शेतकऱ्यांबद्दल आदर? आठवून बघा भाजप नेत्यांची विधाने!

शेतकऱ्यांबद्दल आदर? आठवून बघा भाजप नेत्यांची विधाने!

नवी दिल्ली: नवीन कृषी कायदे मागे घेताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांबद्दल अतिशय आदर असल्याचा अविर्भाव आणला होता. “हे कायदे किती लाभदायक आहेत हे आम्ही सर्व शेतकऱ्यांना पटवून देऊ शकलो नाही हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,” अशी पुस्ती त्यांनी कायदे मागे घेण्याच्या घोषणेला जोडली.

अर्थात गेल्या काही महिन्यांत भाजप नेत्यांनी केलेली विधाने आठवून बघितली, तर पंतप्रधानांचे हे शब्द किती बेगडी आहेत हे दिसून येईल. गेल्या वर्षभराच्या काळात शेतकऱ्यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीच्या सीमांवर चालवलेल्या आंदोलनावर भाजप नेत्यांनी अत्यंत आक्रमक, चिथावणीखोर आणि धमकीवजा टिप्पणी केलेली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या १२ विधानांची यादी येथे देत आहोत. त्यामुळे मोदी यांचा दावा किती बनावट आहे हे स्पष्ट होईल. ही यादी सर्वसमावेशक नाही पण भाजप नेत्यांच्या आंदोलनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर यातून पुरेसा प्रकाश टाकला जाऊ शकतो.

१. “तुम्हाला सरळ करायला दोन मिनिटे पुरेशी”: अजयकुमार मिश्रा

आंदोलक शेतकऱ्यांबाबत टिप्पण्या करून सर्वाधिक वेळा वृत्तपत्रांमध्ये मथळ्याची जागा पटकावण्याची किमया केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केली असेल. “माझ्यासमोर या, तुम्हाला सरळ करायला दोन मिनिटे पुरेशी आहेत,” असे मिश्रा म्हणत असल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. “मी केवळ मंत्री किंवा खासदार किंवा आमदार नाही… संसदेवर जाण्यापूर्वीपासून लोक मला ओळखतात. मी आव्हानांपासून कधीही दूर पळत नाही. मी ज्या क्षणी आव्हान स्वीकारेन, त्या क्षणी तुम्हाला केवळ पालिया नाही तर लखीमपूर (मिश्रा यांचा मतदारसंघ) सोडून पळावे लागेल.”

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांविरोधात झालेल्या कथित हिंसाचारात मिश्रा यांचा मुलगा सहभागी असल्याच्या आरोपानंतर मिश्रा यांच्या या विधानाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. आशीष मिश्राचा सहभाग असलेल्या एका व्हीआयपी ताफ्याने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले, यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आता आशीष कोठडीत आहे, तर मिश्रा अद्याप मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.

२. “आंदोलक ‘खलिस्तानी झेंडेवाले दहतशवादी’ आहेत”: जसकौर मीणा

आंदोलक शेतकरी भारताबाहेरून मदत मिळवणारे खलिस्तानी आहेत असा आरोप करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न अनेक भाजप नेत्यांनी केला. राजस्थानातील दौसा येथील भाजप खासदार जसकौर मीणा यांनी हा आरोप कोणत्याही पुराव्याशिवाय केला. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण होते, तरीही त्यांच्याकडे एके-47 रायफल्स आहेत, असा दावा मीणा यांनी केला होता.

राजस्थान भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट झालेल्या व्हिडिओतील मीणा यांचे विधान पुढीलप्रमाणे: “आता कृषी कायद्यांचेच बघा, दहशतवादी बसले आहेत आणि त्यांनी एके-47 बाळगलेल्या आहेत, खलिस्तानचा झेंडा लावलेला आहे.”

३. ‘खलिस्तानी आणि माओवादी’: अमित मालवीय

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीयही याच लाटेवर स्वार झाले होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे खलिस्तानी व माओवादी दोघांशीही लागेबांधे आहेत, असा दावा मालवीय यांनीही कोणत्याही पुराव्याशिवाय केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर केजरीवाल यांचा दिल्ली “जाळून टाकण्याचा” बेत आहे असा आरोप करून मालवीय मोकळे झाले होते.

४. “शेतकऱ्यांचे सोंग घेतलेले गुंड”: वाय. सत्यकुमार

शेतकऱ्यांना नवीन कृषी कायद्यांबद्दल वाटणारी चिंता भाजप गांभीर्याने घेत नव्हते असे संकेत देणारे आणखी एक उदाहरण म्हणजे, आंदोलक शेतकरी नाहीत, तर ‘गुंड’ आहेत असा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस वाय. सत्यकुमार यांनी केलेला दावा होय. त्यांनी आंदोलकांना “खलिस्तानी” आणि “जिहादी”ही म्हटले होते.

“उत्तरप्रदेशात स्वत:ला शेतकरी म्हणवणारे गुंड ज्या पद्धतीने हिंसक निदर्शने करत आहेत, त्यावरून हा योगायोग नव्हे, तर सुनियोजित प्रयोग आहे हे स्पष्ट आहे,” असे ते ट्विटद्वारे म्हणाले होते.

