७ महिन्यानंतर फारुक अब्दुल्ला यांची सुटका

७ महिन्यानंतर फारुक अब्दुल्ला यांची सुटका

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांची शुक्रवारी जम्मू व काश्मीर प्रशासनान

ओमायक्रॉनचे आव्हान चिंता वाढवणारेः मुख्यमंत्री
भाजपच्या घोडदौडीला बंगालमध्ये लगाम कसा बसला?  
देशातील पहिलाच प्रकल्पः महाराष्ट्र जनुक कोष

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांची शुक्रवारी जम्मू व काश्मीर प्रशासनाने नजरकैदेतून सुटका केली. त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले होते. फारुक अब्दुल्ला हे सध्या राज्यसभेचे सदस्यही आहेत पण त्यांना गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवल्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यात संसदेच्या एकाही अधिवेशनात त्यांना हजर राहाता आलेले नव्हते.

आपली सुटका झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी मी आता मुक्त झालो आहे, अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या सुटकेसाठी व स्वातंत्र्यासाठी काश्मीर व देशाच्या जनतेने आवाज उठवला होता, त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे ते म्हणाले. पण माझ्यासोबत अनेक नेते, कार्यकर्ते यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे, त्या सर्वांची सुटका झाल्यानंतर मला त्याचा मनापासून आनंद होईल असेही ते म्हणाले. भारत सरकार त्या दृष्टीने पावले टाकेल, असा आशावादही त्यांनी प्रकट केला.

गेले काही महिने संसदेतील अनेक खासदारांनी फारुख अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेबाबत सरकारला विचारणा केली होती. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (सेक्युलर), माकप, भाकप व राजदने अब्दुल्ला यांच्या सुटकेची मागणी करणारे एक पत्र जाहीर केले होते. या पत्रात काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या सर्व राजकीय नेत्यांना त्वरित सोडून द्यावे अशी मागणी केली होती. या नेत्यांना एवढा प्रदीर्घकाळ ताब्यात ठेवणे हा व्यक्तीस्वातंत्र्याचा अनादर असल्याची आरोप या पत्रात केला होता.

फारुक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना केलेल्या स्थानबद्धतेवर सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

दरम्यान अब्दुल्ला यांच्या सुटकेमुळे काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल, असा आशावाद नॅशनल कॉन्फरन्सने व्यक्त केला आहे. पण आता पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनाही सोडून देण्यात आले तर ही प्रक्रिया अधिक वेग घेईल, असेही नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे.

फारुक अब्दुल्ला यांचे सुटकेवर काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरुर यांनी आनंद प्रकट केला आहे. तर सध्या ताब्यात असलेल्या जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तजा जावेद यांनी आता अन्य राजकीय नेत्यांची सुटका व्हावी अशी मागणी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0