जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक जाँ गोदार्द यांचे निधन

जगविख्यात चित्रपट दिग्दर्शक जाँ गोदार्द यांचे निधन

१९६० च्या दशकात फ्रेंच चित्रपटांत नवनिर्मितीची लाट आणणारे, ‘ब्रेथलेस’, ‘कटेम्प्ट’ यासारख्या अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते जाँ लिक गोदार्द या

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचे विद्रोही संचलन?
सर्वसामान्य जनतेचा विश्वासघातः विरोधकांची टीका
राज्य बँक घोटाळा : अजित पवारांसह बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल

१९६० च्या दशकात फ्रेंच चित्रपटांत नवनिर्मितीची लाट आणणारे, ‘ब्रेथलेस’, ‘कटेम्प्ट’ यासारख्या अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते जाँ लिक गोदार्द यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. लिबरेशन या वर्तमानपत्राने गोदार्द यांच्या निधनाची बातमी दिली असून गोदार्द यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली.

गोदार्द यांनी फ्रेंच चित्रपटात नवसर्जनाची लाट आणली असली तरी त्यांच्या चित्रपटांच्या प्रभावामुळे जागतिक चित्रपटाचीही भाषा, मांडणी बदलली आणि जगभरात नवनिर्मिती लाट आली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तववादी चित्रपटांमुळे गोदार्द गेल्या शतकात व २१ व्या शतकाच्या पूर्वार्धातही जगातल्या १० प्रभावशाली दिग्दर्शकांच्या यादीत गणले जातात. त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीचा प्रभाव पुढे हॉलिवूड व अन्य देशांमधील क्वेंटेन टॅरेंटिनो, बर्नार्डो बर्टोलुसी, स्टीव्हन सॉडरबर्ग, मार्टिन स्कॉर्सोसी यांच्यासारख्या प्रख्यात दिग्दर्शकांवर पडला.

पेशाने डॉक्टर असलेले फ्रेंच वडील आणि एका स्वीस बँक गुंतवणुकदाराची मुलगी, अशा गर्भश्रीमंताच्या घरात गोदार्द यांचा जन्म पॅरिसमध्ये ३ डिसेंबर १९३० रोजी झाला. १९५०पासून गोदार्द यांची चित्रपटकलेविषयी आवड वाढत गेली. ते एका फिल्म क्लबचे सदस्य बनले. त्यात त्यांची ओळख विख्यात चित्रपट दिग्दर्शक व निर्माते फ्रँक्वा त्रुंफाँ यांच्याशी झाली. त्यांच्या प्रभावामुळे गोदार्द स्वतः दिग्दर्शकीय पेशात उतरले. त्या अगोदर १९५४ पर्यंत गोदार्द यांनी चित्रपट समीक्षण केले होते. या दरम्यान त्यांनी एका लघुपटाची निर्मिती केली. १९६० मध्ये मात्र त्यांनी संपूर्ण लांबीचा A Bout de Souffle (ब्रेथलेस) या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचे निर्माचे फ्रँक्वा त्रुंफाँ होते. या चित्रपटांत १९४० व ५०च्या दशकातल्या अमेरिकी चित्रपटांचे संदर्भ होते पण त्याच बरोबर नवनिर्मितीचे चित्रपट क्षेत्राला वेगळे वळण देणारे तंत्रज्ञानही होते. ब्रेथलेसमध्ये नायकाचे कॅमेरापुढचे स्वगत होते, कॅमेरा हाताने हाताळलेला होता, जम्प कट्स होते. अशा आगळ्यावेगळ्या दिग्दर्शकीय प्रयोगाने पुढील सातआठ वर्षे गोदार्द यांनी अनेक अप्रतिम अशा डझनभर चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा १९६३ साली प्रसिद्ध झालेला Le Mépris  (कंटेम्प्ट), १९६५ साली प्रसिद्ध झालेला  Pierrot le Fou या चित्रपटांनी ‘आधुनिक सिनेमाया प्रवाहावर शिक्कामोर्तब केले.

गोदार्द यांचे चित्रपटातून व्यक्त होणारे राजकीय दृष्टिकोन हा महत्त्वाचा मुद्दा होता. अल्जेरियाच्या स्वातंत्र्ययुद्धाला त्यांचा पाठिंबा होता. त्यांनी अखेरचा चित्रपट ‘विक एंड’ मधून वाढता ग्राहकवाद व बुर्झ्वा समाजावर टीका केली. कोणत्याही चित्रपटाच्या शेवटी ‘The End’ (समाप्त) अशी पाटी येते पण ‘विक एंड’मध्ये ‘The End Of Cinema’ (सिनेमा कलेचा अंत) अशी पाटी येते व चित्रपट संपतो.

गोदार्द यांचा चित्रपट समकालिन राजकीय व्यवस्थेवरच भाष्य करणारा होता. मे १९६८ मध्ये पॅरिस व युरोपमधील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, कामगार चळवळी उग्र झाल्या होत्या. त्याला गोदार्द यांचा पाठिंबा होता. त्यांनी त्रुंफाँ यांच्या मदतीने १९६८ सालचा कान चित्रपट महोत्सव बंद पाडला होता.

गोदार्द यांचे क्रांतीकारी व मार्क्सवादी विचार त्यांच्या चित्रपटात दिसत होते. १९६८ ते १९७३ दरम्यान अमेरिका-व्हिएटनाम युद्धावर त्यांनी जाहीरपणे टीका केली होती. त्यांनी पुढे १९७२मध्ये Tout Va Bien (जस्ट ग्रेट) नावाची मालिकाही बनवली होती. पण ७०च्या दशकानंतर गोदार्द यांचा मार्क्सवादी मूल्यांवरचा विश्वास उडाला होता.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0