५. “आंदोलनावर अतिरेक्यांचा ताबा”: दुष्यंत कुमार गौतम

शेतकरी आंदोलनात खलिस्तान व पाकिस्तानचा पुरस्कार करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष दुष्यंत कुमार गौतम यांनी केला होता. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचे कोणतेही वृत्त नव्हते.

“कृषी कायदे संपूर्ण देशासाठी आहेत पण विरोध केवळ पंजाबमधूनच का होत आहे? खलिस्तान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा आंदोलक देत आहेत. मग त्याला आंदोलन कसे म्हणता येईल?” असे गौतम म्हणाले होते. अतिरेक्यांनी आंदोलनाचा ताबा घेतला आहे आणि देशद्रोही शक्ती या घोषणा देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.

६. ‘अवांच्छित घटक’: मनोहरलाल खट्टर

आंदोलनात ‘अवांच्छित घटक’ घुसले असून ते उघडपणे खलिस्तानला पाठिंबा देत आहेत, असा दावा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला होता. “आम्ही इंदिरा गांधींची हत्या करू शकतो, तर नरेंद्र मोदींचीही करू शकतो” अशा अर्थाच्या घोषणा दिल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. आपले सरकार यात लक्ष घालत असल्याचेही ते म्हणाले होते पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

७. “आंदोलनावर ‘टुकडे-टुकडे गँग’चा ताबा”: सुशीलकुमार मोदी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही आंदोलनावर हल्ला चढवण्यासाठी भाजपच्या लाडक्या बंदुकांचा प्रयोग केला. भाजपच्या मते, ही टुकडे-टुकडे गँग विद्यार्थी कार्यकर्त्यांपासून ते सीएएविरोधी आंदोलनात सर्वत्र सक्रिय आहे.

८. “अराजकतावादी रचनांचे गिनीपिग्ज”: बी. एल. संतोष

शेतकरी त्यांना स्वत:ला वाटणाऱ्या चिंतांसाठी लढत नाही आहेत, तर मेधा पाटकर यांच्यासारखे कार्यकर्ते तसेच आप त्यांचे नेतृत्व करत आहेत, अशा अर्थाची टिप्पणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी केली होती. “शेतकऱ्यांना अराजकतावादी रचनांचे गिनीपिग्ज होऊ देऊ नका,” असे ट्विट त्यांनी केले होते.

९. “डाव्यांची आणि माओवाद्यांची मिसळण”: पीयूष गोयल

आंदोलनाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी आंदोलनात शेतकरी नाहीत, तर ‘डाव्यांची’ व ‘माओवाद्यांची’ भेसळ आहे, असे वक्तव्य केले होते. देशद्रोही कृत्यांसाठी अटकेत असलेल्यांना सोडवण्यासाठी हा विरोध आहे, असा निष्कर्षही त्यांनी काढला होता.

“हे कथित शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांचे नावालाच आहे, असे आमच्या लक्षात आले आहे. त्यात डाव्यांची व माओवाद्यांची मिसळण झालेली आहे. देशद्रोही व बेकायदा कृत्यांसाठी गजाआड असलेल्यांची मुक्तता करवून घेण्यासाठी हे सगळे चालले आहे,” असे ते म्हणाले होते.

१०. “भीषण कारस्थान”: रविशंकर प्रसाद

‘टुकडे-टुकडे’ गँगने शेतकरी आंदोलन ताब्यात घेतले आहे आणि हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून, भीषण कारस्थान आहे असे म्हणणाऱ्या भाजपाईंच्या लाटेवर माजी केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसादही स्वार झाले होते. याच कारणामुळे शेतकरी व केंद्र सरकार यांच्यातील वाटाघाटी अपयशी ठरत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

११. “आंदोलनामागे चीन व पाकिस्तान”: रावसाहेब दानवे

हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाहीच असे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या कळपात भाजपचे आणखी एक केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेही सामील झाले होते.

“हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाहीच. यामागे चीन व पाकिस्तानचा हात आहे. या देशातील मुस्लिमांना प्रथम चिथावणी देण्यात आली. एनआरसी आणि सीएए आले की मुस्लिमांना देश सोडून जावे लागेल असे सांगण्यात आले. एकाही मुस्लिमाला देश सोडावा लागला का? हे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत. आता शेतकऱ्यांना सांगितले जात आहे की, त्यांचे नुकसान होईल. हे अन्य देशांच्या कारस्थान आहे,” असे ते म्हणाले होते.

१२. “सुनियोजित कट”: मनोज तिवारी

दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनीही ‘टुकडे-टुकडे गँग’चा धोशा लावून धरला होता. हे आंदोलन म्हणजे सुनियोजित कारस्थान आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

“एनआरसी व सीएएला शाहीन बाग येथे विरोध करणाऱ्या व्यक्ती व समूह शेतकरी आंदोलनातही उपस्थित आहेत. याचा अर्थ शाहीन बाग प्रयोग येथेही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असे तिवारी म्हणाले होते.

भाजप व त्यांच्या पाठीराख्यांनी शेतकऱ्यांना खोटे ठरवण्यासाठी शक्य ते सगळे काही केले असले, तरी शेतकरी अविचल राहिले. त्यांच्या निश्चयापुढे अखेरीस केंद्र सरकारला हात टेकावे लागले.

मूळ लेख:

COMMENTS