महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन

महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन

फुटबॉलमधील एक महान खेळाडू व अर्जेंटिना संघाचे माजी कप्तान दिएगो मॅरॅडोना (६०) यांचे बुधवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळल्या होत्या.

बुधवारी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त त्यांच्या निकटवर्तीयांनी दिले.

मॅरॅडोना फुटबॉल जगतातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जात असतं. अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करत १९८६च्या फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात मॅरॅडोना यांचा सिंहाचा वाटा होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर गोल करताना त्यांच्या हाताला फुटबॉलचा स्पर्श झाला होता पण पंचांच्या नजरेतून तो प्रसंग सुटला होता. पण पंचांच्या या चुकीमुळे अर्जेंटिनाला निर्णायक गोल करता आला. मात्र या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या विस्मयकार खेळीने त्यांचे नाव घराघरात पोहचले होते. लोकप्रियतेचा उच्चांक त्यांना या खेळामुळे गाठता आला होता.

मॅरॅडोना यांनी अर्जेंटिनाचे ४ विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्व केले होते. १९९०मध्ये त्यांनी अर्जेंटिनाला अंतिम फेरी नेले होते पण प. जर्मनीने या सामन्यात अर्जेंटिनाला हरवले. नंतर १९९४च्या अमेरिकेतील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी पुन्हा नेतृत्व केले होते. पण त्यावेळी अमलीपदार्थ चाचणीत ते सापडले व त्यांना मायदेशी परतावे लागले.

अर्जेंटिनाकडून ९१ सामने ते खेळले त्यात त्यांनी ३४ गोल मारले.

मॅरॅडोना यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त होते. त्यांना कोकेनचे व्यसन लागले. त्यात त्यांना बराच संघर्ष करावा लागला. या व्यसनापायी त्यांना १५ वर्षांसाठी फुटबॉल सोडावे लागले. अखेर १९९७मध्ये त्यांनी फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली. २००८मध्ये ते अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. नंतर २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत जर्मनीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी हे प्रशिक्षकपद सोडले. पुढे मॅरॅडोना यांनी संयुक्त अरब अमिरात व मेक्सिको संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

बार्सिलोना व नापोली या दोन फुटबॉल क्लबकडून ते अनेक वर्षे खेळत होते.

मूळ बातमी

COMMENTS