मुंबईः जगप्रसिद्ध वेशभूषाकार व भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथय्या यांचे गुरुवारी मेंदूच्या दीर्घ आजाराने वयाच्या ९१ वर्षी निधन झाले
मुंबईः जगप्रसिद्ध वेशभूषाकार व भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथय्या यांचे गुरुवारी मेंदूच्या दीर्घ आजाराने वयाच्या ९१ वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी राधिका गुप्ता यांनी आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. गुरुवारी त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
८ वर्षांपूर्वी अथय्या यांना मेंदूत गाठ आली होती व ३ वर्षांपूर्वी त्यांना पॅरेलॅसिसचा झटका आल्याने त्यांच्या शरीराची एक बाजू निकामी झाली होती.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या विख्यात दिग्दर्शक रिचर्ड अटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून काम केल्याने भानू अथय्या यांचे नाव जगभर घेतले जाऊ लागले. ‘गांधी’ चित्रपटातील सर्व पात्रांची वेशभूषा अथय्या यांनी अस्सल वाटण्या इतपत ठेवली होती. त्यावेळी ऑस्करच्या स्पर्धेत त्यांना आव्हानही होते पण ‘गांधी’ चित्रपटातील कलाकारांची वेशभूषा काळानुरूप अस्सल व नैसर्गिक झाल्याने त्यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषाकाराचा ऑस्कर सन्मान मिळाला होता.
पण ऑस्कर मिळवण्याआधीच भानू अथय्या यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान मोठे होते. १९५६ सालच्या गुरु दत्त यांच्या सुपरहीट ‘सीआय़डी’ चित्रपटासाठी वेशभूषाकार म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाय ठेवले व पुढे १०० हून अधिक चित्रपटांवर आपली मोहोर उठवली.
त्या वेशभूषाकार असलेले ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चाँद’, पत्थर के सनम, ‘वक्त’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘आरझू’, ‘आम्रपाली’, ‘सूरज’, ‘अनिता’, ‘मिलन’, ‘रात औऱ दिन’, ‘शिकार’, ‘गाईड’, ‘तिसरी मंजिल’, ‘मेरा साया’, ‘इन्तेकाम’, ‘अभिनेत्री’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘गीता मेरा नाम’, ‘अब्दुल्ला’, ‘कर्ज’, ‘एक दुजे के लिए’, ‘रझिया सुलतान’, ‘निकाह’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘चांदनी’, हे चित्रपट गाजले होते. नव्वदच्या दशकात त्यांनी ‘अग्निपथ’, ‘अजूबा’ व ‘1942- ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटांसाठीही वेशभूषा केली होती. नंतर ‘लगान’, ‘स्वदेस’ या चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
मुळच्या कोल्हापुरच्या असलेल्या भानू अथय्या यांचे आडनाव राजोपाध्ये होते. २८ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा कोल्हापूरात जन्म झाला. कोणत्याही फॅशन स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलेले नव्हते. पण कठोर परिश्रम व प्रतिभावान कलात्मक दृष्टी या जोरावर त्यांनी हिंदी व आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये आपला दबदबा प्रस्थापित केला होता.
१९५०च्या दशकात आपले करिअर सुरू करणार्या भानू अथय्या यांनी गुरुदत्त, बीआर चोपडा, राजकपूर, विजय आनंद, यश चोपडा, राज खोसला, आशुतोष गोवारीकर अशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले होते.
१९९० मध्ये ‘लेकीन’ व २००१मध्ये ‘लगान’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
२०१२मध्ये त्यांनी आपल्याला मिळालेला ऑस्कर पुरस्कार सुरक्षित राहावा म्हणून तो अमेरिकेतल्या ऑस्कर अकादमीला सुपूर्द केला होता.
मूळ बातमी
COMMENTS