यांनीही हे मान्य केल्याने जामियाच्या ग्रंथालयात जे काही घडले त्याचा वृत्तांत आम्ही प्रामाणिकपणे, वस्तुनिष्ठरित्या देत असल्याचा दावा केला होता. पण हा दावाच खोटा असल्याचे ‘अल्ट न्यूज’ या अन्य संकेतस्थळाने सिद्ध केले आहे. जामियातील ग्रंथालयात शिरलेल्या विद्यार्थ्याच्या हातात दगड नव्हे तर ती पर्स (पाकीट) आहे असे अल्ट न्यूजने अतिशय हाय रिझोल्यूशन व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.

इंडिया टुडेने १.२२ मिनिटांचा जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्याच व्हीडिओची प्रत्येक प्रतिमा अल्ट न्यूजने हाय रिझोल्युशनद्वारे तपासली. त्यातून विद्यार्थ्याच्या उजव्या हातात दगड नव्हे तर पाकीट-पर्स होते तर दुसऱ्या हातात काही तरी वस्तू बहुतेक फोन होता, असे स्पष्ट केले आहे. १.२२ मिनिटाच्या व्हिडिओच्या प्रत्येक प्रतिमेत विद्यार्थ्याच्या उजव्या हातात पर्स असल्याचे स्पष्ट दिसते आणि डाव्या हातात सपाट आकाराची वस्तू दिसते. ती मोबाईल असावी असे अल्ट न्यूज सांगते.

इंडिया टुडेची सर्व वाहिन्यांनी री ओढली

सोमवारी जेव्हा इंडिया टुडेने आपल्याकडेच या व्हिडिओची एक्स्लुझिव्ह दृश्ये असल्याचा दावा करत विद्यार्थ्याच्या हातात दगड असल्याचा दावा केला. तेव्हा या दाव्याची तपासणी न करता अन्य वृत्तवाहिन्यांनीही इंडिया टुडेच्या व्हिडिओवर भरवसा ठेवला. यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया, मिरर नॉऊ, रिपब्लिक भारत, टाइम्स नाऊ, द क्विंट व डीएनए या इंग्रजी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. तर झी न्यूज, आज तक, इंडिया टीव्ही, एनडीटीव्ही इंडिया व न्यूज नेशन या हिंदी वृत्तवाहिन्यांनीही हीच बातमी प्रसिद्ध केली होती.

ऑपइंडिया व स्वराज्य या संकेतस्थळांनीही हीच बातमी प्रसिद्ध केली होती.

पोलिसांकडून मारहाण

सोमवारी जामिया कोऑर्डिनेशन कमिटीने जामिया मिलिया विद्यापीठातील १५ डिसेंबर २०१९चे एक व्हीडिओ फुटेज प्रसिद्ध केले होते. या फुटेजमध्ये पोलिस ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण करत असून अखेरीस दोन पोलिस सीसीटीव्हीही काठी मारून तो फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले होते.

आजपर्यंत दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचे समर्थन केले जात होते. विद्यार्थ्यांच्या हातात दगड होते म्हणून आम्ही प्रतिवाद केला असे पोलिसांकडून सांगितले जात होते. हे दावे सोमवारच्या व्हिडिओनंतर खोटे दिसून आले.

त्याचवेळी मकतूब मीडियाने सुमारे ५ मिनिटांचा व्हीडिओ सोमवारी प्रसिद्ध केला. या व्हीडिओत विद्यापीठातील ओल्ड रिडिंग हॉलची दृश्ये आहेत. ग्रंथालयातील काही मुले पोलिसांना रोखण्यासाठी दरवाज्याजवळ अभ्यासाचे टेबल लावताना दिसत आहेत. पण पोलिस हा दरवाजा फोडून आत येतात. पोलिसांना पाहिल्यावर काही मुले पोलिसांना हात जोडून बाहेर पडण्याची विनंती करताना दिसतात तर एक महिला सुरक्षा अधिकाऱ्याला पोलिस ग्रंथालयाबाहेर जाऊ देतात. त्यानंतर पोलिस ग्रंथालयातील विद्यार्थ्यांवर जबर लाठीमार करताना दिसतात. या लाठीमारातून सुटका करण्यासाठी मुले डोक्यावर बॅगा घेताना दिसतात. काही मुलांची दरवाजातून सुटका होताना दिसते पण बाहेरून पोलिस पुन्हा विद्यार्थ्यांवर काठ्या मारत असल्याची दृश्ये आहेत. एका विद्यार्थ्याला तर तो गयावया करत असतानाही पोलिस काठीने जबर मारहाण करताना दिसले.

या व्हीडिओच्या अखेरच्या दृश्यात पोलिस आपला चेहरा लपवत सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

मकतूब मीडियाने असा दावा केला होता की, त्यांच्याकडे एक तासाहून अधिक व्हीडिओ फुटेज आहे. या फुटेजमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जबर मारहाण केल्याची दृश्ये असून विद्यार्थ्यांना ग्रंथालयात घुसून मारहाण केली नाही हा दिल्ली पोलिसांचा दावा खोटा आहे.

मूळ बातमी

COMMENTS